"माई,काय झाले ग तुला. फिरकली नाही अजिबात घराकडे. समद ठिक हाय ना."
" ठिकच हाय. काय बोलायचं आता आणि काय नाय कळेना झालय बघ. जीव नुसता घाबरा-घुबरा झालाय इचार करु करु."
" एवढा कसला इचार करती माई."
" अग एका आईला आपल्या पोरांबिगर दुसर काय दिसत का या दुनियेत. माझ पोरग श्याम आणि सून पारु हिचा इचार चालला मनात."
" काय झाल त्यांना. तब्येत बरी हाय ना? त्यांची."
" ते समद ठिक हाय ग. पण.. "
" अस मधेच काय थांबायली. बोल ना."
" सांगू का नको कळना झालय."
" आता तुझ्या मैतरीण जवळ मन नाय रीकाम करणार तर कोणापाशी बोलणार हाय. आधी आबा व्हत तर त्यांच्या जवळ मन रीकाम करत व्हती तू."
" खर हाय बघ. आता कोणापाशी मन मोकळ करायच म्हणून मनातल्या मनतच कुढत बसलयी बघ म्या."
" अस नको करु. मला तर सांगशिल का नाय? काहीतरी उपाय असलच की यावर. तू सांगितल्या बिगर वाईज ठाऊक होणार का मला."
" तुला तर माहितच हाय पारु गरोदर हाय ते. कालच तिची डिलीवरी झाली. तिच्या माहेरा हाय."
" अग मग एवढी आनंदाची बातमी म्हणून तू घरलाच बसली का? यासाठी आली नाय का भेटाया."
" अग काय सांगू बातमी आनंदाची हाय का दु:खाची."
" बाळ-बाळंतिण सुखरुप हाय ना. त्यांना काय दुखापत झाली का? "
" त्या दोघी बी ब-या हाय."
" अग मग अडचण काय हाय."
" माझ्या श्यामला परत तिसरी मुलगीच झाली अग." पदर डोळ्याला लावून माई रडत होत्या.
" पोरी म्हणजे लक्ष्मीच रुप दुसरं. तिच आनंदान स्वागत करायला हव."
" खर हाय पण आधीच दोन लक्ष्मी हायती घरात सरला अन विमला. आता परत एक. जरा मुलगा होवून मला नातू लाभला असता तर, घराण्याला वारस लाभला असता."
" पोरी काही कमी नाय बघ आताच्या वक्ताला. पोरी बी पोरांइतकचं काम करुन पैक कमावतात."
" दुस-याचचं धन हाय ते. कमावून थोडी आपल्याला देणार हाय का त्या. पोरग कस आपल्या घराचा वारसा जपत. कुलाचार समद्या कुटूंबा सकट करतात. पोरी असल्या तरी आपल्या जवळ सूनाच राहतात. पोरी लगेच सासरहून कधी यायच्या."
" लय दुरचा इचार करायला लागली माई. अजून पोरी चालयाला लागल्या आताशी. तू पार त्यांच्या लग्नापथोर जावून पोहचलीस."
" मनात एक एक इचार डोकावत असतात. आणि डोक्यात नुसता पिंगा सुरु असतो बघ."
" बर ते सोडा सगळे. श्यामच यावर काय म्हणन हाय."
" तो काय माझ्या शब्दापुढे हाय का? त्याला तर एकच पोरगी बास व्हती. तिलाच शिकून मोठी अफसर करल अस म्हणत होता."
" बरोबरच हाय त्याच."
" हाय का आता, समजून सांगितल तुला तरी बी इचारती एकच पोर बास ते."
" आपला जमाना वेगळा व्हता. आपण न शिकलेलं. घरचे जे सांगतिल तसच करायचो. घरची काम आवरुन शेताला जायचो. पण आताच वाईस वेगळ हाय. खर्च वाढलाय. आपलं कुटूंब कमी पैकात बी चालायच. आता तेच पैक एका महिन्यात संपून जातय बघ. किराणा, भाजीपाला. कुटूंबाची जबाबदारी झेलून संसार करण जिकीरीच झाल हाय."
" अग मग कमावतो कशाला. पोटापाण्यासाठीच ना. आणि कुटूंबाकरताच. मग पैक पैक काय करत बसायच. जमाना बदलला तरी बी लोक आताच्या जमान्यानुसार थोडीच वागतात. आपल्या रीतीभाती, चालीरीती पाळतातच की समद्या."
" तुला सांगून काय फायदा नाय बघ. तुला वाटेल तशीच वागत राहशील. मी आपलं समजूतीच्या गोष्टी तुला सांगा मला आले व्हते. पण हित तुला सांगून माझ्या तोंडाला फेस यायचा बाकी हाय बघ. "
" काय ओ मावशी काय झाले. कोणाच्या तोंडाला फेस यायचा बाकी आहे."
" श्याम तू हायस का. तुझी मंडळी आणि बाळ कस हाय."
" एकदम मस्त आहे बघ. "
" बर झालं लेका. अर कोणाच्या तोंडाला फेस यायाचा म्हणून काय इचारायला. माझ्याच बघ. "
" का ग मावशे. काय झाले. घरी सगळे ठिक आहे ना. तुझी तब्येत बरी आहे ना. मधे तुला बीपी चा त्रास झाला होता. आता बर वाटतय ना तुला."
" मी आता गोळ्या खावून ठणठणीत हाय बघ. मला काय धाड भरलीये. अरे ही माई बघ की, सारख आपलं नातू पाहिजे म्हणती. आता सोन्यासारखी लक्ष्मी घरात आली तर हिनं आमच्याशी बोलणं बी टाकलय. पहिल्यासारखी बोलायला, भेटायला येत नाही. म्हणलं आपणचं जाव माईची ख्याली खुशी पाहाया."
" तिला तर मी ओरडून ओरडून थकलोय पण आमची हाक तिच्या पर्यंत पोहचतच नाही बघ. कस आणि कोणत्या भाषेत समजवायच अजून हिला. आबा आज असते तर त्यांनी तिला बरोबर समजावल असत. त्यांच्या शिवाय ती देखील कोणाचचं ऐकत नव्हती."
" चल पोरा आता येते मी. लय उशीर झालाय आता."
" अग चहा पाणी तरी पिऊन जा." नाहीतर जेवण करुनच जा आता."
" म्हतारीची मस्करी करतस व्हय रं. जेवायला येईल मी. माझ्या सुनेच्या हातचं खायला. आणि नात बघाया येईल."
" म्हाय हातचं खाल्ल तर तुला काय कडू लागतय का."
" तस नाय ग. "
" तुही सून घरी येईपथोर तू काय मला भेटाया येणार नाय का? "
"तू जर घरात एकला इचार करत बसून राहलीस तर मी नाय यायची. तूच येत जा. शेजारची मंदा बी तुला इचारत व्हती. उद्या मार चक्कर मग. "
माई घराबाहेर पडून पूर्वी सारखी वागल का? श्यामच्या बोलण्याने माई आपला विचार बदलतील का? पाहूया पुढच्या भागात.
क्रमशः
अष्टपैलू लेखक स्पर्धा २०२५
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा