मी लाज टाकली.. भाग ३

व्यथा तिची


मी लाज टाकली.. भाग ३


मागील भागात आपण पाहिले की रेखाला झिडकारून जयेश निघून जातो. आता बघू पुढे काय होईल ते..


" गुड मॉर्निंग मॅम.." सकाळी सकाळी रेखाचा फोन वाजला. रात्रभर रडून तिचे डोळे सुजले होते. काल झालेला अपमान शरीरभर पसरला होता. कोणाशीही बोलायची इच्छा नव्हती. नाईलाजाने हा फोन उचलावा लागला होता.

" बोल सुमेध." बाहेर बसलेल्या जयेशने हे नाव ऐकले. आणि कान टवकारून रेखाचे संभाषण ऐकू लागला. त्याला खरंतर फक्त रेखाचे बोलणे ऐकू येत होते. पण उत्सुकता खूप होती त्यामुळे जमेल तेवढे ऐकत होता.

" मॅम, थोडे काम होतं माझं.."

" बोल ना मग."

"मॅम , तुम्हाला माहित आहे ना माझे लग्न ठरले आहे.. तर माझ्या होणाऱ्या बायकोचा परवा बर्थडे आहे. मला तिला छानसे गिफ्ट द्यायचे आहे. तुम्ही मला दिलेले गिफ्ट तिला खूप आवडले. सो एक रिक्वेस्ट होती. तुम्ही मला गिफ्ट घ्यायला मदत करू शकाल का? मला तिला छानसे सरप्राईज द्यायचे आहे."

" मला ना आज बरं नाहीये. नाहीतर मी नक्की आले असते सुमेध. मी तर आज ऑफिसला सुद्धा येणार नाहीये." रेखा आवाजावर ताबा ठेवत म्हणाली..

" काही सिरियस मॅम?"

" नाही रे.. जास्त काही नाही.. थोडे डोके दुखते आहे. बाहेर जायची इच्छा नाही."

" मॅम, असे असेल तर फक्त दोन तास काढा ना माझ्यासाठी. तुमच्या सारखा चॉईस कोणाचा नाही. प्लीज... ते म्हणतात ना शॉपिंग करून बायकांची दुखणी पळून जातात." सुमेध मस्का मारत बोलला. रेखाला हसायला येऊ लागले. लग्नाआधी किती ती होणाऱ्या बायकोची मर्जी राखायची आणि लग्नानंतर?

" बस..बस.. जास्त मस्का नको मारूस. येते मी. दादरला भेटू." फोन ठेवत रेखा म्हणाली. तिने फोन ठेवला हा जयेशला समजले. तो पटकन बाजूला झाला. बरं नाहीये असे सांगून ही त्या सुमेधला भेटायला चालली आहे एवढेच त्याला समजले. तो पेपर समोर घेऊन विचार करायला लागला. तोपर्यंत रेखा तिचे आवरून चहा घेऊन आली होती. काहीच न बोलता तिने चहाचा कप समोर ठेवला. तो ठेवताना कुठेही आपला स्पर्श जयेशला होणार नाही याची काळजी घेतली. जयेशचा पुरूषी अहंकार चांगलाच जागा झाला होता. ती बोलली नाही म्हणून तो ही बोलला नाही. रेखाने त्याचा डबा करून दिला आणि ती आरामात पुस्तक वाचत बसली. न राहवून शेवटी जयेशने विचारलेच,
" आज ऑफिस नाही वाटते?"

" नाही जाणार." त्याच्याकडे न बघताच रेखा उत्तरली. खरेतर तिचे अंग असुसले होते जयेशच्या स्पर्शासाठी. पण काल झाला तसा अपमान परत करून घ्यायचा नव्हता तिला.

" बरं आहे तुमचे. हव्या तेव्हा सुट्टया मिळतात." परत तसेच शब्दांचे काटेरी बाण टोचत जयेश बोलला. डोळ्यातले पाणी तिने कसेबसे रोखले. तो जाताच
तिने घर आवरून बाहेर जायची तयारी सुरू केली. ऑफिसला न जाता घरा समोरच्या रस्त्यावर कार मध्ये बसलेला जयेश स्वतःशीच बेचैन झाला होता. काल बोललेल्या स्वतःच्याच शब्दांची त्याला लाज वाटत होती. काल रेखाला बघून त्यालाही तिला जवळ घ्यावेसे वाटले होते. पण.. परत तो पुरूषी अहंकार. तिने पुढाकार घेतलेला त्याला पटला नव्हता. तिने ते शब्द मनावर घेतलेत की काय? रेखा तशी नाही. तरिही. भांडण झाल्यावर ती नेहमी माझ्याशी स्वतःहून बोलायला येते. आज नाही आली. माझा स्पर्शही टाळला. ती खरेच दुसऱ्याकडे जाईल? जयेशची बेचैनी वाढत होती.

काय करू सुचत नसतानाच जयेशला बिल्डिंगमधून रेखा उतरताना दिसली. नेहमीचेच कपडे, नेहमीचीच वेशभूषा. पस्तिशीतही ती छान दिसते आहे. जयेशने स्वतःशीच कबूल केले. कितीतरी दिवसात त्याने धड तिच्याकडे पाहिलेही नव्हते. त्याचे त्यालाच जाणवले. आधी आधी ती पार्लरमध्ये आयब्रो करून आली तरी मी कशी दिसते विचारायची. आपण काहीच बोलत नाही हे बघून आता तिने ते विचारायचेही सोडून दिले होते. आपल्या चुका त्याला टोचायला लागल्या होत्या. नेहमी बस, ट्रेनने जाणार्‍या रेखाने टॅक्सीला हात केला. तेव्हा मात्र आपल्या संसाराचे काही खरे नाही याची त्याला खात्री पटली. आता न बोलता त्याने तिचा पाठलाग करायचे ठरवले.


जयेशला करेल का कबूल त्याची चूक रेखासमोर? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all