Login

मी परकी भाग 1

About Relation
विषय : परकी


"अगं मनिषा, पुढच्या आठवड्यात गणपती बसत आहेत. आपल्याला आतापासून काही तयारी करावी लागेल ना?"

सचिन आपल्या बायकोला मनिषाला म्हणाला.

"हो, माझे आजच बोलणे झाले सायलीशी. आम्ही दोघीजणी करू तयारी. सायलीला डेकोरेशनचे काम छान जमते. ती ते आवडीने करेल. अधूनमधून मी मदत करेल तिला. इतर कामेही हळूहळू करत आहोत आम्ही."

मनिषाने गणपतीसाठीची पूर्वतयारीची माहिती सचिनला सांगितली.

"तुम्ही दोघे सर्व छान सांभाळून घेतात; त्यामुळे बाहेरील कामे सोडली तर आम्हां दोघ भावांना जास्त काही करावे लागत नाही. हुशार व गुणी बायका मिळाल्या आम्हा दोघ भावांना."

मनिषाने सांगितलेले ऐकून,सचिन आनंदाने व गंमतीने म्हणाला.

"उत्सव, सण म्हटलं की सर्व मिळून करण्यात एक वेगळीच मजा असते! काय गं सायली, बरोबर ना?"

मनिषा आपल्या लहान जावेला सायलीला म्हणाली.

"हो वहिनी, खरे आहे तुमचे म्हणणे."

सायली मनिषाला म्हणाली.

"कशावरून चर्चा सुरू आहे आज?"

असे म्हणत बाहेरून आलेला सागर, या तिघांच्या चर्चेत व गप्पागोष्टीत सहभागी झाला.

चौघांची हसत, थट्टा मस्करी करत गप्पांची छान मैफील जमली होती.

त्यांचे हे सर्व बोलणे ऐकून, किचनमध्ये भांडी धुत असलेल्या, सविताच्या चेहऱ्यावर दुःख व रागाचे भाव उमटत होते.

'चौघेजण कसे त्यांचे त्यांचे निर्णय घेतात, मला काही विचारत नाही.वहिनी तर दुसऱ्या घरातून आलेल्या असतात,परक्याच असतात; पण माझे सख्खे भाऊही मला विचारत नाही. का विचारतील म्हणा! त्यांच्यासाठी आता मी परकी आहे ना!'

या विचारातच सविताने आपले काम कसेतरी आटोपले व आपल्या रूममध्ये रागातच जाऊन बसली.

मनातले दुःख तिच्या डोळ्यातून अश्रू रूपाने वाहत होते.

'मन कितीदा दुसरीकडे रमवण्याचा प्रयत्न करते पण नकोसा भूतकाळ पुन्हा आठवतोच. माझ्या बाबतीत देवाने असे का केले?
हा प्रश्न नेहमी माझ्या मनात नेहमीच येतो.'

सविताला पुन्हा आपला भूतकाळ आठवू लागला.

'इतर मुलींप्रमाणे माझीही संसाराची खूप सारी स्वप्न होती.
जेव्हा घरात माझ्या लग्नाविषयी बोलणे सुरू झाले तेव्हा आई-वडिलांचे घर सोडून जायचे म्हणून वाईट वाटत होते.

'मुलींना एक दिवस लग्न करून आपल्या स्वतःच्या घरी जावेच लागते.'

असे सर्व आई-वडील आपल्या मुलींना समजावून सांगतात.

मलाही असे सांगण्यात आले.

नवे घर,नवी नाती जोडताना, कधी दुःख मिळते तर कधी आनंदही!

माझ्या नशिबात आनंद कमी.. दुःखच जास्त होते.
मुलीला सासर चांगले मिळाले की सासरच्या लोकांचे खूप कौतुक होते; पण सासर चांगले नाही मिळाले तर मग मुलीच्याच नशिबाला दोष दिला जातो.