Login

मी परकी भाग 2

About Relation

माझे नशीब चांगले नव्हते म्हणून मला नवरा चांगला मिळाला नाही. त्याला दारूचे व्यसन होते. हे आम्हांला लग्नानंतर कळाले. नशिबाचे भोग म्हणून आणि कधीतरी तो सुधारेल या आशेवर मी संसार करत होती. पण माझ्या नशिबात सुख नव्हतेच. माझा नवरा सुधारला तर नाही उलट दारूच्या व्यसनामुळे आजारी पडून आम्हांला कायमचा सोडून गेला आणि जाताना दोन मुले माझ्या पदरात टाकून गेला.

'आमचा मुलगा मेला आणि तुझ्यामुळेच तो गेला'

असे आरोप करत माझी व माझ्या दोन्ही मुलांची जबाबदारी सासरच्‍यांनी टाळली.
येथेही माझे नशीब आडवे आलेच.

अशा बेजबाबदार सासरला कायमचे सोडून, दोन्ही मुलांना घेऊन मी कायमची माहेरी आली.

दुसरे लग्न करायची मुळीच इच्छा नव्हती. सासरकडून काही मदत मिळेल अशी अपेक्षाही नव्हती. अशा प्रसंगात आई-वडील व दोन्ही भाऊ खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहिले. त्यामुळे मला जगण्याचे बळ मिळाले. माझ्या मुलांना छत्र मिळाले. त्यांना आजी आजोबा व मामांचे प्रेम मिळू लागले.


दोन वर्षांनी मोठ्या भावाचे सचिनचे लग्न झाले. मनिषा मोठी सून म्हणून तिच्या हक्काच्या घरात आली.

सचिनचे लग्न झाले व मला वहिनी आली. याचा एकीकडे मला आनंद होत होता; पण माझ्या मनात परकेपणाची भावना ही येत होती. हे घर आपलं नाही. आता हे सर्व मनिषाचे आहे.

मुलीचे जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंतच आई-वडिलांचे घर हे तिचे असते आणि लग्न करून ती सासरी गेली की सासरचे घर तिच्यासाठी स्वतःचं असतं आणि आई-वडिलांचे घर तिच्यासाठी परक होऊन जातं.

ती माहेरच्यासाठी पाहुणी होऊन जाते. सासरचे घर हे तिच्या हक्काचे असते.

माझ्यासाठी तर आता दोन्हीही घरे हक्काची राहिली नाही.
दोन्हीकडे मी आता परकीच आहे. असे मनाला वाटत होते.

आई-वडिलांवर मुलगा म्हणून प्रेम करणारा, त्यांचे ऐकणारा व माझ्यावरही भाऊ म्हणून प्रेम करणारा सचिन,आता मनिषाचा नवरा ही होता. बहिण म्हणून त्याची काळजी घेणे व त्याची विचारपूस करणे हे सर्व मी अगोदर करत होती. तोही अनेकदा माझे मत विचारायचा, कधी सल्ला घ्यायच; पण मनिषाच्या येण्याने त्याला आता बहिणीच्या मताची व सल्ल्यांची गरज वाटत नव्हती.

मनिषा खूप चांगली आहे. ती कधी मला दुखवत नाही.

मी सासरी असते आणि जेव्हा माहेरपणाला आली असती तेव्हा माझ्याशी सर्वजण किती छान वागले असते! माझे किती कौतुक केले असते! पण आता मी कायमची इथेच राहत होती; त्यामुळे मला ते प्रेम मिळणार नाही हे मला कळत होते. मी फक्त त्यांची एक जबाबदारी होती आणि ते सर्वजण छान पद्धतीने पूर्ण करत होते. आई वडील दोन्ही भाऊ व मनिषा हे सर्वजण मला कधी कोणत्या शब्दांनी दुखवत नाही; पण या सर्वांमध्ये राहूनही मी स्वतःला परकी समजते.

क्रमश :
नलिनी बहाळकर
0

🎭 Series Post

View all