सागरचे लग्न झाले व सायली लहान सून म्हणून आमच्या घरात आली.
मुलीचा संसार व्यवस्थित झाला नाही; पण आपल्या दोन्ही मुलांचे लग्न होऊन सुना घरी आल्या. याचा माझ्या आई-वडिलांना आनंद होत होता. माझ्या मुलांचे ते आजी आजोबा होतेच आणि आता सचिनच्या मुलाचे वेदांतचे पण आजी-आजोबा झाले होते. सचिन व मनिषा वेदांतचे आई-बाबा म्हणून त्याचे लाड करीत होते;पण माझ्या मुलांनाही मामा-मामीचे प्रेम देत होते. सर्व काही चांगले होते; पण माझ्या मुलांना वडिलांचे प्रेम मिळत नव्हते. याचे मला वाईट वाटत होते.
माझे स्वतःचे घर असते, संसार असता... तर मी माझ्या पद्धतीने, माझ्या विचाराने व मला आवडते तसे सर्व काही केले असते. माझ्या मुलांच्या बाबतीतले निर्णय मी घेतले असते. त्यांच्यासाठी काहीतरी वेगळे केले असते; पण घरात आमच्या तिघांची जबाबदारी व खर्च यामुळे अगोदरच मला ओशाळल्यासारखे वाटते. त्यामुळे मी मनातील सर्व इच्छा मनातच ठेवते. आपल्याला व आपल्या मुलांना जे सुख मिळते आहे, त्यातच समाधान मानते.
नातेवाईक व इतर लोकांना माझी कहाणी ऐकून वाईट वाटते; पण माहेरचे खूप चांगले आहेत. हे पाहून त्यांना समाधानही वाटते.
"तुझे भाऊ-बहिणी खरंच खूप चांगले आहेत."
असे मला सर्वजण म्हणतात.
वरवर जरी सर्व चांगले दिसत असले तरी मला आपलेपणा वाटतच नाही.
का कुणास ठाऊक? पण मनात परकेपणाची भावना वाटते.
माझे लवकर लग्न झाले आणि शिक्षणही अपूर्ण राहिले. काहीतरी उद्योग करून आपली जबाबदारी आपण पूर्ण करावी. असे मी ठरवले. त्यामुळे शिवणकाम शिकले आणि शिवणकाम करू लागले. घरातील थोडफार काम, मुलांचे आवरणे व नंतर माझे हे शिवणकाम. यात दिवस जाऊ लागला.
मनिषा व सायलीचे शिक्षण चांगले झालेले आहे. दोघींचे विचार छान जुळतात. दोघीजणी जावांपेक्षा बहिणीच जास्त वाटतात. एकमेकांना विचारून घरातील कामे व निर्णय घेत असतात. माझे विचार त्यांच्याशी जुळत नाही त्यामुळे मी त्यांना काही सांगत नाही, विचारत नाही आणि त्याही मला काही विचारत नाही.
आजच्या काळात चार दिवस नणंद माहेरी आली तरी वहिनी तिचा कंटाळा करते. मी तर माहेरी आयुष्यभरासाठी आली आहे व तेही दोन मुलांना घेऊन.
आई-वडिलांनी, भावांनी व वहिनींनी माझी परिस्थिती जाणून घेतली. प्रेम व नात्याच्या भावनेतून आणिआपले कर्तव्य समजत मला ते सर्व मदत करत आहेत. माझ्यामुळे या सर्वांना नक्कीच त्रास होतो आहे. पण ते तसे कधी दाखवत नाही. ते जाणवू देत नसले तरी मला नक्कीच जाणवत असते. पण घरात असे काही सण उत्सव असले, काही निर्णय घ्यायचे असले तर मला काही विचारीत नाही. याचेच खूप वाईट वाटते.'
या विचारातच सविता झोपून गेली.
क्रमश :
नलिनी बहाळकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा