Login

मी परकी भाग 4

About Relation

"वहिनी, मला ना ताईंची कधी खूप दया येते आणि कधी खूप रागही येतो. त्यांच्यावर असा वाईट प्रसंग आला. नवरा व्यसनी होता आणि तो ही गेला. सासरच्‍यांनी जबाबदारी नाकारली आणि पदरी दोन मुले. हे सर्व पाहून एक स्त्री आणि आपली नणंद म्हणून त्यांच्याविषयी खूप सहानुभूती वाटते; पण त्यांचे वागणे व बोलणे पाहिले की, खूप राग येतो. आपल्याशी त्या परकेपणाने वागत असतात असे वाटते."

सायली आपल्या जावेला मनिषाला म्हणाली.


" तू जे म्हणते आहे, ते मलाही माहित आहे. मलाही त्यांच्याबद्दल वाईट वाटते. त्यांच्याबाबतीत असे घडायला नको होते. नवर्‍यापासून त्यांना काही सुख नव्हते आणि व्यसनामुळे तो तर गेला ; पण ताईंच्या सासरच्यांनी नातवंडांची सुद्धा काही जबाबदारी स्वीकारली नाही. त्यांच्याही मुलाची मुले आहेत ना? सांभाळणे तर दूरच पण काही इतर मदत सुद्धा केली नाही. सासरचे असे वागले म्हणून माहेरच्यांना थोडीच असे वागावे लागेल? मुलीकडे व नातवंडांकडे पाहून आई-वडिलांना वाईट वाटते. भावांनाही बहिणीची काळजी आहेच. त्यामुळे माहेरी ताईंची व त्यांच्या दोन्ही मुलांची काळजी घेतली जात आहे. नातेवाईक व इतर लोकांना ताईंबद्दल व त्यांच्या मुलांबद्दल सहानुभूती वाटणे साहजिकच आहे आणि असे लोक माहेरच्यांना कधीकधी मोफत सल्लेही देत असतात.

ताई या घराची मुलगी आहे पण आता आपण या घराच्या सुना आहोत. त्यांच्याबद्दलच्या सहानुभूतीमुळे आपल्यावर अन्याय होऊ नये असे मला वाटते.
आई बाबा तर ताईंचा व त्यांच्या मुलांचाच विचार करत असतात. आपण ताईंना व त्यांच्या मुलांना कधीही कोणत्याही गोष्टीचे कमी पडू देत नाही; पण तरीही आई-बाबा आपल्या दोघींना काही कळू न देता, आपल्या दोन्ही मुलांकडून पैसे घेत असतात. ताईंच्या नावे व मुलांच्या नावे बँकेत पैसे जमा करत असतात. आपल्या मुलांपेक्षा त्यांच्या मुलांचे जास्त लाड करत असतात.

त्यांना वाटते आपल्या सुनांना काही कळत नाही ; पण मला सर्व समजते. ताईंना व त्यांच्या मुलांना आपण कधीही परकेपणाची जाणीव होऊ दिली नाही. आपल्याप्रमाणेच ताईंना सर्व घेत असतो व आपल्या मुलांसारखे त्यांच्या मुलांचे सर्व लाड करीत असतो. त्यांची मुले आपली समजून आपण स्वतःला एकच मूल होऊ दिले. एवढे सर्व आपण चांगले वागूनही, आई-बाबा व ताई आपल्याशी व्यवस्थित वागत नाही. परकेपणानेच वागत असतात. ताई कधी मनमोकळेपणाने बोलत नाही. आपण काही विचारले तर व्यवस्थित काही सांगत नाही. मग आपणच का नेहमी नेहमी त्यांना भाव देत राहायचे. म्हणून आता मी त्यांना काही जास्त विचारत नाही. आपले जे कर्तव्य आहे ते करत राहते."

मनिषाने आपल्या मनातील सर्व सायलीला सांगितले.


क्रमश :
नलिनी बहाळकर
0

🎭 Series Post

View all