Login

मी परकी अंतिम भाग

About Relation

"आई बाबा व ताईंचे वागणे मलाही खटकते. आई बाबांच्या बोलण्यात ताईंविषयी नेहमीच सहानुभूती व काळजी दिसते. ' तिचे चांगले असते, तिचा स्वतः चा संसार असता तर कशाला माहेरी येऊन राहिली असती? तिच्या नशिबात सुख नव्हते.' असेच नेहमी बोलत असतात.
जसे इथे त्यांना खूपच त्रास आहे. असे दाखवतात. उलट त्यांना आपण किती समजून घेत असतो. आनंद देण्याचा प्रयत्न करत असतो. अनेकदा मी बोलण्याचा प्रयत्न करते; पण उगाच घरात वाद होतील. लोकांची त्यांच्याबद्दलची सहानभूती अजून वाढेल व आपण वाईट ठरू आणि दोघे भाऊही आपल्यालाच रागावतील ते वेगळेच! उगाच घरातील हसरे वातावरण दु:खी होऊन जाईल. या विचाराने मी अनेक गोष्टी दुर्लक्षित करते व शांत राहते."

सायली मनिषाच्या म्हणण्याचे समर्थन करत म्हणाली.

मनिषा व सायलीच्या समजूतदारपणामुळे त्यांच्या घरात शांती, सुख व समाधान होते.

अशीच वर्षामागून वर्षे जात राहिली.

मुले मोठी होत होती.

सविताची दोन्ही मुले, मनिषाचा वेदांत व सायलीची आर्या सर्व मुले खूप हुशार होती.
सर्वजण चांगले शिक्षण घेत होते.
या मुलांचेही एकमेकांशी छान जमत होते.


इतर सर्व सणांप्रमाणे,
रक्षाबंधन व भाऊबीज हे सण आनंदाने घरात साजरे होत होते.

दोन्ही भाऊ आपल्या ताईला नेहमीच काहीतरी वेगळी भेटवस्तू द्यायचे जेणेकरून ती आनंदी होईल.

यावर्षी रक्षाबंधनाला त्यांनी ताईला एक अनोखी भेट दिली.

ताईला त्यांनी एक छोटेसे घर घेऊन दिले.

ही अनोखी भेट पाहून ताईने त्यांना विचारले,

"माझ्यासाठी एवढं सर्व का?"

तेव्हा दोन्ही भाऊ म्हणाले,

"तुझी मुले मोठी होत आहेत. काही वर्षात त्यांचे लग्न होईल. त्या हेतूने आणि आता तुलाही तुझे हक्काचे घर हवे ना? तुझ्या सासरच्यांनी तुला परके समजले; पण आम्ही तुला कधी परकी समजलेच नाही. आमच्याकडून होत गेले तेवढे आम्ही तुझ्यासाठी केले आणि यापुढेही करत राहू."


भावांचे बोलणे ऐकून,


'सासरच्यांनी मला व माझ्या मुलांना परकेपणाची वागणूक दिली; पण माझ्या माहेरच्यांनी मला नेहमीच आपलेपणाची वागणूक दिली आणि मी कायम या घरात स्वतः ला परकी समजत आली. मी आपलेपणा कधी दाखवलाच नाही.'

सविता असा विचार करू लागली व तिच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या.

हे अश्रू आनंदाचे, दु:खाचे की पश्चातापाचे?

हे तिला समजत नव्हते.


समाप्त
नलिनी बहाळकर
0

🎭 Series Post

View all