मी तुला माझ्यात जपणार आहे…
नंदिनी कथेत आपण त्याचं निस्वार्थ प्रेम बघितलेय, या कथेत तेच निस्वार्थ प्रेम, पण तिचं.
भाग १
पनघट पे आके सैयां मोड़ दे बैयाँ
एंड एवरीबॉडी क्रेजी ओन राधा
छेड़े है हमका देयां बैरी कन्हैया
एंड एवरीबॉडी क्रेजी ओन राधा
होगा वोह लाखों दिल का चोर
हमका तो लागे बोर
हुआ है ऐसे बावला जो कहता जाए
ओ राधा तेरी चुनरी
ओ राधा तेरा झल्ला
ओ राधा तेरी नटखट नजरिया…
"मीराऽऽऽ मीराऽऽऽ….
मीराऽऽऽ मीराऽऽऽ…. "
मेडिकल कॉलेजच्या एका भव्य ओपन स्टेडियमध्ये फायनल इअरच्या विद्यार्थ्यांचा घोळक्यातून तालासुरात "मीरा" नाव घुमत होते. समोर स्टेजवर एक २०-२१ वर्षाची तरुणी, जवळपास ५'३" उंची असावी, गव्हाळ रंग, आकर्षक चेहरा त्यात भरपूर आत्मविश्वास, हसली की दोन्ही गालांवर खळी पडलेली, डार्क जीन्स, त्यावर क्रिमिष रंगाचा टॉप कम शर्ट, बाह्या वर पर्यंत फोल्ड केलेल्या, लांब सिल्की काळेभोर केस वरती थोडे पिनप करून बाकी मोकळे सोडलेले, गळ्यात दोन्ही खांद्यावरून समोर आलेली लाल रंगाची काचेचे वर्क असलेली बांधणीची ओढणी, आणि डोळ्यांवर काळा गॉगल, सुरू असलेल्या गाण्यावर ताल धरत नाच करत होती. सोबतीला काही मुलंमुली सुद्धा होती. बहुतेक कुठल्यातरी डान्स कॉम्पिटीशनची प्रॅक्टिस सुरू होती. तिचा नाच इतका सुंदर होता की सगळे मंत्रमुग्ध झाले होते, आणि फक्त "मीरा मीरा" करणं सुरू होते. पण त्या मीराचे मात्र पूर्ण लक्ष समोर उभा असलेल्या तिच्या श्री वर होते. ती अगदी त्याच्या नजरेला नजर भिडवत डान्सच्या एक एक स्टेप्स घेत होती.
श्रीला मात्र तिच्या नजरेत दिसत असलेल्या प्रेमाचा त्रास होत होता. तो स्तब्ध उभा कधी तिच्याकडे बघत तर कधी आपली नजर खाली झुकवत होता.
आता तर मीरा चक्क स्टेजवरून खाली उतरली आणि श्रीच्या भोवती येत डान्स करत होती, सोबत बाकी सगळ्या तिच्या मित्रमंडळीचे आपले 'मीराऽऽऽ मीराऽऽऽ' करणे सुरूच होते.
"Shri, I love you!" जोराने ओरडत मीरा श्रीच्या पुढ्यात आपल्या एका गुडघ्यावर येऊन बसली आणि गुलाबाचे फुल त्याच्या पुढे धरत त्याचा नजरेला नजर भिडवत म्हणाली.
वातावरण एकदम शांत झाले, पिन ड्रॉप सायलेन्स म्हणतात अगदी तसे वातावरण झाले होते. अधूनमधून येणाऱ्या हवेचाच जो काय थोडा आवाज घोंगावत होता.
आतापर्यंत चिअरप करणारी मुलं सुद्धा एकदम शांत झाली आणि सगळ्यांची नजर श्री-मीरावर स्थिरावली होती. कारणही तसेच होते, अख्ख्या कॉलेजला माहिती होते, मीरा श्री वर प्रेम करते, तिला तो खूप आवडतो, ती त्याला अगदी जीवापाड जपते. पण त्यांना हे सुद्धा माहिती होते, की श्री ला असला काही प्रकार आवडत नाही. तो नेहमीच मुलींपासून, या प्रेम प्रकरणापासून दूर असत. तसा तो खुप शांत मुलगा होता, पण अशा काही गोष्टी निघाल्या तर त्याची खूप चिडचिड व्हायची. त्याने एक दोनदा मीराला सुद्धा असे काही करतांना रागावले होते. आतापर्यंत मीरा त्याचा मागे मागे करत, त्याला त्रास देत, पण असे सगळ्यांसमोर तिने त्याला आज पहिल्यांदाच प्रपोज केले होते. त्यामुळे सगळ्यांची नजर त्या दोघांवर स्थिरावली होती. बऱ्याच वेळ दोघांकडूनही काहीच हालचाल होत नव्हती. ती गुलाब घेऊन त्याच्याकडे बघत खाली बसली होती, तर तो आपले दोन्ही हात आपल्या पाठीमागे घेत, हातात हात अगदी घट्ट पकडून, मान खाली झुकवून जमिनीकडे बघत होता.
"मीरा, हा तुझा हिरव्या डोळ्यांचा श्री, तुला हो म्हणायचा नाही."
"आय नो, तो खूप हुशार आहे, दिसायला छान आहे, पण तरीही किती अकडू, खडूस आहे, तू त्याच्याकडून होकाराची अपेक्षाच कशी केली?"
"आज भरी महफिल में तुम्हें रुसवाई हो जाएगी, तुम जिसे अपना कहती हो न और उससे भी बढ़कर अपनी जान समझती हो न, वहीं ये तुम्हारा श्री तुम्हारी जान ले जाएगा ।"
"श्री तर प्रेमाची मूर्ती आहे, सगळ्यांना स्वतःमध्ये सामावून घेतो. याच्या तर फक्त नावातच श्री आहे, बाकी प्रेम काय आहे याला तर माहिती सुद्धा नाही."
घोळक्यातून येणारे ते एक एक शब्द श्रीच्या हृदयावर तलवारीप्रमाणे घाव घालत होते. डोळ्यात कुठेतरी कोपऱ्यात पाणी जमा होऊ बघत होते. त्याने नजर उचलत तिच्याकडे बघितले, तर ती खूप आत्मविश्वासाने त्याच्याकडे बघत होती. तिचा तो आत्मविश्वास, त्याच्या काळजाला आणखी चिरत होता.
"श्रीच्या प्रेमात मीराला विषाचा प्याला प्यावा लागला होता. ये इतिहास है मेरी जान, और हिस्टरी अपने आप मे बार बार दोहराती रहती हैं."
"माझ्या श्री साठी मी विष पण प्यायला तयार आहे." मीरा श्रीच्या नजरेला नजर भिडवत म्हणाली.
"मी विष प्यायला तयार आहे", मीराचे हे शब्द त्याला असह्य झाले, डोळ्यांची उघडझाप करत डोळ्यांच्या कोणात जमलेले पाणी डोळ्यातच विरले आणि त्याने तिच्या हातातले गुलाब घेतले.
"येऽऽऽ…", आनंदात ओरडतच मीरा जागेवरून उठली आणि उडी मारत आपले दोन्ही हात त्याच्या गळ्यात टाकत त्याला बिलगली. ती त्याला अशा पद्धतीने लटकली होती, की ती खाली पडू नये म्हणून त्याने आपला एक हात तिच्या कंबरेभोवती घेत तिला घट्ट पकडले.
मीराचा आनंद बघून तिथे उपस्थित सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला, कारण त्याचासाठी असलेली तिची तळमळ अगदी सगळ्यांनी बघितली होती. त्याचा मात्र हृदयात रडू आणि ओठांवर खोटं हसू होतं.
"डी जे वाले बाबू जरा गाना चला दो…" मीराची एक मैत्रीण ओरडली, तसे हायबिटस् साँग्ज सुरू झाले.
श्रीने मीराला खाली उतरवले, मीरा तर अक्षरशः त्याच्या भोवती फेर धरत नाचत होती, बाकी मित्रमंडळी सुद्धा तिला शामिल झाले.
ओ राधा तेरा झुमका
ओ राधा तेरा ठुमका
ओ पीछे पीछे सारी नगरिया….
सगळे मस्तीमध्ये बघून श्री मात्र तिथून हळूच बाहेर पडला.
"श्री, थँक्यूऽऽऽ…" मीरा त्याचा पाठीमागून आवाज देत आली.
"मीरा, असे काही नाही आहे, आणि हे तुला पण माहिती आहे." श्री.
"मग ते फुल तू….." मीरा.
"सगळ्यांसमोर मला तुझा इन्सल्ट करायचा नव्हता."
"पण, तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे, मला माहिती आहे."
"हो, पण ते प्रेम एक फ्रेंड सारखे आहे, त्यापुढे काही नाही."
"का? मी दिसायला हॉट नाही की काय?"
"आहेस."
"सेक्सी नाही?"
"मी तुला कधी त्या नजरेने बघितले नाही." श्री.
"बघ ना मग!" मीरा.
श्री चूप राहिला.
"मी सुंदर नाही?" मीरा.
"आहेस." श्री.
"मग, बघ अख्खं कॉलेज माझ्या मागे होतं."
"मी पण तेच म्हणतोय, त्यातलाच एक चांगला मुलगा निवड."
"मी तुझं आणि फक्त तुझंच स्वप्न बघितले आहे. आणि माझा लाईफ पार्टनर फक्त तूच आहेस."
"मीरा, उगाच हट्ट करू नको. मी तुला आधी सुद्धा सांगितले आहे, की मला हे लग्न वगैरे काहीही करायचे नाही."
"तर… नको करूयात लग्न. मला नकोय नवरा, मला माझा सोल्मेट हवा आहे. तू मला माझ्या सोबत हवा आहेस, माझा साथीदार बनून, कायमचा माझ्यासोबत."
"कळते आहे काय? तू नाही तर कोणी नाही. तू सोबत नाही तर मी पण नाहीऽऽऽ………"
"श्री….."
कोणीतरी त्याला आवाज दिला, तशी त्याची तंद्री तुटली आणि तो त्याच्या जवळपास पाच सहा वर्षापूर्वीच्या आठवणीतून बाहेर आला.
"तू सोबत नाहीस तर मी पण नाही…" मीराचा तो तेव्हाचा आवाज त्याचा कानात अजूनही फिरत होता. तो एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये बाप्पांच्या मूर्ती समोर उभा प्रार्थना करत होता. त्याच्या डोळ्यांत अश्रू होते, कंठ दाटून आला होता.
"हा आई?" श्री आपले डोळे पुसत म्हणाला.
"ती तुझी वाट बघतेय, चल लवकर." आई.
त्याने नकारार्थी मान हलवली.
"श्री, तू फक्त स्वतःचा विचार करतोय, तू इतका स्वार्थी कसा काय झाला?" आई.
"मी स्वार्थी नाही, मी पण तिचाच विचार करतोय." श्री.
"मग माझ्या सोबत चल." आई.
"माझ्यामुळे तिचं आयुष्य आधीच खराब झाले आहे, पुढे व्हायला नको."
"पुढील आयुष्यासाठी ती आधी जगायला तर हवी?"
"डॉक्टरांची बेस्ट टीम तिला अटेंड करत आहे, सगळं ठीक होईल."
"तुझ्यामुळे तिने आज हे आत्महत्येसारखं पाऊल उचललं आहे. तू इतका कसा काय आंधळा होऊ शकतो? तुला तिचं प्रेम दिसत नाही काय? काय तेच ते घेऊन बसला आहेस? आयुष्याची राखरांगोळी व्हायच्या आधी बाहेर पड त्यातून."
"आई, मी काय आहे, कसा आहे, तुला सगळं माहिती आहे. मी तिच्या या प्रेमासाठी बनलेलो नाही. मी तिच्या आयुष्यात परत गेलो तर तिचं पुढील आयुष्य सुद्धा बरबाद होईल."
"तू आधी एक डॉक्टर आहेस. तुझं पहिले प्राधान्य, लोकांचा जीव वाचवणे हेच असायला हवे, ना की प्रेम आणि बाकी गोष्टी." आई थोडी रागवत म्हणाली.
"आई, मी आधीच गेलो होतो, प्रसादने मला येऊ दिले नाही."
"नाही तेव्हा तू तिच्यासाठी प्रसादसोबत भांडत असतो, आणि आज त्याने येऊ नाही दिले, अन् तू त्याचे ऐकले?"
"तो तिचा भाऊ आहे, जे करेल ते योग्यच करेल. त्याचं पण तर बरोबर आहे, माझ्यामुळेच आज हे सगळं झाले आहे, मला तिच्या दूरच राहायला हवे."
"आता तिला वाचवणे महत्वाचे आहे, ना की बाकी हे सगळं." आई.
तरी तो मान खाली घालून उभा होता.
"आमच्या सगळ्यांच्या प्रेमाची परतफेड तू अशी निर्दयी होऊन करणार आहेस? ती वेडी पण तुझ्यावर प्रेम करून बसली. आमच्या सगळ्यांच्या आयुष्याला लागलेले तू एक ग्रहण आहेस." आई चिडत बोलत होती, पण तो मात्र बाप्पांच्या मूर्तीकडे टक लावून बघत होता.
"असा कसा रे तू दगड, माझ्या पोटी जन्माला आला? ती पोरगी तिथे जीवन मरणाच्या दारात अडकली आहे, तू असा इथे निष्ठुर होऊन बसला आहेस. ते तिचे आईवडील तिकडे जीव मुठीत घेऊन कासावीस होत लेकीच्या वाटेने नजर लावून बसले आहेत. कसं कळत नाहीये रे सोन्या तुला? आज तू जिवंत आहेस ते तिच्यामुळेच. जिच्यामुळे तू ॲक्सिडेंटमधून वाचालास, तिचं ते ऋण तरी फेड. डॉक्टरांच्या मते ती जर ४८ तासात शुद्धीवर नाही आली, तर तिच्या जीवाचे बरेवाईट होऊन शकते, ती कोमात जाऊ शकते. ४८ तास भरत आले रे राजा, तुला पण माहिती ती तुझीच वाट बघते आहे..तरी तू असा अंत बघणार?" आई आता अक्षरशः त्याच्या पुढ्यात भिक मागत रडत होती.
आईच्या एक एक शब्दाने त्याच्या हृदयाचे तुकडे होत होते. तो एक क्षणाचाही विलंब न करता तडक ICU कडे निघाला.
"थांब!" प्रसाद रागाने श्रीला अडवत म्हणाला.
"प्रसाद, माझी वाट सोड." श्री शांतपणे म्हणाला.
"तुला आतमध्ये जाण्याची अट माहिती आहे. ती मान्य असेल तरच पुढे जा." प्रसाद.
"मला तुमच्या सर्वांच्या सगळ्या अटी मान्य आहेत." श्री सगळ्यांकडे बघत म्हणाला. तसा प्रसादने ICU कडे जाण्याचा रस्ता मोकळा केला.
श्री तयारी करत भरभर ICU मध्ये गेला. तिच्या बाजूला जाऊन बसत तिचा हात आपल्या हातात घेतला. तिची ती अवस्था बघून आता त्याचा बांध सुटला होता, आणि त्याच्या डोळ्यातून दोन अश्रू गालांवर ओघळत तिच्या हातावर पडले. (आणि टीव्हीमध्ये दाखवतात तसे तिच्या हाताची हालचाल झाली. तिच्या डोळ्यांची उघडझाप सुरू होती) त्याच्या त्या मोरपंखी स्पर्शाने ती शुद्धीत येत होती.
________________________
श्रीने तिचे प्रेम अस्विकार केल्यामुळे तिला त्याचा नकार सहन झाला नव्हता, आणि तिने अक्षरशः तिच्या दुमजली घरावरून उडी घेतली होती. तिच्या डोक्याला जबरदस्त मार लागला होता, आणि बरीच दुखापत झाली होती. पण कदाचित देवाला सुद्धा तिच्या मृत्यू आता मान्य नव्हता आणि एवढं सगळं होऊनही ती त्यातून वाचली होती, कदाचित फक्त त्याचसाठी.
__________________________
आता जवळपास पंधरा दिवस होत आले होते, तिच्या तब्बेतीत आता बरीच सुधारणा झाली होती, तरी तिला अजून काही दिवस हॉस्पिटलमध्ये रहावे लागणार होते.
"कशी आहेस? बरं वाटतेय का आता?" बोलतच श्री रूममध्ये आला.
"डॉक्टर, दार बंद करा ना.."तिचा हळूवार अशक्त असा आवाज आला.
त्याने हॉस्पिटल रूमचे दार बंद केले आणि तिने खुणावले, तसे तिच्या बेडवर तिच्या जवळ जाऊन बसला.
"तुला एका आयुष्याची किंमत माहिती आहे ना?" श्री थोडा रागावूनच बोलत होता.
ती मात्र फक्त त्याच्याकडे बघत होती.
"तू सगळ्या अटी मान्य केल्यास?" ती.
"हो! पण हे जे काय तू केले आहे, मी तुला अजिबात माफ….."
त्याचं बोलणं पूर्ण व्हायच्या आतच त्याच्या ओठांवर एक मुलायम स्पर्श झाला आणि त्याचे ओठ तिच्या ओठांत लॉक झाले होते.
तिचे आयुष्य, तिचा तो तिला परत मिळाला होता. ती अधाशासारखी फक्त त्याच्यात स्वतःला सामावू बघत होती. तिचे असे अचानकपणे वागण्याने त्याचे डोळे आपोआप बंद झालेत आणि त्याचा वेदना अश्रूरूपाने गालांवर ओघळत होत्या, कदाचित या वेदना कोणाला समजणार ही नव्हत्या.
******
क्रमशः
कथेचे भाग नियमित येतील. Thank you!
