Login

मी तुला माझ्यात जपणार आहे 5

पाळी नैसर्गिक आहे.

मी तुला माझ्यात जपणार आहे 

भाग 5 

पूर्वार्ध : 

मीरा आणि श्रीचा साखरपुडा पार पडतो. तो बालपणीच्या आठवणीत रमतो. 

आता पुढे.. 

              

       श्री आता दहावीत गेला होता, तर मीरा आठवित होती. दोघं एकाच शाळेत होती, फक्त श्री मीराच्या दोन वर्ग पुढे होता. श्री बऱ्यापैकी शांत मुलांमध्ये येत होता, त्यामुळे शाळेत मुलं त्याच्या खोड्या काढायचे, मीरा त्या सगळ्यांना चांगलीच सूनावयाची. कितीतरी वेळ श्रीला लाडीगोडी लावत त्याच्याकडून आपला गृहपाठ करून घेत होती आणि स्वतः मात्र धूम खेळत होती. श्री दहावीत होता, बोर्डाची परीक्षा, त्याचे खेळणे आता कमी झाले होते, आता तो अभ्यासातच जास्त रमत होता. त्याचा वडिलांनी जबरदस्ती त्याला टेनिसचे क्लासेस लावून दिले होते, तेवढे तो करायचा. 

______

"वृषाली, श्रावणीला स्वयंपाक करायला शिकव आधी, सतत काय ते अवजारं घेऊन बसली असते. शर्वरी आपली अगदी गाय, तिकडे सासरी कशी छान रमली. कधी म्हणून तिच्या सासरहून काही तक्रार येत नाही आणि ती पण कधी काही उगा सांगत नाही. शरयू जरा कधी कधी बोलण्यात गडबड करते, पण तिला सांगून ठेव, सासरच्या गोष्टी इकडे माहेरी सांगायच्या नाहीत ते. आता ते तिचं घर आहे, तिचं ती सांभाळून घेईल. तशी आपली शिकवण आहेच, ती सगळं छान सांभाळून घेते म्हणून तिची आत्येसासुबाई कौतुक करत होत्या. पण ही श्रावणी अन् या श्रीने माझे डोकं उठवून ठेवले आहे, जे करायचं नाही सांगते, ही दोघं तेच करतात. अन् ही श्रावणी तर अगदीच आगाऊ कार्टी." श्री आणि श्रावणी आपल्या अभ्यासाचे घेऊन बसले होते, ते बघून आजीची बडबड सुरू होती. 

"अवजार नाहीयेत ते, त्याला टूल्स म्हणतात. मी काय हे घरातले कामं थोडी करत बसणार आहे, मला डिग्री मिळणार आहे." श्रावणी उत्तरली. 

"हो का? मग नवऱ्याला आणि सासरी सगळ्यांना रोज डिग्रीचाच एक एक तुकडा खाऊ घाल हा!" आजी.   

     आजीचे बोलणे ऐकून तिथे उपस्थित बाकीच्यांना हसू आले. श्रावणीने डोळे मोठे करून बघितले तर सगळ्यांनी आपले हसू आपल्या ओठांआड लपवले. 

"ते काही नाही, आजच्या सगळ्या पोळ्या तू बनवायच्या, आणि अगदी गोल. थोडी पण वाकडी झालेली चालणार नाही." आजीने हुकूम सोडला. 

"आजी, अगं आजकाल पोळ्या गोल नाही आल्या तरी चालते, पण शिक्षण आणि सगळ्यात महत्वाचे स्वसंरक्षण हे यायलाच हवे." श्री आपल्या पुस्तकांतून बाहेर डोकावत म्हणाला. 

"बोलले! बहिणीचे बंधूराज बोलले. तरी सतत सांगत असते याला जास्त टीव्ही बघू देत नका जाऊ, पण या म्हातारीचे ऐकताय कोण? एकतर त्या एकता कपूरच्या मालिका, नाहीतर दिवसभर न्यूज आणि न्यूजपेपरवर असते हे पोरगं. ही टीव्ही आजकालच्या पिढीला पार बिघडवून ठेवत आहे." आजी. 

"आजी, अगं आई, मी खरंच सांगतोय ग. पोळी कशीही झाली तरी तिचे तुकडे करूनच खातो ना, मग गोल असू देत की त्रिकोणी, काय फरक पडतो? पण मुलींना अशी काही वाईट वेळ उद्भवली तर स्वतःचे रक्षण तरी करता यायला हवे ना? ते शिकायला हवे." श्री. 

"हो, आणि मी पोळ्यांना बाई लावणारे. मी कामं करायला बाहेर जाणार आहे, मला काय वेळ मिळणार आहे पोळ्या लाटायला?" श्रावणी. 

"आगाऊ पोरगी, तू काय घरं बांधणार आहेस? आधी आपलं घर सावरायला शिक." आजी. 

"नाही, मी रस्ते बांधणार आहे. मला बांधकाम विभागात काम करायचे आहे." श्रावणी. 

"घ्या, परत हीचे आपले नवीनच. सिव्हिल इंजिनिअर घरं सुद्धा बांधतात." आजी.

"पण मला आपल्या इथल्या रस्त्यांसाठी काम करायचे आहे. बघितले ना आपल्याकडे रस्ते खराब असल्यामुळे किती ॲक्सिडेंट होतात. पाठक काकांचा शरद पण त्यातच गेला, काका काकूंची हालत किती वाईट झाली आहे. आपलं मूल आणि आपला बाबा कोणी त्यात गमवू नये, आता हेच माझं ध्येय आहे. माझं ठरले आहे, मी तिथेच काम करणार, प्रामाणिकपणे काम करणार." बोलता बोलता श्रावणीच्या डोळ्यात पाणी तरळले होते, जे तिने अलगदपणे डोळ्यातच आटवले होते. 

"बरं बरं, नवऱ्याच्या घरी जाऊन जो गोंधळ घालायचा तो घाला. आज मात्र पोळ्या अगदीच गोल झाल्या पाहिजेत, नाहीतर रोज रात्री जेवणाच्या पोळ्या आणि भाकऱ्या तुलाच कराव्या लागतील." आजी हुकूम सोडून आपल्या रूममध्ये निघून गेली. 

"हिटलर!" श्रावणीने तोंड वाकडं केले. 

"एsss आजी आहे." आई थोडी दर्डावत म्हणाली. 

"हा तर मी कुठे काय म्हणाले? हिटलर पण किंग होता, त्याला पण सगळं शिस्तीत लागत होते. एका राजाचे नाव दिलेय मी आजीला." श्रावणी. 

ते ऐकून श्री खुदुखुदू हसू लागला. 

"तू खरंच खूप आगाऊ झाली आहे. तोंड तर अगदी कात्री सारखे चालायला लागले आहे." आई. 

"मला म्हणाली कशी, डिग्रीचे तुकडे तोडून खाऊ घालत जा. मी काय एवढे पागल आहे काय?" श्रावणी. 

"नाही ग माझे सोने, तेवढी नाही, अगदी थोडीशीच आहेस बघ." आई हसायला लागली. 

"आईsss, शी बाबा, तू पण मला चिडवतेस? तुला माहिती ना, ते माझे स्वप्न आहे." श्रावणी. 

"हो हो, आधी पोळ्या करायला घे, नाहीतर उगाच रोज पोळ्या लाटत बसावे लागेल, आणि मग अभ्यासाला वेळ नाही पुरणार. चल ये, पोळ्या कश्या करायच्या ते सांगते." आई आणि श्रावणी स्वयंपाक घरात गेल्या. श्री आपला अभ्यास करता करता दोघींना बघत होता. 

      दोन पोळ्या झाल्या असतील की तेवढयात आजीने आईला काहीतरी कामासाठी आवाज दिला. 

"श्रावू, नीट कर पोळ्या. मी आलेच." बोलून आई निघून गेली. श्रावणीचा आपला पोळ्या गोल आणि सारख्या जाडीच्या होण्यासाठी आटापिटा सुरू होता, पण तिला गोल पोळ्या जमत नव्हत्या. तिला काही सुचले आणि ती काहीतरी घेऊन आली आणि परत पोळ्या करू लागली. 

"देवा रे देवा! सासरी जाऊन ही पोरगी माझ्या सात पिढ्यांचे नाव काढेल." आजी तिथून जात होती, श्रावणीला बघून त्यांनी डोक्यावर हात मारून घेतला. 

         श्रावणीने स्केल आणि कंपास आणले होते, आणि त्याने पोळीचे व्यास (diameter) मोजत, खुणा करत, ज्या बाजूने जास्त होती पोळी, ती तिथून कट करत होती, जिकडून कमी होती तिकडून लाटत मोठी करत होती. आता मात्र पोळ्या करण्यात श्रावणी भारीच रमली होती. आजीला मात्र तिला बघून आता चक्कर येण्याचे बाकी राहिले होते. 

"ही काय तुझी प्रयोग शाळा आहे काय?" आजी.

"तुम आम खाओ ना यार, गुठलियो के दाम क्यू गिणते हो!" श्रावणी आपल्याच तालात म्हणली.

"मी काय तुझी यार आहे काय?"

"बाहेरचा यार करू तर देत नाही, मग तूच माझी यार." 

"गप बस! अन् हे काय आंबा अन् गुठळी?" आजी.

"आजी गुठळी नाही गुठली." श्रावणी. 

"कार्टे!!" 

"पोळ्या गोल झाल्या म्हणजे झालं ना? आजी, मला पोळ्या करू देत, तू जा बरं तिकडे, उगा डिस्टर्ब करतिये." 

"देवा, कोणत्या नक्षत्रावर हे ध्यान पदरात घातलं?" आजी बडबड करत निघून गेली. 

"ए ताई, थांब मी सांगतो पोळ्या कशा करायच्या तर…" श्री आजी गेलेली बघून किचनमध्ये गेला.

"अरे नको, परत रागवायची हिटलर.." 

"आपल्या खानदानात पुरुष कधीच स्वयंपाकघरात जात नाही!" श्री श्रावणी दोघंही एकत्र आजीची स्टाईल मारत म्हणाले आणि स्वतःच हसू लागले. 

"आता नाही येणार ती, थांब मी सांगतो." म्हणत श्रीने कणकेचा गोळा हातात घेत गोल गोल फिरवत छान गोल गोळा बनवला, दोन्ही कडून पीठ लावत पोळपाटवर ठेवत हाताने थोडासा दाबला, आणि मग अलगदपणे लाटण्याने लाटायला लागला, आणि पोळी गोल गोल फिरत मोठी होत होती. 

"अय्या श्री! कसलं भारी करतोय, ते पण किती इझिली." श्रावणी अवाक् होत बघत होती.

"हे बघ, जास्त काही नाही करावं लागत, लाटणं अगदी घट्ट न पकडता थोडं अलगद पकडायचं, आणि पोळीच्या काठावरून फिरवत न्यायचे." श्री खूप मन लावून सांगत होता. 

"तू तर कधीच पोळी केली नाही, मग तुला एका झटक्यात कसे काय जमले?" 

"अगं सगळं आपल्या interest आणि आवडीवर असते बघ. जे करायला आवडते ना, ते फक्त बघून सुद्धा येते. तू नाही का कसल्या भराभर त्या इमारती काढत असतेस, सगळे व्ह्यूज कसे झटक्यात तयार करतेस, तसेच आहे बघ." 

"तुला खूप आवडते ना स्वयंपाक करायला?" 

"हो ताई, मला तर ना शेफ व्हायचं." 

"पण आपल्या घरी चालणार नाही." 

"हो, ते आहेच. जाऊ दे तू पोळ्या कर, आणि फारच जमले नाही तर ही प्लेट घे, पोळी लाटून झाली की या प्लेटने दे आकार, आणि शेकतांना दोन्ही कडून मस्तपैकी तूप लाव. हिटलर बघ एकदम फिदाच तुझ्यावर!" श्री तिला एक पोळी भाजून दाखवत बोलत होता. 

"बरं बंधुराज! बरेच मोठे झालात हा तुम्ही!" म्हणत श्रावणीने त्याचे गाल ओढले. 

श्री परत जायला निघाला की तेवढयात काहीतरी आठवून परत फिरला. 

"ताई, तुला शरद दादा आवडत होता का ग?" 

ती काहीच न बोलता त्याच्याकडे बघत होती.

"मी बघितले होते, त्याच्या बद्दल बोलताना तुझ्या डोळ्यात अश्रू होते." 

"त्याला मी आवडत होते. त्याने मला प्रपोज केले होते." 

"मग?" 

"तुला आपल्या घराचे वातावरण तर माहिती आहे ना, लव्ह marriage चालते काय? उगाच त्याला आशेला लावू शकत नव्हते. प्रेम जितकं गोड असतं, त्याहून खूप जास्त danger असतं. माणूस एकदा का प्रेमात बुडाला ना, आणि मग जर त्याला ते प्रेम नाही मिळाले तर तो काहीपण करून जातो. शरदला दुःखी नसते बघू शकले, मी नकार दिला होता." बोलता बोलता परत श्रावणीला गहिवरून आले. श्री लगेच जात तिला घट्ट मिठी मारली.

"ताई, मी नेहमीच तुझ्यासोबत असेल. तू एकटी नाहीये." 

   तेवढयात फोनच्या दोन रिंग झाल्या, आणि फोन कट झाला. नंतर परत रिंग व्हायला लागल्या. 

"हम्म! जा मॅडमला पण गरज दिसतेय तुमची… काय होमवर्क नाहीतर प्रॅक्टिकल लिहून मागायचे असेल." श्रावणी हसत म्हणाली. 

"हो." म्हणत पळतच जात त्याने फोन उचलला. 

"मीरा, अशी रडतेय का? थांब आलोच. आणि आधी ते रडायचं बंद कर." 

"ताई, मी मीराकडे जातोय." ओरडतच तो मीराच्या घरी पोहचला सुद्धा, तर मीरा एका कोपऱ्यात उभी रडत होती. रडून रडून तिची हालत पार खराब झाली होती. 

"काय झालं? आणि रडू नकोस, तू तर किती स्ट्राँग मुलगी आहेस." श्री तिचे डोळे पुसायला जाणार की तेवढयात ती मागे सरकली. 

"मीरा, काय झालं?" 

"मी आता लवकरच मरेल." ती रडत म्हणाली.

"काय?" 

"मला खूप मोठा रोग झाला आहे." 

"कोण म्हणालं? तुझे काही चेकप केले होते काय? आजी कुठेय?" श्री खूप काळजीत पडला. 

"आजी, आई बाबा लग्नाला गेले आहेत, रात्री येतील. प्रसाद दादाची मित्राकडे नाईट आउट आहे." ती रडत म्हणाली.

"बरं, मला दाखव काही रिपोर्ट्स असतील तर, आपण घरी आईला दाखऊ." 

तिने रडत रडत नकारार्थी मान हलवली. 

"मीरा, अगं सांग ना काय झालंय? अशी रडू नकोस." तो काकुळतेने म्हणाला. 

     मीराने आपला फ्रॉक पकडत मागचा भाग पुढे आणत त्याला दाखवले. तिचा फ्रॉक रक्ताने पूर्ण ओला झाला होता, पायावरून पण बरेच रक्त ओघळले होते. 

"गेल्या चार पाच तासांपासून सू करतो तिथून खूप रक्त निघत आहे. थांबतच नाहीये. पोट पण दुखत आहे. आई पण नाहीये. श्री मला वाचव, मला मरायचे नाहीये." मीराने भोंगा पसरला. श्रीला मात्र झालेला प्रकार लक्षात आला होता. 

"मीरा, ऐक मुलींसाठी हे अगदीच नॉर्मल आहे. याने कोणीच मरत वगैरे नाही. मी आहे ना तुझ्याजवळ, घाबरु नको आता. तुझ्या आईच्या कपाटात असेल आहे." 

"काय असेल आहे? आई कपाट लॉक करून गेलीय." 

"बरं, तू इथेच थांब, मी आलोच पाच मिनिटात. घाबरु नको, काहीच होणार नाही." तिला काही सूचना देत तो बाहेर पळाला सुद्धा. 

   घरी श्रावणी आणि आई दोघीही नव्हत्या आणि आजीजवळ जाणे म्हणजे डोक्यावर मोठं संकट ओढवून घेण्यासारखे होते. त्याने आपल्या कपाटातून काही पैसे घेतले, आपली सायकल घेतली आणि सरळ औषधांचं दुकान गाठलं. 

"काका एक पॅक stayfree, whisper जे असेल ते द्या." श्री. 

मेडिकलवाल्याने एक पॅक घेत ते पेपरमध्ये गुंडाळू लागला.

"अहो काका, त्यात लपवण्यासारख काय आहे? अहो ती नैसर्गिक गोष्ट आहे, एवढे लाजिरवाणे होण्याची गरज नाही." 

_________

"घेशील परत बायकांच्या वस्तू? जाशील परत स्त्रियांच्या दुकानात?" विक्रम. 

"आज किचनमध्ये सुद्धा पोळ्या करत होता." आजीने मध्येच आपली री ओढली. 

"कधी काय तर बांगड्यांचा दुकानात, कधी किचन, आज तर चक्क हद्द पार केली, ते pad घ्यायला गेला?" श्रीच्या उघड्या पाठीवर चांबड्याच्या पट्ट्याने विक्रम त्याला अगदी जनावरासारखा मारत सुटला होता. 

श्रीच्या मात्र डोळ्यात एक थेंब पाणी नव्हते, की एक आह सुद्धा नव्हती की तो जागेवरून थोडासा हलला सुद्धा नव्हता. तो खाली जमिनीकडे बघत होता, आणि विक्रम बेल्ट तुटेपर्यंत मारत होता.

***

क्रमशः