Login

मीरा (भाग १)

जगातील प्रत्येक सजीवाला भावना असतात. त्या ओळखता यायला हव्यात. माणूस तर खूप भावनिक आहे. तो सुखी आहे की दुःखी त्याच्या भावना सांगून जातात. मीरा ही एक जन्मापासून अपंग मुलगी आहे तिचं वय २१ वर्षे आहे. ती त्यांच्याच इमारतीत राहणाऱ्या एका मुलावर प्रेम करू लागते. पण हे प्रेम अव्यक्त आहे. समोरचा मुलगा तिचं प्रेम स्वीकारतो की नाही ते आपण या सिरीजमध्ये वाचणार आहोत.


जगातील प्रत्येकाला भावना असतात.
ही प्रेमकथा नसून एका प्रेमाची कथा आहे.

संदेश आज एका महिन्यानंतर मुंबई मधील रूमवर आला आहे. हि रूम त्याच्यासाठी नवीन आहे कारण मागच्या महिन्यात तो जेव्हा कंपनीच्या कामासाठी बाहेरगावी गेला होता तेव्हा त्याच्या मित्रांनी भाड्याने घेतली. याआधी ते त्याच इमारतीत राहत होते परंतु ऍग्रिमेंट संपल्यामुळे त्यांना रूम बदलावी लागली. तो आपल सगळं समान तपासून पाहतो व व्यवस्थित लावून ठेवतो. संदेशबरोबर आणखी दोन मित्र राहतात सचिन व अशोक. तिघेही मागच्या तीन वर्षांपासून एकत्र राहत आहेत. तिघेही नोकरीनिमित्त इथे राहतात. संदेश खासगी कंपनीत नोकरी करतो. सचिन व अशोक सरकारी नोकरदार आहेत. प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त असतात. मात्र संध्याकाळी सर्वजण एकत्र असतात तेव्हा ते घरीच स्वयंपाक बनवून खातात. सर्वांना उत्तम स्वयंपाक बनवता येतो.


त्यांच्या समोरच्या फ्लॅटमध्ये मुली राहतात. अशोकची त्यांच्यासोबत चांगली ओळख झाली आहे. तो जास्तीत जास्त वेळ त्यांच्याच रूममध्ये असतो मुलींना देखील त्याच काही वाटत नाही कारण अशोकचा स्वभाव खूप मनमिळाऊ आहे. त्याला इतरांना मदत देखील करायला आवडत मुलींना तर जास्तच. अशोकला मुलींसोबत बोलायला खूप आवडतं कारण त्याचं शिक्षण गावी झाल्यामुळे मुलींशी बोलण्याचा संबंध खूप कमी वेळा यायचा. कॉलेजमध्ये असताना तो थोडा लाजाळू होता. स्टडी रुममध्ये एखादी मुलगी त्याच्यासोबत बोलली तरी त्याला खूप बरं वाटे. मात्र तिथे कोणीही जवळची अशी मैत्रीण भेटली नाही. कॉलेजनंतर काही दिवसातच त्याला नोकरी लागली. इथे शेजारी म्हणून मुली त्याच्याशी बोलतात तर अशोकला खूप मस्त वाटतं त्याला त्यांच्याशी बोलतच राहावंसं वाटतं. सचिनची मात्र गर्लफ्रेंड आहे. त्याच रोज रात्री एक तास फोनवर बोलणं चालू असत. संदेश साधा, शांत स्वभावाचा मुलगा आहे. तो प्रेमाविषयी कोणासोबत जास्त काही बोलत नाही त्याला जरी एखादी मुलगी आवडली तर कोणालाही बोलून दाखवत नाही. आपल्याच मनात ठेवतो त्याच्याविषयी मनमोकळ बोलत नाही.
संदेश फ्रेश होऊन मोबाईल मध्ये काहीतरी बघत बसला आहे. अशोक समोर मुलींच्या रूममध्ये गप्पा मारत आहे सचिन काहीतरी काम करत आहे. तेवड्यात तिथे एक 21 वर्षाची मुलगी येते व अशोकला आवाज देते आणि रूममध्ये डोकावते समोर संदेश आहे तो तिला पाहतो. त्याला थोडं अवघडल्यासारखं होतं कारण ती मुलगी अपंग आहे तिचा एक हात थोडा वेडावाकडा आणि बारीक आहे आणि पायातही काहीतरी प्रॉब्लेम आहे. संदेश अशोकला आवाज देतो. तिकडून अशोक बाहेर येतो व तिला बोलतो, काय मीरा कशी आहेस? काय म्हणतेस? ती बोलते, माझं काम केलं की नाही तू? अशोक बोलतो ......."अरे विचारलंय मी एक दोन ठिकाणी त्यांनी सांगितलं की मी कळवेल तुला." ती..... ठिकय .....असं बोलते आणि समोर मुलींच्या रूममध्ये जाते. जाता जाता संदेशकडे नजर टाकते.
संदेश अशोकला जवळ बोलावतो व विचारतो, "कोण आहे ही? आणि तुझ्याकडे काय काम आहे हीच?" अशोक सांगतो, ........"ती आपल्याच फ्लोअर वर राहते. ती काम शोधत आहे तर मला म्हणाली काही असेल तर सांग. मी बोललो सांगतो म्हणून."


दुसऱ्या दिवशी संध्याकाळी बरोबर त्याच वेळेला मीरा
मुलांच्या रूमकडे येते. अशोककडे चौकशी करु लागते. अशोक तिला द्यायची म्हणून काहीतरी उडवाउडवीची उत्तरं देतोय. मीरा दारात उभा राहून बोलत आहे. संदेश रात्रीच्या खाण्याची तयारी करत आहे. संदेश तिच्याकडे एक नजर टाकतो, ती आज जरा नटून आल्यासारखी वाटते. तशी ती दिसायला छान आहे. तिचे कुरळे केस, तिचा ड्रेसिंग सेन्स आणि सतत हसरा चेहरा. म्हणून सर्वजण तिच्याशी प्रेमाने बोलतात. कदाचित ती अपंग आहे म्हणून सुद्धा काहीजण तिला आपुलकीने बोलतात. संदेश मात्र तिला टाळण्याचा प्रयत्न करतो कारण ती जेव्हा येते तेव्हा तिरक्या नजरेने त्याच्याकडेच पाहत असते. खरंतर मीरा संदेशच्या प्रेमात पडली आहे.