Login

मेघ दाटले - भाग 13

Love , Suspense

मेघ दाटले - भाग 13 


नुपूर रागाने दाराबाहेर गेली. अजिंक्यला वाईट वाटलं. ती आपल्यासाठी म्हणून एवढा वेळ थांबली होती आणि आपण उगीच तिला असं बोललो. तो पण मग तिच्या मागोमाग बाहेर जातो. पण त्याला नुपूर कुठेच दिसत नाही. तो थोडा पुढे जाऊन पाहत असतो तेवढ्यात त्याला मागून हसण्याचा आवाज येतो. पाहतो तर नुपूर....!!! 


" तू...... तू गेली होतीस ना ..?? " तो न कळून म्हणाला.

" हम्म.... जातचं होते. पण विचार केला. माझ्या मित्राचं दुसरं इथे कोणीच नाहीये. कोण काळजी घेणार बिचाऱ्याची... त्यापेक्षा आपणच थांबलेलं बरं....." ती हसत हसत बोलत होती.


"  हो का....... असं काही नाही हा की माझं कोण नाही. माझी एक मैत्रीण आहे जवळची. मी तिला फोन केला ना तर ती आत्ता येईल धावत माझ्यासाठी......" अजिंक्य.


" कोण मैत्रीण.......??? " तिने जरा साशंक मनाने

विचारलं.


" आहे एक स्पेशल..........." तो उगीचच दुसरीकडे नजर वळवत म्हणाला.


" हो.. का... मग बोलवं तिलाच. मी जाते...." असं म्हणून नुपूर त्याच्या समोरूनच घरी निघून गेली. अजिंक्य मात्र स्वतःशीच हसत तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत तिथेच उभा राहिला. 

.................................


दुपारनंतर पोलीस स्टेशनला एखादी फेरी मारावी असं अजिंक्यने ठरवलं. पण पुन्हा त्याच्या डोक्यातून कळ येत होती. त्यामुळे तो घरीच थोडा वेळ पडून राहिला. थोड्या वेळाने म्हादू काका त्याच्यासाठी जेवण घेऊन आले. अर्थात ते नुपुरनेच पाठवलं होतं हे काही वेगळं सांगायला नको...!!  ती तणतणचं घरी आली. ' काय समजतो हा स्वतःला...... मी त्याला बरं वाटावं म्हणून एवढं सगळं केलं पण त्याचं काही नाही. कोण त्या मैत्रिणीचं कौतुक. पण खरंच असेल का त्याची अशी कोण मैत्रीण...??? असे ना का...  आपल्याला काय करायचंय......मी अजिबात बोलणार नाहीये त्याच्याशी.....' नुपूर स्वतःशीच विचार करत जेवत होती. इकडे अजिंक्य देखील तिचा तो रागावलेला चेहरा आठवत म्हादू काकांनी आणलेलं जेवण जेवत होता. नुपुरच्या वागण्याचं त्याला हसू येतं होतं.

.................................

संध्याकाळी त्याला जाग आली ती शिंदेच्या फोनमुळे. त्याने दुपारनंतर पोलीस स्टेशनला जायचा विचार केला होता. पण जेऊन झाल्यावर त्याला चांगलीच सुस्ती आली आणि तो गाढ झोपला. शिंदेंचा फोन आल्यावर तो उठला.


" हॅलो.... हा शिंदे बोला......" अजिंक्य डोळे चोळत होता.


" सर , कशी आहे तुमची तब्येत आता....?? " पलीकडून शिंदेंनी विचारलं.

" मी ठीक आहे. बोला काय नवीन अपडेट....." आता तो जरा सावरून बसला आणि शिंदे काय बोलतायत त्याकडे लक्ष देऊ लागला. 


" सर सर्जेराव राजवाडे हे किशोर राजवाडेंचे चुलत भाऊ आहेत. त्या शिक्षकांचा अपघात झाला ती गाडी देखील त्यांच्याच नावावर आहे. ते व्यवसायाने शेती करतात. पण गावातली सगळी लोकं त्यांना वचकून असतात. त्यांचा गावात बऱ्यापैकी दरारा आहे. अपघात झाला त्या दिवशी ते मुंबईला काही कामानिमित्त गेले होते त्यामुळे केसशी त्यांचा काही संबंध नाही असं त्यांच्या जबानीत लिहलं आहे...."  शिंदे.


" ok.... अजून काही.....??? " 


" सर मि. मोहितेंचा नंबर ट्रेस करायचा प्रयन्त केला पण त्यांचा मोबाईल स्विच ऑफ येतोय. सर माझ्या मते ते दिवसभर मोबाईल बंद ठेवत असतील आणि जेव्हा कधी घरी फोन करायचा तेव्हाच तो चालू करत असतील.....सर आपण जर त्यांच्या घरी फोन करून ते कोणत्या वेळात फोन करतात हे विचारलं तर त्या बोलत असताना आपण त्याचा नंबर ट्रेस करू शकतो....." शिंदे म्हणाले.


" येस..... मी कळवतो तुम्हाला विचारून....." एवढं बोलून अजिंक्यने फोन ठेवला. 

मिसेस मोहितेना फोन करायचा म्हणजे नुपुरशी बोलायला हवं होतं. कारण त्याच्याकडे मामीचा नंबर नव्हता. पण नुपूर तर त्याच्यावर रागवून चिडून गेली होती. त्यामुळे ती त्याच्याशी कितपत बोलेल ही शकांच होती. त्याने मग घरी जाऊनच तिच्याशी बोलायचं ठरवलं. पण त्या आधी तिचा राग जाण्यासाठी काहीतरी करायला हवं असं त्याला वाटलं. मग त्याच्या डोक्यात तिच्यासाठी काहीतरी स्पेशल करायचे विचार मनात घोळू लागले.  

..................................

संध्याकाळ सरली तसा हळूहळू रातकिड्यांचा गजर चालू झाला. किरकिर्र आवाजाने रात्र अधिकच भयानक वाटू लागली. मिट्ट पडलेला काळोख आणि आजूबाजूची दाटीवाटीने उभी असणारी झाडं बघून अंगावर काटा येत होता. त्यातच वाहणाचा करकर आवाज करीत कोणीतरी झपझप आपली पावलं टाकत निघालं होतं. एका ठिकाणी घराला लागूनच काढलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये लाईट दिसत होता. ती व्यक्ती घर जवळ येऊ लागलं तसतसं हळूहळू चालत त्या पत्र्याच्या दाराजवळ आलं. तिने दार वाजवल आतल्या एका माणसाने दार उघडलं.


" काय म्हणतायत मग पावनं त्यांची खातीरदारी नीट व्हतीय ना....?? " आत प्रवेश करत त्या माणसानं विचारलं.


" व्हय जी. सगळी काळजी घेतोय आमी त्यांची. " एकजण म्हणाला. 


एका छोट्या अंधाऱ्या खोलीत एका माणसाला बांधुन ठेवलं होतं. फक्त डोक्यावरती एक छोटा बल्ब लटकत होता. अति श्रमाने त्या व्यक्तीने मान टाकली होती. अंगावरच्या कपड्यावरून ती व्यक्ती साध्या घरातली वाटतं होती. उभ्या असणाऱ्यांपैकी एकाने त्या बांधलेल्या व्यक्तीच्या तोंडावर पाणी उडवलं आणि ती व्यक्ती जागी झाली. 


" काय पावन..... कसा चालला हाय पाहुनचार तुमचा.... काय कमी न्हाय ना पडते इथं....?? " बाहेरून आलेल्या माणसाने हसत विचारलं.


" मला सोडा... किती दिवस तुम्ही मला असे बांधुन ठेवणार आहात....." बांधलेली व्यक्ती हात सोडवायचा प्रयन्त करत होती. बाजूला अंधार असल्यामुळे त्याला आपल्याशी नक्की कोण बोलतंय ते कळत नव्हतं. 


" जास्त दिस न्हायी ठेवणार असं तुमास्नी..... एकदा का किशोरचा नि त्याच्या बायकोला तुमि मारलंत असं का पोलिसासनी पटलं की तुमाला आमी लगेच सोडणार बगा...." ती व्यक्ती हसत म्हणाली.


" काय........???? मी ...... मी काहीही केलेलं नाहीये.. तुम्ही तुम्ही मारलंय माझ्या ताई आणि भावजींना..... सोडा मला.... सोडा......" ती व्यक्ती हातपाय झाडत राहिली. पण कोणीच  त्यांना सोडलं नाही. 


" बारकू..... दे बाबा पावण्यांसनी फोन लावून त्यांच्या बायका पोरासनी आठवण येतीया त्यांची....." असं म्हणून ती व्यक्ती बाहेर निघून गेली. आणि उभ्या असलेल्यांपैकी एकाने बांधलेल्या माणसाला फोन लावून दिला. ती व्यक्ती इतकंच म्हणाली फोनवर, 


" माझं काम अजुन काही दिवस चालणारे. तुझी आणि मुलांची काळजी घे.. मी .... मी लवकरच परत येईन..." समोर सुरा घेऊन उभ्या असलेल्या व्यक्तीकडे बघत ते बोलले आणि त्यांनी फोन ठेऊन दिला.


क्रमशः.......