Login

मेघ दाटले - भाग 16

Love , Suspense

मेघ दाटले - भाग 16 

पोलीस स्टेशनला आज फारसा उत्साह जाणवत नव्हता. काल कळलेल्या बातमीने तर तपासाची दिशाच बदलली होती. अजिंक्य अस्वस्थपणे फेऱ्या मारत होता. 

" सर आता काय करायचं ? आपल्याला वाटतं होतं की या मामानीच मारलं असावं राजवाडे नवरा बायकोला... पण आता त्यांचाच पत्ता नाहीये...." शिंदे म्हणाले. 


" हो. पण यामुळें एक गोष्ट लक्षात येतेय ती म्हणजे नक्कीच मिस्टर मोहिते कोणत्या तरी अडचणीत आहेत. जर ते याच गावात आहेत तर इतक्या दिवसात ते कोणालाच कसे दिसले नाहीत..." अजिंक्य विचारात पडला.


" तेच तर....... सर आपण म्हादू कडे चौकशी करूया का...? तुम्ही म्हणाला होतात की त्यांच्या मिसेसच्या माहितीनुसार ज्या दिवशी रात्री राजवाडेंचा खून झाला त्या रात्री ते गावी यायला निघाले होते. मग कदाचित म्हादूने त्यांना बघितलं असेल....?? " शिंदेंनी आपली शंका बोलून दाखवली.


" yes right.. पण तसं असतं तर म्हादुकाकांनी आपल्याला हे सगळं आधीच सांगितलं असत. ज्या अर्थी ते बोलले नाहीत त्या अर्थी त्यांना यातलं काहीच माहीत नाही. पण तरीही तुम्ही विचारा. मी पुन्हा एकदा कंपनीत जाऊन येतो मि. मोहितेंनी तिकडे काही सूचना दिल्या आहेत का ते बघायला हवं..." तो म्हणाला. 


" ओके सर. मी तुम्हाला रिपोर्ट करतो नंतर. " शिंदेनी त्याला सॅल्युट केला तसं त्याने त्यांच्या दंडाला हलकेच थोपटलं आणि हसत निघुन गेला. 

........................................

तो कंपनीत जायला निघाला. पण नुपुरला देखील सोबत न्यावं असं त्याला वाटलं. त्याने गाडी बाजूला लावली आणि तिला फोन केला. 

" हॅलो, गुड मॉर्निंग मॅडम......." तो छान हसून म्हणाला.


" अम्म....... गुऊऊऊ.... ड मॉर्निंग......." ती जांभया देत उठली. तिचा तो झोपळलेला आवाज ऐकून त्याला गंमत वाटली. झोपेतही किती गोड दिसत असेल ना ही...!!! तो मनाशीच म्हणाला. 


" मॅडम उठा सकाळ झाली........" 

" हो... पण आज उठवसच वाटत नाहीये. बाहेर बघ ना किती मस्त पावसाळी वातावरण झालंय.... रात्री पण सर पडली छान... हवेतला हा सुखद गारवा..... वॉव..... या वातावरणात तर मला मस्त लोळत पडावस वाटतंय...." तिने अजुन एक आळस दिला.


" छान.... आज काय कवी वगरे चावला की काय तुला......?? एकदम जड जड बोलायला लागलेयस सकाळी सकाळी.... " तो पलीकडे हसत होता. 


" गप रे....... मस्त झोप लागली होती... उठवलंस मला. काय काम आहे....? " ती जरा मस्करीच्या मुड मध्ये होती.


" अच्छा म्हणजे मी फक्त काम असल्यावरचं फोन करायचा का तुला.... ?? मी कंपनीत जातोय. तू येणारेस का विचारायला आलो होतो.. पण आता जातो एकटाच...." त्याने रागाने फोन ठेवून दिला. 


त्याने फोन बंद केल्यावर ती धडपडतच उठली. धावतच ती तिच्या रूमच्या गॅलरीमध्ये आली. तिने वरूनच अजिंक्यला हाक मारली आणि त्याचं लक्ष वेधुन घेतलं. त्याने पाहिलं तर विस्कटलेले मोकळे केस , एखाद्या लहान मुलीने हट्ट करताना केलेल्या क्युट फेससारखा तिचा तो बोलका चेहरा, झोपळलेले डोळे तरीही लुकलूक करून त्याच्याकडे बघणारे बनीचा टीशर्ट आणि गुलाबी कलरची नाईट पॅन्ट घातलेली ती त्याला हाका मारत होती. त्यातही ती सुंदर दिसत होती अगदी इवल्याशा छोटुलीसारखी...!!!


" अजिंक्य...... अजिंक्य.... हॅलो.... इकडे इकडे बघ.... लक्ष कुठाय.....??? " ती गॅलरीत हात हलवत उभी होती तसा तो भानावर आला. त्याने तिच्या बोलण्याकडे लक्ष देत मान उडवत काय म्हणून विचारलं. 


" मी....... मी येतेय दहा मिनिटात.... थांब हा जाऊ नको... आलेच.... " असं म्हणून ती आत पळाली सुद्धा. त्याला क्षणभर तिच्या अशा अल्लड वागण्याचं हसू आलं. 


थोड्याच वेळात नुपुर बाहेर आली. ब्लु जीन्स त्यावर यलो कलरचा लॉंग कुर्ता, गळ्यालगत गुलाबी कलरचा स्टायलिश स्कार्फ...मोठे स्टड कानातले... आणि चेहऱ्यावर एक गोड स्माईल करत ती त्याच्याजवळ आली. तिला असं रिलॅक्स बघुन त्याला बरं वाटलं. 

" चला निघायचं का ....Am ready .. " ती अगदी उत्साहाने गाडीचा दरवाजा उघडून फ्रंट सीटवर बसली देखील. तो आपल्याच विचारात होता.


" अरे येतोयस ना......??? चल ना..." ती म्हणाली तशी त्याच्या विचारांची तंद्री खुंटली.


" अं..... हो ... " तो येऊन ड्रायव्हिंग सीटवर बसला. 


बाहेर छान पावसाळी वातावरण झालं होतं. सूर्याची कोवळी किरणं आज अर्ध्या दिवसाच्या सुट्टीने घरी परतली होती आणि काळे ढग हजेरी लावताना दिसत होते. रात्रीही एखादी सर पडुन गेली असावी. झाडांवर , वेलींवर पडलेले पाण्याचे मोती नुपूर आणि अजिंक्यला निरखत त्यांच्या सोबतच निघाले होते. तिला खूप छान वाटतं होतं. तिने एकवार त्याच्याकडे पाहिलं तो शांतपणे ड्राइव्ह करत होता. काळे ढग चहुबाजुनी दाटले होते तरीही पाऊस लगेच पडेल अशी खात्री नव्हती. हवेतही आता गारवा पडत होता. खिडकीतून येणारा वारा आता झोंबत होता. त्याच्या ते लक्षात आलं. त्याने एका वळणावर गाडी थांबवली आणि आपलं जॅकेट काढुन तिच्यावर पांघरलं. ती गोड हसली. याला कसं कळतं सगळं मी न सांगताही... तिचं वेड मन त्याच्याच विचारात गुंतल होतं. 


" निघुया ना..... " तो हसुन म्हणाला. त्यावर तिने फक्त मान डोलावली. 

त्यांची गाडी हळुहळु तशीच पुढे जात होती. तेवढ्यात तिला समोर एक चहाची टपरी दिसली. लहान मुलासारखं ती 'चहा.... चहा ' करत ओरडली. तसं त्याला हसू आलं. त्याने चहाच्या टपरी जवळ गाडी लावली. 


" काय दादा.... बऱ्याच दिवसांनी आलात इकडं.... " चहा करणारा मुलगा अजिंक्यला बघत म्हणाला. तसं नुपुरला आश्चर्य वाटलं. 


" मी येतो मध्येच कधीतरी इकडे मुड आला की. याच्या हातच्या चहाने फ्रेश वाटतं खूप...." तो तिच्या चेहऱ्यावरचे गोंधळलेले भाव बघून म्हणाला. 


त्या टपरी वरच्या मुलाने दोघांसाठी फक्कड चहा केला. बाजूला छान गुलाबी हवा त्यात ढगाळलेलं वातावरण आणि त्या सोबतीला आल्याचा मस्त चहा...!!! हे कॉम्बिनेशन तिला फार आवडायचं. चहाचा एकेक घोट घेत ती त्याचा पुरेपुर आनंद लुटत होती. आणि त्याने तिच्या चेहऱ्यावरचे अवखळ भाव टिपत चहा संपवला.

..................................

दोघेही कंपनीत पोहचले. नुपूरने आज खूप दिवसांनी कंपनीमध्ये पाऊल ठेवलं होतं. तिने डोळे भरून कंपनीच्या इमारतीवरून नजर फिरवली. डॅडनी किती कष्टाने उभारलंय सगळं....!!! त्याच विचारात ती आत आली. मागोमाग अजिंक्य देखील आला. तिने रिसेप्शनिस्टला सांगुन मॅनेजरना बोलवायला सांगितलं. तिचं नाव ऐकताच सावंत घाईगडबडीत बाहेर आले. 


" सावंत , मला एक पन्नास हजारांचा चेक हवा होता. तुम्ही मला देता का करून....??? " तिने विषयालाच हात घातला.


" सॉरी मॅडम , पण आम्ही तुम्हाला पैसे देऊ शकत नाही..." 


क्रमशः.......

🎭 Series Post

View all