Login

मेघ दाटले - भाग19

Love ,suspense

मेघ दाटले - भाग 19 

सगळ्या बाजूने दिनेशनचच नाव पुढे येत होतं आणि अजिंक्यला देखील त्याच्यावर संशय होताच. अजिंक्य राजवाडेंच्या वाड्यावरून निघाला तेव्हा संध्याकाळ झाली होती. तो मग पुन्हा पोलीस स्टेशनला आला. बारकुला ताकीद देऊन त्यांनी त्याला सोडून दिलं आणि तो घरी परतला. आज दिवसभर त्याची फार धावपळ झाली होती. घरी आला नि तो दमुन खुर्चीवर बसला. तिथेच पाठी मन टेकवुन त्याने डोळे मिटले. दिवसभरात इतकं काय काय घडलं होतं की त्याला विचार करायला देखील वेळ नव्हता. डोकं थोडं शांत झाल्यावर त्यानं मग एकेका गोष्टीचा संदर्भ लावायला सुरवात केली. समजा जरी हे दिनेशने केलं असेल तरी का ?? कशासाठी केलं असेल त्याने...??? हा प्रश्न काही त्याला चैन पडू देईना. राजवाडेंची झालेली भांडण ....??? हे कारण असु शकेल का....?? आपण भांडणं झाली इतकंच ऐकलंय आत्तापर्यंत पण ती का आणि कशी झाली हेच आपल्याला ठाऊक नाही. तो विचार करत असतानाच त्याच्या फोनची रिंग वाजली. 


"  हॅलो ........ " पलीकडून नेहा बोलत होती. तिचा आवाज ऐकून त्याला बरं वाटलं. 

" बोला मॅडम , काय म्हणताय.....? " तो हसत म्हणाला.


" काही नाही. जेवायला आज इकडे ये. निर्मला मावशी बोलवतेय ते सांगायला फोन केला होता..." ती म्हणाली.


" हो का... म्हणजे तुझ्याकडून नाही का आमंत्रण ?? " 

" आहे हा. माझ्याकडून पण आहे.....तू ये गपचुप..." ती ऑर्डर सोडत म्हणाली. 

" पण खूप उशीर झालाय गं नुपूर दहा वाजलेत रात्रीचे. आणि मी आत्ताच आलोय ग दमुन....आता यायचा कंटाळा आलाय....." तो खरंच फार दमला होता.

" अरे म्हणून तर सांगितलं ना घरी काय करत राहू नको. आम्ही थांबलोय तुझ्यासाठी जेवायचे.. तू ये लवकर..." ती उत्साहाने म्हणाली.


" ok. येतो. " तिच्या आग्रहापुढे त्याला नाही म्हणवेना. त्याने फोन कट केला. 


तोंडावर पाणी मारलं. त्याने मग स्काय ब्ल्यू कलरचा टीशर्ट आणि जीन्स घातली. तो नुपुरकडे जायला निघाला. तो येणार म्हणून नुपूर भलतीच खुश झाली. आज ती त्याला त्याच्याविषयी वाटणाऱ्या फिलिग्स शेअर करणार होती. त्यामुळे एक अनामिक हुरहूर तिच्या मनाला लागली होती. तो काय म्हणेल....?? त्यालाही मी आवडत असेन का....??? तिच्या डोक्यात नुसते प्रश्न फिरत होते. आणि तिचं वेड मन तर कधीच अजिंक्यपाशी येऊन पोहचल होतं.  थोड्याच वेळात तो नुपुरच्या बंगल्यावर आला. त्याला बघून तर ती अजूनच त्याच्या प्रेमात पडली. कॅज्युअल लूक मध्येही तो कमालीचा हँडसम दिसत होता. तो आल्यावर मग सगळे जेवायला बसले. म्हादू काका आणि निर्मला ताईंना देखील ते नको नको म्हणत असताना ती आपल्यासोबत जेवायला लावायची. तिची मायेची आणि हक्काची माणसं म्हणून तीच होती आता तिच्यासाठी. तिने त्यांना कधीच नोकरासारखं वागवलं नाही. त्यामुळे आजही सगळे एकत्र जेवले. छान गप्पा मारत सगळ्यांचं जेवण झालं. नुपुरला अजिंक्यशी बोलायचं होतं. म्हणून मग ती काहीतरी कारण काढुन त्याला थांबवत होती. शेवटी तो इतका दमला होता की तो घरी जायला निघाला. 

" अजिंक्य , थांब ना थोडा वेळ.... मला बोलायचंय तुझ्याशी...." ती त्याला विनवत म्हणाली.


" नुपूर प्लिज मी खुप दमलोय गं.. आपण उद्या बोलुयात ना...!! " तो म्हणाला.


" अजिंक्य प्लिज मी जास्त वेळ नाही घेणार तुझा......" 

" Ok .  बोल लवकर......" तो एक जांभई देत म्हणाला.


" अजिंक्य ....... I.... I........." ती पुढे बोलणार इतक्यात त्याला कोणाचा तरी फोन आला.


" हॅलो... हा बोल. आलो मी येतोय पाच मिनिटात...." फोनवर इतकंच बोलून त्याने फोन कट केला. नुपुरला सॉरी म्हणून तो तिथून बाहेर पडला. तिचं बोलणं मात्र अर्धवटच राहिलं. ती तशीच वाट पाहत राहिली त्याच्या परतण्याची...!!! 

.................................

रात्रीचे जवळजवळ बारा वाजत आले. सगळीकडे सामसूम झालं होतं. गावाजवळच्या शेतातून कोणीतरी भरभर चालत होतं. मधूनच पानांची होणारी सळसळ अंगावर काटा आणत होती. रातकिड्यांच्या किरकिर्र आवाजाने रात्रीचा काळोख अजुनच गडद होत होता. ती व्यक्ती आजूबाजूला बघत झपझप पावलं टाकत गावाबाहेरच्या देवळाजवळ आली. तिथं कोणीतरी त्या व्यक्तीची वाट बघत थांबलं होतं. 

" किती उशीर केलासा. चल आता लवकर... न्हाईतर आपन गावलोच म्हनून समज...." दुसरी व्यक्ती म्हणाली. 


" न्हायी .... न्हायी... मला लई भ्या वाटतंय.... त्यांना समदं समजलं तर नसलं...??? आपन हतन लांब जाऊया...." ती व्यक्ती म्हणाली.


" पर समदं घेतलंस ना बराबर.  काय लागलं तर असावं... चल चल पल लवकर.......न्हाईतर काई खरं न्हायी आपलं......" 

दोघेही मग पळत सुटले. देवळाच्या समोरच्या रस्त्याने गेलं की ते गावातून बाहेर पडणार होते. दोघेही तिथून जीव खाऊन पळत सुटले. गावाच्या वेशीजवळ आल्यावर त्यांना धाप लागली म्हणून ते थांबले. त्यांनी मान उंचावुन वर पाहिलं तर त्यांच्या जीवाचा थरकाप झाला. पुढं जावं की मागं जावं तेच त्यांना कळेना. एका जागी थिजल्यासारखे ते तिथेच उभे राहिले. दोघेही घामाने डबडबले होते. समोर अजिंक्य उभा होता....!!!! 


" काय मॅरेथॉन संपली की काय.....??? " तो बेरकी हसत त्या दोघांजवळ आला. 


" चला आता पोलीस स्टेशनमध्ये असंच पळत येणार की आमच्या सोबत गाडीतून येणार...??? 


दोघांनाही काय बोलावं सुचेना. त्यांची तर दातखिळीच बसली होती. अजिंक्यने मग आवाज दिल्यावर बाकीची पोलीस मंडळी आली आणि त्या दोघांना पकडून पोलीस स्टेशनला घेऊन गेली. 

..............................


" बोला , काय सेवा करू तुमची...?? शिंदे अहो , पाहुणे आलेत आपल्याकडे... काही चहा , कॉफी विचाराल की नाही....??? " अजिंक्य समोर बसलेल्या त्या दोघांकडे बघत म्हणाला. 

समोरच्या खुर्चीत दिनेश आणि बारकु खाली मान घालुन बसले होते. बारकुला पोलिसांनी पकडलं आहे हे कळताच दिनेशने पळुन जायचं ठरवलं. पण मग बारकुला देखील सोडलं गेलं आणि दोघही पळून जायचा बेत करू लागले. पण दिनेशवर लक्ष ठेवायला सांगितलेल्या माणसांनी वेळेत फोन करून अजिंक्यला सावध केलं आणि तो वेळेत तिथे हजर झाला. पळुन जाणाऱ्या दिनेश आणि बारकुला त्यांनी पकडलं. 


" बोला दिनेश साहेब.... कोणी मारलं किशोर आणि निशा राजवाडेंना.....???? बोला....... " अजिंक्य काहीसा ओरडून म्हणाला तसा दिनेश दचकला. 

आजपर्यंत तो तोऱ्यात राहायचा. दिसेल त्या माणसाशी फटकून वागायचा. पण आज पहिल्यांदाच त्याची बोलती बंद झाली होती. त्याचा अरेरावीपणा गळून पडला होता. त्याच्या हातुन गुन्हा घडला होता आणि तो कबुल करण्याशिवाय त्याच्याकडे आता काहीच पर्याय नव्हता. 


" बोल, कोणी खून केला राजवाडेंचा.......???? "

अजिंक्य ओरडला त्याच्या डोळ्यात आता संताप दिसत होता. काही क्षण दिनेशला त्याची भीती वाटली. हा तोच दिनेश होता जो अजिंक्यशी साधं माणुसकी म्हणून देखील धड बोलला नव्हता. आज त्याच अजिंक्य समोर त्याची तोंड उघडायची पण हिंमत होत नव्हती. 


" हो..... मीच मारलं किशोर काका आणि निशा काकुला....."   तो ओरडला आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळले...