Login

मेहंदी ची जळमटे... पर्व दुसरे (भाग सातवा)

न रंगलेल्या मेहंदी च्या जळमटांत रंग भरताना...

मेहंदी ची जळमटे... पर्व दुसरे
भाग सातवा

"अरे तु बाबा होणार आहेस. आणि मी आज्जी."

आईच्या तोंडून हे वाक्य ऐकताच अभय चा आनंद गगनात मावेनासा झाला. त्याला काय करावं सुचत नव्हतं, इतका आनंदाने वेडा झाला होता. कधी एकदा सायली ला भेटतो असं झालं होत त्याला. आज्जी आणि बाबा सुद्धा खुप खुश झाले होते. किती दिवसांनी आज त्यांना मनापासून आनंद झाला होता.

पण ह्या अनपेक्षित गोष्टीने आभा ला मूळ मुद्द्याला बगल द्यावी लागली, कारण आता कितीही झालं तरी घरचे सायली बद्दल काही ऐकून घेणार नाही हे तिला माहीत होत. आणि दुसऱ्या बाजूने ती आत्या होणार असल्याचा आनंद तिलाही झाला होता. त्यामुळे पुढे काही बोलणे तिनेही थांबवले. कावेरीला आपण काय ऐकतोय तेच कळत नव्हतं. पण तिने मनापासून हसत अभय ला शुभेच्छा दिल्या.

"खुप खुप अभिनंदन."

"Thank You.. आणि जमल्यास मला माफ करशील ना..?" अभय.

"हो कावेरी आता झाल गेलं सगळ विसरून नव्याने सुरुवात कर बाळा." आज्जी.

"हो आज्जी." कावेरी.

"बरं तु सुद्धा येतेस ना सायली च्या घरी..?" आई.

"नाही खुप उशीर झालाय. काका घरी वाट पाहत असतील. निघते मी." कावेरी.

"आम्ही सोडू तुला." बाबा.

"नाही बाबा मी जाईन." कावेरी.

"सांगितलं ना एकदा बाळा सोडू आम्ही तर चल आता. चल आभा या आम्ही खाली आहोत." बाबा.

आज्जी चा हाथ धरत बाबा आणि आई घेऊन जाऊ लागले. अभय ने कावेरी ला थांबवत पुन्हा एकदा तिची माफी मागितली.

"अभी अजुन किती वेळा माफी मागणार आहेस. ह्या सगळ्यात तुझी काहीही चुकी नाहीये."

"तुझ मन मोठं आहे म्हणून तु अस बोलतेय पण खरच आज्जी बोलली तसं तु विसरून जाशील ना सगळं..? आय नो खुप अवघड आहे पण प्लीज कावे."

आणि तिघेही खाली आले. आभा ने हॉटेल मधुन चेक आऊट केलं आणि ती ही गाडीत जाऊन बसली. नेहमी गाडीत बसल्यावर दंगा मस्ती करणारे, एकमेकांची खोडी काढणारे, मोठमोठ्याने गाणी गाणारे गाडीत शांत शांत होते. तिघांना ही त्याची आठवण झाली होती कदाचित. खळखळून हसणारी कावेरी अवघडून बसली होती. काका च घर आल्यावर ती उतरली. तिने उसणं हसून सगळ्यांना बाय केले. पण आत येण्यास कोणालाही विचारले नाही. सगळ्यांना देखील आश्चर्य वाटले. तिचा हा स्वभाव नव्हता पण तीच मन मेल होत. तिच्या मनाचा, भावनांचा कोणीच विचार केला नव्हता. त्यामुळे ती मनाने खुप दूर निघून गेली होती सगळ्यांपासून.

गाडी निघून जात असताना तिने मागे वळून पाहिलं. साइड मिरर मधून अभय चा चेहरा तिला दिसला. जसं जशी गाडी दूर जात होती, तसे तिला तिच्या खुप जवळच कोणी कायमच निघून जात असल्याचं जाणवलं. तिचं मन खुप जड झालं. आज आभा च्या बोलण्याने तिच्या खचलेल्या मनात आशेचा किरण दिसला होता. पण आता तोही नाही. अभय च देखील तिच्यावर लक्ष जात, तो तिला पाहून हसतो. पण ती मनाशी निर्धार करत काहीच प्रतिक्रिया न देत, वळून निघून जाते.

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

सायली च्या घरी

पाटील कुटुंब देशमुखांच्या घरात आले. आई आणि आज्जी ने आभा ला तिथे शांत राहण्याचे आदेश आधीच देऊन ठेवले होते. खरं खोटं करण्यापेक्षा जास्त गरजेचं आता म्हणजे ती सायली ची तब्येत. तिची काळजी आता घ्यायला हवी म्हणून तिनेही हसत सगळं विसरून गेल्याचे त्यांना सांगितले. घरात आल्या आल्या सगळ्यांचा गडबड गोंधळ सुरू झाला. देशमुख कुटुंब पाटील कुटुंबाच्या पाहुणचारात गुंतले. आणि अभय ची नजर मात्र सायली ला शोधत होती. कदाचित आत्याने ते हेरले असावे.

"अभय सायली तिच्या खोलीत आहे. जा जाऊन भेटून ये."

"अं..हो जातो."

सायली तिच्या खोलीत मोबाईल वर टाईमपास करत होती. अभय हळूच जाऊन मागून तिला मिठी मारतो.

"अभिनंदन माझ्या बाळाची होणारी आई.." तिच्या कानात म्हणतो. सायली दचकते.

"अभय काय करतोयस तु..?" सायली वैतागत बोलली.

"सायली बास्स ना आता. किती तो राग."

"प्लीज मला एकटीला सोड."

"नाही हा मी तुला आता एकटीला सोडून कुठेच जाणार नाही ना तुला जाऊ देणार."

"हो ना. मग चल आपण आपला वेगळा संसार थाटु."

"चल आता मस्करी बस कर आणि बॅग भरायला घे. लगेच निघायचं आहे आपल्याला मुंबई ला."

"नाही अभय, मी मस्करी नाही करत आहे. जर तुला मी आणि हे बाळ हवं असेल तर लवकरात लवकर वेगळं हो. मला नाही रहायचंय त्या घरात."

"पण का सायली..? माझ्या घरचे माझ्यापेक्षा जास्त प्रेम तुझ्यावर करतात आणि तुला हवं नको ते सगळं बघतात मग तुला इतका काय त्रास की.."

"हे बघ मला ते काही माहीत नाही. तु विचार कर. तुला काय हवं ते."

"आणि जर का निर्णय मला मान्य नसेल तर..?"

"मग याचे परिणाम खुप वाईट होतील. जे दिसतील तुला लवकरच."

"काय करणार आहेस तु..? सांग ना काय करणार." अभय खुप चिडून सायली ला विचारात होता. त्यानंतर सायली ने जे उत्तर दिलं, ते ऐकून त्याला धक्का बसला. सायली अशी कशी बोलू शकते यावर त्याचा विश्वास च बसेना. अभय आणि सायली च्या वाढत्या आवाजामुळे घरचे घाबरतात. आणि लगेच सायली च्या खोलीच्या दिशेने येतात.

"अभय काय झालं..?" दोघांना असं तावातावाने भांडताना पाहून आईने अभय ला विचारलं. अचानक सगळे खोलीत आल्याने दोघे देखील भांबावले.

"काय झालं अभी, तु सायलीवर ओरडतो का आहेस..?"

"हो ना, तिची काळजी घ्यायची सोडून तु किती ओरडतोएस तिच्यावर..?" सायली ची आत्या उपहासाने बोलल्या. आणि सायली शेजारी जाऊन उभ्या राहिल्या.

"आई काही नाही ते जरा.."

"काही नाही कसं, आता सगळे इथेच आहेत तर सांगून टाक ना सगळ्यांना." अभय ला मधेच थांबवत सायली बोलली.

"अभय बाळा सांग ना काय झालं आहे..?"

"आई चल आपण निघू आधी इथून."

"सायली तु सांग, काय झालं..?" आभा बोलली.

"जे काही आहे ते अभय सांगेल." सायली आभा च्या प्रश्नावर दुर्लक्ष करत बोलली.

"आभा तिला काही विचारू नको. तिला तुम्ही इतकं प्रेम केलं, इतकी माया केली पण तिला तुम्ही कोणीच नको आहात. वेगळा संसार पाहिजे तिला." अभय च बोलणं ऐकून सगळे स्तब्ध होतात. सगळ्यांच्या नजरा सायली वर जातात. ती मात्र काहीच चुकीचं न केल्याचं आव आणून उभी होती.

"सायली बाळा काय बोलतोय हा अभय, हे खरं आहे का..?"

"हो आज्जी. खर आहे."

"का पण आमच्या प्रेमात काही कमी पडतंय की काय असं झालं तुला अचानक हा निर्णय घेतला तु..?"

"कमी नाही खुप जास्तच प्रेम मिळत. आणि ती लुडबुड नकोय मला माझ्या संसारात कोणाची. तुम्हाला मान्य असेल तर येते मी नाहीतर आता इथून गेलात तरी हरकत नाही."

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

कावेरी च्या काकांकडे

"कावे हे बघ मी फोटोज् आणले आहेत, ह्यातले सगळे वहिनी आणि दादाला पसंत आहेत. तु आता ह्यातला एखादा बघ म बोलवू त्यांना पोह्यांचा कार्यक्रमाला." काका उत्साहात बोलले.

"तुम्हाला जो पसंत आहे तो बघा."

"अग असं काय करतेय, बघ तरी ह्यातला कोणी. शेवटी तुला ठरवायचं आहे."

"नाही प्लीज काका. मला नका काही विचारू ह्यातलं."

"ठीक आहे मग ह्यांना बोलवतो ह्या रविवारी. नाहीतरी दादा आणि वहिनी शनिवारी येतील. आता व्हिडिओ कॉल करून फोटो दाखवतो त्यांना. चालेल..?"

"तुम्हाला जे ठीक वाटेल ते." असं बोलत कावेरी तिच्या रूम मध्ये निघून जाते.

"अग कावे, पोरी लाजलीस का..?" आणि काका मान हलवत हसत राहिले.

आपल्या खोलीत जाऊन कावेरी दार लावून घेते. आणि उशीमध्ये तोंड खुपसून, हुंदके देत रडू लागते. तिच्या ढासळत जात असलेल्या निर्धाराची तिला जाणीव होते. लगेच ती तिचे डोळे पुसून आपल्या कामाला लागते.

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

(सायली च्या घरी)

"अहो सायली ची आई, बाबा काय बोलतेय ही तुम्ही काहीतरी समजवा ना तिला."

"कोणी काही समजावून सांगायची गरज नाही. मी घेतला तो निर्णय ठाम आहे. तुम्हाला मान्य आहे की नाही ते सांगा." सायली अभय च्या आईला बोलली.

"अजिबात मान्य नाही. अभी आम्हा घरच्यांना कधीच सोडून जाणार नाही आणि ते ही काही चुकी नसताना." आभा तावातावाने बोलली

"ते त्यालाच विचार ना तु..!" सायली.

"हो ना अभी..?" आभा अभय ला विचारात होती. पण अभय शांत होता. सगळ्यांना वाटलं अभय काहीतरी समजावेल सायली ला पण,

"सायली, मी पुढच्या आठवड्यात येतो तुला घ्यायला. तो पर्यंत मी नवं घर पाहतो."  अभय हे बोलताच त्याच्या घरातले निशब्द होतात. मुलानेच मान्य केलंय, तर पुढे काय बोलावं कोणालाही कळत नाही. आभा ला त्याच बोलणं खुप लागत. पाणी डोक्यावरून चाललय म्हणून ती मनाशी काही ठरवते आणि

"आलोच आम्ही दोन मिनिटांत." म्हणत, अभय ला घेऊन घराच्या बाहेरच्या बाजूला जाते.

"अभय काय चाललंय तुझ..? तुला कळतंय ना सायली काय बोलतेय ते. आणि तु तिला प्रतिकार करायचा सोडून साथ देतोय..?" अभय शांतच होता. तो काहीच बोलत नव्हता. आभा अजुन चिडली. ती त्याच्या खांद्याला पकडत त्याला प्रश्नावर प्रश्न विचारत होती. अभय चा एकाएकी बांध सुटला, आणि जोरात रडू लागला. आभा ला अभय च हे रूप नवं होत. त्याला अस बिथरताना पाहून तिलाही गहिवरून आलं. तिने त्याला शांत होऊ दिलं.

"अभी, मला माहितीये तु असा अचानक इतका मोठा निर्णय घेणार नाहीस, प्लीज सांग ना मला काय झालं..?"

"आभा, ती बोलते की मी तिचं बोलणं नाही मान्य केलं तर ती त्या बाळाला जन्म नाही देणार. ते ही एका आठवड्यात सगळ संपवून..." आदित्यला हुंदका न आवरल्याने तो पुढचं वाक्य बोलूच शकला नाही.

"बापरे अभी, तु बोलला का नाहीस तिथे हे..?"

"तिने कोणालाही ही गोष्ट न सांगण्याची धमकी दिलीय. आणि मला माझ बाळ हवंय. त्यामुळे एका क्षणाचा ही विचार न करता मी मान्य केलंय. कधी वाटलं नव्हतं, बाबा होण्यासाठी मला माझ्या बाबांना सोडावं लागेल."

"कोणालाही सोडायची गरज नाहीये दादा तुला." मागून आलेल्या आवाजाने दोघेही दचकतात. पाठी वळून बघतात तर, त्या व्यक्तीला पाहून अभय ची नजर अनोळखी तर आभा ला हायस वाटतं. तो श्रीकांत होता.

"हो दादा मला सगळ्या गोष्टींची कल्पना आहे. आता काहीच काळजी करू नकोस."

"कोण आहेस तु..?"

"अभी अरे हा आदित्य चा भाऊ आहे..?"

"भाऊ..?" अभय गोंधळला होता.

"ऐका, ही वेळ आता ओळख करून घेण्याची नाहीये. मी ज्या कामासाठी आलोय चला आधी ते पूर्ण करू." अस म्हणत श्रीकांत दोघांना घेऊन आत येतो. आभा सायली च्या खोलीत जाऊन सगळ्यांना खाली बोलावून घेते. श्रीकांत ला पाहून सायली च्या घरचे अचंबित होतात तर आभा च्या घरच्यांना त्याची ओळख ही नव्हती. त्याला इथे पाहून सगळ्यात जास्त आश्चर्य आत्याला झाल होत. कारण श्रीकांत हा आत्याचा मुलगा होता. जे अजुनही आभा ला माहीत नव्हते.

"श्री तु इथे काय करतोयस..?" आत्या श्रीकांत ला विचारत होती.

"आई, मला यावं लागलं. आभा आणि तिच्या घरावर जो अन्याय होतोय त्यासाठी याव लागलं. खास करून त्या कावेरी साठी..."

"आभा, कावेरी तु कसं ओळखतोस यांना श्री..? ए काय ग, माझा मुलगा कसा तुला ओळखतो..?" श्रीकांत हा आत्याचा मुलगा असल्याचं नुकतच कळल्याने, आभा आधीच शॉक झाली होती. नियतीचे असे कसे हे चक्र तिला काहीच कळतं नव्हतं. ती भांबावलेल्या नजरेने श्रीकांत ला पाहत होती.

क्रमशः

🎭 Series Post

View all