मेहंदी ची जळमटे... पर्व दुसरे
भाग दुसरा
टपरी च्या जवळ येताच तिने पाहिले, समोर एक व्यक्ती उभी होती. एका हातात चहा पीत आणि दुसऱ्या हातात पेटलेली सिगारेट होती. त्याला पाहून आभा चा पारा मात्र खुप तापला कारण हा तोच व्यक्ति होता जो मगाशी तिने थांबवलेल्या रिक्षात बसून गेला होता. ती जाऊन त्याच्या समोर उभी राहिली.
"हाच प्रश्न होता का जीवनाचा..?"
"सॉरी..?"
"माझं महत्वाचं काम असूनही तुम्हाला मी थांबवलेल्या रिक्षाने जाऊ दिलं. का तर तुम्हाला खरचं इमर्जन्सी होती म्हणून."
"अहो मॅडम ऐकुन तरी घ्या." पण आभा काहीच ऐकुन घ्यायच्या मनस्थितीत नव्हती. हातातल्या सिगारेट कडे पाहून त्याला एक रागाचा कटाक्ष देत,
"निर्लज्ज कुठले" असं म्हणत ती घाईतच तिथून निघून गेली.
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
आभा च्या घरी
बेल च्या आवाजाने आई दार उघडतात. अभय आलेला असतो. आत जाऊन फ्रेश वैगरे होऊन तो नुकताच हॉल मध्ये येतो. आई येऊन त्याला पाणी देते. तितक्यात आज्जी सुद्धा हॉल मध्ये येते.
"अभय बाळा आलास तु."
"हो आज्जी आताच आलो. ते तु सांगितलेलं सगळं सामान देखील आणलय आणि बाकी पूजेचं सामान गुरुजी च आणतील." इतकं सगळं झालं होत ज्याने सगळे सावरत जरी असले तरी अस्वस्थ होते. झालेल्या प्रसंगामुळे सत्यनारायण ची पूजा ठेवता आली नाही म्हणून आज लग्नाच्या किती महिन्याने आज्जीने दोघांचा सुखी संसार व्हावा तसेच घरात सात्विक आणि प्रसन्न वातावरण व्हावे म्हणून फक्त छोटी पूजा ठेवली होती.
"बरं. आणि सगळ्यांना आमंत्रण दिलंस का..?
"आई, मी दिलंय सगळ्यांना आमंत्रण. तुम्ही निश्चिंत रहा. बाकी राहिले आहेत त्यांना हे गेले कावेरी च्या बाबांसोबत सांगायला."
"अरे हो आई. मी विसरलोच. कावेरी कुठे गेली..?"
"ती कधीच निघून गेली. तिला सामानाची आवराआवर करायची होती ना. म गेली निघून घाईत."
"सामानाची आवराआवर..? का..?"
"तुला नाही माहित का ती पुण्याला जातेय तिच्या काकांकडे..?"
"काय.. मला नाही काही बोलली ती ह्याबद्दल.. थांब तिला फोन करून येतो."
अभय बाहेर दार उघडून निघाला तशी आभा येताना दिसली.
"काय ग इतका उशीर, झालं का सगळ काम..?"
"हो अभी काम झालं. एका मूर्ख माणसामुळे झाला उशीर. ते सोड तु कुठे निघालास..?"
"मी कावेरी ला फोन करतोय ग. ती पुण्याला जातेय तिच्या काकांकडे राहायला. आज घरी आलेली पण निघून गेली अचानक न भेटताच."
"असं मधीच का आणि मला काही सांगितलं पण नाही."
"काय माहित."
"बरं तु बोल मी पटकन फ्रेश होऊन येते दोन मिनिटांत. कॉल कट नको करुस."
"ठीक आहे."
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
कावेरी च्या घरी
"कावे, उद्या तुला बाबा येतील सोडायला तु एकटी जाणार नाहीयेस त्यांनी सांगितलं आहे."
"बरं आई."
कावेरी बॅग भरत होती की तितक्यात तिचा फोन वाजतो. त्यावर अभय च नावं पाहून तिला खुप बरं वाटत. उचलू की नको अश्या विचारात असताना कॉल कट होतो. पुन्हा अभय चा फोन येतो. ह्या वेळी एका रिंग मध्येच ती उचलते.
"हॅल्लो.."
"अग ए मंद. फोन का उचलत नाही ग..? आणि आई काय म्हणत होती तु पुण्याला जातेय..?
"हमम्म.."
"हम्म्म काय..? बोल उत्तर दे..!"
"अरे हो थोडा चेंज म्हणून जातेय."
"तु नाही जायचं हा कावे. बास्स मला माहीत नाही काही."
"तु बोलशील आणि मी ऐकू."
"का मी कोणीच नाही का तुझा..?"
अभय च्या प्रश्नाने कावेरी च्या डोळ्यांत टचकन पाणी भरत. तिला भडाभडा बोलून व्यक्त व्हावं वाटत होत पण तिने प्रश्नाला दुर्लक्ष केलं.
"आभा कशी आहे..?"
"ही काय इथेच आहे. तिला पण बोलायचं आहे तुझ्याशी. हे घे बोल."
"हॅल्लो आभा मी सगळ तुझ बोलण ऐकलंय त्यामुळे वेगळं कारण काही देऊ नकोस तु मला. आम्हाला मित्र मानत असशील तर तु तुझ जाणं रद्द करून उद्या तु येणार आहेस घरी."
"अग पण आभा..."
"मी फोन ठेवतेय. उद्या छान तयार होऊन ये. घरी पूजा आहे उद्या.. तर येणार आहेस तु पण. ओके. बाय."
आभा ने तिने काही बोलायच्या आतच फोन ठेवून दिला. कावेरी ला काय करावं सुचत नव्हतं.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
दुसऱ्या दिवशी
आज अभय आणि सायली ह्या नव्या उत्सवमूर्ती साठी घरात पूजा होती. एकामागून एक येणाऱ्या दुःखाच्या लाटेने पाटील आणि देशमुख कुटुंब खचले असले तरीही पुन्हा नव्याने केलेल्या सुरुवातीत सगळे आपलं मन रमवत होते. फुलांच्या माळांनी पाटलांच घर छान सजल होत. अभय आणि आभा ने जातीने लक्ष देऊन सुंदर आणि प्रसन्न वाटेल असं सगळीकडे सजवल होत. पाहुण्यांची वर्दळ वाढत होती. अभय आणि बाबा त्यांची सरबराई आणि विचारपूस करण्यात व्यस्त होते. आभा सायली ला तयार करत होती. आई प्रसादाची तयारी करत होत्या आणि आज्जी हॉल मध्ये बसून गप्पा मारत होती. कोणाला काही हवं नको विचारात होती. आज्जीने अभय ला हाक मारत त्यांच्याकडे बोलवलं.
"हा बोल ग काय झालं..?"
"अरे तुला काय सांगितलं होतं मी. सोवळं नेसून ये बोलले होते ना, मग हे काय घातलयस तु..?"
"ए आज्जे नको ना ग. आता घातलीय ना ही शेरवानी मग."
"अभी लवकर जा आणि घालून ये लवकर, पूजेची वेळ होत आलीय. जा जा लवकर जा."
अभय थोड्या नाराजीनेच चेंज करायला गेला. सगळी तयारी झाली असल्याने आई सायली तयार झाली की नाही पहायला गेल्या. दार उघडून आभा ने आईला आत घेतलं. आभा फिकट आकाशी रंगाच्या काठापदरच्या साध्या साडीत तयार झाली होती. आभा ला अस पाहून क्षणभर आईला मागचे प्रसंग आठवले. किती गोड आणि निरागस दिसतेय आभा म्हणून त्यांनी तिला कोणाची नजर लागू नये म्हणून काजळाची तीट लावली. आभा ला सुद्धा गहिवरून आलं. तिने आईला सायली कडे घेऊन जात तिला तिने तयार केल्याचं सांगितलं. आईने तिचीही दुष्ट काढत तिला बाहेर येण्यासाठी सांगितलं. जाता जाता आईच लक्ष तिच्या हातावर गेलं.
"आईं नी तुला दिलेल्या पाटल्या कुठेय सायली..?"
"खोलीत असतील आई."
"आधी जा आणि त्या घालून ये. नाहीतर आई खुप चिडतील. किती अनमोल आहेत त्या आपल्या साठी माहितीये ना तुला. जा बाळा पटकन जा आधी घालून ये."
"हो आई जाते लगेच."
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
बाबांच च लक्ष दारावर जातं. कावेरी तिच्या आई वडिलांसोबत घरात येताना दिसली. तिने आजच जाणं रद्द करून पुढे ढकलून आपल्या मित्रांच्या बोलण्या मुळे तिथे आली. निळा रंग आणि त्यावर सफेद धाग्यांनी नक्षीकाम केलेला पंजाबी ड्रेस तीच सौंदर्य खुलवत होता. काही जणांच्या नजरा तिच्या वरच खिळल्या होत्या पण तिला तिच्या नजरेत फक्त अभय पहायचा होता. कावेरी आणि तिची आई आज्जी शेजारी येऊन बसल्या. तितक्यात तिथे देशमुख कुटुंब सुद्धा हजर झाले. त्यांना पाणी देण्यासाठी बाबा जाणारच होते की कावेरी ने त्यांना अडवून स्वतः आत गेली आणि पाणी आणून दिलं. थोडा वेळ सगळ्यांशी गप्पा गोष्टी करत त्यांनी सायली ला विचारले.
जाऊन बघून येते म्हणून ती अभय च्या खोलीच्या दिशेने चालू लागली. तिने दारावर टकटक केली. पण काहीच प्रतिसाद न आल्याने ती गेली पण पाहिलं तर खोलीत कोणीच नव्हतं. म्हणून ती वळून जायला निघाली तस तीच लक्ष भिंतीवरच्या अभय च्या फोटो कडे गेलं. त्या फोटोला ती भान हरपून पाहू लागली. आतापर्यंत त्याच्या सोबत घालवलेल्या क्षणांना ती आठवू लागली. तेवढ्यात अभय खोलीत आला. अभय ला सोवळं नेसलेलं पाहून त्याला ती पाहताच राहिली.
पिळदार शरीरयष्टी आणि चेहऱ्यावरचा मिश्या आणि त्यावरच तेज पाहून कावेरी पुन्हा स्वतःला हरवून बसली. अभय ने तिला कसा दिसतोय मी विचारलं पण त्यावर तिचा काहीच प्रतिसाद नव्हता. ती एकटक त्याच्याकडे पाहत बसली जणू काही सर्व जगाचा विसर पडला होता तिला. मनातल्या भावना स्प्रिंग सारख्या असतात, जितक्या दाबून धरू ठेवू तितक्या वेळ राहतात. एकदा का त्यावरच नियंत्रण सुटलं की त्यापेक्षा दुपटीने स्प्रिंग सारख झोकून देतात. कावेरी च सुद्धा असच काहीस झालं. तिच स्वतःवरच नियंत्रण सुटले आणि तिने जाऊन अभय ला घट्ट मिठी मारली.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा