Login

आठवणी दूरदर्शनच्या

आठवणी दूरदर्शनाच्या

*विषय : आठवणी दूरदर्शनच्या!*

*शीर्षक -दूरदर्शन: कुटुंबीयांना जोडणारा धागा*

लहानपणीचा काळ म्हणजे सोनेरी आठवणींचं जिवंत झाड. त्याच झाडाच्या फांद्यांवर लटकणारी एक खास गोड आठवण म्हणजे दूरदर्शन! आज वर्ल्ड कप, नेटफ्लिक्सचं साम्राज्य, आणि यूट्यूबच्या गल्ल्या गाजत असल्या तरी त्या काळच्या ‘दूरदर्शन’च्या आठवणींची सर नाही.असे मला तरी वाटते.

संध्याकाळी पाच वाजले की सगळं घर टीव्हीसमोर जमायचं. दूरदर्शनची ती सुरुवातीची धून - "तिन-न-ना-ना-ना..." - अजूनही कानात गुंजते. टीव्हीवर चित्रपट लागणार आहे हे समजलं की, दुपारपासूनच तयारी सुरू. "आज टीव्हीच्या वर लागलेली धूळ झटकून ठेव हं!" अशी बाबांची सूचना यायची.

‘रामायण’ आणि ‘महाभारत’ हे तर पर्वणीचे सोहळे होते. "टीव्हीचा अँटिना जरा सरळ करा ओ !" असं सांगताना आईची ती हुरहुरलेली अवस्था बघायला मिळायची. ‘महाभारत’ सुरू झालं की रस्त्यावर सन्नाटा पसरायचा; ज्यांच्याकडे टीव्ही नव्हता ते शेजारच्या घरात जमून ‘टीव्ही पाहण्याच्या अधिकाराचं’ गमतीशीर प्रदर्शन करायचे.बातम्याची धून अजूनही मनाला भावते.

‘चित्रहार’ आणि ‘छायागीत’ हे संगीतप्रेमींसाठी मेजवानी. 'चित्रहार' पाहताना गाणी सुरु झाली की "हे गाणं जुनं आहे," असं सांगायची स्पर्धा सुरू व्हायची. ‘मोगली’चं जंगल बुक पाहून मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी जंगलात हरवायची इच्छा दाटून यायची.काश आपण पण मोगली असतो या विचारात आम्ही हरवायचो.

तसंच, ‘शक्तिमान’! शक्तिमान पाहून सगळेच सुपरहिरो बनायला तयार. "मी शक्तिमान आहे," असं म्हणत माझी छोटी बहीण अंगणात फिरत असायची. मुलांसारखी दिसायची त्याचा फायदा असो पण नंतर आईच्या चपलेचा प्रहार तिच्या "मिशन शक्तिमान"ला यशस्वी होऊ द्यायचा नाही.

एकदा ‘कृषी दर्शन’ सुरू झालं की घरातल्या मोठ्यांच्या चेहऱ्यावर “आता काय पाहायचं?” असं प्रश्नचिन्ह उमटायचं. पण त्याही काळात "सगळं पाहण्याचं" प्रण सांभाळून आम्ही तेही मन लावून पाहायचो.

दूरदर्शन फक्त मनोरंजन नव्हतं, ते कुटुंबाचा एक अविभाज्य भाग होतं. एकत्र पाहण्याच्या आनंदामुळे त्याने घरांना घरपण दिलं. आज टीव्हीचे चॅनेल्स वाढले, पण त्या जुन्या आठवणींची गोडी कधीच कमी होणार नाही आणि होऊ देखील नये.

आता हा विषय आठवून मनात येतं,
"ते दिवस तेच होते,
जिथे हास्याची शिदोरी होती,
संपूर्ण कुटुंब टीव्हीसमोर,
आणि दूरदर्शनची दुनिया होती!"

*सौं.जान्हवी साळवे.*