"गुड मॉर्निंग.. काय चालू आहे?"
"काय चालू असणार? तुझ्याच मॅसेजची वाट बघत होते. मॅसेज आला, आता लागते कामाला. तू?"
" मी आमच्या मॅडमची वाट बघतो आहे, कधी एकदाचे गरम पाणी आणून देतील ते."
" गरम पाणी? का रे? बरा आहेस ना?"
" हो.. रोज सकाळी इतरजण जेव्हा चहा पितात तेव्हा आम्ही चहा नामक उकाळा पितो.." त्याने एक डोळा मारण्याचा इमोजी पाठवला.
" तुझे बरे आहे रे बसल्या बसल्या तुला आयता चहा मिळतो. माझा नवरा बघ कसा मारक्या म्हशीसारखा बघतो आहे, त्याला छान आलं, वेलची घातलेला चहा देऊनही." तिने डोक्यावर हात मारण्याचा इमोजी पाठवला.
" तो म्हैस आहे की रेडा? तुला अजून माहीत नाही."
" काहिही बोलतो आहेस.."
" आमची ही ते गरम पाणी घेऊन आली आहे. जरा बघतो ते चहासारखे झाले आहे का?"
" बघ.. मी पण स्वयंपाकाला लागते. ऑफिसला जायचे आहे."
" तुला एक गोष्ट सांगायची होती."
" तुला कधीपासून परवानगी लागायला लागली? बोल ना.."
" आपला हा रोजचा वॉट्सॲपचा संवाद मला रोज दिवसभराचा उत्साह देऊन जातो.. थँक यू सो मच."
" मलापण खूप बरे वाटते तुझ्याशी बोलून. बरं तू रविवारी येणार आहेस का? सगळेच येणार आहेत."
" येईन.. पण थोडा उशीर होईल."
" बरं येताना निशाला घेऊन ये. मी सुद्धा आदीला आणणार आहे. आता फायनल बाय हां.. उशीर होतो आहे." फोन ठेवून समीरा उठली. आदी तिच्याकडे बघत होता.
" काय रे, असा काय बघतो आहेस?"
" तुझ्या चेहर्यावरचे हसू.. कोणाशी बोलत होतीस विचारू का?"
" त्यात काय विचारायचे? यशसोबत बोलत होते." आदी एकदम शांत झाला. समीराही तिचा मोबाईल तिथेच ठेवून गेली. आदीला तिच्या मोबाईलमधील चॅट बघायची फार इच्छा होत होती. पण त्याने स्वतःला आवरले.
" घे चहा घे.." निशाने यशसमोर चहाचा कप धरला. " झालं वाटतं बोलून समीराशी?"
" हो.. तिला तेच सांगत होतो, तुझ्या हातच्या गरम पाण्याला सुद्धा चव आहे." यश हसत म्हणाला.
" घरातल्या प्रत्येक गोष्टी बाहेरच्या व्यक्तीला सांगायची गरज नसते." निशा फणकार्याने बोलली.
" बरं, यापुढे नाही सांगणार." भांडणे नको म्हणून बोलणं आटोपतं घेत यश म्हणाला. निशा तो गेला तिकडे रागाने बघत राहिली. यश आवरून आला तरिही ती तशीच बसून होती.
" काय ग, आज तुला नाही का जायचे का ऑफिसला? बरं ऐक.. रविवारी आमच्या ग्रुपचे गेटटुगेदर आहे. तू येणार का? " यशने विचारले.
" ती समीरा असेल ना तिथे?"
" आमचा सगळा ग्रुप भेटणार आहे. ती ही आलीच त्यात."
" मग यायलाच पाहिजे.." निशा पुटपुटली.
" काय बोललीस?"
" येते मी.."
"बरं. रविवारी माझे एक काम आहे. ते झाले की निघू. चल बाय.. लव्ह यू." निशाला जवळ घेत यश म्हणाला. त्याच्या स्पर्शातून त्याचे प्रेम तिला जाणवत होते. तरिही त्याचे समीराशी बोलणे तिला खटकत होते. तिने तो विचार झटकला. तिने त्याला घट्ट मिठी मारली आणि सगळे विचार दूर सारले.
काय असेल नक्की यश आणि समीराचे नाते? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
दादर मुंबई
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा