मागील भागात आपण पाहिले की समीरा आणि यशच्या मैत्रिला देण्यात येणारे चुकीचे स्वरूप समीरा खोडून काढते. पुढे बघू काय होते ते.
" तू एवढा बोलतोस समीराशी?" निशाने गादीवरची चादर नीट करत विचारले.
" तू बघितलेस कधी?" यशने उलट विचारले.
" मग तुझे मित्र उगाचच बोलत होते?"
" तो त्यांचा दृष्टिकोन होता. मैत्रिणीशी बोलणे वाईट असते का?"
" ते मला माहीत नाही. पण मला नाही आवडत तू तिच्याशी बोललेले."
" निशा?"
" तुझे तिच्यावर प्रेम नसेल तर तू तिच्याशी बोलणे सोडून दे." निशाने निर्वाणीचा इशारा दिला.
" निशा समजून घे.. आम्ही फक्त मित्र आहोत. आणि आम्ही कुठे भेटून बोलतो? दहा एक मिनिटे चॅट करतो तेवढेच."
"माझ्याशी बोल ना, जे बोलायचे ते."
" मी बोलतोच ना.. पण समजून घे ना, कोणतीही जोडी शंभर टक्के एकमेकांना अनुरूप नसते ग. मनातली प्रत्येक गोष्ट आपल्या जोडीदाराला नाही सांगता येत. त्या सांगण्यासाठी कोणाची तरी गरज असते. इथे ती समीरा आहे. बस.. तू नको ना लोकांसारखा वेगळा विचार करूस." यश निशाला विनवत होता. त्याचा सच्चेपणा निशाला पटत होता.
" ठिक आहे. काय बोलू मी यावर.." निशा खांदे उडवत म्हणाली.
" तू नको काही बोलूस.. मीच तुला थँक्स म्हणतो." यश आनंदाने बोलला. यश आणि समीरा दोघांचाही संवाद पूर्वीसारखाच चालू होता. पण हळूहळू त्यात त्रोटकपणा येऊ लागला. आजकाल समीरा ऑनलाईन नसायची. जसा वेळ मिळेल तशी ती मॅसेजला रिप्लाय द्यायची. इथे यशचेही प्रमोशन झाले होते. काम, जबाबदारी दोन्ही वाढले होते. तरीही न चुकता तो रोज सकाळी समीराला मॅसेज करणे चुकवत नव्हता. दिवसामागून दिवस जात होते. मागच्या गेटटुगेदर नंतर एकदोन वेळा सगळे भेटले होते. पण काही ना काही कारण काढून समीरा मात्र आली नव्हती. मागे मिहीर जे बोलला होता, त्याचा राग असावा मनात असे वाटून यशने पण विषय वाढवला नाही. समीराचे बोलणे कमी कमी होत होते. एक दिवस अचानक निशाने यशला फोन केला.
" यश, समीरा कशी आहे?"
" कशी म्हणजे? बरी असेल.. का?"
" तुझी मैत्रीण असूनही तुला माहित नाही?"
" निशा मी ऑफिसमध्ये आहे. उगाचच कोडी घालू नकोस. काय ते पटकन बोल. काल का परवाच ती माझ्याशी बोलली होती. काय झाले?"
" यश.. समीराचा अपघात झाला होता." निशा रडवेली होऊन बोलत होती.
" काय?? झाला होता म्हणजे?"
" मागच्या वर्षी एका लहान मुलीला वाचवताना समीरा गाडीखाली आली होती. तेव्हा ती खूप जख्मी झाली होती. तिच्या पायावरून गाडी गेली होती." निशा जे बोलत होती ते सगळे यश सुन्नपणे ऐकत होता.
" ती गेले वर्षभर अंथरूणावर आहे. तिला मधुमेह असल्यामुळे त्या जखमा भरून आल्या नाहीत. गँगरीन झाले होते."
" तुला कसे समजले?" यशने विचारले.
" माझी एक मैत्रीण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. तिला बघायला म्हणून मी आले होते. तिथेच आदी दिसला. इथे कसा काय म्हणून बोलायला गेले तर समजले.. आधी तो काहीच बोलत नव्हता मी खोदून विचारल्यावर त्याने सांगितले.. काल तिची तब्येत जास्तच बिघडली म्हणून तिला इथे आणले आहे. यश.. ऐकतो आहेस ना?"
" हो.. बोलत रहा.." यश सुन्न झाला होता.
" समीरा.. खूप सिरियस आहे."
" हॉस्पिटलचे नाव आणि पत्ता?"
" तू इथे येऊन काहीच फायदा नाही. डॉक्टर इथे गर्दी करू नका म्हणत आहेत. तसेही ती आयसीयु मध्ये आहे.. कोणालाही ओळखायच्या पलीकडे." यशने फोन कट केला. तो डोके धरून बसला. तो ऑफिसमध्ये सांगून बाहेर पडला. गाडीत येऊन बसल्यावर त्याला सगळे आठवायला लागले. त्या दोघांची पहिली ओळख, हळूहळू वाढलेली मैत्री. दोघांनी आपापले जोडीदार निवडताना केलेल्या गमती.. सुरूवातीच्या भेटीगाठी कमी झाल्यावर वाढलेले फोनवरचे बोलणे. त्याला अचानक आपल्या पायाखालून जमीन सरकल्यासारखे वाटले. वेळात वेळ काढून तो आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट तिच्याशी शेअर करत होता. तिच्या अभिप्रायाची वाट बघायचा. आणि समीरा.. गेले वर्षभर ती आजारी होती. एका शब्दाने तिला सांगावेसे वाटले नाही? एवढा परका झाला होतो मी तिच्यासाठी? तिनेच नाही तर ग्रुपमधल्या कोणीच आपल्याला कळू दिले नाही? यशने मोबाईल उघडला. त्याचे प्रमोशन झाले तेव्हा जवळपास महिनाभर दोघेही एकमेकांशी बोलले नव्हते. त्यानेही ही गोष्ट मनावर घेतली नव्हती, घ्यायला वेळ नव्हता. आपण जेव्हा आपलं आयुष्य आनंदात घालवत होतो तेव्हा ती आजारपणाशी लढत होती..त्याला खूपच अपराधी वाटलं. पण तो एकदा तिच्या घराजवळ गेला होता. सहज भेटून जाऊ या विचाराने त्याने तिला फोन केला होता, तेव्हा अडखळत तिने ती बाहेर असल्याचे सांगितले होते. म्हणजे तिने जाणीवपूर्वक आपल्याला लांब ठेवले? कामात थोडे सेटल झाल्यावर तो तिला भरभरून मॅसेज करत होता, त्यावर तिचे फक्त इमोजीज येत होते. का लपवलीस एवढी मोठी बातमी माझ्यापासून? एवढाही विश्वास नव्हता मित्रावर? यशचे मन आक्रंदत होते. त्याच्या डोळ्यातून त्याच्या मनाविरुद्ध अश्रूंच्या धारा वहायला लागल्या. कितीतरी वेळ समीरा अशी का वागली असेल याचा तो विचार करत होता. तो जेवढा जास्त विचार करत होता तेवढाच त्याला तिच्या वागण्याचा त्रास होत होता. समीरा सिरियस आहे, त्याला निशाचे वाक्य आठवले. त्याही परिस्थितीत त्याने समीरा लवकर बरी व्हावी म्हणून देवाला हात जोडले. तोच निशाचा फोन वाजला. वाजून वाजून बंद झाला. प्रार्थना संपल्यावर त्याने डोळे उघडले. मोबाईलवर निशाचा मॅसेज फ्लॅश होत होता.. "समीरा इज नो मोर." त्याला जोरजोरात रडावेसे वाटत होते, समीराला खडसावून विचारावेसे वाटत होते की तू हे असं का वागलीस. पण स्वतःची असहायता जाणवून त्याला अजूनच भरून आले. आता फक्त तिच्या आठवणीच सोबत असणार होत्या आणि तिने शेवटपर्यंत परकं मानलं याचा सल. डोळे पुसून तो हॉस्पिटलकडे जायला निघाला. सोबत म्हणून त्याने गाणी सुरू केली. आशा भोसले गात होती. "मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है.."
कथा कशी वाटली नक्की सांगा.
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा