Login

मेथीचे थेपले Recipe In Marathi

लहान मुलांना आवडतील असे मेथीचे थेपले
मेथीचे थेपले


बाजारात मस्त मोठ्या मोठ्या मेथीच्या भाजीच्या जुड्या दिसतात. ताजी ताजी लाल कोराची पाने असलेली मेथीची भाजी चवीला छान लागते असे म्हणतात. मला तर रोजच मेथीची भाजी दिली तरी चालते, पण मुली कंटाळतात; म्हणून मग मी त्याचे वेगवेगळे प्रकार करून खाऊ घालत असते. आज आपण मेथीचे थेपले बनवणार आहोत.


साहित्य : चार वाट्या कणिक, एक वाटी बेसन पिठ, मेथीची भाजी एक वाटी, एक चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा भरपूर लसूण घातलेला, लाल तिखट एक चमचा, हळद, दोन पळी तेल, दही एक वाटी, जीरे अर्धा चमचा, ओवा एक चमचा, चवीनुसार मिठ आणि भाजण्यासाठी साजुक तुप.

कृती: १) मेथीचे पानं स्वच्छ धुवून बारीक चिरुन घेणे.

२) आता कणकेत तेल घालून चांगले एकजीव करून घेणे. दोन्ही हाताने चांगले घासून तेल पिठात मिक्स करणे.

३) आता त्यात मिठ मिरची ठेचा ओवा जीरे हळद दही आणि मेथीची भाजी घालून चांगले पिठ मळून घेणे.

४) थोडे थोडे पाणी घालून जरा मऊसर मळून घेणे.

५) आता हे पिठ झाकण ठेवून अर्धा तास भिजत ठेवणे.

६) नंतर तेलाचा हात लावून पुन्हा मळून घेणे.

७) चपाती करतो तसे मधे तेल लावून मध्यम आकाराचे गोळे करून जरा जाडसर लाटणे.

८) गरम तव्यावर दोन्ही बाजूने छान खरपूस भाजणे.

९) दोन्ही बाजूने भरपूर साजुक तुप लावून भाजणे.

१०) तुपामुळे खुप छान चव येते आणि थेपले बराच वेळ मऊ पण राहतात.

हे थेपले दही लोणच किंवा शेंगदाण्याच्या चटणी बरोबर खुप छान लागतात किंवा तुम्ही चहा बरोबर पण खाऊ शकता. बाहेर कुठे प्रवासात जाताना पण डब्यात घेऊन जाऊ शकता. हे थेपले दोन दिवस चांगले मऊ राहतात. नक्की करून पहा हे मेथीचे थेपले.


किचन तुमचे आणि रेसिपी माझी. अशाच नवनवीन रेसिपीसाठी मला वाचत रहा आणि रेसिपी आवडल्यास लाईक कमेंट करायला विसरू नका.