म्हणून जग फसते! भाग -1

शरद नावाच्या सिनियर तरुणाला ह्या वयात भेटलीय कॉलेज क्वीन.. बघुया पुढे काय होणार कोण फसतेय आणि कसे..
म्हणून जग फसते !
भाग -1
©®राधिका कुलकर्णी.

" पण काही म्हण शऱ्याऽऽ, फारचं काकूबाई आहे बूवा तुझी बायको…अजिबात शोभत नाही तुला..! कुठे तु इतका हॅंडसम टीपटॉप आणि कुठे ती.. !"
" पण काय रे शऱ्या.. नाही म्हणजे ह्या वयातही इतके तरूण राहण्याचे रहस्य काय..!!"

" आता ह्या वयात पण खेचतेस होय गं माझी. जर मी खरच इतका हॅंडसम असतो तर कॉलेजमध्ये असे रिजेक्ट केले नसतेस तु मला… "

शऱ्या……म्हणजेच शरद वर्तक.
हिंदूजा सोसायटीची शान. प्रत्येक कामात हिरीरीने पुढाकार घेणारा \"सदाहरीत, उमदा \" म्हातारा.
उमदा ह्यासाठी की सत्तरी पार करून गेली तरी त्याच्या चेहऱ्यावर अगदी नवतरूणांना लाजवेल इतका उत्साह असायचा. रोज नित्य नियमाने योगा, प्राणायाम आणि व्यायाम करून कमावलेली सुदृढ शरीरयष्टी. सहा फूट उंची,शिडशिडीत बांधा,वर्तक अडनावाला शोभेसा टिपीकल गोरा रंग,घारे लुकलुकणारे खट्याळ डोळे, हेअरडाय लावून कलर केलेले काळेभोर केस, व्यवस्थित राखलेली फ्रेंच-कट दाढी आणि चेहऱ्यावर भुरळ पाडणारे गोड हसू त्याच्या व्यक्तिमत्त्वाला चार चांद लावत असत.
असा हा सत्तरीतला देखणा नौजवान नुकताच पन्नाशीला टच केल्यासारखा रसरशीत आणि प्रफुल्लीत असायचा. त्यात खेळ ते राजकारण अशा सगळ्या विषयांवर उत्तम पकड असल्याने लहान-थोरांपासून आताच्या नवीन पिढीपर्यंत सर्वांनाच तो आपल्या मधाळ वाणी आणि बुद्धीचातुर्याने चटकन आपलेसे करत असे.

तरूण मुले तर त्याला सरळ " एसव्ही " अशी एकेरी हाक मारायचे. कारण तरूणांना अगदी आपला हक्काचा यार वाटावा इतका तो त्यांच्यात मिळून मिसळून वागायचा..
त्याउलट त्याची बायको विशाखा अगदी विरुद्ध जोडी. विशाखा तिच्या नावाप्रमाणेच \"सर्व दूर\" \"अस्ताव्यस्त\"\" पसरलेली…. शरदने स्वतःला व्यायाम करून फिट ठेवले होते तर विशाखाचा व्यायामाशी छत्तीसचा आकडा. ह्याला उंची वस्त्रे, परफ्यूम्स, ब्रॅंडेड कपड्यांची आवड तर ही अगदी साधे सूती ढगळ गाऊन किंवा विटक्या मळखाऊ रंगाच्या साड्या घालून वावरणार.

साधी कोथिंबीरीची जूडी आणायलाही शरद पोलो वगैरे ब्रॅंडेड टी-शर्ट मस्त ट्रेक ट्राऊझर, पायात शूज असा जामानिमा करून जायचा तर विशाखा हातात येईल ती साडी नेसून किंवा घरच्याच साडीवर बाहेर पडणार.
बाहेर जाताना फक्त खांद्यावरचा अस्ताव्यस्त पदर पिन-अप करून दोन खांद्यावर यायचा इतकाच काय तो फरक. दोघेच एकत्र सहसा फार कमी फिरत आणि कधी चुकून भाजी मार्केट किंवा मंदिरात एकत्र गेले तरी येता-येता हे घेऊ ते घेऊ असे करत सगळा बाजार करूनच ती घरी येणार. तोवर शरदच्या बायकोबरोबर असेच निवांत भटकूया ह्या रोमॅंटिक कल्पनेची कम्प्लिट वाट लागलेली असायची.
त्याला सगळ्यांशी मिळून मिसळून रहायला आवडे तर हीला \"आपले काम भले आणि आपण भले\" असे रहायला आवडे. म्हणजे खडूस नव्हती ती पण फार लोकांत मिसळणे, उगीचच किट्टी पार्ट्यांच्या नावाखाली एकत्र जमून ह्याच्या त्याच्या ऊखाळ्यापाख्याळ्या करणे, तासनतास गप्पांचे फड रंगवत लेट-नाईट पार्ट्या करणे असल्या कुठल्याच गोष्टीत तिला रस नसायचा.
वेळ मिळाला की लायब्ररीत जाऊन चांगली पुस्तके वाचणे पसंत करे ती.
नाही म्हणायला दोघांमध्ये एक समान धागा म्हणजे दोघांचेही एका विषयावर एकमत होते की आपण एकमेकांना त्यांची त्यांची स्पेस द्यायची आणि आपली मते दुसऱ्यांवर न लादता गरज पडेल तिथे एकमेकांना पुरेपूर साथ देऊन आनंदी जीवन जगायचे... \" मी तुझ्या कामात लुडबूड करणार नाही आणि तु माझ्या कामात अडथळे आणायचे नाही\" हा अलिखित करार दोघांमध्ये सामंजस्याने झालेला असल्याने ते आपापल्या वर्तूळात खूष होते.
त्यामुळे कोणी कितीही काहीही बोलले तरी शरद कधीही बायकोविषयी बाहेर कुणाजवळही तक्रारीचा सूर काढत नसे. शक्यतोवर वैयक्तिक आयुष्य बाजूला ठेवून इतर विषयांवर चर्चा करणेच तो पसंत करे.
सगळ्यांना त्याच्या ह्या धीरोदात्त स्वभावाचे कमालीचे कौतुक वाटे..
इतक्या हऱ्याभऱ्या कबाबला असं \"अळूचं फदफदं\" कसं काय मिळालं ह्यावर लोक माघारी चर्चाही करत पण त्याच्यासमोर कोणी हा विषय काढत नसे.
विशाखा जेव्हा घरात बसून पुस्तक वाचत असे किंवा मग घोरासुराचे आख्यान लावून पडलेली असे तेव्हा हा
सोसायटीची कामे किंवा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात बिझी असे.
कार्यक्रम कोणताही असो मग ते गणपती असोत की नवरात्र, दिवाळी पहाट असो किंवा सोसायटीचे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजनाची सर्व जवाबदारी एसव्ही तरूणांच्या खांद्याला खांदा लावून पार पाडत असे.

अशाच एका स्नेहसंमेलनानिमित्त आज सोसायटीतील सारे तरूण तूर्क म्हातारे अर्क एकत्रित जमले होते. आणि त्यात कर्मधर्मसंयोगाने माला म्हणजेच पूर्वाश्रमीची माला देवधरही मेळाव्यात सामील झाली होती.
माला नुकतीच हिंदूजा सोसायटीच्या \"सी\" विंग बिल्डिंगमधे वन बीएचके फ्लॅट घेऊन रहायला आली होती. ती आल्यावरचे हे तिचे पहिलेच स्नेहसंमेलन असल्याने थोड्या कुतूहलानेच ती तिथे आली. फारशी कुणाला ओळखत नसली तरी नवीन ओळखी व्हाव्यात ह्या हेतूनेच ती आवर्जून कार्यक्रमात सहभागी झाली.

तिथे येताच तिची नजर ह्या चिकण्या हिरोवर स्थिरावली. जरा बारकाईने निरीक्षण केल्यावर फ्रेंच कट दाढीच्या आत लपलेला एक ओळखीचा चेहरा तिला सापडला.
मनातल्या शंकेचे निरसन करायला ती स्वतःच पुढाकार घेऊन त्याच्यापर्यंत पोहोचली.

"आर यू मिस्टर श..र...द वर्तक बाय एनी चान्स ?? "
थोड्याशा औत्सुक्याने चाचरत चाचरतच तिने प्रश्न विचारला.
ज्या दिशेने प्रश्न आला त्या दिशेने एकशे-ऐंशी डिग्रीत आपली मान गर्रकन फिरवून शरदने मागे वळून पाहिले.

गुलाबी रंगाचा लखनवी सलवार कमीज, झुळझळणारी त्याच रंगाची तलम ओढणी, कानात लहानश्या डायमंडच्या कूड्या, एका हातात नाजूकसे ब्रेसलेट आणि दुसऱ्या मनगटावर गोल्ड प्लेटेड नाजूक घड्याळ, कपाळावर छोटीशी लाल टिकलीआणि ओठांवर अगदी पुसट गूलाबी लिपस्टिक असा पेहराव केलेली एक साठीच्या आसपास दिसणारी निमगोरी,
कुरळ्या केसांचा पोनी घातलेली,आखीव-रेखीव बांध्याची, सुंदर ललना त्याच्यासमोर ऊभी राहून त्याला प्रश्न करत होती.

" हो मीच शरद वर्तक… पण…. आ..प..ण..!! मी ओळखले नाही आपल्याला ? "

शरदही निरखून बघत होता. चेहरा ओळखीचा वाटत होता; पण खूण पटत नव्हती..
मग तिनेच आपली ओळख करून दिली..

" अरे शऱ्या मला नाही ओळखलेस होय रे !! अरेऽऽ मी मालाऽऽ. माला देवधर. आपण एकाच कॉलेजला नव्हतो का...एसपी कॉलेजला... आठवले का ?"
त्याबरोबर खाडकन डोक्यात ट्यूब पेटली आणि शरद एकदम करंट लागावा तसा भानावर आला.. शरदने हळूच स्वतःला चिमटा काढून खात्री करून घेतली.

कॉलेजपासून उराशी बाळगलेली \"अधूरी आशा\" आता ह्या वयात पूर्ण होईल अशी त्याने स्वप्नात पण कल्पना केली नव्हती.
\"ती\"; जी कॉलेजमध्ये सगळ्यांच्या ऋदयाची धडकन होती. कॉलेजची हॉट-गर्ल म्हणून जीचे नाव अख्ख्या कॉलेजवीरांच्या ओठी विसावलेले असायचे. जिने तब्बल तीन वर्षं सतत कॉलेजक्वीनचा किताब पटकावून कॉलेजचा गौरव वाढवला होता ती कॉलेज सुंदरी आत्ता त्याच्यासमोर साक्षात उभी होती.

शरदसारख्या मुलांकडे तर त्यावेळी ती ढुंकूनही बघत नसे. पण ती मात्र सगळ्यांच्या ह्रदयाची राणी होती.
कॉलेजच्या प्रवेशद्वारात पाऊल ठेवताच सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळलेल्या असायच्या.

लांबसडक सोनेरी केसांचा कधी फ्रेंचनॉट बांधलेला तर कधी बटवेणी घातलेली. त्यातल्याच दोन चूकार बटा हळूच वाऱ्याशी सलगी करण्यासाठी सोडलेल्या. ७०च्या दशकातील निम्मी, सिम्मी किंवा तस्सम हिरॉईनसारखी तंग कुर्ता पायजम्याची वेशभूषा करून हायहिल्स घालून जेव्हा ती युनिव्हर्सिटीच्या रस्त्यावरून चालायची ना तेव्हा तिच्या हिल्सच्या टकटकीच्या लयीवर लय पकडत अख्ख्या कॉलेजची ह्रदये धडकायची.
तिला भेटून तिच्याशी संवाद साधण्यासाठी मुलांच्या पैजा लागायच्या. पण ही दिसायला जितकी काटा तितकीच वागायला खडूस. कुणाला आपल्या आसपास पण फटकू द्यायची नाही आणि कोणी जास्तच जवळीक साधायचा प्रयत्न केलाच तर त्याचे श्रीमूख नुकत्याच खाऊन थुंकलेल्या पानागत लाल झालेच म्हणून समजा.

—------------------------------------------------------
क्रमशः भाग -1

शरदच्या आयुष्यात शरदाचं चांदणं बनून आलेलं हे वादळ पुढे काय रंग घेतेय हे पाहूया पुढील भागात.
वाचकहो आज डॉक्टर्स डे निमित्त लिहीलेली ही कथा माझ्या सर्व डॉक्टर बंधुभगिनींना सादर समर्पित करत आहे.
खूप दिवसांनी काहीतरी लिहायचा प्रयत्न केला आहे. वाचून प्रतिक्रिया नक्की कळवा.
धन्यवाद.
@राधिका.

🎭 Series Post

View all