मी भाग्यवंत

Aajobamkadun milalela aadhyatmik varsa asel kadachit spardhetil paritoshikapeksha maza aatmik aanand mala jast molacha vatato


       प्रत्येकाचेच आयुष्य हे एखाद्या ग्रंथापेक्षा कमी नसते. अगदी साधंसरळ वाटत असलं  तरी प्रत्येकाच्याच आयुष्याच्या वाटेत चढउतार, खाचखळगे येत असतात. एखादे अनपेक्षित वळण कधी आयुष्याला दिशा देते तर कधी उध्वस्त सुद्धा करून जाते. प्रत्येकच जण आपापल्या परीने हा जीवनपथ चालत असतो .त्याच जीवनपथाची किंवा त्यातील काही वेचलेल्या क्षणांची कहाणी म्हणजेच त्याचे चरित्र.
 
    
मी डॉ. मुक्ता बोरकर-आगाशे.अगदीच माझा अथ पासून इति पर्यंतचा प्रवास नाही उलगडून सांगणार कारण विशेष असं मी काही फार केलेलं नाहीये त्यामुळे माझ्या परीने एकंदरीत माझं व्यक्तिमत्त्व उलगडायचा हा माझा प्रयत्न.


पूर्व विदर्भातील लाखनी ,जिल्हा भंडारा येथील श्री. दौलत आणि सौ.इंदिरा बोरकर या दाम्पत्याची मी एकुलती एक लेक.लग्नानंतर दहा वर्षांनी झालेली.त्यामुळे मी स्वतःला नेहमीच विशेष मानते. कारण मला असं वाटतं की देवानी मला घडवायला दहा वर्ष घेतली.खरंच मी विशेष आणि भाग्यवान आहे कारण मी या आईवडिलांच्या घरी जन्माला आले.


माझ्या बद्दल सांगण्यासाठी माझ्या आई आणि बाबांबद्दल सांगणे हे ओघाने आलेच. त्यांच्या विना माझ्या या असण्याला काही अर्थच नाही. माझ्या बाबांचा जन्म एका गरीब कुटुंबात झालेला. दोन बहिणी आणि तीन भाऊ अशा भावंडातील सगळ्यात छोटे असलेले माझे बाबा.अगदीच छोटे असतांना पितृछत्र हरवलं आणि हलाखीचं आयुष्य वाट्याला आलं.
पती नाही ,पदरी पाच लेकरं तरी आजीने स्वतः अर्धपोटी उपाशी राहून,काबाडकष्ट करून लेकरांना घडवलं. माझे वडील लहान असताना काही दिवसांनी परिस्थितीमुळे त्यांनी शाळा सोडली. त्यांच्या सरांना त्यांच्या बुद्धिमत्तेचा आवाका कळल्याने त्यांनी स्वतः माझ्या वडिलांची फी भरली आणि आजीला विनंती करून त्यांना पुन्हा शाळेत घातले.असे अतिशय कष्टातून, स्वतः मोल मजुरी करून माझे बाबा आधी पी टी सी करून नोकरीला लागले आणि त्यानंतर नोकरी करतच पुढे बी. ए., बी. एड.,एम. ए.,एम. एड. झाले.


माझी आई तिच्या आठ बहिण भावंडातील सगळ्यात मोठी मुलगी. वडील त्याकाळात प्राथमिक शिक्षक. पण शिक्षकी पेशा सोबतच अध्यात्माकडे ओढा असल्याने ते एक कीर्तनकार होते.घरी सतत येणारे जाणारे आणि खाणारी तोंडे अनेक असल्याने परिस्थिती जेमतेम होती.त्याकाळात सुद्धा लेकीला शिकवून स्वत:च्या पायावर उभे केले.त्यामुळे माझ्या आईचे लग्न व्हायच्या आधी पासूनच ती नोकरी करायची.लग्नानंतर नोकरी करतच ती बी. ए. झाली.


अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून वर आल्यामुळे माझ्या बाबांनी कुटुंबातील भाऊ आणि बहीण यांच्या जे जे शिकण्यायोग्य असतील त्या  सगळ्या मुलांच्या शिक्षणाचा भार पेलला. लग्नानंतर त्यांनी आजोबांचा आध्यात्मिक व्यासंग पाहून त्यांचे शिष्यत्व पत्करले.आई घरची मोठी मुलगी असल्याने आणि ती स्वतः कमावती असल्याने तिने सुद्धा वडिलांच्या प्रपंचाचा भार उचलत आपल्या लहान बहीण भावांना शिकवावे असे त्यांना वाटले. दोघांच्याही कर्तव्य तत्पर वृत्ती मुळे दोन्हीकडचे बरेच जण आमच्या घरी राहून शिकले.


लग्नानंतर बऱ्याच वर्षांनी मी झाले.त्याआधीच घरी शिकायला असलेली ही सगळी मुलं होतीच त्यामुळे माझ्या एकुलते एक पणाची जाणिव मला कधी झालीच नाही. त्यातल्या त्यात सगळे मुलं जसे वाढले तशीच वागणूक मला सुद्धा मिळाली त्यामुळे एकुलती एक असली तरी फारशी लाडू बापू मी कधी झाली नाही.


माझे लहानपण म्हणजे माझ्या आयुष्यातील सुवर्णकाळ होता जो एखाद दुसऱ्याच्या वाट्याला येतो.शाळेला सुट्या लागल्या की आजोळी पळायची माझी धावपळ असायची. एवढे मामा मावशी आणि लाडाची मी एकटी. इथे मात्र मी अगदी लाडाची बोपली असायची. आजोबांसोबत बंडीवर बसून शेतात फेर फटका  मारणे,त्यांच्या सायकल वर बसून ते जिथे जातील तिथे फिरून येणे, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये रात्री अंगणात खाटेवर झोपून आकाशाचे निरीक्षण करत सप्तर्षी शोधणे,सोबतीला त्यांनी सांगितलेल्या सगळ्या रामायण, महाभारत आणि देवादिकांच्या कथा ऐकणे. असं भाग्य लाभलेली लाडाची नात मी. 


शाळेत जायला लागली तेव्हापासूनच मी सगळ्या शिक्षक वर्गाच्या लाडाची होती. हुशारी सोबतच स्टेज डेअरिंग चांगलं असल्याने एक चौफेर,बहुगुणी मुलगी म्हणूनच मी शाळेत ओळखली जायची. तेव्हा प्रायमरी शाळेत चौथ्या वर्गाला सुद्धा बोर्ड होता आणि त्या परीक्षेत मी तालुक्यातून पहिली आले होते. सोबतच चौथीच्या स्कॉलरशिप मध्येही मी मेरीट लिस्ट मध्ये असल्याने त्या वयातही सत्कार, बक्षीस असे अनुभव माझ्या वाट्याला आले.शाळेत असताना स्नेह संमेलनात वादविवाद, समयस्फुर्त,भाषण,कवितांची अंताक्षरी असो की गायन, समुहगान,नृत्य,फॅन्सी ड्रेस स्पर्धा सगळीकडे माझा मुक्त संचार असायचा. मी भाग घेतला नाही अशी शाळेतली कोणतीच स्पर्धा नव्हती. सगळ्यात जास्त बक्षीस मिळाल्याबद्दल चॅम्पियनशिप ट्रॉफी सुद्धा मला मिळालेली.


तेव्हा दूरदर्शन वर किरण बेदी च्या जीवनावर असलेली कविता चौधरी ची  
' उडान ' सीरियल यायची. त्या सीरियल ने मी इतकी प्रेरित झाले होते की मला अगदी तसेच व्हायचे होते. त्यामुळे मी माझा खेळांमधला इंटरेस्ट वाढवला. वर्गात एकदा सरांनी सगळ्यांना "पुढे आयुष्यात तुम्हाला काय व्हायचं आहे?" असा प्रश्न विचारला तेव्हा  आय पी एस व्हायचे माझे हे ध्येय बघून सगळेच चकित झाले होते. सरांना तर ही हुशार पोरगी 'असला कशाचा वेडा विचार करते.' असे पण वाटून गेले.पण माझ्या डोक्यात एवढे भूत घुसले होते की मी आमच्याकडे नव्हते म्हणून अमरावतीला हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथे उन्हाळी शिबिरात हे क्लासेस होतात म्हणून दहावी ची परीक्षा झाल्यानंतर तिथे ज्युडो कराटे चे क्लासेस लावले. पहिल्यांदा महिनाभर घरापासून अगदी दूर होते.आई नको ग जाऊ म्हणून  किती वेळा म्हणाली पण मी काही याबाबतीत ऐकायला तयार नव्हते.इथे येऊन जीवनाचा नवा अनुभव नक्कीच मिळाला.शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सुद्धा मी प्रगल्भ झाले.

घरी मी एकुलती एक मुलगी त्या काळात जन्माला आलेली पण आई वडिलांच्या वागण्या बोलण्यातून कधी त्याबद्दल खंत जाणवलीच नाही. त्यामुळे मी कधीच मुलगी म्हणून स्वतः ला कमजोर मानलेच नाही.उद्धट  मी नव्हती पण मुलगी म्हणून जर मुलांनी त्रास दिला किंवा गपगुमान ऐकून घ्यावं असा विचार केला तर प्रतिकारास मी नेहमीच सज्ज असायची. माझा एक दरारा होता. माझ्या मैत्रिणींना माझा फार आधार वाटायचा त्यामुळे राखी आली की माझ्या सगळ्या मैत्रिणी मला राखी बांधायच्या.
आता हे सगळं आठवलं की हसायला येते कारण 90 चा तो काळ आणि त्यामानाने माझे वागणे..!


दहावीचा रिझल्ट लागला. चांगलेच मार्क्स मिळाले.शाळेतून नाही पण संस्थेच्या सगळ्या शाळांमधील मुलींमधून मी पाहिली होती. बारावीत सुद्धा मी  त्याभागातील मुलींमधून प्रथम होती.माझा थोडा हिरमोड झाला होता पण सगळ्यांना विशेषत मोहल्ल्यातील सगळ्यांना माझे विशेष कौतुक वाटायचे कारण घरी शिकणारे आम्ही अनेक. वडील साहित्य चळवळीचे अग्रणी. विदर्भ साहित्य संघाची त्यांनी स्थापन केलेली शाखा आणि त्यादृष्टीने असलेला त्यांचा लोक संग्रह. सामाजिक कार्यात सुद्धा ते नेहमीच अग्रेसर असायचे. एका गरीब हृदयरुग्ण मुलासाठी निधी गोळा करून त्याच्या ऑपरेशन पर्यंत सर्व सोपस्कार त्यांनी पार पाडले. त्यातूनच वैनगंगा मानवता सेवा संघाची स्थापना झाली. अशा अनेक संस्थांमुळे आणि बाबांच्या चळवळ्या स्वभावामुळे एकतर ते बाहेर नाहीतर ते घरी असले की लोकं आमच्या घरी असा सतत येणाऱ्या जाणाऱ्यांचा राबता असायचा.घरची बाहेरची बरीच कामे मी आणि माझ्या मावश्याच करायचो.आईची नोकरी,आजूबाजूच्या गावात जाण्या येण्याच्या फारशा सोयी नसल्याने तिचे पायी रोज पाच सहा किलोमीटर जाणे येणे,मावशांची मदत व्हायची पण तरीही घरचा व्याप भरपूर होता. सासरच्या सगळ्यांचं नीट करूनही ,पोरांना शिकवून सुद्धा काकू खराबच होती.एवढ्या सगळ्यांचं करायचं, पतीला समाज कार्याचे वेड यामुळे बरीचशी आर्थिक भिस्त तिच्यावरच असायची. त्यातच तिचे ब्लड प्रेशर अतिशय हाय व्हायचे. आरामाची आवश्यकता असूनही गरज म्हणून आई मात्र नोकरीवर जातच राहिली. अतिशय वाढलेल्या उच्च रक्त दाबातही ती इतकी नॉर्मल,शांत कशी राहायची याचा आज कळते तेव्हा विचार येतो. तिचे धीर गंभीर अन् सोशिक व्यक्तिमत्वच तिला इतकं सहन करण्याचं बळ द्यायचं असं मला वाटते.


आता यावेळी बाबांनी आणि त्यांच्या मंडळाने विदर्भ साहित्य संघाचे संमेलन आयोजित करायचे ठरवले होते. आईची नेहमीप्रमाणे साथ होतीच. निधी कमी पडला तर अगदी पीएफ मधून कर्ज काढून आर्थिक साथ द्यायची तयारी तिने दाखवली. बाबांनी स्वतः ला त्यात अगदी झोकून दिलेलं. तेव्हा संमेलनाला आतासारखं भारंभार अनुदान पण नाही मिळायचं. संमेलन अगदी तोंडावर आलं आणि आईची तब्येत खूपच बिघडली. आईच्या दोन्ही किडन्या काम करणं बंद झालं होतं. काही दिवस भंडारा येथे आणि नंतर नागपूरला मेडिकल कॉलेज च्या आय सी यू मधे तिला ॲडमिट करण्यात आलं. इकडे बाबा संमेलनात आणि आई आय सी यू मधे अशी बिकट परिस्थिती. तशाही परिस्थितीत तिने बाबांना स्वतः जवळ थांबू दिलं नाही. पतीचं स्वप्न हे जणू स्वतःचं स्वप्न समजून ती जगली. संमेलन अगदी यशस्वी पार पडलं आणि त्यानंतर नागपूरच्या डॉक्टरांनी आईला पुढच्या उपचारासाठी मुंबईला रेफर केलं. मुंबईला आई चार महिने ॲडमीट होती.मामा आळीपाळीने आणि आजी तिच्याजवळ असायचे.बाबा येऊन जाऊन असायचे कारण तेवढा आर्थिक भार सोसायचा म्हणजे त्यांना सुद्धा नोकरीवर जाणे भागच होते. सगळ्यांचं करणं आणि सामाजिकता यामुळे आईच्या आजारावेळी दोघेही नोकरीवर असूनही इकडून तिकडून पैसा जमा करावा लागला.आईच्या किडनी ट्रान्सप्लांट साठी प्रयत्न सुरू होते पण अचानक एक दिवस आई गेली. आई नागपूर वरून मुंबई ला गेली होती तेव्हा चार महिन्यांपूर्वी मी तिला भेटली होती.एवढी पहाडासारखी धीराची माझी आई पण तेव्हा मला बघून अतिशय रडली होती. आईचं माझं हे शेवटचं दर्शन होतं. अजूनही मनात आईची शेवटची ती प्रतिमा कायम आहे....


आईचं जाणं पचवणं फार कठीण होतं. पण वडिलांकडे पाहून मी स्वतः ला सावरलं. माझे आजी, आजोबा,मामा ,मावशी,मोठा दादा वहिनी यांची कायमच मला साथ राहिली. त्यानंतर लोकांनी बाबांना दुसरे लग्न करण्याचे दिलेले सल्ले.  ज्या मावशीला त्यांनी लेक समजूनच वाढवलं होतं तिच्या लग्नाचा विषय आधीपासूनच घरात सुरू होताच, लोकांनी तिलाच  मागून घ्या म्हणून पण सल्ले दिले. बाबांनी मात्र लग्न करण्यास ठाम नकार दिला. माझा दोन नंबरचा मामा तेव्हा नव्या जागी व्यवसाय घालायच्या तयारीत होता. आईच्या आजारामुळे त्याचं सगळं लांबणीवर पडलं होतं. तो आमच्या घरी राहून शिकल्याने आईच्या मनाच्या जवळचा होता.मी त्याच्या लाडाची असल्याने बाबांनी त्याला दुसरीकडे व्यवसाय न घालता आमच्या इथेच व्यवसाय घालायची गळ घातली. आता मामा मामी आणि आम्ही असं नवं बिऱ्हाड सुरू झालं. दोन तीन महिन्यांनी मामीला मुलगा झाला आणि घरात पुन्हा आनंदाचे दिवस आले. मोठ्या मावशीचे लग्न झाले,लहान मावशीला नोकरी लागली आणि माझे बारावीचे वर्ष अशी परिस्थिती.माझं सारं आयुष्यच बदलून गेलं. मानसिक दृष्ट्या बारावी साठी मी तयारच नव्हती यावर्षी ड्रॉप घ्यावा असं बरेचदा वाटे पण आयुष्याचं एक वर्ष वाया घालवायला मन तयार नव्हतं जमेल तसा अभ्यास करून बारावी पूर्ण केलं.मनासारखं दान पदरात नव्हतं पडलं पण तरीही पी सी एम ग्रुप मधून मेकॅनिकल इंजिनिअरिंग ला ॲडमिशन मिळत होतं पण इंजिनिअरिंग करायची इच्छा नव्हती पी सी बी ग्रुप मधून बी ए एम एस ला नंबर लागला. नागपूरला नामांकित कॉलेज ला ॲडमिशन झालं. मनाची उडान बाजूला सारून मी वास्तवात जगू लागले. 


एवढी ॲक्टिव असलेली मी पण कॉलेज मध्ये मात्र डान्स सोडता कोणत्याच कलेत भाग घेतला नाही.मी सेकंड ईयर ला असताना 'मेरा पिया घर आया ओ रामजी' वर केलेला डान्स कॉलेज मध्ये इतका पापुलर झाला होता की पूर्ण कॉलेज मला डान्सर म्हणूनच ओळखायला लागले.आम्ही ज्या हॉस्टेल ला राहायचो ते वर्किंग वुमेन्स हॉस्टेल होते तिथल्या संस्थेच्या वार्षिक समारंभात मात्र मी सगळ्याच गोष्टींमध्ये सहभाग नोंदवायची. तिथल्या डिबेट स्पर्धेत मात्र दोन्ही वर्ष नंबर पटकवला . पाहता पाहता डिग्री झाली , एम डी साठी तेव्हा एंट्रन्स परीक्षा नव्हती त्या ,त्या विषयातल्या मार्क्स वरच एम डी ला नंबर लागायचा. दोन विषयांमध्ये फक्त एका मार्काने चान्स गेला. दोन्ही ठिकाणी मी फर्स्ट वेटींग च राहिले. घरी परत येऊन प्रॅक्टिस च्या दिशेने तयारी सुरू केली. एम डी नाही करू शकले तरी पुढे प्रॅक्टिस च्या दृष्टीने उपयुक्त  सी सी एच, सी जी ओ व पंचकर्माचे सर्टिफिकेट कोर्स मी केले.


इंटर्नशीप दरम्यानच जेव्हा मैत्रिणींच्या लग्नाच्या चर्चा सुरू होत्या तेव्हा मी पण विचार करू लागले. जेव्हा ही गोष्ट मनात यायची तेव्हा प्रकर्षाने माझे बाबा माझ्या डोळ्यासमोर यायचे. बाबांचे मित्र असलेले आगाशे काका आणि आमचे घर यांचे फार जिव्हाळ्याचे संबंध होते. मुख्यत्वे हे आधीपासून लाखनीचे रहिवासी नव्हते ,मामा मामी मुळे यांच्याशी बराच घरोबा होता. समवयस्क असल्याने त्यांचे दोन्ही मुलं आणि मुलगी यांच्याशी माझी पण मैत्री होती. दोघा भावांपैकी त्यांचा लहान मुलगा विनय थोडा बुजऱ्या स्वभावाचा होता. त्याची फिरकी घेता घेता त्याच्या प्रेमात कधी पडले हे माझे मलाच कळले नाही.अवतीभवती असणाऱ्या चालू ,हिरोगिरी दाखवणाऱ्या पोरांपेक्षा त्याचा साधेपणा, सच्चेपणा मनाला अगदीच स्पर्शून गेला.लग्नाचा विचार करतांना माझ्या दोन अपेक्षा होत्या एकतर मी एकुलती एक मुलगी म्हणून माझ्याशी लग्न करणारा मुलगा मला नको होता आणि दुसरं म्हणजे माझ्या बाबांची काळजी घेणारा त्यांचे मोठेपण समजून त्यांचा गोतावळा सांभाळणारा ,माझ्यावर मनापासून प्रेम करणारा नवरा मला हवा होता.इंजिनिअरिंग केल्यावर दोन वर्ष नोकरी केल्यानंतर  त्याने व्यवसायात उतरायचे ठरवले तरी त्याला माझा पाठिंबाच होता. 


आमचं लग्न जुळलं त्याच दिवशी माझ्या बाबांना एका मोठ्या ट्रस्ट चा  'फुले शाहू आंबेडकर ' हा पुरस्कार जाहीर झाला. माझे बाबा, माजी मंत्री शांतारामजी  पोटदुखे आणि  लाँग मार्चचे प्रणेते जोगेन्द्रजी कवाडे या त्रिमूर्तीला मा. निळू फुले यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण झाले. माझ्या लग्नानंतर लगेच पाच दिवसांनी हा सोहळा असल्याने आम्ही उभयता आणि बाबांचे मित्रमंडळ या सोहळ्याला उपस्थित होतो.


लग्नानंतर बाबांची लाडकी लेक आता एक जबाबदार सून झाली होती. स्वतः ची प्रॅक्टिस सांभाळून घरच्या जबाबदाऱ्या सांभाळणे म्हणजे तारेवरची कसरत होती. अगदी छोट्या स्वरूपातील असलेला नवऱ्याचा व्यवसाय आता विस्तीर्ण रूप घेऊ पाहात होता.त्यामुळे पाठीमागे असणाऱ्या व्यापांचा पसारा वाढतच होता.आमचं हार्डवेअरचं दुकान ,मोझेक टाईल्सची फॅक्टरी,शेतीचा व्याप एवढा पसारा सांभाळता सांभाळताच व्हायचे.पुढे नवनवीन प्रकारच्या टाईल्स बाजारात आल्या नंतर आम्ही टाईल्स फॅक्टरी बंद केली.

लग्नानंतर दोन वर्षांनी लेकाचा जन्म झाला अन् आयुष्यातील आईपणाचे नवे पर्व सुरू झाले. एका गोंडस,हुशार मुलाची मी आई झाले. सगळं सुरळीत सुरू असताना ना ध्यानी ना मनी कुणीतरी यावर्षी इलेक्शन न घेता सिलेक्शन करायचं म्हणून सरपंच पदासाठी माझं नाव सुचवलं.
ईच्छा नसतांनाही आणि नाही म्हणत असतानाही मी त्यात ओढली गेले. कुठेतरी दोन्ही पार्टीत इगो प्रॉब्लेम झाला आणि गाडी पुन्हा इलेक्शन वर आली. पुन्हा नाही म्हणत असतानाही मला त्यात ओढले गेले आणि मी निवडणुकीत उभी राहिले आणि जिंकले सुद्धा. काही दिवसातच मला अचानक एका मोठ्या पार्टीची युवा प्रमुख म्हणून सुद्धा घोषित केलं गेलं पण इलेक्शन ते सरपंच पदाची निवडणूक यादरम्यान होणाऱ्या वाटाघाटी आणि नकोसे वाटणारे डावपेच यांनी मला अगदी एक दीड महिन्यातच राजकारणाचा एवढा उबग आला की अगदी नकोसे वाटले. त्याचदरम्यान मला सरकारी नोकरीची ऑफर चालून आल्याने मी ती स्वीकारली. एक वर्ष नोकरी केली.पोस्ट अतिदुर्गम आदिवासी भागातील होती. विशेष म्हणजे दूर होती. पुढे मागे बदली होण्याची काहीच चिन्हं नव्हती त्यातच लेकीचा जन्म झाला आणि मी नोकरीचा राजीनामा दिला.नोकरी सोडल्यानंतर पुन्हा मी राजकारणात यावं यासाठी लोकांनी बरेच प्रयत्न केले कारण माहेर ,सासरची पार्श्वभूमी आणि माझी लोकप्रियता. पण पुन्हा राजकारणात पडायचं नाही यावर मात्र मीअगदी ठाम होते. कदाचित आज मी तिथे कुठच्या कुठे राहिले असते कारण वकृत्व,लोकप्रियता अन् कार्यक्षमता या तिन्ही गोष्टी माझ्यात होत्याच पण आजमितीला मात्र राजकारण सोडल्याचा कुठलाच पश्चात्ताप मला नाही.मग पुन्हा मी माझ्या वैद्यकीय व्यवसायाकडे वळले.

नवऱ्याने काही वर्षातच व्यवसायाला एका उंचीवर नेऊन ठेवले.लेकीच्या जन्मानंतर तर अजूनच बरकत येऊ लागली.अगदी नागपूर विभागातील कंपनीच्या टॉप टेन डीलर मधे नवऱ्याचे नाव येऊ लागले. दोन गोंडस लेकरांनी आमचे आणि नातवंडाबरोबर आजी आजोबांचे सुद्धा भावविश्व समृद्ध करून टाकले.


आई गेल्यापासून बाबांनी स्वतः ला अगदी साहित्य आणि समाज कार्यात झोकून दिलं होतं. नोकरी असे पर्यंत आणि माझ्या लग्न पर्यंत ते कसेतरी बंधनात होते पण त्यानंतर मात्र त्यांनी स्वत:ला साहित्य अन् समाजाच्या सेवेसाठी झोकून दिलं.आई गेल्यानंतर तिच्या मृत्युपासून ते नंतरच्या प्रत्येक घडणाऱ्या घटनांचा आलेख कवितेतून त्यांनी मांडला. त्या सगळ्या कवितांचा संग्रह पुढे 'विरही 'म्हणून प्रसिद्ध  करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. त्या पुस्तकाच्या प्रकाशनाचा भार मीच उचलणार हे  त्यांना निक्षून सांगितलं पुस्तक तर त्यांनी छापलं पण आईच्या साठाव्या जन्मदिनी आम्ही त्या पुस्तकाचं प्रकाशन केलं.अशा अलौकिक आई वडिलांच्या पोटी मी जन्माला आले याचा मला नेहमीच अभिमान आहे.


त्यानंतर बाबांचं 'तुमचे आमचे सण ' हे सर्व धर्मीय आणि राष्ट्रीय सणांची माहिती असलेले पुस्तक आले. त्याआधीच त्यांचे दोन कविता संग्रह आणि 'बंधू भगिनींनो' हा वैचारिक लेख संग्रह प्रकाशित झाला होता. त्यांच्या हयातीत त्यांनी दोन विदर्भ साहित्य संमेलन,एक युवा साहित्य संमेलन आणि अनेक छोट्या मोठ्या साहित्य संमेलनांचे आयोजन केले. ते असताना शाखेला पुरस्कार दिले जात नव्हते पण जेव्हा पुरस्कार सुरू झाले तेव्हा पहिला पुरस्कार लाखनी शाखेला मिळाला आणि आवर्जून  त्यांच्या योगदानासाठी हे पारितोषिक दिलं जात आहे याचा उल्लेख केला गेला.

2012 ला रामनवमी च्या दिवशी त्यांचे अपघाती निधन झाले आणि मी अक्षरशः पोरकी झाले. स्वतः चे दुःख आवरून आई गेल्यानंतर तिच्या विरहात झुरणारे बाबा आठवून मी ते सगळ्या पाशातून मोकळे झाले असा विचार करून माझे दुःख आवरले. चार चौघात मी कधीच रडत नाही पण आईबाबांची आठवण आली तरी अजूनही डोळे काठोकाठ भरून येतात.एवढ्या वर्षात कधी नव्हे ते एक तरी भावंडं हवं होतं असं मला त्यावेळी प्रकर्षाने वाटून गेलं. 

बाबा गेल्यावर नवऱ्याने खूप सावरलं.बाबांचे सगळे विधी ,तेरावे सगळे माझ्या मनाप्रमाणे माझ्या सासरच्यांनी यथोचित पार पाडले.बाबांच्या जाण्याने तर माझे सासरेच अर्धे खचले. एवढे सख्य त्या दोघांमध्ये होते. माझ्या बाबांचे पुण्यस्मरण कार्यक्रम सुद्धा मझे सासरेच आयोजित करायचे. त्यांच्या दुसऱ्या पुण्यस्मरणाला 'साहित्यव्रती' हा त्यांच्यावर लिहिलेल्या आठवणींचा स्मृतिग्रंथ काढण्यात त्यांनीच पुढाकार घेतला.

बाबा गेल्यावर चार वर्षांनी अचानक आजारी पडून सासूबाई गेल्या. लेकरं आजीच्या प्रेमाला पारखी झाली. सासरे मात्र सासूबाईंच्या जाण्याने बरेच खचले. माझ्या जबाबदाऱ्या वाढल्या. मला तर आता संपूर्ण घराची आई झाल्याचा फील येऊ लागला. सासऱ्यांनी माझ्यावर अतिशय प्रेम केलं. लेकीपेक्षाही जास्त विश्वास त्यांनी माझ्यावर दाखवला. मी स्पष्टवक्ती  आणि नवरा मात्र कुणालाही न दुखावणारा. माझा हा स्वभाव बघून  काहीही स्पष्ट विचारायचं असलं की ते मलाच विचारायचे.आपल्याला आई वडील नाही तर देवानी  सासू सासऱ्यांच्या रुपात दुसरे आईवडीलच आपल्याला दिले या विचाराने आणि माझ्यावर असलेल्या संस्कारांनी मी माझ्या सासूसासऱ्यांचे मनापासून सगळे केले. पण कदाचित नियतीला हे मंजूर नव्हते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अखेर सासरेही गेले. बाबांच्या जाण्याइतकेच दुःख त्यांच्याही जाण्याने मला झाले. 

खरंतर इच्छा असूनही मुलींना वडिलांचे श्राद्ध वगैरे घालता येत नाही पण माझ्या घरी हे सगळं होते. माझे सासू सासरे आणि माझे आई बाबा आजही प्रतिमा स्वरूपात माझ्या दिवाणखान्यात जोडीने विराजमान आहेत एवढी मी भाग्यवान आहे.

मी वाचन वेडी आहे. जमेल तसे वाचत असते. बाबांचा चळवळ्या स्वभाव माझ्यातही आला आहे. त्यामुळे जमेल तसा सामाजिक कार्यांमध्ये माझाही उस्फुर्त सहभाग असतो.अतिशय हौशी असल्याने अगदी शारदा देवी स्थापना ,त्या माध्यमातून कार्यक्रम आयोजन असे पण कामं मी केले आहेत. त्यानंतर मंदिरातच मूर्ती प्रतिष्ठापीत झाल्याने आम्ही नवरात्रात आमचे कार्यक्रम करतो. बऱ्याच ठिकाणी आरोग्य विषयक मार्गदर्शन आणि इतरही विषयांवरील भाषणासाठी मला बोलावले जाते. मी कुठलेही आर्थिक मानधन न घेता प्रबोधनाचा शुद्ध हेतू मनात ठेऊन सगळीकडे भाषणासाठी जाते. मैत्रिणींच्या ग्रुप सोबतच मी स्वलिखित व्यसन मुक्ती भारुड सुद्धा सादर केलं. ज्या ज्या माध्यमातून साध्य होईल तिथून तिथून मी व्यक्त होत असते.अनेक सामाजिक संस्थांशी मी जुळली आहे. डॉक्टरांच्या ग्रुप सोबत कॅन्सर अवेअरनेस कार्यक्रम सुद्धा आम्ही महिला डॉक्टरांनी केले.उन्हाळी शिबिरात बौद्धिक विभागाची जिम्मेदारी सुद्धा मी यावर्षी सांभाळली. परिसरातील बहुतेक शाळा कॉलेज मध्ये मी भाषणासाठी जाऊन आले आहे.

आमच्या भागात बाबांनी साहित्य चळवळ रुजवली. त्यामुळे आमच्या घराला फार मोठमोठ्या लोकांचे पाय लागलेले.राम शेवाळकर,मधुकर आष्टीकर,सुरेश भट यांच्यासारखी अनेक मोठमोठी दिग्गज मंडळी घरी येऊन गेली. सगळ्यांचे वक्तृत्व अगदी नकळत्या वयातच कानावरून गेले आहे. सुरेश भटांचा एल्गार मी सातवीत असताना ऐकला आहे. 'कुटुंब रंगलंय काव्यात ' वाले विसुभाऊ बापट सुद्धा घरी येऊन गेलेत. त्यांच्या तोंडून  पाचवीत ऐकलेलं 'उन उन खिचडी साजुकसं तूप..' अजूनही माझ्या स्मरणात आहे. वाचनाची मला लहानपणापासूनच फार आवड आहे.प्र.के अत्रे, पु..ल., वि.स. खांडेकर, योगिनी जोगळेकर,सुमती क्षेत्रमाडे आणि बऱ्याच लेखकांची  पुस्तकं मी वाचली आहेत.आय डेअर ,विंग्ज ऑफ फायर,माझे सत्याचे प्रयोग सारखे अनेकांचे आत्मचरित्र सुद्धा वाचले आहेत. वाचणे आणि नाचणे हे दोन्ही माझे आवडते छंद होते.बाबांकडे अनेक नवोदित मार्गदर्शनासाठी यायचे  घर छोटं असल्याने त्यांचं ऐकणं, त्यांच्यामुळे आम्ही बंदिस्त अशा बऱ्याच काही गोष्टींमुळे साहित्यात ,लिखाणात गोडी निर्माण व्हायच्या ऐवजी तिटकाराच निर्माण झाला होता. विशेषत: कवितांच्या बाबतीत.मी तर काहीही झालं तरी कविता करायच्या नाहीत असंच जणू ठरवलेलं.पण पुढे आयुष्यात कशात रस निर्माण होईल हे कुणीच सांगू शकत नाही. माझे आजोबा ज्यांचा मी वरती उल्लेख केलेला आहे ते सुद्धा हिंदी आणि मराठी दोन्ही भाषेत अभंग रचना लिहायचे. त्यांच्या आध्यात्मिक अभंगांचे 'अनुभूती अभंगमाला' हे पुस्तक माझ्या बाबांच्या काळात प्रकाशित झाले.


 बाबा खूपदा म्हणायचे,मुक्ता तुझ्यात सामर्थ्य आहे तू लिही. गद्य मी लिहू शकते यावर त्यांचा पूर्ण विश्वास होता.माझं वाचन चांगलं होतं. बाबा आणि मी वैचारिक चर्चा करायचो त्यामुळे त्यांना माझी क्षमता माहीत होती.त्यांच्या हयातीत तर मी लिहू शकले नाही याचे वाईट वाटते.अचानक कॉलेज बॅचच्या एका गेटटुगेदर नंतर मी त्यावर,मैत्री आणि नंतर बॅचमेट्स वर लिहिलं. सगळ्यांना ते इतकं आवडलं की बस. पुढील लेखन प्रवासासाठी सगळ्यांनी मला प्रेरित केलं. तितक्यातच माझी जिवलग मैत्रीण आणि मित्र यांचं विचित्र भांडण झालं.मी दोघांमध्ये पॅचप  करायचा खूप प्रयत्न केला पण कुणीच माघार घ्यायला तयार नव्हतं. तेव्हा माझ्या मनाला इतकं लागलं की, ' गवसेल का मला ते , जे ओघळून गेले..' या कवितेच्या ओळी आपसूकच स्फुरल्या आणि मी पद्याकडेही वळले.मी बऱ्या कविता करते असं मैत्रिणी म्हणतात पण माझ्यालेखी अजून ते अचीव व्हायचे आहे जे मला हवे आहे.

कारोना मधे लाखनीच्या विदर्भ साहित्य संघ शाखेचे सचिव असलेले काका गेले आणि ही धुरा अनपेक्षितपणे माझ्या खांद्यावर आली. आता त्याला सुद्धा  न्याय द्यायचा आहे. बाबांच्या काळातील सुवर्णकाळ पुन्हा परत आणायचा आहे.

मैत्रीण रश्मी ने कोरोना काळात ऑनलाईन साहित्य जगताची ओळख करून दिली. तिथेच अनेक जिवलग मैत्रिणी नव्याने भेटल्या. पुढे मॉम्सप्रेसो वर लिहू लागले. बऱ्याच श्रेणीमध्ये तिथे आणि स्टोरी मिरर वर अवॉर्ड भेटले. मॉम्स नी व्हिडिओज म्हणजे व्लाॅग्ज (vlogs) च्या दुनियेची सुद्धा ओळख करून दिली. लिखाणासोबतच बऱ्याच दिवसांपासून बंद पडलेले अनेक कलागुण या व्हिडिओज आणि लाईव्ह शोज च्या माध्यमातून बाहेर आले. पुन्हा नव्या दालनाने आनंद दिला. राज्यस्तरीय करंडक पासून ईरा वर लेखनाला सुरुवात केली. त्यानंतर अष्टपैलू आणि आता चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी लिहीत आहे.

 आत्मकथा फेरीच्या निमित्ताने मी व्यक्त झाले. आयुष्यात खूप काही केलं नाही. सगळे म्हणतात मी ऑलराउंडर आहे पण मला वाटते की मी 'जॅक ऑफ ऑल मास्टर ऑफ नन ' आहे. देवानी न मागताच बरंच काही भरभरून दिलं आहे. त्याचा उपयोग करून घेण्यात कदाचित मीच कमी पडत आहे.स्पर्धेत मी लिहिते पण त्यानिमित्ताने लिखाण होतं हा शुद्ध हेतू .त्यानिमित्ताने आपल्या तुटक्या फुटक्या लेखनात सुधारणा होतात असं मला वाटते.आजोबांकडून मिळालेला आध्यात्मिक वारसा असेल कदाचित स्पर्धेतील पारितोषिकपेक्षा माझा आत्मिक आनंद मला जास्त मोलाचा वाटतो. आपण आपलं लिखाण करत राहायचं चांगलं असलं की त्याला योग्य तो न्याय मिळणारच.चांगल्याचे कौतुक करणे मला मनापासून आवडते.


माझ्या व्यक्तिमत्त्वावर मला बाबांपेक्षा माझ्या आजोबांचा प्रभाव जास्त जाणवतो. ताल लयीची थोडी जाण, गाणे; नृत्याची आवड कदाचित तिकडचीच देण असावी असं मला वाटते. कारण माझ्या बाबांना चित्रपट , गाणे यांची नावडच. एवढ्या प्रतिकूल परिस्थितीत माझ्यात हे गुणधर्म आले कुठून? हा प्रश्न बरेचदा मला पडतो .मी चित्रपटातील गाण्यांवर जेवढ्या आवडीने नाचते तेवढ्याच आवडीने भजनात, हरिपाठातही नाचायला मला आवडते.कुठेही नेऊन टाकले तरी माझे मन कुठेही रमते.
 बोरकर परीवाराकडून आलेला शीघ्रकोपाचा दुर्गुण दूर करण्यात कदाचित ही आईकडली शिकवणच कामी आली आहे.


प्रेमाच्या बाबतीत मी फारच भाग्यवान आहे. माझ्या मातुल कुळातील मंडळींचा मी जीव की प्राण आहे. मला सख्खे भाऊ बहिण नाहीत. पण माझ्या मामाची मुलं जी आमच्याकडे राहिली ती माझ्यावर इतकं प्रेम करतात की सख्खा भाऊ काय करेल. माझ्या मावशीच्या मुली आणि माझी लेकरं यांच्यात इतकं सख्य आहे की जे माझ्या मावश्या आणि माझ्यात आहे. माझी लहान मावशी जिच्यामुळे मला बहिणीची कमतरता जाणवली नाही. जीच्याघरी माझं माहेरपण जपलं जातं ती माझ्या मनाच्या अतिशय जवळ आहे. तिच्यापेक्षा मोठ्या मावशीचा माझ्या जडणघडणीत मोलाचा वाटा आहे. माझ्यामधल्या आत्मविश्र्वासाची जनक ती आहे. माझी मोठी वहिनी, मामी आईच्या मायेनी माझं करतात. माझी जाऊ,मोठे दीर,नणंद सगळ्यांशी माझे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहेत. माझी जाऊ,मी आणि मुलं सोबत असली की नवीन माणसाला कोणतं मूल कोणाचं हे ओळखणं कठीण होईल एवढं सुंदर नातं आमचं आहे. 
बाबांनी जोडलेली सारी जिव्हाळ्याची, मानलेली नाती कायम माझ्या सोबतीला आहेत.


डॉक्टर असूनही व्यावसायिक व्यक्तीशी लग्नाचा निर्णय घेतला तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या पण माझ्या निर्णयावर पश्चात्ताप करण्याची वेळ माझ्यावर कधी आली नाही.रिद्धी सिद्धी ने युक्त माझे घर,प्रेमळ;समजदार;माझ्या मनाचा विचार करणारा नवरा,गुणी मुलं,अनेक विदेशवाऱ्या माझ्या अपेक्षेपेक्षाही सारं जास्त आहे.देवानी जेवढं हिरावून घेतलं त्यापेक्षा पटींनी मला दिलं.बाबांनी जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन दिला. त्यामुळे कोणत्याही गोष्टीतून पटकन सावरायला मला मदत होते. वाटते तितके जीवन साधे सरळ नसते पण आपला त्याच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन त्याला सहज,सुसह्य बनवतो. आता लेकरं घडत आहेत. त्यांनी आयुष्यात यशस्वी व्हावं  पण सोबतच एक चांगला माणूस व्हावं एक आई म्हणून यासाठी मी प्रयत्नरत आहे. एवढं सुंदर आयुष्य देण्यासाठी मी त्या दयाघनाप्रती नेहमी कृतज्ञ आहे.एवढं भरभरून मिळालेली मी भाग्यवंत आहे.


जे काही न्यून आहे ते माझे आहे. जे काही माझे चांगले आहे ते गॉड गिफ्ट आहे,ती माझ्या आई वडिलांच्या चांगल्या कामांची  पुण्याई आहे.देवा आता फक्त एवढेच मागणे आहे, हे पाय नेहमी जमिनीवर असू दे.
' अहंकाराचा वारा न लागो राजसा,माझिया विष्णूदासा भाविकासी" हेच एक तुझ्यापायी मागणे.

धन्यवाद!