रूपा नावाप्रमाणे अतिशय सुंदर, गोरीपान, उंच बांधा असलेली त्याचबरोबर लांबसडक केस अगदी शोभून दिसायचे तिला. इंजिनिअर होऊन नोकरी करणारी स्वावलंबी आणि महत्वाकांक्षी आई वडिलांची एकुलती एक मुलगी.
तर राजेश अगदी नावाला साजेल असा राजबिंडा पुरुष. उंच बांधा, रंगाने जरा सावळा असला तरी मनाने मात्र तेव्हढाच सुंदर. तो ही इंजिनिअर आणि घरात मोठा. त्याला एक बहिण ती मात्र सासरी गेलेली, वडिलांचं छत्र लहानपणीच हरवलेलं.
रूपा आणि राजेश दोघांनी प्रेमविवाह केला मात्र घरच्यांच्या संमतीने. सुरुवातीला मस्त संसार सुरू झाला, काही दिवसांनी लहान सहान गोष्टीवरून घरचे वातावरण बिघडण्यास सुरुवात झाली होती.
रूपा मात्र समजदार असल्यामुळे तिने दरवेळी एक पाऊल मागे घेतलं. कशाला उगाच वाद म्हणून तीने सासूबाईची प्रत्येक गोष्ट ऐकायला सुरुवात केली.
देवघरात सासूबाई पूजा करताना जरा मोठ्याने बोलल्या,
"रूपा,अगं उद्या सुट्टी घे चित्रा आणि जावाईबापु येणार आहेत घरी."
"पण आई!"
"पण बिन काही नाही. तुला नोकरी याच अटीवर करू दिली मी, की सासरचं कुणीही आले तर तुला सुटी घ्यावीच लागेल नाहीतर घरी बसायचं."
रूपाने राजेशकडे बघितलं तिच्या डोळ्यात त्याला अनेक प्रश्न दिसले मात्र तो काहीच न बोलता बॅग उचलून बाहेर गाडीमध्ये बसला.
त्याच्या पाठोपाठ रूपाने देखील पर्स उचलली आणि गाडीत बसली.
त्याच्या पाठोपाठ रूपाने देखील पर्स उचलली आणि गाडीत बसली.
पाच मिनिट अगदी निरव शांतता होती. कुणीचं काही बोललं नाही.
"रूपा...तुला वाटलं असेल की, मी आईला काही तरी बोलावं पण तुला माहित आहे मी आईला काहीही बोलू शकत नाही. मी जर तुझी बाजू घेतली तर तुला माहित आहे कुठली गोष्ट कुठे नेते आई."
रूपा यावर काहीही बोलली नाही.
रूपाने ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सुट्टी घेतली. तिची नणंद आणि तिचा नवरा आला. त्याआधी रूपाने मस्त गरमागरम नाष्टा केला.
"वहिनी, अहो हे काय! साडे दहा वाजले आणि तुम्ही नाष्टा आणलाय. अहो आम्ही घरी अकराला जेवतो."
"पण ताई तुम्ही तर!"
"रूपा जा...राहू दे, ठेव तो नाष्टा स्वयंपाकाला लाग."
"नको...आता केला आहे तर खाऊ दोन दोन घास, तसही आता स्वयंपाकाला लागणार तर कधी होईल जेवण तयार कुणास ठाऊक?"
रूपाने नाष्टा दिला आणि स्वयंपाकाला लागली. साधारण दोन तासात तिने वरण भात, मसाल्याची भाजी,चार पाच लोकांच्या पोळ्या,बासुंदी आणि भजी बनवली. लगेच जेवायला वाढलं.
सगळ्यांची जेवण झाली आणि रूपाने स्वतःसाठी ताट जेवायला घेतलं तेवढ्यात सासूबाई किचन मध्ये आल्या.
"रूपा, अगं चित्रा निघाली दोन दिवस झाले ती इकडे लग्नाला आली होती, मुलं वाट बघत असतील ना तिची. बासुंदी असेल तर डब्यात भर बरं."
"आई अहो दोन वाट्याच उरल्या आहे फक्त."
"अगं जाऊ दे ना आता, तशीही कुणाला हवी आहे संध्याकाळी."
तिने डबा घेतला आणि त्यात भांड्यातली बासुंदी टाकली. ती बासुंदी फार कमी वाटली म्हणून तिने तिच्या ताटातली वाटी सुद्धा डब्यात टाकली.
"वहिनी, अहो कुंकू लावा...मला उशीर होतोय घरी जायला. तुम्हाला काय घरी बसून जेवायचं तर आहे फक्त या जरा बाहेर."
रूपा ताटावरून उठली आणि कुंकू लावलं. नणंद बाई तिच्या घरी निघून गेली.
संध्याकाळी राजेश घरी आला.
"रूपा, अगं आज खूप काम झालं, खूप डोक दुखत आहे गं."
"थांबा मी चहा करते आणि गोळी आणते."
"अरे वा! घरात मस्त वास येतोय.चहा ऐवजी काही गोड केलं असेल तर ते आण बरं का."
रुपाने आईकडे बघितलं आणि किचनमधे निघून गेली.
"तुला कधी पासून गोड आवडायला लागलं रे?"
"अगं होते कधी कधी इच्छा."
रुपाने चहा करून आणला आणि टेबलावर ठेवला.
"ही घ्या गोळी."
"अगं चहा नको होता मला."
"अहो दुसरं गोड काही नाही मग घरात. सकाळी बासुंदी केली होती, तिची मलाच चव नाही समजली तुम्ही तर ऑफिसला होता."
हे ऐकून सासूबाईला जरा रागच आला.
काही बोलतील का सासूबाई की सरळ उठून निघून जातील? वाचुया पुढच्या भागात.
क्रमशः...
©®कल्पना सावळे
क्रमशः...
©®कल्पना सावळे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा