Login

मी फक्त माझ्या नवऱ्याची ( भाग २)

नाती ही रबरासारखी असतात काळजीपूर्वक हाताळावी लागतात, किती तानायची , किती ओढायची आणि किती सैल सोडायची ते कळलं पाहिजे.
"अगं नाही खाल्लस  तर मरणार नाहीस, कर  उद्या परत."

आईचे हे शब्द रूपाला खूप टोचले, काही क्षण ती शांत राहिली, तिला सासूबाईंच्या शब्दाचे फारच वाईट वाटले मग ती अगदी शांतपणे म्हणाली,


"आई हे काय बोलत आहात? जरा भान ठेवा बोलायचं. मी सून आहे तुमची, तुमच्या मुलाची बायको."


"आता तू मला अक्कल शिकवू नकोस, वर्ष होईल लग्नाला पण काहीच स्वयंपाक  येत नाही. नोकरी करून पोट नाही भरत, हाताला चव असावी लागते."


"म्हणजे आजच जेवण बेचव होतं असं म्हणायचं आहे तुम्हाला."

"हो...कुठे मीठ कमी तर कुठे तिखट जास्त आणि ती काय बासुंदी होती बेचव...मजबुरी म्हणून खावं लागलं दुसरा काही पर्याय नव्हता."

आता मात्र रूपाला जरा राग आला आणि कधी नव्हे ती सासूबाईना म्हणाली,

"अरे वा! मग बेचव स्वयंपाक बरा खाल्ला तुमच्या लेकीने आणि जावयाने एवढचं नाहीतर घरी पण घेऊन गेले."

"तेच खुपते तुझ्या डोळ्यात. माझी लेक आहे तिचाही हक्क आहे या घरावर , तिला हवं ते नेईल आणि हवं ते करेल तू कोण गं बोलणारी?"

दोघींची भांडण अजून वाढतील हे बघताच राजेश म्हणाला,


"रूपा प्लिज... चल आवर पटकन सकाळी ऑफिसला पण जायचं आहे."


रूपाने तोंडातले शब्द तोंडात ठेवले.

आठ दहा दिवस गेले, अचानक रूपाला खूप ताप आला. ताप असल्यामुळे ती सुट्टी घेऊन घरी राहिली. नेमकी त्याच दिवशी नणंद तिच्या नंदेला घेऊन माहेरी येणार होती.

दारावरची बेल वाजली सासूबाई दरवाजा उघडायला गेल्या.

" चित्रा..ये ना! अशी अचानक आली, आधी सांगितलं नाही."

"काही नाही गं, इकडे जरा काम होतं म्हणून म्हटलं तुझी भेट घ्यावी. बरेचं  दिवस झाले आपली भेट झाली नाही."

"बरं बसा दोघी, मी चहा टाकते."

"का? अजून रूपा आली नाही का आज?"

"घरीच आहे, महाराणीला बरं वाटत नाही."

"जमते बर बाई यांना दर महिन्यात आजारी पडायला. कधी डोकं दुखतं तर कधी ताप येतो. मग सासू आहे स्वयंपाक पाणी करायला."


आईने चहा केला आणि घरात काही फरसान होतं, काही बिस्कीट होते ते आणले आणि दिले.चहा झाल्यावर चित्रा रूममधे गेली.


" काय गं रूपा, जमत नसेल तर सोडून दे बाई नोकरी. तुला काय मिळेल आयत खायला पण आईची दगदग होते ना म्हणून बाकी काही नाही, चल येते मी."

यावेळी नणंद बाई जरा गडबडीत होत्या.एवढं बोलून चित्रा निघून गेली.

आईच्या डोक्यात मात्र भलताच विचार चालू होता.

"आईने कुकर लावला.भाजी केली आणि कणिक मळली. चार पाच चपात्या लाटल्या आणि बाकी कणिक तशीच पडू दिली. गरमागरम जेवून घेतलं. रात्रीचे आठ वाजले राजेश मात्र अजून पर्यंत घरी परतला नव्हता.


रूपा इकडे तापाने फणफणली होती. एकटक घड्याळाकडे बघत होती, तसाच तिचा डोळा लागला. रात्रीचे साडेदहा वाजले, दारावरची बेल वाजली. टिंग टाँग...टिंग टाँग.


आईने दरवाजा उघडला.

"आज उशीर केलास?"

"हो, अगं खूप काम होतं आज ऑफिसमध्ये. झालं तुझे जेवण?"


"हो मी केलं जेवण, रूपा आणि तू घे जेवून आता. ह्या बाईचं काय करायचं कळत नाही!"

"का? काय झालं?किती वेळा सांगितलं तिला की, माझी वाट नको बघू पण माझं काही ऐकलं तेव्हाच ना."

"आता काय फायदा राजेश, आधी डोक्यावर घ्यायचं आणि आता मात्र."


राजेशने आईचं बोलणं अर्ध्यातून थांबवलं.

"आई  तू शांत रहा, आता नको सुरू होऊ."

एवढे बोलून राजेशने हातातली बॅग टेबलावर ठेवली हातपाय धुवून बेडरुममधे गेला.

"अरे अजूनही झोपून आहेस तू रूपा! चल जेवायला उशीर होतोय."

रूपा काहीच बोलली नाही. राजेशने परत  आवाज दिला मात्र तिने काहीच उत्तर दिले नाही. आता मात्र राजेश चिडला.


काय होईल पुढे? राजेश आणि रुपा मध्ये वाद होतील की, राजेश तिला समजून घेईल? वाचूया पुढच्या भागात.
क्रमशः...
©®कल्पना सावळे.

0

🎭 Series Post

View all