राजेश तिच्या जवळ गेला, अंगावरच ब्लँकेट बाजुला सारत म्हणाला,
"रूपा, अगं दोन घास खावून घे गोळी तशीच पडली आहे. तू औषध नाही घेतलं तर तुला बरं कसं वाटेल?"
ती काहीच बोलली नाही. मात्र ब्लँकेट सरकवल तेव्हा तिच्या अंगाला त्याचा स्पर्श झाला. ती तापाने फणफणली होती. त्याने तिच्या हाताला, कपाळाला, गळ्याला हात लावून बघितलं तर त्याला जणू चटके बसत होते. तो तसाच उठला आणि कपडे घातले तिला धरून त्याने कार मध्ये बसवले आणि हॉस्पिटल मध्ये नेले.
तिला डॉक्टरांनी भरती करून घेतले. काही रक्ताच्या तपासण्या केल्या. राजेश तिच्याजवळ थांबला. त्याचं मन लागत नव्हतं, खरं तर राजेशच्या पोटात अन्नाचा कण नव्हता. तिला जरा बरं वाटलं तेव्हा अर्ध्या रात्री राजेश ने फक्त थोडा ज्युस घेतला.
सकाळ झाली आता रूपाचा ताप उतरला होता. राजेशचा फोन वाजला, फोन आईचा होता.
" राजेश तू रात्रभर घरात नव्हता. कुठे गेलास? काहीही सांगत नाहीस."
"आई अगं जरा गडबडीत होतो, रूपाला हॉस्पिटल मध्ये आणलं. आता करणारच होतो तुला फोन."
"बरं ये मग घरी."
राजेशच्या मनात विचार आला की, आईने एका शब्दाने देखील रुपाची चौकशी केली नाही. म्हणजे ती रूपा बरोबर नीट वागत नाही ते मी समजू शकतो आणि कालांतराने ते सगळं नीट होईल असं वाटत होतं पण एवढा राग आईच्या मनात असेल असं वाटलं नव्हतं. आपण शेजारी जरी आजारी असेल तर त्याची चौकशी करतो आणि रूपा तर माझी बायको आहे.
हा विचार करून त्याचं डोक आता खूप दुखायला लागलं. तेव्हढ्यात नर्सने आवाज दिला.
"सर काही तपासण्या अजून कराव्या लागतील."
"हो हो करा. जे काही करता येईल सगळं करा आणि रूपाला ठणठणीत बर करा."
राजेशने ऑफिस मध्ये फोन करून सुटी घेतली.
काही वेळाने रूपाने डोळे उघडले आणि हलकीशी स्माईल दिली. राजेशने तिचा हात हातात घेतला.
"बर वाटतं ना आता?"
"हो...तुम्ही घरी जा आणि फ्रेश व्हा. काही खाल्ल नसेल, खावून घ्या. मी बरी आहे आता."
"हो तुला थोड्या वेळाने नाष्टा येईल तू पण खाऊन घे."
एवढं बोलून राजेश घरी निघून गेला.
राजेश घरी गेला. फ्रेश होऊन रेडी झाला.
"हे घे चहा, रात्री न जेवताच निघून गेला. जेवण तसचं पडलं आहे."
"आई तुला अजूनही जेवणाच पडलं आहे,अगं तिला एक्ने तीन ताप होता. तिचं कोण आहे इथे आपल्याशिवाय."
"काही झालं नसेल तिला, दोन लोकांचा स्वयंपाक केला आणि एवढी कशी काय आजारी पडली हेच मला कळत नाही. आमच्यावेळी आम्ही खटल्याचा स्वयंपाक करत होतो ते ही ताप अंगात असतांना आणि आता मात्र."
"आई तू मला ते नको सांगू. तुम्ही फक्त घरातलं काम करत होता आता तसं नाही. रूपाच नाही तर बऱ्याच स्त्रिया घर सांभाळून नोकरी करतांना दिसतात. मग कधी तरी थकवा जाणवतो आणि मग आजारी पडतात."
"काय जादू केली बाई हिने काय माहित,माझा मुलगा असून तिचीच बाजू घेतो."
"आई मी तुझी किंवा तिची बाजू घेत नाही मी जे खरं आहे, जे सत्य आहे, जे बरोबर आहे त्याची बाजू घेतो. देवपूजा झाली असेल आणि इच्छा असेल तर वरण भात दे बनवून."
"मला वेळ लागेल देवपुजेला अजून."
राजेशला कळून चुकलं होतं आई काही टिफीन देणार नाही. तो बाहेर निघून आला आणि एका हॉटेल वरून वरण भात घेऊन रुपाकडे गेला.
रूपाला देखील कळलं होत की तो डब्बा बाहेरून आणलेला आहे. पण ती काही बोलली नाही कारण ती बोलली असती तर राजेशला वाईट वाटलं असतं.
संध्याकाळी तिचा ताप कमी झाला आणि तिला सुटी झाली. मात्र थकवा अजून जाणवत होता. ती घरी गेली. बघते तर तिची आई घरी आलेली होती.
"आई तू कशी काय इकडे?"
"अग जावई बापूंनी सांगितलं, तुला बरं नाही म्हणून मी आले."
"बर झालं तुम्ही आलात. रूपा जा तू आराम कर."
खरं तर राजेशने आईला बोलावून घेतलं होतं. कारण त्याची आई काही करणार नाही हे त्याला माहीत होत. मात्र सासुबाईला तिची आई आलेली काही आवडलं नव्हतं.
काय होईल पुढे? सासूबाईंच्या स्वभावात फरक पडेल का? वाचूया पुढच्या भागात.
©®कल्पना सावळे.
©®कल्पना सावळे.
