Login

मी फक्त माझ्या नवऱ्याची ( भाग ४)

नाती ही रबरासारखी असतात काळजीपूर्वक हाताळावी लागतात, किती तानायची , किती ओढायची आणि किती सैल सोडायची ते कळलं पाहिजे.
तीन दिवसात रूपा एकदम ठणठणीत बरी झाली. आईने तिची खूप सेवा केली असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही.

एवढ्या दिवसात मात्र सासूबाई एकदाही तिच्या आईशी बोलली नाही की रूपाची चौकशी केली नाही. रूपा बरी झाल्यावर  तिची आई निघून गेली.


एक दिवस संध्याकाळी जेवतांना,

"मी काय केलं नसतं, उगाच कशाला बोलावून घेत आईला? म्हणजे लोकांना सांगायला की सासू करत नाही म्हणून. आता तुझी आई आल्यावर मी कशाला हात लावू कशाला."

रूपा काही बोलणार त्या आधी राजेश म्हणाला,

"आई अगं तिला काहीच माहीत नाही त्यातलं, मी बोलावलं त्यांना कारण तुला देव पुजेपासून फुरसत नाही आणि मग रूपाच कुणी केलं असतं?"

"काय करायचं त्यात? एवढी कुठे आजारी होती ती? तसही सासू सुनेचे नाही करत आपल्याकडे."

रूपाने राजेशला डोळ्यांनी खूनावल की शांत रहा. राजेश काहीच बोलला नाही.जेवण केलं आणि निघून गेला.

काही दिवसांनी रूपा परत कामावर जायला लागली. सगळं पूर्वीप्रमाणे सुरू झालं.

आठ दहा दिवस होत नाही तोच तिची नणंद खूप आजारी पडली म्हणून ती माहेरी निघून आली.


रूपा नेहमीप्रमाणे उठली आणि घरचं सगळं आवरून कामाला निघाली.

"रूपा अगं तुला कळत नाही का चित्राला बरं नाही ते, सुटी घेवून घरी बसावं. तिला काय हवं काय नको ते बघावं. एवढं साधं तुला कळत नाही की तुला समजून घ्यायच नाही."

रूपाने ऐकून न ऐकल्यासारखं केलं. पर्स उचलली आणि कामावर निघून गेली.

ती काहीच नाही बोलली कारण राजेश बाहेर गावी गेला होता आणि रूपा काही जरी बोलली असती तर त्याला मासाला लावून राजेशला सासूबाईंनी सांगितलं असतं म्हणून ती गुपचूप निघून गेली.

दिवसभर सासूबाईला काम पुरल कारण लेकीला जे पाहिजे ते बनवून दिले एवढेच नाही तर तिच्या दोन मुलांनी त्यांना हैराण करून सोडले होते.

संध्याकाळी रूपा घरी आली. तिने पटापट आवरून स्वयंपाकाला लागली. स्वयंपाक झाल्यावर सासूबाईनी नातवंडांना वाढलं आणि त्याचं जेवण झाल्यावर लेकीच्या रुमध्ये दोघींचे जेवण घेऊन गेली.

इकडे रूपा बेडरुममधे आराम करत होती. रात्रीचे साडे नऊ वाजले, जेवायची वेळ झाली म्हणून ती सासूबाईंना आवाज द्यायला गेली.


"वाढू का आता, नऊ वाजलेत!"

"आमची जेवण झालीत केव्हाची. चित्राला लवकर जेवायची सवय आहे."


"अहो आई मला आवाज तर द्यायचा ना. ताई झोपल्या होत्या म्हणून मी थांबले त्यांच्यासाठी, नाही आवाज दिला."

"अगं मला बरं नाही म्हणून गरम गरम खावून घेतलं. काही जेवण जात नाही मला आणि तशी तुला उशिरा जेवायची सवय आहे.राजेशला सोडून नाही जेवण ना तू."


रूपाने रुमचा दरवाजा बंद केला आणि किचनमध्ये गेली. तिथे गॅसच्या ओट्यावर सगळीकडे पसारा होता. ना भाजीवर झाकण होत ना पोळ्याच्या डब्यावर. बेसिन मध्ये भांड्याचा ढीग होता.

रुपाने पदर कमरेला खोचला, किचन ओटा आधी आवरून घेतला आणि मग भांडी घासून घेतली. ताट वाढून घेतलं तेव्हढ्यात राजेशचा फोन आला.

"हॅलो...."

"हॅलो,जेवलीस का?"

"हे काय ताट वाढून घेतलं, तुम्ही जेवलात?"

"हो माझं झालं कधीच आता बसलो बसमध्ये येईल सकाळी. तुझा आवाज खूप खोल येत आहे काय झालं? खूप दमलेली वाटत आहे.


"नाही असं काही नाही."

"अगं जास्त काम नको करू, आताच आजारातून उठली आहेस ना."

"ह्ममम,या मग लवकर."


रूपा जेवली आणि झोपायला गेली.

दुसऱ्या दिवशी राजेश आला. रूपा नेहमीप्रमाणे उठली आणि काम करायला लागली.

सासूबाईने आज नेहमीपेक्षा आवाज चढवला.

"राजेश, अरे तुझ्या बायकोला सांग जरा, कालपासून  मी म्हणत होती सुटी घे, चित्रा काय रोज रोज येते आपल्या घरी. तू कर तिचे लाड पण मी आजिबात करणार नाही. हेच शिकवलं तिच्या आईने की, सासरच्या माणसाशी असं वागायचं, हे असे संस्कार दिलेत आईने तिच्या."

हे ऐकून मात्र आता रूपाला खूप राग आला.

रूपा काही बोलेल का सासुबाईला की मुकाट्याने ऐकून घेईल? वाचूया पुढच्या भागात.
क्रमशः...
©®कल्पना सावळे