"आई हे बघा तुम्ही मला काहीही म्हणा पण माझ्या माहेरच्या माणसांना तुम्हाला बोलण्याच्या काही अधिकार नाही. मी ते सहन पण करणार नाही."
"राजेश ऐकलं कशी जीभ चालते तिची. गोगल गाय आणि पोटात पाय."
सासूबाईंचं बोलणं होत नाही तोच रूपा मध्येच बोलली,
"त्यांना काहीही सांगू नका,जे काही बोलायचं ते माझ्याशी बोला. मला अजिबात आवडत नाही मोठ्यांशी या भाषेत बोलायला पण काय करू आता माझी सहनशक्ती संपली. अहो मी एक बाई आहे हे विसरलात तुम्ही. मलाही मन आहे, भावना आहे. मी सून आहे म्हणून काहीही बोलणार का तुम्ही.आज जरा स्पष्ट बोलते, जसं तुम्ही वागत आहात ना माझ्याशी मी ही या पुढे तसेच वागणार तुमच्याशी."
"बघितलं राजेश कशी बोलते माझ्याशी."
"आता ते काहीही बोलणार नाही आपल्या मध्ये. खूप केलं मी तुमच्यासाठी आणि तोंडातून एक शब्द न काढता सगळं ऐकत गेले पण यापुढे नाही, अजिबात नाही. माझं करायची वेळ येते तेव्हा मागे सरता आणि तुमच्या वेळी मात्र मी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा असते तुमची. या आधी माझी साथ फक्त माझ्या नवऱ्याने दिली आहे म्हणून मी ही त्याच्यासाठी वाट्टेल ते करेल पण तुमच्यासाठी नाही. मी कुणाची सून नाही, ना कुणाची वहिनी, ना कुणाची मामी या पुढे मी फक्त माझ्या नवऱ्याची."
एवढं बोलून रूपाच्या भावना अनावर झाल्या आणि ती राजेशच्या गळ्यात पडून ढसाढसा रडायला लागली. नेहमी हसतमुख असणारी रूपा आज मात्र उदास आणि दुःखी झालेली दिसली.
राजेशने तिला शांत केलं, ग्लासभर पाणी दिले. तिने अश्रू पदराला पुसत पाण्याचा एक घोट पिला आणि ती जे काही बोलली ते तिच्या संस्कारात बसत नव्हत म्हणून ती परत बोलली,
"मला माफ करा मी जरा मोठ्या आवाजात बोलले पण एकदा फक्त एकदा तुम्ही स्वतःला माझ्या ठिकाणी ठेवून बघा मग कळेल कसं वाटत मनाला? कश्या वेदना होतात? मन मारून कसं जगावं लागतं आणि कसं गप्प बसावं लागतं."
कुणी काहीच बोललं नाही. रूपाने परत बोलायला सुरुवात केली,
"तुमची मुलगी जेव्हा सून म्हणून दुसऱ्याच्या घरात जाते तेव्हा तुम्हाला तिच्या सासरचे नियम जीवघेणे वाटतात मात्र तेच नियम तुम्ही सुनेला लावता तेव्हा तुम्ही तीळभर विचार करत नाही. अहो सून ही सुद्धा कुणाची मुलगी आहे हा विचार सासरची मंडळी करत नाही हे खूप दुःखदायक, वेदनादायक आहे आमच्या सारख्या मुलींसाठी."
हे ऐकून चित्राच्या डोळ्यात पाणी आलं.ती रुमच्या बाहेर आली आणि म्हणाली,
"वहिनी, अहो एकूण एक शब्द अगदी खरं बोलल्या तुम्ही. खरच कदाचित तुमच्या एवढं शहाणपण माझ्यात असतं तर किती बरं झालं असतं ना? माझ्यासारख्या काही मुली असतात ज्या माहेरी भावजयीच्या संसारात ढवळा ढवळ करून, नणंद या हसत्या खेळत्या नात्याला उगाच चुकीचं ठरविल्या जाते. मी ही नक्की प्रयत्न करेल तुमच्यासारखा वागण्याचा. जमलं तर मला माफ करा. मला असं वाटते मुलीने मुलीसारखं राहावं. माहेरी येवून दोन घास खावून गुपचूप निघून जावं ह्यातच खरं शहाणपण."
"चित्राताई एक स्त्री असणं फारसं अवघड नाही मात्र एक मुलगी आपल्या प्रेमाच्या माणसांना सोडून सासरी सून म्हणून पाऊल टाकते तेव्हा ती सासरी असणाऱ्या मंडळींना आपलसं करण्याचा मनापासून प्रयत्न करते मात्र सासराची मंडळी तिला नेहमी परकी समजतात. खर तर तिला तुम्ही आपलसं करून बघा ती तुमच्यासाठी काहीही करायला तयार होईल."
हे बोलून रूपा आत निघून गेली.
हे सगळं ऐकुन सासुबाईला पण कुठेतरी त्या चुकल्या ही जाणीव झाली पण त्यांनी ते कधीही बोलून दाखवले नाही.
दुसऱ्या दिवशी चित्रा पण तिच्या घरी निघून गेली.
खर तर संसार म्हटलं की प्रेमा बरोबर तक्रारीही आल्या. जसं आपल्याला खिचडी बरोबर लोणचं आणि पापड हे लागतं कारण त्याने खिचडीची चव अधिकच वाढते . मग नवरा बायकोचा संसार हा प्रेमाचा संसार जेव्हा नव्याने सुरू होतो तेव्हा त्याबरोबर काही तक्रार करणारी मंडळी पण हवी ना, फक्त त्याचा अतिरेक व्हायला नको नाही का!
माझी ही कथा पूर्णतः काल्पनिक आहे.
धन्यवाद.
समाप्त...
©®कल्पना सावळे
धन्यवाद.
समाप्त...
©®कल्पना सावळे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा