Login

मी जेवणार नाहीये (भाग १)

आपलेच दात आणि आपलेच ओठ
मी जेवणार नाहीये (भाग १)
(आपलेच दात आणि आपलेच ओठ)

“रात्री मी जेवणार नाहीये.” मंदाताई आपल्या सुनेला पल्लवीला म्हणाल्या आणि दिवे लागणी झाल्यावर आपल्या खोलीत जाऊन बसल्या.


‘आता आईंना जेवायचं नाही म्हणजे त्यांच्या हिश्श्याचा स्वयंपाक करावा लागणार नाही. बरं झालं आधीच सांगितलं ते. नाहीतर मी करून ठेवलं असतं आणि परत शिळं उरलं असतं.’ पल्लवी कणिक भिजवत स्वतःशीच म्हणाली. अजित ऑफीसमधून येण्यापूर्वी तिने स्वयंपाक करून घेतला. आज नेमका अजितला घरी यायला उशिर झाला होता. अजित आणि पल्लवीचं काही महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं. नव्या घरात पल्लवी रुळू बघत होती; पण म्हणावं तशी घडी अजूनही बसली नव्हती.


मंदाताई बऱ्याचशा लहरी स्वभावाच्या होत्या. मनात असलं तर कामाला मदत करत. बरेचदा अजित घरात असला की त्यांची पल्लवीला कामाला मदत असे. अजित ऑफिसमध्ये गेल्यावर मात्र त्या पडली काडीही उचलत नसत. ही गोष्ट पल्लवीच्या लक्षात आली होती; पण घरात इनमिन चार माणसे होती, फारसे काही काम नसायचे त्यामुळे ती ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायची.


श्रीपतरावही संध्याकाळी गार्डनमध्ये फिरून आले होते. बैठकीच्या खोलीत चहा घेत पुस्तक वाचत बसले होते.

स्वयंपाक आटोपल्यावर काय करावं म्हणून पल्लवी सासूबाईंच्या खोलीत डोकावली. मंदाताईंचा डोळा लागला होता.


‘बरं नाही की काय? कदाचित म्हणूनच जेवायला नको म्हटल्या असतील.’ पल्लवीचा स्वतःशीच संवाद सुरू होता.


थोड्यावेळाने अजित घरी आला. अजित फ्रेश होईपर्यंत पल्लवीने डायनिंग टेबलावर जेवायची तयारी केली.


“हे काय, तीनच ताटं?” अजित स्वयंपाक घरात आल्या आल्या म्हणाला.


“आईंना जेवायचं नाहीये.” पल्लवी


“असं कसं. थांब मी आवाज देतो.” अजित मंदाताईंच्या खोलीत जाऊ लागला.


“जेवायचं नसेल तरी इकडं येऊन बस म्हणावं. कसं वाटतं ते.” श्रीपत राव अजितला म्हणाले. अजित मंदाताईंना घेऊन स्वयंपाक घरात आला.


“जेवते रे थोडं. उगी अन्नाला पाठ लावू नये म्हणतात.” मंदाताई पल्लवीच्या ताटावर जेवायला बसल्या.


“पल्लू, तू पण बस ना.” अजित


“अरे तुम्ही सुरू करा. बसतेच मी मागून.” पल्लवी म्हणाली आणि पापड भाजायला गेली. पल्लवीने पापड भाजून आणले.


“लोणचं वाढतेस का थोडं? आणि ती काल केलेली शेंगदाण्याची चटणीही वाढ.” मंदाताई म्हणाल्या.


“पापड भाजलेस सोबत दोन चार साबुदाणा पापड्या तळल्या असत्या तर अजून मजा आली असती.” श्रीपतराव म्हणाले आणि पल्लवीने पापड्या तळून आणल्या. सगळे गप्पा करत जेवत होते. पल्लवी सगळ्यांना हवं नको ते बघत होती. सगळ्यांची जेवणं आटोपत आली होती. तितक्यात अजितला कुणाचातरी फोन आला. बोलत बोलतच अजित ताटावरून उठला आणि हात धुवून बाहेर गेला.


जेवण नाही करायचं म्हणालेल्या मंदाताईही अगदी तृप्तीची ढेकर देऊन ताटावरून उठल्या होत्या. पल्लवीने पोळीच्या डब्यात पाहिलं, डब्बा पूर्ण रिकामा होता. भात वरण, भाजी सगळं काही संपलेलं होतं. पल्लवीच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. स्वतःचे अश्रू गिळतच तिने सगळं आवरलं. आता स्वतःसाठी काही बनवून खायची तिची इच्छा नव्हती. उपाशीपोटीच ती झोपायला गेली.


अजितचं फोनवर बोलणं सुरूच होतं. त्याचा फोन आटोपला आणि पल्लवी त्याला म्हणाली.


“अजित, आपण आईस्क्रीम खायला जाऊया का?”


“आता! किती वाजलेत बघ. मला अर्जंट दोन मेल करायचे आहेत गं. आपण उद्या जाऊया आईस्क्रीम खायला. चालेल ना?”


“ठीक आहे. तू कर काम. मी झोपते.” पल्लवी म्हणाली आणि तोंडावर पांघरूण घेऊन पडली. पोटात कावळे ओरडत होते त्यामुळे तिला झोपही लागत नव्हती.


अजित बऱ्याचवेळपर्यंत काम करत बसला होता. रात्री उशिरा त्याने रुममधला लाईट बंद केला आणि तोही झोपला.


सकाळी पल्लवीला जाग आली ती अर्धशिशीच्या वेदनेसोबतच!


‘रात्रीचं जेवण चुकलं… ऍसिडिटी वाढणारच होती आणि हे होणारच होतं..’ पल्लवी स्वतःला समजवत सकाळच्या कामाला लागली. नेहमीप्रमाणे अजित ऑफिसमध्ये जाईपर्यंत मंदाताईंनी स्वयंपाक घरात लुडबुड केली. अजित ऑफिसला निघताच त्यांनी कामातून हात काढून घेतला.


पुन्हा दोन दिवसांनी मंदाताईंनी रात्री जेवणार नाही असं पल्लवीला सांगितलं. मागच्या प्रसंगावरून पल्लवीने आधीच दोनचार पोळ्या जास्त टाकल्या.


मंदाताईंनी मात्र परत तिची फजिती केली. ताटावर बसून त्या अगदी थोडंसं जेवल्या. बराच स्वयंपाक उरला होता.


“चांगलाच सढळ हात दिसतोय तुझा. रोज एवढं अन्न फेकण्यात गेलं तर माझ्या पोराच्या डोक्यावर केस राहायचे नाही.”


“आई मी ह्याचाच नाश्ता करून घेते.” पल्लवी चाचरत म्हणाली.

“राहू दे, माझा स्वयंपाक करू नकोस. ह्या शिळ्यातच माझं जेवण होतं.” मंदाताईंनी पल्लवीला सुनावलं.


त्यांच्या बोलण्याचं पल्लवीला वाईट वाटलं. तरी त्यांना उलटून उत्तर न देता ती काम करत राहिली.


“आई, जेवायला वाढू का?” दुपारी जेवायच्या वेळेवर पल्लवीने मंदाताईंना आवाज दिला.