मी जेवणार नाहीये (भाग २)
“तुला भाजी आणायला जायचं होतं ना. तू जाऊन ये. मी घेते वाढून.” मंदाताई खोलीतूनच म्हणाल्या.
“ठीक आहे. मी भाजी घेऊन येते. मग जेवेण.” पल्लवी पिशव्या घेऊन बाजारात गेली. दुपारी भाज्या घेऊन परत आली आणि जेवायला बसली. रात्रीचा उरलेला स्वयंपाक तसाच होता. पल्लवीने तो वाढून खायला घेतला तर तोपर्यंत तो विटला होता.
‘सकाळी माझा नाश्ता ह्यातच होत होता. मलाही खाऊ दिला नाही आणि स्वतःही काही खाल्लं नाही. का करताय ह्या असं?’ पल्लवीला स्वतःचाच राग आला. पोळीच्या डब्यात राहिलेली एक पोळी तिने लोणच्यासोबत पोटात ढकलली.
मंदाताईंचं असं लहरी वागणं सुरूच होतं. नेमका स्वयंपाक केला की त्या अंमळ जास्त जेवायच्या आणि जरा जास्त केला की एवढंतेवढं खायच्या. पल्लवीला एक तर शिळं खावं लागायचं नाही तर अर्धपोटी रहायला लागायचं. त्या दोन्ही कारणामुळे तिची तब्येत बिघडत चालली होती.
एक दिवस पल्लवीला परत डोकेदुखीचा त्रास झाला आणि सोबत पित्ताचाही. सकाळी उठल्या उठल्या तिला अगदी कडूजहर उलटी झाली. पल्लवी अगदीच गळून गेली होती. नेमका त्या दिवशी शनिवार होता आणि अजितही घरी होता.
“का गं पल्लू, काय झालं? बरं वाटत नाहीये का?” तिचा मलूल चेहरा बघून अजित काळजीने म्हणाला.
“पित्त वाढलं आणि डोकंही खूप दुखतंय. वाटेल थोड्यावेळाने बरं” पल्लवी
“ते काही नाही. अंगावर काही काढायचं नाही. चल आपण दवाखान्यात जाऊन येऊ.” अजित म्हणाला.
“स्वयंपाक वगैरे आटोपते, मग जाऊन येऊ.” पल्लवी
“कशाला त्रास घेतेय. आई आहे ना, ती करून घेईल. चल आपण जाऊन येऊ.” अजित
“नको रे. मी करते. तासाभरात होईल सगळं.” पल्लवी
“अगं, ऐक माझं. थांब मी सांगतो आईला.” अजित खोलीतून लगेचच बाहेर पडला. पल्लवीही त्याच्या मागे गेली.
“आई, पल्लूला बरं वाटत नाहीये. मी तिला हॉस्पिटलमध्ये नेऊन आणतो.” अजित मंदाताईंना म्हणाला.
“का गं, काय झालं?” मंदाताई
“सकाळपासून उलट्या होत आहेत तिला.” अजित
“हो का? अगं आवळा सुपारी खाऊन बघ. बरं वाटेल.” मंदाताई
“त्याने काही होणार नाही आई. मी तिला हॉस्पिटलमध्ये नेऊन आणतो. तोपर्यंत तू प्लिज स्वयंपाक करून घेशील ना. बाबांची जेवायची वेळ होईल म्हणून म्हटलं.” अजित
“हो हो. तुम्ही जाऊन या.” मंदाताई नाईलाजाने म्हणाल्या आणि स्वयंपाक घरात वळल्या.
‘आमच्यावेळी नव्हतं बाई असं. जरा दखलं खुपलं की दवाखान्यात जा. आणि आमचे नवरेही नव्हते असे, एवढं झेलणारे.’ मंदाताई बडबडत होत्या. नेमकी बॉटल भरायला आलेल्या पल्लवीच्या कानावर त्यांचे शब्द पडले. तिच्या डोळ्यात पुन्हा पाणी जमा झालं.
“नको ना रे जायला. ऍसिडीटीची गोळी घेतली की बरं वाटतं मला.” पल्लवी अंगणात त्याला म्हणाली.
“म्हणजे तुला आधीही असा त्रास झालाय ना. कमॉन यार पल्लू, अगं शिकल सवरली आहेस ना तू, असं अंगावर का काढतेय. ते काही नाही, आपण डॉक्टरकडे जातोय. चल बस गाडीवर.” अजित म्हणाला. पल्लवी त्याच्या बाईकवर बसली.
“मायग्रेनचा त्रास आहे हा.” डॉक्टर म्हणाले.
“हो डॉक्टर, मला आधीपासूनच आहे मायग्रेन.” पल्लवी
“कधी म्हणालीस पल्लू तू. एनिवेज्, ह्यावर काही पर्मनंट उपाय नसतो का?” अजितनं डॉक्टरांना विचारलं.
“पुरेशी झोप. वेळच्या वेळी खाणंपिणं… शीळं अन्न टाळणं आणि आपले ट्रीगर पॉईंट्स म्हणजे ज्या कारणामुळे डोकं दुखतं हे माहीत आहे ते कारणं कमी केले की ह्याचा त्रास होत नाही. सध्याचं औषध देतोय. ही गोळी डोकं दुखलं की घेऊ शकता; पण लक्षात घ्या सतत गोळ्या घेणंही चांगलं नसतं.” डॉक्टर म्हणाले. अजितने त्यांचे आभार मानले आणि दोघे तिथून उठले.
“काय यार पल्लू, आता तुझ्या खायच्या प्यायच्या वेळाही मीच सांभाळू का?” अजित औषधांच्या दुकानात पल्लवीला म्हणाला आणि पल्लवी रडायला लागली.
“आता रडण्यासारखं काय आहे त्यात! काही झालंय का?” अजित म्हणाला. पल्लवीने नकारार्थी मान हलवली.
“म्हणजे काहीतरी आहे.” अजित म्हणाला. दोघे तिथून निघाले. अजितने एका बागेजवळ गाडी थांबवली. दोघे बागेतल्या बाकड्यावर जाऊन बसले.
“सांग आता.” अजित
“काही नाही रे… माझंच चुकतंय.”
“आता सांगशील का?”
“आई नेहमीच असं करत आहेत. त्यांनी जेवायचं नाही म्हटलं आणि मी नेमका कमी स्वयंपाक केला की त्या जेवतात. त्यांना गृहीत धरून केलं की नेमक्या जेवत नाहीत. किती स्वयंपाक करू तेच कळत नाही. शिळं उरलं की फेकुही देत नाहीत. मला आधीपासूनच मायग्रेनचा त्रास आहे रे. जेवण वेळेवर केलं आणि शिळं खाल्लं नाही तर माझं डोकंही दुखत नाही. आजकाल दोन्ही गोष्टी नीट होत नाहीयेत. मी सगळं नीट करू बघतेय, पण जमतच नाहीये.” पल्लवीने रडतच सगळं सांगितलं.
“मला माहितीये ह्यावर उपाय. चल सांगतो तुला सगळं.”
अजित म्हणाला आणि दोघे तिथून उठले.
क्रमशः
© डॉ. किमया मुळावकर