मी जेवणार नाहीये (भाग ३ अंतिम)
“आई, गर्दी आहे हॉस्पिटलमध्ये. जेवायला थांबू नको. आम्ही येतो इथलं झालं की.” अजितने घरी फोन लावून सांगितलं आणि बाईक काढली.
“आपण कुठं जातोय?”
“योगिता मावशीकडे.”
“आईंच्या लहान बहीण आहेत ना त्या मावशी?”
“हो. तीच ह्यातून मार्ग काढून देईल.”
“कसं वाटतं ते. नको. राहू दे. काही दिवसांनी मलाच सवय होईल ह्याची.” पल्लवी म्हणाली. दोघे बोलत बोलत मावशीकडे पोहोचले. योगिताताई मंदाताईंच्या लहान बहीण होत्या. त्याच शहरात राहत होत्या. योगिताताईंना एकुलता एक मुलगा होता. योगिताताईंच्या मिस्टरांना काही वर्षांपूर्वी देवाज्ञा झाली होती.
पल्लवी आणि अजितला घरी आलेलं बघून योगिताताईंना खूप आनंद झाला.
“सचिन कुठं गेलाय मावशी? आज सुट्टी असेल ना?” अजित
“अरे दिल्लीला गेलाय तो. कंपनीने ट्रेनिंगला पाठवलं आहे. येईल आठवड्यात परत.” योगिता मावशी म्हणाल्या. इकडच्या तिकडच्या बऱ्याच गप्पा झाल्या. योगिताताईंनी बोलता बोलता स्वयंपाक केला. पल्लवीने त्यांना बरीच मदत केली.
“मावशी एक काम होतं…” अजितने बोलायला सुरुवात केली आणि सगळी हकीकत योगिताताईला सांगितली.
“माझं तर असं झालंय, आपलेच दात आणि आपलेच ओठ… कसा मार्ग काढू तूच सांग.” अजित
“एक काम कर. पुढच्या आठवड्यात तू आणि पल्लवी फिरायला जा. तसंही लग्नानंतर गेलाच नाहीत कुठे. हवं तर इथंच महाबळेश्वरला जा. मी येईल घरी. आणि तुमचा प्रॉब्लेम दुरुस्त करून देईल. ताईचा स्वभाव मला माहितीये आणि उपाय काय करायचा हेही माहिती.” योगितामावशी म्हणाल्या.
त्यांचा निरोप घेऊन दोघे तिथून निघाले.
“अरे कसं वाटतं ते, तू मावशींना सगळं सांगितलंस” पल्लवी अजितला म्हणाली. अजित गाडी चालवत होता.
“आईचा स्वभाव मला माहितीये. माझ्या आत्या, काकू घरात आल्या की ती अशीच करायची. तिला स्वयंपाक करायचा किंवा कामाचा कंटाळा आला की ती सरळ म्हणायची मला जेवायचं नाही. आणि सगळे जेवायला बसली की ही स्वयंपाक करणाऱ्यांची फजिती करायची. तिच्या नंदांसोबत, जावांसोबत हे वागणं ठीक आहे. असूया असते मी समजू शकतो. पण तू तर सून आहेस ह्या घरची. जाऊ दे तू तयारी कर. आपण फिरायला जातोय. तू बघशील, आपण निघू त्यादिवशी बघ आईला बरं वाटणार नाही. मी ओळखतो तिला.” बोलत बोलत दोघे घरी पोहोचले.
अजितने महाबळेश्वरला जायचा प्लॅन केला.
योगितामावशीसोबत ठरवल्याप्रमाणे दोघे फिरायला जायला निघाले. नेमकी त्यादिवशी सकाळी मंदाताईंची तब्येत खराब झाली.
“अरे आईंना बरं वाटत नाहीये.” पल्लवी
“तू शांत राहा.” अजित तिला म्हणाला आणि मंदाताईजवळ गेला.
“काय झालं गं आई? बरं नाहीये का? ठीक आहे आम्ही जात नाही. बुकींगचे पैसे काही परत मिळणार नाही. जाऊ दे तुझ्या तब्येतीपुढे पन्नास हजार काहीच नाहीत.” अजित म्हणाला.
“बापरे, पन्नास हजार! जा बाबा तू. मला वाटेल थोडयावेळात बरं.” मंदाताई म्हणाल्या आणि दोघे त्यांचा निरोप घेऊन निघाले.
दुपारी योगिताताई मंदाताईंकडे आल्या.
“योगे, आता वेळ मिळाला का? अजितच्या लग्नानंतर गेलीये ते आज उगवलीस.” दारात बहिणीला बघून मंदाताईंना आनंद झाला.
“अगं सचिन गेलाय दिल्लीला. मग म्हटलं काय एकटं रहावं म्हणून आले निघून. आता आठवडाभर राहणार बरं.” योगिताताई घरात येत म्हणाल्या.
“बरं केलं. तू येणार आहेस हे माहीत असतं तर अजितला जाऊच दिलं नसतं.” मंदाताई
“कुठं गेलाय तो?”
“फिरायला गेलाय. आपल्या वेळी नव्हतं बाई असं. एवढे पैसे खर्च करून मजा करणं.” मंदाताई
“तो काळ वेगळा आणि हा काळ वेगळा.” दोघी बहिणी मस्त गप्पा करत बसल्या.
संध्याकाळ झाली. मंदाताईंनी देवासमोर दिवा लावला.
“तायडे, मी जेवणार नाही बरं.” योगिताताई म्हणाल्या.
“का गं? काय झालं?” मंदाताई
“अगं दुपारचं जेवण जड झालंय.” योगिताताई म्हणाल्या. मंदाताईंनी श्रीपतरावांचा आणि त्यांचा स्वयंपाक केला. दोघांचं ताट वाढलं.
“योगिता, ये की जेवायला.” श्रीपतराव म्हणाले.
“बरं, जेवते थोडं. अन्नाला पाठ लावू नये म्हणतात.” योगिताताई जेवायला बसल्या.
“वा! माझ्या आवडीची बेसन खिचडी केलीस. पापड लोणचं असतं तर अजून मजा आली असती.” योगिता ताई म्हणाल्या. मंदाताईंनी त्यांना पापड लोणचं दिलं. त्या जेवायला बसेपर्यंत कुकरमध्ये खिचडीने तळ गाठला होता आणि कढईत बेसनाची खरड बाकी होती. मंदाताई फक्त दोन घास खाऊन उठल्या.
तीन चार दिवसात जेवणावरून योगिताताईंनी मंदाताईंची चांगलीच फजिती केली. शेवटी कंटाळून मंदाताई त्यांना म्हणल्याच,
“काय गं, नेमकं जेवायचं नाही म्हणतेस आणि स्वयंपाक कमी केला की जेवतेस आणि जास्त केला की जेवत नाहीस. खायचं नाही खायचं स्पष्ट सांगत जा ना. इनमिन तीन लोकं आहोत घरात. नेटका स्वयंपाक करावा लागतो. एक तर धड पोट भरत नाही किंवा शिळं उरतं. नेहमी नेहमी शिळं नाही ना खाऊ शकत.”
“हेच तर तुला सांगायचं होतं. स्वभाव बदल ताई. आधी तू खटल्याच्या घरात राहत होती. नंदाजावांसोबत तुझे हेवेदावे ठीक होते; पण पल्लवी तुझी सून आहे. तिच्यासोबत का हे असलं वागणं? आपला काळ वेगळा होता हे मान्य. पण आताची पिढी तशी नाहीये. नशिबाने तुला चांगली सून मिळाली आहे तेव्हा तिला जप. बाकीच्या बायका बघ, त्यांना कसा सूनवास असतो ते. अगं हातपाय धडधाकट आहेत आपले तर घरातले कामं आपण केले तर काही बिघडत नाही. चालतफिरत राहू तर आपलंच आयुष्य चांगलं राहील. लक्षात ठेव सुनेला जीव लावशील तर ती तुला जीव लावून राहील. सून चांगली राहिली तर तुझं म्हातारपण चांगलं निघेल. असा विचित्र सासुरवास करू नको बाई तिला. जे पेरलं तेच उगवते म्हणतात… चांगलं पेर चांगलंच उगवेल.” योगिताताई बोलत होत्या. त्यावर मंदाताई काहीच बोलल्या नाही.
दुसऱ्यादिवशी योगिताताई त्यांच्या घरी निघून गेल्या. दोन दिवसांनी अजित आणि पल्लवी परत आले. वातवरणाचा चेंज मिळाला म्हणून पल्लवी खुश होती.
नेहमीप्रमाणे ती स्वयंपाक करायला लागली.
नेहमीप्रमाणे ती स्वयंपाक करायला लागली.
“मी रात्री जेवणार नाहीये बरं.” मंदाताई म्हणाल्या. पल्लवीने साशंक नजरेने त्यांच्याकडे पाहिले.
“अगं खरंच जेवणार नाहीये. तू भाजी कर आणि कणिक भिजवून ठेव. अजित आला की तुम्ही तिघे जेवायला बसा मी गरम गरम पोळी टाकून देते.” मंदाताई
“थँक्स आई.” पल्लवी
“अगं थँक्स कसलं. मला माझी चूक उमगली. बरं मी काय म्हणत होते, उद्या जेवणाला आपण मसाला छोले बनवायचे का? तू चणे भिजू घाल. सकाळी भाजी मी बनवते.” मंदाताई स्वयंपाक घरात तिला मदत करत बोलत होत्या.
तेवढ्यात अजित घरात आला. दोघींना हसत खेळत गप्पा मारताना बघून त्याने एक फोन लावला.
“थँक्स योगिता मावशी!”
“थँक्स योगिता मावशी!”
समाप्त
© डॉ. किमया मुळावकर