Login

मी का सोसावं ?

मी का सोसावं ? भाग १
भाग १

" अगं अनन्या, ऐकलंस का ? चहात साखर कमी आहे आणि वरून तू सांगतेस की आज तुला ऑफिसला लवकर जायचंय ? हे घर आहे की खानावळ ? तुझ्या या नोकरीच्यामुळे नशिबाची आणि माझ्या आरामाची पार वाट लागलीये ! " मयंकने चहाचा कप रागात टेबलावर आदळला.

अनन्याने शांतपणे तन्वीला कडेवर घेतले आणि घड्याळाकडे पाहिले. सकाळी सहा वाजल्यापासून ती कामाला लागली होती. स्वयंपाक, तन्वीचं आवरणे, मयंकचा डबा आणि आता स्वतःची तयारी. पण मयंकच्या तोंडून कौतुकाचा एक शब्द तर दूरच, उलट रोजचा टोमणा मात्र ठरलेला असायचा. तिने शांत स्वरात विचारले,

" मयंक, चहात साखर कमी वाटत असेल तर बाजूलाच डबा आहे, घेऊ शकतोस ना ? मी पण माणूसच आहे, यंत्र नाही. आणि तुझ्या इतकाच पगार मीही घरी आणते, मग रोज सकाळची ही कच कच कशासाठी ? "

" पगाराची मस्ती चढलीये तुला ! आई बरोबरच म्हणते, मुलींना जास्त शिकवलं आणि डोक्यावर चढवलं की त्या सासरच्यांना माणसाची किंमत ठेवत नाहीत." मयंक खेकसला.

लग्नानंतरची पहिली दोन वर्षे कशी गेली, हे अनन्याला आजही आठवत होतं. मोठ्या हौसेने तिने या घरात पाऊल ठेवलं होतं. पुण्याच्या एका नामांकित कंपनीत सिनियर इंजिनिअर म्हणून काम करणारी अनन्या, घराची जबाबदारी पेलताना कधीच मागे हटली नाही. पण प्रॉब्लेम तिच्या कामाचा नव्हता, तर मयंकच्या अहंकाराचा होता.

सासूबाईंचा फोन दर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी यायचा. त्या मयंकला फोनवर सांगायच्या,

" अरे मयंक, बायकोला जरा धाकात ठेवत जा. आज घराबाहेर पडलीये, उद्या तुझ्या डोक्यावर बसेल. तिला जाणीव करून दे की तिचं अस्तित्व तुझ्यामुळे आहे."

एके दिवशी तर मयंकने कहरच केला. त्यावेळी अनन्या गरोदर होती, थकव्यामुळे तिला ऑफिसमधून आल्यावर डोकं टेकवावंसं वाटत होतं. पण मयंकला त्या दिवशी बाहेरून आल्यावर गरम भजी खायची होती.

" मला आज बरं वाटत नाहीये मयंक, आपण बाहेरून मागवूया का ? " तिने अगदी विनवणीच्या सुरात विचारले.

" बाहेरून कशाला ? घरी काय बायको नावाची वस्तू मेलीये का ? नोकरी करतेस म्हणजे काय उपकार करतेस ? या घरात राहायचं असेल तर माझ्या जिभेचे चोचले पुरवावेच लागतील." मयंक ओरडला.

अनन्याने त्या रात्री किचनमध्ये उभं राहून भजी तळली, पण डोळ्यांतून वाहणारं पाणी त्या तेला पेक्षा जास्त उष्ण होतं. तिला वाटलं होतं, मूल झाल्यावर सगळं बदलेल. पण तन्वीच्या जन्मानंतर मयंकची वागणूक अधिकच हिंसक झाली.
जेव्हा पाणी डोक्यावरून गेलं ...

तन्वी आता दोन वर्षांची झाली होती. अनन्याला ऑफिसमध्ये एका महत्त्वाच्या प्रोजेक्टसाठी उशीर झाला. ती घरी आली तेव्हा मयंक दारातच उभा होता.

" कुठे होतीस इतका वेळ ? कोणत्या मीटिंग मध्ये रमली होतीस ? " त्याने संशयाने विचारले.

" मयंक, तू माझ्या कॅरेक्टरवर शंका घेतोयस ? तुला माहितीये क्लोजिंग चालू आहे. " अनन्याचा आवाज थरथरला.

" शट अप ! ही तुझी नाटकं आता जुनी झालीत. "

असं म्हणत मयंकने तिचा हात जोराने पिरगाळला आणि तिला भिंतीवर ढकलले. अनन्याच्या खांद्याला जबर मार लागला. तन्वी कोपऱ्यात उभी राहून रडत होती.

त्या रात्री अनन्याला झोप लागली नाही. सासू- सासऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला, तर त्यांनी फोनवर उलट तिलाच ऐकवले ,

" पुरुषाचा हात चुकून उठतो कधीतरी, पण घर मोडायचं नसतं. तूच काहीतरी उलट बोलली असशील."

अनन्याला समजलं की, हे घर आता तिचं उरलेलं नाही. जिथे सन्मान नाही, तिथे संसार असूच शकत नाही. तिने आरशात स्वतःच्या डोळ्यांत पाहिले. डोळ्यांत पाणी होतं, पण त्यामागे एक नवा निश्चयही होता.

दुसऱ्या दिवशी अनन्याने ऑफिसला जायचं निमित्त केलं. पण ती ऑफिसला गेली नाही. तिने आईला फोन केला आणि ढसाढसा रडली. मनात साठलेला सहा वर्षांचा कचरा त्या फोनवर वाहून गेला. आईने शांतपणे सगळं ऐकून घेतलं आणि फक्त एकच वाक्य बोलली,

" सोना , तू आमची लेक आहेस, ओझं नाही. तू वाघिणी सारखी बाहेर पड, तुझा उंबरठा आजही तुला वाचवायला समर्थ आहे."

काही वेळातच अनन्याच्या फोनवर मेसेज आला, विमान प्रवासाचं तिकीट ! तिच्या वडिलांनी पाठवलेलं.

तिने मागे वळून पाहिले नाही. तन्वीला घेतलं, दोन कपडे बॅगेत भरले आणि घराबाहेर पडली. मयंकला वाटलं होतं की ती नेहमीप्रमाणे दोन दिवसांत रडत परत येईल. पण त्याला काय माहीत, की अनन्याने आता परतीचे दोर कापून टाकले होते. मयंकने तिची किंवा लेकीची विचारपूस करण्याची तसदी देखील घेतली नव्हती. तो त्याच्या आयुष्यात मस्तीत जगत होता. त्याचे आई वडील त्याला साथ देत होते.

" ती तिच्या पायाने गेली आहे. ती स्वतः परत येईल."

आज दोन वर्षांनंतर जेव्हा मयंक आणि त्याचे आई-वडील तिच्या माहेरी समेट करायला आले होते, तेव्हा अनन्याच्या चेहऱ्यावर भीती नव्हती, तर एक करारी बाणा होता. तिने ठामपणे ठरवलं होतं, चुकीची माफी असते, पण गुन्ह्याला फक्त शिक्षाच असते !