Login

मी कशाला आरशात पाहू गं भाग -१

रुपाचा गर्व
जलद लेखन स्पर्धा फेब्रुवारी 2026
विषय - क्षणिक सौंदर्य

मी कशाला आरशात पाहू गं
भाग -१

गेल्या महिनाभरापासून रूपश्री दवाखान्यातच ऍडमिट होती. त्यामुळे तिथे केअरटेकर येऊन तिची शरीर स्वच्छता,कपडे बदलणे सगळं करून जायची.
दिवसभर कृष्णा तिचं सगळं बघायची.
रुपश्रीच्या डोक्यावर केस तर राहिलेच नव्हते. ती अधून मधून कृष्णाला म्हणायची,"मला आरसा दाखव ना.बघु दे मला माझा चेहरा एकवेळ."
पण कृष्णा तिला बोलण्यात गुंतवून विषय टाळून टाकायची. कृष्णाने तिला सांगूनच टाकले दवाखान्यात आरसाच आणला नाही आहे.

रुपश्री नावाप्रमाणेच रूपसंपन्न. जणू नक्षत्रांच्या गावातूनच उतरलेली परी.

तिला आपल्या गोऱ्या गोमट्या रूपाचा फार गर्व.
रुपश्री भावंडात सर्वात मोठी. तिच्या माहेरी ती सर्व भावंडं आणि आई वडील सगळेच गोरे गोरे पान. अगदी युरोपियन भासायचे.

रूपक काळा सावळा पण नाकी डोळी निटस. घरी गजांतलक्ष्मी पाणी भरतेय. चांदीचा पत्रा बसवलेली आणि चांदीची गज असलेली बंगई अंगणात झुलतेय.
होतकरू तरुण.असलेल्या संपत्तीला वाढवतच नेणारा. रुबाबदार, निर्व्यसनी बोट ठेवायला कुठेच जागा नाही.

आई-वडिलांनी हे स्थळ सुचवले त्यावेळी रूपश्री नाराजच झालेली. तिला गोराच नवरा हवा होता.
पण आई-वडिलांनी समजुत घातली. पांढऱ्या रंगाची, आखूड शिंगाची, जास्त दूध देणारी गाय हवी म्हटलं तर मिळणार आहे का? सगळं एकाच जागी कसं मिळणार ?मुलगा गोरा आहे पण कुठलं व्यसन आहे नाहीतर परिस्थिती सर्वसाधारण आहे.

शेवटी नाईलाजास्तव रूपश्री लग्नासाठी तयार झाली.
लग्नाला वर्ष उलटलं दोन वर्ष उलटले घरातले सगळे आणि माहेरचे सगळे वाट बघत होते घरात पाळणा कधी हलणार?आजी आजोबा आसुसले होते नातवंडांना मांडीवर खेळवायला.
पण रुपश्रीच्या मनात भीती होती की होणारा मुल आपल्या नवऱ्यासारखं काळंसावळं झालं तर? तिला गोरच मूल हवं होतं.
शेवटी तिने मूल न होऊ देण्याचा एकतर्फी निर्णय घेतला.

रूपकला ते खूप खटकले. त्यातूनच त्यांचे खटके उडायला लागले.रूपकच्या लक्षात आलेलं की हिने नाईलाजास्तव आपला स्वीकार केलेला आहे.ही फक्त गोऱ्या कातडीवरच प्रेम करते.

आजवर त्याने तिच्या डोळ्यात हिंदकळणारे सौंदर्याचे मधूर तळे बोलून कधीच गढूळ केले नव्हते.

रूपकला वाटले आपल्या नावातच फक्त 'रूप' आहे पण त्याने 'क'ट्टी केलीय आपल्याशी.
त्याला सारखं वाटत होतं आपण चूक केली. आपण आपल्यासारखीच सर्वसाधारण मुलगी बघायला हवी होती. 'नाकापेक्षा मोती जड' झाला.

असे विचार त्याच्या मनात सुरू होते तोच दिवाणखान्यातून त्याच्या कानावर आईचे शब्द पडलेत,"रूप गर्विता म्हणवते स्वतःला.
'उपर से टामटूम अंदर से राम जाने' अशी गत आहे.
वरच्या गोऱ्या कातडीच्या आत मलीन मन दडलेलं सगळ्यांना तुच्छ लेखणारं.

नट्टापट्टा करायला सगळा दिवस कमी पडतो एका कामाला हात लागत नाही. बरं बोलणं वागणं तरी व्यवस्थित असावं ना त्याला काय पैसे पडतात? पण रूपगर्विताच ती.
ती कृष्णा,तिची काय हालत केली हिने? गरिबा घरची लेक म्हणून चुप आहे नाहीतर...

'गर्वाचे घर खाली म्हणतात' येईल एक दिवस तसाही तेव्हा येईल जमिनीवर. तेव्हा वेळ निघून गेलेली असेल."

घरातल्या गडी माणसांना घरात नेहमी माणुसकीची वागणूक मिळत असे पण
रुपश्री आली आणि ती तिच्या दुप्पट तिप्पट वयाच्या मावशी, काकांना अरे तुरे करून बोलायला लागली.दिसण्यावरुन टोमणे मारु लागली.
सासू-सासरे नाराज होते पण काय बोलणार ना.
रुपक ही आजवर शांत होता.पण आता शांतता भंग झाली होती.

पुढे काय घडतं? कृष्णा कोण?तिचं काय होतं? रुपश्री बदलते का?वाचा पुढील भागात.
भाग -२मधे.
क्रमशः
©®शरयू महाजन
0

🎭 Series Post

View all