Login

मी कशाला आरशात पाहू गं भाग-३ अंतिम

रुपाचा गर्व
जलद लेखन स्पर्धा फेब्रुवारी 2026
विषय -क्षणिक सौंदर्य

मी कशाला आरशात पाहू ग
भाग -३ अंतिम

आधीच गर्विष्ठ असलेली,आपल्या रूपाचा अभिमान असलेली रुपश्री दिवसेंदिवस जास्तच अहंकारी बनत गेली. कारण श्रीमंत घर मिळालं तो अहंकार वेगळाच होता.
पण तिच्या वागणुकीचा परिणाम संपूर्ण घरावर झाला होता. घरातील सगळेच लोक साधे सरळ ज्यांनी कधीच पैशाचा माज दाखवला नाही. उलट दान धर्म, गरिबांना मदत ,आश्रितांची कदर यात सतत धन्यता मानणारा परिवार. सगळेच परस्पर पूरक.

पण रूपश्री आली आणि दुधात मिठाचा खडा पडावा तसं झालं.

रूपकनी खूप प्रयत्न केला तिला बदलण्याचा.पण पालथ्या घड्यावर पाणी. कुत्र्याचे शेपूट नळ कांड्यात घातलं तरी वाकडंच म्हणतात त्यातला प्रकार.

त्याचा त्रास रूपकला व्हायला लागला. रूपक आपल्याच विचारात गढलेला राहायचा. सुन्न बसून राहायचा.

अशात रूपश्रीला गिळायला त्रास होऊ लागला. सुरुवातीला अन्न आता तर पातळ पदार्थ ,पाणी सुद्धा गिळायला त्रास होऊ लागला.
डॉक्टरांकडे नेले आठ पंधरा दिवसाची औषध घेऊन झाली तरी काहीच फरक पडला नाही.

शेवटी शहरात मोठ्या डॉक्टरांकडे नेले तिथे डॉक्टरांनी वेगवेगळ्या टेस्ट सांगितल्या त्या सगळ्या टेस्ट करून झाल्यानंतर चार दिवसात रिपोर्ट आले रुपश्रीला अन्ननलिकेचा कॅन्सर होता.

आता कॅन्सरचे उपचार सुरू झाले रेडीएशन, लाईट.
त्या उपचारात रुपश्रीचे सगळे केस गेले.
तिचा गळ्याचा भाग काळा ठिक्कर पडला होता. चेहराही काळा पडलेला. ऐन चाळीशीत म्हातारी दिसायला लागली.
सगळा नूरच उतरला होता.

कुठे गेले सौंदर्य ?कुठे गेला त्या सौंदर्याचा गर्व,अभिमान, अहंकार?

आता तर तिच्या गळ्याच्या भागाची कातडी सडून गळून पडत होती.अक्षरश:तिचा चेहरा पाहू शकत नव्हते कुणी.

रुपक मनाशी विचार करत होता, "किती अहंकार केला गं आपल्या सौंदर्याचा. आता आरशात बघ स्वतःला मग समजेल.

ती कृष्णा बिचारी,जिला तुझ्यामुळे विद्रूप चेहरा घेऊन जगावे लागतेय,जिचा तू पदोपदी अपमान केलास,जिला रुपावरुन सदानकदा तुच्छ लेखलेस,
तरी आज ती तुझी मनापासून सेवा करतेय.तुझं मन जपतेय.

तुला आरसा दाखवत नाही आहे ती कारण तुझा विद्रूप झालेला चेहरा तू बघू शकशील का?

ती विसरली गं तू केलेला छळ, अपमान.
तुच सांग तिचे आंतरिक सौंदर्य मोठे की तुझे हे बाह्य सौंदर्य?
श्री,

दिपै चामचादर मढी
हाड पिंजरा देह
भितर यासम जगतमे
और नहीं घिनगेह
आणि अशा या देहाच्या सौंदर्याचा किती अभिमान बाळगला तू?
सगळ्यांना दुखवलेस.
श्री,मी सुद्धा नाही बघु शकत गं.
आता तरी विचार कर.
शेवटचे दिवस सुखात घालवायचे असतील तर अहंकार सोड.

ज्या शरीराला तू आपलं मानलं, ज्या सुंदर शरीराचा अहंकार केलास, त्या शरीराला नटवण्यासाठी कष्ट घेतले ते शरीरही शेवटी तुझी साथ सोडणार आहे गं. तेही सोबत नाही येऊ शकत.
स्मशानभू पर्यंत अंती हे
येती आप्तगण सारे
तुझ्या सवे स्तव देह न येई
वदू किती जिवा रे

हे सत्य आहे जीवनाचं.
श्रीच्या डोळ्यात पश्चात्तापाचे अश्रू दाटून आले होते.ती नि: शब्द होती.

समाप्त
©®शरयू महाजन
0

🎭 Series Post

View all