" हॅलो , उद्या माझा वाढदिवस आहे. तू फ्री असशील तर रात्री फिरायला जायचे का ?" प्रेम म्हणाला.
" मी ? तुझे मित्रमैत्रीण असतील ना. " पल्लवी म्हणाली.
" पुण्यात तू सोडून कुणी नाही ओळखीचे. " प्रेम म्हणाला.
" अरे रात्री नको. सकाळी जाऊ. " पल्लवी म्हणाली.
" मी दिवसभर साईटवर असेल. म्हणून फक्त रात्रीच फ्री आहे. प्लिज. " प्रेम म्हणाला.
" ठिके. तासाभरात सांगते. " पल्लवी म्हणाली.
सपना बाजूलाच होती. पल्लवीच्या चेहऱ्यावरील उडालेले रंग पाहून तिला समजायचे ते समजले.
" काय झाले ?" सपना म्हणाली.
" प्रेमने उद्या रात्री फिरायला बोलावले आहे. त्याचा वाढदिवस आहे." पल्लवी म्हणाली.
" मग जा ना. काका-काकूंचा प्रॉब्लेम आहे का ?" सपना म्हणाली.
" नाही. ते तर गावाकडे गेलेत. " पल्लवी म्हणाली.
" ग्रेट. मग जाऊन ये. " सपना म्हणाली.
" अस पुरुषासोबत रात्री बाहेर फिरणे ? " पल्लवी म्हणाली.
" तू स्वतःच्या मनाला विचार. तुला प्रेम कसा वाटतो ? तुला जर सुरक्षित वाटत नसेल तर नको जाऊ. पण विश्वास वाटत असेल तर नक्की जा. " सपना म्हणाली.
पल्लवी विचारात पडली. शेवटी तिने प्रेमला होकार दिला.
संध्याकाळी पांढऱ्या रंगाचा टॉप , वरून गुलाबी जॅकेट आणि निळ्या रंगाची जीन्स तिने घातली. मेकअप करून छानपैकी तयार झाली. कितीतरी वर्षांनंतर तिने साडी आणि पंजाबी ड्रेस सोडून काहीतरी वेगळे घातले होते. प्रेम ठरलेल्या ठिकाणी आपली बुलेट घेऊन पोहोचला. प्रेमने पांढरा टीशर्ट आणि काळे जॅकेट घातले होते. पल्लवी तिथे आली आणि प्रेम तिच्या रूपाकडे पाहतच राहिला.
" खूप सुंदर दिसत आहेस पालवी. " प्रेम म्हणाला.
" थँक्स. " पल्लवी लाजतच म्हणाली.
मग पल्लवी प्रेमच्या बुलेटवर बसली. प्रेमने गाडीला किक मारली. पल्लवीने लाजतच प्रेमच्या खांद्यावर हात ठेवला. सुरुवातीला मंदिरात जाऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. नंतर दोघेही शहरभर फिरले. एकमेकांसोबत सेल्फी काढल्या. फाईव्ह स्टार रेस्टॉरंटमध्ये जेवण केले. शेवटी रात्र खूप झाली होती म्हणून प्रेम पल्लवीला तिच्या घराजवळ घेऊन आला. पल्लवी गाडीवरून उतरली. तेवढ्यात पाऊस सुरू झाला.
" तू घरी जा. मी थांबतो इथे आडोश्याला. " प्रेम म्हणाला.
" अरे नको तूपण घरी चल. " पल्लवी म्हणाली.
पल्लवीच्या हट्टामुळे प्रेम तिच्या घरी गेला. पल्लवीने लगेच बेडरूममध्ये जाऊन प्रेमसाठी टॉवेल आणले.
" तू या टॉवेलने डोके पुसून घे. मी पाणी आणते तुझ्यासाठी. " पल्लवी म्हणाली.
प्रेमने टॉवेलने केस पुसले. कपडेही खूप ओले झाले होते म्हणून त्याने शर्ट काढला. अंग पुसू लागला. तेवढ्यात तिथे पल्लवी आली. प्रेमच्या अंगावर शर्ट नव्हता. पल्लवीची नजर प्रेमच्या बलदंड शरीरयष्टीवर पडली. त्याची भारदस्त केसाळ छाती , पिळदार शरीर पाहून पल्लवी मोहित झाली आणि लाजेने गुलाबी झाली. प्रेमचीही नजर केस ओले झालेल्या पल्लवीवर पडली. तो पल्लवीजवळ आला. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. दोघांनाही कशाचेच भान उरले नाही. प्रेमने पल्लवीच्या नाजूक गोऱ्या गालावर हात ठेवला आणि तिच्या ओठांवर ओठ टेकवले. पल्लवीनेही कसलाच विरोध केला नाही. तीही प्रेमच्या उबदार मिठीत शिरली.
***
थोड्या वेळाने पल्लवी भानावर आली. तिने प्रेमला दूर केले आणि ती एक हुंदका देत तिच्या बेडरूममध्ये गेली. तिने स्वतःला कोंडवले. ती रडू लागली.
" पल्लवी , दार उघड. माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर." प्रेम बेडरूमचे दार वाजवत आवाज देऊ लागला.
" निघून जा इथून. " पल्लवी ओरडली.
प्रेम निघून गेला.
क्रमश...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा