मुळातच मला पर्यटनाची अतिशय हौस. विदेशप्रवास हे तर माझं स्वप्नच ! पासपोर्टही काढून ठेवलेला...पण योग काही येईना !
अचानक एक दिवस आईला तिच्या मैत्रिणीचा फोन आला.. सहज बोलता बोलता म्हणाली, "आम्ही युरोपला चाललोय.. चलतेस का ?" युरोपचं नाव ऐकताच आईला खूणेनं सांगितलं, "मी येते म्हणून सांग!"
त्यांचं सगळं नियोजन तयारच होतं. मी फक्त पैशांची जुळवाजुळव केली आणि एका प्रथितयश ट्रॅव्हल कंपनीत पैसे भरून युरोपवारी निश्चित केली.
आम्ही लंडनसह युरोपातल्या दहा देशांमधील प्रमुख पर्यटनस्थळांना भेटी देणार होतो. त्यामुळे एक यूकेचा आणि एक शेंजेन असे दोन व्हिसा मिळवले. खरेदी आटोपली.. विदेशी चलनही मिळवलं.
माझी पहिलीच परदेशवारी ! सगळंच स्वप्नवत !! सर्व हितचिंतकांनी दिलेल्या शुभेच्छा, आशीर्वाद आणि सूचना यांचा स्वीकार करत मी काटकर काकाकाकू, पिंपळगावकर काकाकाकू आणि कालिंदी मावशी यांच्यासह लंडनला जाण्याकरिता विमानात पहिलं पाऊल ठेवलं.
खरंतर मी पूर्वी विमानाचा प्रवास केलेला.. पण तो देशांतर्गत.. आणि फक्त दीड तासांचा ! इथे मात्र विमानातच आठ-नऊ तास अगदी अवघडून बसायचं होतं.
प्रवासातच मला भयंकर डोकेदुखी आणि मळमळीनं हैराण केलं. लंडन जवळ आलं तसं सहप्रवाशांनी अंगावर गरम कपडे चढवले. मी ही स्वतःला संपूर्णपणे पॅकबंद केलं.
आणि एकदाचं गंगेत घोडं न्हालं ! आम्ही लंडनच्या हिथ्रो विमानतळावरून बाहेर पडलो. माझं डोकं अजूनही ठणकत होतं. त्यात गरम कपड्यांचं ओझं ! मी कंटाळून डोक्याची टोपी काढून टाकली .. अन् लंडनच्या थंडगार हवेनं जादू केली ..! माझं 'चढलेलं' डोकं क्षणात उतरलं !
'लंडन' ह्या शहराचं माझ्या वडिलांना अतिशय आकर्षण. इंग्रजी साहित्याचा त्यांचा गाढा अभ्यास असल्यानं 'लंडन' शहर आणि 'थेम्स' नदीच्या भोवती त्यांचं विश्व अनेकदा रममाण व्हायचं. त्यांच्या हयातीत त्यांच्या लंडनभेटीचा योग काही जुळून आला नाही. मी मात्र लंडनच्या तीन दिवसांच्या मुक्कामात त्यांचं क्षणोक्षणी स्मरण केलं..!
माझ्या पहिल्या परदेशवारीचा पहिला दिवस अन् त्यातही पहिलं प्रेक्षणीय स्थळ .. इंग्लंडच्या राणीचा राजवाडा..!
आमची बस बकिंगहॅम पॅलेसला पोहोचली.. माझा उत्साह आणि उत्सुकता शिगेला पोहोचलेली ! मी फोटोग्राफीत मग्न झाले.. अर्थातच माझ्या ग्रुपमधील मंडळी माझ्या आजूबाजूला आहेत याकडे माझं संपूर्ण लक्ष होतं (?). मनसोक्त फोटो काढले. आजूबाजूला बर्याच पिवळ्या टोप्या वावरत होत्या. पोटभर फोटोग्राफी झाल्यानंतर मी नजर आजूबाजूला वळवली. पिवळ्या टोप्या तर होत्या पण त्याखालचे चेहरे मात्र अनोळखी !
'पाचावर धारण बसणे' ह्या वाक्प्रचाराचा मूर्तिमंत अनुभव मी त्या क्षणी घेतला. आपण कुठून आलोय ? कुठे जायचंय ? काहीच कळेना ..!
तिथल्याच एका स्थानिकाला बाहेर पडण्याचा रस्ता विचारला. कशीबशी पॅलेसच्या बाहेर पडले पण तरीही ग्रुपमधलं कोणीच दिसेना. रस्त्यावर सैरावैरा चालू लागले.
योगायोगाने एके ठिकाणी आमच्याच ट्रॅव्हल कंपनीची दुसरी बस उभी दिसली. 'मराठी' शब्द कानावर पडताच माझ्या जीवात जीव आला. मी त्या टूर मॅनेजरकडे आमच्या ग्रूपची चौकशी केली.
सुदैवानं त्याला माहित होतं. त्याने सांगितलेल्या दिशेने सरळ चालू लागले. एकीकडे सतत टूर मॅनेजर व ग्रुपमधल्या सहप्रवाशांना फोन लावणं सुरुच होतं. पण कोणीच फोन उचलेना. शेवटी एकदाचा फोन उचलला गेला अन् टूर मॅनेजरने मला पुढचा मार्ग सांगितला. तो स्वतः पुढे घ्यायला आला अन् शेवटी आमची स्वारी अनेक सुस्कारे, सूचना आणि टोमण्यांना तोंड देत बस मध्ये चढली.
पुढचा प्रवास मात्र सुरळीत झाला. पॅरीस,बेल्जियम,नेदरलँड करत करत आम्ही स्वित्झर्लंडला पोहोचलो.
मला सर्वात जास्त आवडलं ते स्वित्झर्लंड..खरंच अप्रतिम! शुभ्र बर्फाळ डोंगर 'जय मल्हार'मधल्या कैलासाची आठवण देणारे !
या सहलीचं वैशिष्ट्य म्हणजे एकाच सहलीत जगातील तीन आश्चर्यं आम्ही अनुभवली. पॅरिसचा आयफेल टॉवर, पिसाचा कलता मनोरा आणि रोमचं
कलोझियम !
व्हॅटिकन सिटीची भव्यताही नतमस्तक करणारी !
पंधरा दिवसांची युरोपवारी आता संपत आली होती ..
"रहायला हॉटेलचा मोठा बडेजाव;
चमचमीत पदार्थांवर रोज दोन वेळा ताव !
परी मायभूमीकडे आता मन घेई धाव ;
तरी या टूरचे विस्मरण होणे नाही,
अशी युरोप टूर आता पुन्हा होणे नाही !!"
अशी मनाच्या व्याकूळ अवस्थेत मी आमच्या ग्रूपसह पुन्हा भारतात येऊन पोहोचले..!
© कल्याणी पाठक
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा