मागील भागात आपण पाहिले,सावकाराचा वाडा आणि सावकार यांना संपवून सुंदरा गावाबाहेर पडली. आता लवकर सुरक्षित स्थळी जायचं एवढ एकच लक्ष्य होत.आता पाहूया पुढे.
जवळपास आठ दहा मैल अंतर कापून सगळे थांबले. ही पळापळ आणखी किती वर्षे चालणार. कधी थांबेल हे दुष्टचक्र. सुंदरा विचार करत होती. गाड्या सोडून सगळे शांत झोपी गेले. जवळपास रात्र व्हायला आली. तोवर बकुळामावशीने चूल पेटवली. आता सगळे जागे होऊ लागले. पोरीबाळी अंग मोकळं करून ,हातपाय धुवून बकुळामावशीला मदत करायला आल्या.
सुंदरा स्वतः स्वयंपाक करायला बसली. बकुळामावशी आणि सुंदरा तयारी करू लागल्या.
सुंदरा सहज बोलून गेली,"मावशे पिठलं जरा झणझणीत कर,पाटलांना आवडत तस."
अचानक सुंदरा थांबली. हैबती पाटलांच्या आठवणीने तिच्या डोळ्यातून अश्रू तरळले.
इकडे महादेव आता वयात आला होता. पिळदार आणि बांधीव शरीर. सरळ धारदार नाक,आणि डोळे भोकरावाणी टपोरे. हुबेहूब सुंदरासारखे. हैबतीच्या तालमीत दांडपट्टा, तलवार,भाला सगळं शिकला.
हैबती आता शहाजीराजे भोसले यांच्या फौजेत होता. पण महादेवला भुरळ घातली ती शिवबाराजांनी. तो आता नुकताच शिवबाराजांच्या हेर खात्यात सामील झाला होता. महादेवला खविसखानाला संपवायच होत.
त्याच्या आबा आणि आईला वेगळं करणाऱ्या सैतानाला संपवायच होत. हैबती मात्र सुंदराच्या आठवणीत झुरत असे.
इकडे बकुळामावशी मात्र कळवळून म्हणाली,"सुंदरा,तू परत जा. पाटील तुला घेत्याल परत."
तशी सुंदरा म्हणाली,"मावशे,आख्ख्या गावासमोर अब्रू लुटली त्या हैवनाने, माझ्यामुळ पाटलांना बोल नको."
एवढ्यात भाकऱ्या थापायला बिजली,मोहना,रूपा बसल्या. लसूण आणि मिरच्या वाटल्याचा झणझणीत वास सगळीकडे दरवळू लागला.
रूपा हळूच म्हणाली," मावशे,राधिकाच पुढे काय झालं?" तशी सुंदरा हसली,"तरीच म्हंटल या साळकाया विसरल्या कश्या? सांगते."
मी राधिकेला घेऊन पुढे निघालो. पोरींना मी तयार करायला सुरुवात केली. तलवार,दांडपट्टा, भाला सगळं. सोबत तान्ही रखमा होती. तीलसुद्धा सांभाळत होते. आम्ही दिवसा आराम आणि रात्री प्रवास करत होतो. मजल दरमजल करत जवळपास पंधरा दिवसांनी आम्ही नारायणगावात पोहोचलो. बकुळामावशीने तिच्या जुन्या ओळखीवर एक जागा मिळवली.
आता फड उभा करायला हवा. या पोरींना नाचगाणी शिकवायला पाहिजे. तबलजी,ढोलक्या,तुणतुणे वाजवणारे पाहिजे. सगळी जुळवाजुळव आम्ही सुरू केली. मी माझं नाव सुंदराबाई सातारकर अस ठेवलं.
या नावामुळं मला बुऱ्हाणपूर पुसून टाकता आलं. मालती,पारू,सुमन,राधिका,जना, यमुना सगळ्याजनींना तयार करू लागले.दुसरीकडे त्यांना हत्यार चालवायला शिकवण चालूच होत.सगळ्याजणी माझ्यावर विश्वास ठेवून शिकत होत्या. कुलीन घरातल्या ह्या पोरींवर आज काय वेळ आली.
मला विचार केला तरी वाईट वाटत असे. राधिकाचा आवाज खूप सुंदर होता. जेवढी दिसायला देखणी तेवढीच हत्यारे चालवायला तिखट होती ती.
फड सुरू झाला. हळूहळू हळूहळू खेळ होऊ लागले. प्रवास सुरु झाला. शेवटी आयुष्य म्हणजे नदीच की,नेहमी वाहती असणारी. असेच एका गावात खाजगी बैठकीला बोलावलं. तिथल्या वतनदाराने. मी अस्वस्थ झाले.
तेव्हा मालू मला म्हणाली,"आक्का काय झालं? बैठक ठरल्यापासून तू नाराज आहे."
तस मी तिला म्हणाले,"मालू,या बैठकी नावाला असतात ग. त्या नावाखाली तमाशातली बाई भोगायची."
हे ऐकूनच मालू हादरली. एवढ्यात राधा शांतपणे म्हणाली,"आक्का,तू एवढं शिकवलंय की चारजण सहज मारू शकतो आम्ही. मग खोलीतला एकटा माणूस काय जड आहे का?"
तशी पारू म्हणाली,"खरय आक्का.आता न्हाय सोडायच कुणालापन."
वतनदारांनी राधाला बोलावलं. बैठक सुरू झाली. राधाचा मधाळ आवाज आणि अदा यावर आशुकमाशुक फिदा होऊन दौलतजादा करू लागले. ऐन मध्यरात्री बैठक संपली. वाजवणाऱ्यांना वतनदाराने बाहेर जायला सांगितलं. राधाने इशारा करताच ते बाहेर गेले. वतनदाराने आतून कडी लावली.
वतनदार राधाच्या जवळ आला. त्याने राधाचा हात धरला.
तस राधा गोड हसली,"जरा धीर धरा. थोडं दमान."
तसा तो राधाला जवळ घेत म्हणाला,"आता धीर होत नाही. तुझ्या-माझ्यात आता काहीच नको."
राधा त्याच्या कानात म्हणाली,"मग ही हत्यार करा की बाजूला. टोचतायत मला."
तस हसत त्याने सगळी हत्यारे राधजवळ दिली. राधाने त्याला झुलवत आतल्या दालनात नेलं. तो अगदीच उतावळा झाला. भराभर त्याने स्वतःचे कपडे उतरवले आणि विवस्त्र होऊन त्याने राधाला जवळ ओढले.
राधा सावध होती. तिने त्याला हळूच पलंगावर ढकलले.त्याला म्हणाली,"तुम्हाला आता खुश करते राया."
अस म्हणत राधा त्याचा अंगावर आली. त्याच्या ओठात ओठ दिले. दुसऱ्या हाताने त्याच्या मांडीजवळ स्पर्श केला. वतनदार आता खुळावला. एवढ्यात,सर्रकन खंजीर बाहेर काढला आणि एका झटक्यात त्याचा पुरुषार्थ राधाने कापला आणि तो ओरडायच्या आत गळ्यावरची नस फाडली.
वतनदार कापलेल्या कोंबड्यासारखा तडफडत होता. बाहेरच्या शिपायांना वाटलं आत तो मजा करतोय. दोन तासांनी राधा बाहेर आली. आम्ही तयारच होतो. पहाटेच्या अंधारात आम्ही गायब झालो. एक राक्षस राधाने संपवला.
त्यानंतर आम्ही अक्षरशः धावत नारायणगावात पोहोचलो. इकडे वतनदार मरून पडल्याचं सकाळी माहीत झालं. राधाला त्याने बैठकीला बोलावलं हे फक्त मोजक्या लोकांना माहीत होतं.
शिवाय त्याच्या अत्याचारी स्वभावाने तो मेला याचा आनंदच वाटला सगळ्यांना. बस्स तेव्हापासून माझ्या फडातल्या पोरींवर हात टाकणे म्हणजे मरण हे सगळ्यांना माहीत झालं. एवढ्या नाजूक पोरी बाप्याना मारतात कशा?
मग आम्हीच काळ्या जादूची हुल उठवली. तरी काही लांडग्यांना मोह आवरत नाही. सुंदरा हे सर्व सांगत असताना एक स्वार दुरून येताना दिसला.
मोहना सावध झाली. तेवढ्यात स्वार जवळ आला. त्यानं पाणी मागितलं.
थोड्या वेळाने तो बोलू लागला,"सुंदराबाई,आवो किती शोधलं तुमास्नी. आमच्या गावची यात्रा तुमच्या बिगर व्हत न्हाय,ठाऊक हाय ना."
तशी सुंदरा म्हणाली,"दादा अरे तुमच्या गावाला विसरणं का.गावात आलेल्या तमाशातील बाईची वटी भरणार तुमचं गाव. धोंडिबा पाटलासणी सांग बरोबर यात्रेच्या दिवशी हजर होतो आम्ही."
स्वार म्हणाला,"आक्का, अजून महिना हाये बघ यातरला...पर पाटील म्हणाल आक्काला शोधून आवतन दे."
स्वार निघून गेला. तशी बिजली म्हणाली,"आक्के,ह्या गावात आपल्याला एवढा मान का? आस काय घडलंय?"
तस सुंदरा म्हणाली,"आज संध्याकाळी खेळ झाला की सांगते. याच गावात राधिकाला गमावलं मी."
तेवढ्यात मोहना म्हणाली,"आक्का,निघायची तयारी करूया का?"
तस पारू म्हणालीच,"व्हय आक्के,जरा लवकर जाऊ.म्हंजी पोरींना यात्रेत फिरता येतंय. तेवढाच विरंगुळा."
सगळे निघायच्या तयारीला लागले.एवढ्यात छबु जवळ आला.
सुंदराजवळ घोटाळत तो म्हणाला,"आक्के,पुढं माझं गाव हाये.."
तशी सुंदरा त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली,"व्हय बाळा,तुला नसलं खेळात काम करायचं तर नको करू आज."
तसा तो म्हणाला,"आक्का,मी असा निपजलो, ना धड बापय,ना धड बाई. मला जोगत्या करायचं ठरलं."
आई बाप म्हणाल,"जोगत्या झालास तर घराची इज्जत राहील.दहा वर्षाचा व्हतो. काहीच कळत नव्हतं."
माझं लगीन लावलं.मला लिंब नेसवला. जगन जोगत्याच्या घरी रहायला पाठवलं."
असे म्हणत तो रडू लागला. तेव्हा बिजली म्हणाली,"छबु, तू या फडात कसा आला,त्ये काय आम्हाला माहीत न्हाई का?"
नको वाईट वाटून घिऊ. सगळे भराभर आवरू लागले.गाड्या जुंपल्याया.
गाड्या चालू लागल्या.तशी सगुणा गाऊ लागली.
वार वहात ग न्ह्यार
माझ्या परसात.
सांग निरोप बयाचा,
जप माह्यार काळजात.
वार वहात न्ह्यार मामांजीच्या वाड्यावर,
वाट बघून शिणले,
पंथ गेलं देशावर.
माझ्या परसात.
सांग निरोप बयाचा,
जप माह्यार काळजात.
वार वहात न्ह्यार मामांजीच्या वाड्यावर,
वाट बघून शिणले,
पंथ गेलं देशावर.
संसारी बाईच जे सुख कधीच अनुभवता येणार नाही ते सगुणा ओव्या गाऊन सांगत होती. ते पाहताच सुंदराचे मन पाखरू होऊन उडालं आणि हैबती पाटलांच्या मळ्यात कधीच जाऊन पोहोचलं.
हैबतीबरोबर शेतात काम करताना सुंदरा अश्या ओव्या म्हणू लागली की गावातल्या आयाबाया तीच किती कौतुक करायच्या. ते साखरी दिवस सुंदराच्या डोळ्यातून अलगद अश्रू बनून वाहू लागले.
एवढ्यात सगुणा गायची थांबली आणि सुंदरा भानावर आली. ती लगेच म्हणाली,"सगुणा,का थांबलीस ग?"
तस ती हसली,"आक्के अग गाव दिसू लागलं की. ते बघ तिकडे कळस दिसतोय देवीच्या देवळाचा."
तसे सर्वांनी भक्तिभावाने हात जोडले. गावाबाहेर मैदानात गाड्या थांबल्या. बैल मोकळे झाले. तंबू उभारायची गडबड सुरू झाली. बकुळामावशी चूल मांडायला जागा शोधू लागली. छबु मात्र भरल्या डोळ्यांनी देवीचा कळस पहात होता. सगळं धूसर दिसत होतं.
छबु कसा पोहोचला या फडात? राधिक गेली त्या गावात सुंदराला एवढा मान का?
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा