Login

मी मानिनी ! मी मर्दिनी ! भाग 28

आज एक नव्या कामगिरीवर जाणार सुंदरा.



(सदर कथानक इतिहासाच्या पार्श्वभूमीवर असले तरी कोणत्याही ऐतिहासिक सत्याचा दावा करत नाही. सदर कथा पूर्णपणे काल्पनिक आहे)

मागील भागात आपण पाहिले हत्यारे ताब्यात घेतली.धान्याच्या पोत्यात हत्यारे लपवून आता पुढील प्रवासाला सुरुवात झाली.या मोहिमेत पुढे काय होणार?चला पाहूया.


संध्याकाळी मुक्कामाच्या ठिकाणी सगळे पोहोचले.मोहना आज आनंदात होती.स्वराज्याची सेवा करायची संधी मिळाल्याने आयुष्य सार्थकी लागले असे तिचे मन सांगत होते.

तेवढ्यात सुंदराने तिला विचारले,"काम झाले का?"

मोहनाने सांगितले,"हो काम झाले आहे.हत्यारे मिळाली.आता नाईकांनी सांगावा दिला की पुढचे ठरवू."


सुंदरा म्हणाली,"मोहना,तुळसा कशी वाटली तुला?तिला तलवार आणि शस्त्र चालवायला शिकवायचे का?"


मोहनाने थोडे थांबून बोलायला सुरुवात केली,"आक्का,आता कोणावर विश्वास ठेवता येणार नाही.आपण तिला शिकवू पण लगेच आपल्या कामगिरीत सामील करायला नको."


तेवढ्यात रूपा आली,"आक्का ,पुढच्या गावी खेळ हाये.तिथली काही मंडळी भेटायला आली हायेत."

रुपाला पुढे व्हायला सांगून सुंदराने आवरायला घेतले.


"सुंदराबाई रामराम,म्या चिमणाजी देशमुख.आमच्या गावाला उद्या तुमचा खेळ हाये."


सुंदरा मधाळ स्वरात बोलली,"व्हय,उद्या तुमाला खुश करू की पावन."


तसा तो हसला,"आव खेळात खुश कराल ते गावाला.आमची खुशी वाड्याव."

सुंदराने संयमाने विचारलं,"काय हुकूम आसल तर सांगा सरकार."

त्याबरोबर त्याच्या बरोबर आलेला एकजण म्हणाला,"तुमच्या दोन पोरी पाठवा खाजगी बैठकीला आन सोबत नाच्या पण पायजे."

सुंदराने मान डोलावली.बैठकीचा विडा घेतला आणि त्यांना वाटेला लावले.



तो गेल्यावर मोहना म्हणाली,"इथेच मुंडके मारावे असे वाटत होते.याला आयाबहिणी नाहीत का?"


सुंदराने तिला शांत केले,"आपला खेळ झाल्यावर खाजगी बैठक करावीच लागते.त्याच्या गावात गेल्यावर माहिती काढू."


तेवढ्यात बकुळामावशीने सर्वांना जेवायला आवाज दिला.पहिला घास घेतल्यावर मोहना म्हणाली,"आज कालवण कुणी केलं मावशे?चव लई बेस आली हाये."


बकुळामावशी म्हणाली,"तुळसाने केलं हाये आज."


मोहनाने तिला विचारलं,"एवढं छान जेवण बनवायला कुठं शिकलीस?"


तुळसा म्हणाली,"चित्रामायने शिकीवल,तिला बिचारीला लई आवड होती,सैपकाची,संसाराची.पर मुरळीला संसार नसतोय."


एवढे बोलून तुळसा गप्प झाली.मोहनाने तिला समजावले,"जितका वेळ तिने तुला आईची माया दिली त्या गोड आठवणी लक्षात ठेव.तुझ्या हाताला आलेली चव म्हणजे तीच तुझ्यासोबत असणं आहे."


तुळसा डोळ्यातलं पाणी पुसत म्हणाली,"त्या आईने जगायचे शिकवले आता ही आई लढायला शिकवील."


सुंदराने मायेने तुळसाला जवळ घेतले.सगळेजण जेवत असताना सुंदरा वेगळ्याच विचारात होती.उद्या त्या चिमणाजी देशमुखाचे काय करायचे?त्याचा बंदोबस्त कसा करायचा?ह्याच विचारात ती कसेतरी जेवत होती.


ते पाहून मोहना तिच्याजवळ गेली,"आक्का,याच्याआधी सुद्धा आपण अशा लोकांचा सामना केलाय.तू नको काळजी करुस."


जेवणखाने उरकून सगळे शांतपणे झोपले होते.अचानक मांजराचा आवाज आला.त्यासरशी मोहना आणि सुंदरा सावध झाल्या.मांजर वस्तीतून दूर जात नाही.कोणीतरी आसपास आहे.हे जाणून त्या सावध झाल्या.


मोहनाने खंजीर हातात घेतला.दोघीजणी सावध होऊन आवाजाच्या दिशेने चालू लागल्या.अचानक झाडाच्या मागे हालचाल जाणवली.सुंदराने मोहनाला ईशारा केला.दोघींनी दोन बाजूनी झडप घातली.तिथे कोणीच नव्हते.


त्या मागे फिरणार एवढ्यात झाडावरून दोन जणांनी दोघींच्या गळ्याला खंजीर लावला,"ह्यो हाये दुसरा धडा.सगळी ताकद लगीच वापरायची न्हाई."


मोहनाने हळूच हाक दिली,"नाईक!"


तस तो हसला,"नाईक न्हाई,पण नाईकांचे डोळे हाये आम्ही दोघे.आता नीट ऐका."असे म्हणून त्याने पुढची योजना दोघींनाही समजावून सांगितली.


4सुंदराने आता मनाची पूर्ण तयारी केली.आता प्रत्यक्ष बहिर्जी नाईक प्रत्येक पावलावर बरोबर असणार होते.त्यामुळे सुंदराला काळजी वाटत नव्हती.दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर गाड्या निघाल्या.सूर्योदयाच्या वेळीच यात्रेच्या गावात प्रवेशच केला.ह्या गावात आई भवानीचे ठाणे होते.अत्यंत जागृत देवस्थान अशी ख्याती होती सगळीकडे.



एकेकाळी विस्तीर्ण परिसरात उभे असलेले वैभवशाली मंदिर आज मात्र मोडकळीस आलेले.रया गेलेल्या अवस्थेत होते.सुंदराच्या मनात विचार आला ही मंदिरेही माझ्या आयुष्यासारखी आहेत.वैभवाची किनार लाभलेली आणि भग्नावस्थेत खितपत पडलेली.

सुंदरा विचारांच्या तंद्रीत असताना छबु ओरडला,"आक्का,आग मुक्कामाच्या ठिकाणी पोचलोय आपुन."


नेहमी तमाशाच्या फडाला उतरायला गावाबाहेर जागा दिली जात असे.तिथे उतरल्यावर सगळी मांडामांड झाली.

सुंदराने सखाराम,गणपा आणि मोहनाला बोलावले,"ह्या जत्रेत घोड्यांचा बाजार भरतो.नव्या दमाची घोडी खरेदी करा."

मोहना म्हणाली,"आक्का,इथून दोन घोडे घेऊ.जास्त खरेदी केली तर शंका येईल."


सुंदरा हसली,"हो,आणि संध्याकाळी मिळतीलच की काही घोडी."


तेवढ्यात बजाकाका हाक मारत म्हणाला,"सुंदरा,दर्शनाला जायच नाही का?आवरा लवकर.देवीची वटी भरायची आहे.
मोहना आणि सुंदरा दर्शनाची तयारी करायला गेल्या.



सगळेजण दर्शनाला निघाले.खेळ ज्या गावी असेल तिथल्या ग्रामदैवताचे दर्शन घेऊन आणि आशिर्वाद घेऊन कार्याला सुरुवात करायची.असा सुंदराचा नियम होता.


दर्शन घेताना मोहनाच्या मनात धोंडीबाचा विचार आला,"आई,त्यांना मी निवडले आहे.माझ नात टिकेल का माहीत नाही.पण त्यांच्या आयुष्याची दोरी बळकट असू दे आई."


दर्शन घेऊन सगळे बाहेर आले.सहज बाजारात फेरफटका मारत असताना अनेक माहेरवाशीण पोरीबाळी दिसत होत्या.त्या सगळ्यांनी पदर मात्र चेहरा झाकेल असा घेतला होता.

मोहना पुढे एका घराजवळ थांबली,"माय,वाटसरूला पाणी मिळलं का?"

तशी एक म्हातारी आतून म्हणाली,"पोरी,ओसरीवर थांब.देते पाणी.दुसरं काय न्हाई बघ आता."


एवढे बोलेपर्यंत म्हातारी गार पाण्याची घागर घेऊन आली.पाणी घेताना सुंदरा म्हणाली,"आजी,आज यात्रा हाये,आन ..."


म्हातारी हसली,"घरात काहीच न्हाई, निवद पण नाही.असच नव्ह?"

मोहना म्हणाली,"तस न्हाई आजे, पण?"


म्हातारी म्हणाली,"ह्या पोरी पाघितल्या?त्या एवढा पदोर वडून चालत्यात.का?तर त्या राक्षसांची नजर पडायला नग."


बजाकाका घाबरला,"कोण?आजी इथं काय धोका हाये का?"


म्हातारी म्हणाली,"त्यो चिमणाजी देशमुख,वंगाळ नजरचा. चांगल्या पोरीबाळी भोगायच्या आन त्या मुडद्या मुबरकखानला इकायच्या. म्हणून म्या देवी आई संग भांडले. जवर ह्यो राकीस मरत न्हाय,तुला गोड निवद न्हाय."


सुंदरा पुढे झाली.म्हातारीचे हात हातात घेत निर्धाराने म्हणाली,"आजे, तुला लवकरच पूरणा वरणाचा सैंपाक करायला लागल.माझं मन सांगतंय."


म्हातारीने मायेने सुंदराच्या तोंडावर हात फिरवला,"पोरी,तुझ्या तोंडातून आई स्वत बोलली आसल.माझं मागण पूर व्हवू दे."सुंदरा म्हातारीचा निरोप घेऊन उठली.


दर्शन घेऊन सगळे परत आले.तिथे पालखी उभी होती. मोहनाने क्षणात ओळखले.


सुंदरा पुढे झाली,"रामराम देशमुख सरकार. आज तुमच्या गावात सेवा करतोय."


देशमुख हसला,"गावची सेवा आम्हाला काय कामाची.आम्हाला खुश करा."



हे बोलताना मांडी चोळत करत असलेले हावभाव पाहून मोहना चिडली होती.सुंदरा मात्र शांतपणे म्हणाली,"सरकार,सेवा करू.पण ह्यावेळी आम्हाला करू द्या पाहुणचार.खास शामियाना उभारतो तुमच्याकरिता."


चिमणाजी हसला,"हा,तसही वाड्यात तेच तेच.त्यापेक्षा काहीतरी नवे करू."सुंदराने चिमणाजीला वाटेला लावले.


सुंदरा वळली,"मोहना,तू आणि सखाराम घोडे खरेदीला जा.आज रात्री मी स्वतः याची खातीरदारी करते."


मोहना हसली,"आक्का,म्हणजे आजच आजीचा नवस पुरा करणार तर तू."


सखाराम आणि मोहना बाहेर पडले. बाजारात आल्यावर उमदी जनावरे पाहून मोहना खुश झाली.एका व्यापाऱ्याजवळ असलेली दोन घोडी तिच्या मनात भरली.सखरामला तिने इशारा केला.


सखाराम म्हणला,"पावन,घोड ईकायला हाय जणू?"


तो हसला,"हा मिया.ये दोनो घोडे विकायचे हायेत.उमदे जनावर हाये.लढाईत सुद्धा चाललं."


मोहना म्हणाली,"पर चाचा आमाला एकच पायजे आसल तर?"


चाचा हसला,"हे दोघे जोडीदार हाये.सुटे नाय विकणार."

मोहनाने दोन्ही घोडे विकत घेतले.


संध्याकाळी तमाशाच्या फडात चांगली रंगत भरली.मध्यरात्री खाजगी बैठक होणार होती.सुंदरा खास तयार झाली होती.काळी चंद्रकळा, ठुशी,बिल्वर,कपाळावर चंद्रकोर आणि नजरेत अदा. पण हे सगळं दाखवायला.


प्रत्यक्षात कमरेला दांडपट्टा, खंजीर आणि चाकु लपवून सुंदरा तयार होती.राक्षसाच्या नरडीचा घोट घ्यायला.कारण त्यावरच बहिर्जी नाईकांनी सोपवलेली पुढची कामगिरी अवलंबून होती.


काय असेल ती कामगिरी? सुंदरा चिमणजीला कसे संपवेल?
वाचत रहा.मी मानिनी....

क्रमशः
0

🎭 Series Post

View all