Login

मी मानिनी ! मी मर्दिनी ! भाग 29

सुंदरा आणि मोहनाने पहिली कामगिरी फत्ते केली.



(सदर कथानक इतिहासाच्या पार्श्वभूमीवर असले तरी कोणत्याही ऐतिहासिक सत्याचा दावा करत नाही. सदर कथा पूर्णपणे काल्पनिक आहे)


मागील भागात सुंदराने चिमणजीला खाजगी बैठकीला फडावर बोलावले.त्याचवेळी तमाशाच्या खेळात रंग भरत होते.आता चिमणाजीचे पुढे काय होईल?


सुंदराने आपले सगळे कसब पणाला लावले.नृत्य,सौंदर्य आणि मद्य यांचा अंमल चढू लागला.सुंदराने जाळे विणायला सुरुवात केली.शामियाना चारी बाजूनी चिमणाजीच्या माणसांनी वेढलेला होता.

सुंदराने मद्य समोर ठेवत म्हंटले,"घ्या सरकार,आजची रात्र रंगीन होऊ द्या.नृत्य आणि अदा यांनी प्रेमाची बरसात होऊ द्या."

चिमणाजीने तिला जवळ ओढले,"फक्त लांबून नाही चालायचं."

सुंदराने हळूच स्वतःला सोडवले आणि म्हणाली,"इशकाचा खेळ आता कुठे सुरू झाला.जरा रंग चढू द्या खेळाला."

चिमणाजीने मिशीला पीळ दिला.सुंदराने ईशारा करताच ढोलकीची थाप कडाडली.घुंगरू बोलू लागले आणि सुंदराच्या अदानी वातावरण पूर्ण बदलून गेले.


इकडे बाहेर चिमणाजीने पेरलेली माणसे सजग होती.डोळ्यात तेल घालून पहारा करत होती.

तेवढ्याय छबु जवळ आला. त्यातल्या एकाला म्हणाला,"आवो,आस किती येळ हुभ राहणार?आन तसबी हित काय धोका असणार हाये.तवा म्या काय सांगते.."


छबुने लाडीकपणे जवळ जात त्याला समजावले.तस तो गडी पाघळला.छबुकडे पहात तो लाडिक हसला,"मंग आमची काय सेवा हाये का न्हाई?"


तसे छबु हसत म्हणाला,"तुमी फक्त हुकूम करा सरकार.काय सेवा पायजे?"

तो मांडीवर थाप मारत म्हणाला,"जराशी दारू आन...."

छबु हसत डोळा मारत म्हणाला,"सगळं मिळलं ,जरा दम धरा सरकार."


छबुने लगेच गणपा आणि सखारामला ईशारा केला.त्यासरशी मद्याचे प्याले आले.मद्याचा कैफ चढू लागला.



इकडे सुंदराचे सौंदर्य, नृत्य आणि मद्याने अंमल सुरू झाला.रात्रीचा तिसरा प्रहर सुरू झाला.इतक्यात कोल्हा ओरडल्याचा आवाज आला.इतक्यात बेसावध पहारेकरी एकेक करून गायब होऊ लागले.छबुने त्याचे काम अचूक केले होते.

इकडे चिमणाजीच्या डोळ्यांसमोर चार चार सुंदरा नाचू लागल्या.त्याक्षणी सुंदराने इशारा केला. चारही बाजुंनी चार जण आत घुसले.काही कळायच्या आतच चिमणाजी बांधला गेला.मुसक्या आवळल्या गेल्या.पोत्यात चिमणाजीचे गाठोळे आवळून घोड्यावर टाकले आणि काही कळायच्या आतच चिमणाजी नाहीसा झाला.अगदी हवेत गायब व्हावा तसा.


पहाट फटफटू लागली.सूर्य वर चढू लागला.इकडे गावात गडबड उडाली.चिमणाजी देशमुख रात्रीत गायब झाल्याची बातमी सगळ्या गावात पसरली होती.चिमणाजीला कोणीही वारसदार नव्हता.लग्नाच्या बायका टिकल्या नव्हत्या.त्यामुळे आता काय?



इकडे गावातली पंच मंडळी जमली.सुंदराला आणि फडावरील माणसांना बोलावण्यात आले.पाटील म्हणाले,"सुंदराबाई,चिमणाजी कुठेय?"


सुंदरा ठामपणे म्हणाली,"कोण चिमणाजी? माझा काय संबंध?"


तेव्हा चिमणजीचा माणूस म्हणाला,"काय बोलता बाई?आवो काल बैठकीला देशमुख आलत."


सुंदरा हनुवटीवर हात ठेवून म्हणाली,"बाई ग,बैठक वाड्यावर होत असती.माझ्याकडं कुठेय वाडा?"

असे म्हणून सुंदरा हसू लागली.चिमणजीला बोलावले तो शामियाना गायब होता.बैठक झाल्याचा काहीच पुरावा उरला नव्हता.


आता देशमुख गढीचा वारसदार कोण?हा प्रश्न होता.तेवढ्यात वाड्याच्या आतील दालनातून एक सुंदर युवती बाहेर आली.ती दुसरी तिसरी कोणी नसून बिजली होती.तिच्याबरोबर एक राजबिंडा तरुण होता.


तेवढ्यात बिजली म्हणाली,"आवो रुपाजी देशमुख.रात्री तुमचा मामा भेटला आन आज आख्ख्या गावाला बोलावलं काय त्यानं?"


तशी पंच मंडळी चिडली,"ये बाई कोण तू? इथं वाड्यावर काय करतीय?"


तसा तो तरुण पुढे झाला,"म्या रुपाजी शिर्के.चिमणाजी मामाच्या बहिणीचा पोरग."असे म्हणून रूपाजीने एक कागद हातात ठेवला.


स्वतः चिमणाजी देशामुखाने शिक्का आणि सही करून दिलेला कागद होता.त्यात रुपाजी त्याचा वारसदार असून त्याच्या जिवाच काही बरे वाईट झाले तर रुपाजीने सगळे सांभाळावे असा उल्लेख होता.

पाटील आता काहीच बोलू शकत नव्हते.इकडे सुंदरा आणि मोहना खुश होत्या.नाईकांनी सोपवलेली मोहिनी फत्ते झाली होती.देशमुख गढी जावळीच्या वाटेवर अगदी मोक्याच्या ठिकाणी होती.तिथून रसद पोहोचवणे,कुमक पुरवणे सहज शक्य होते.आता मात्र मोहिमेला बळ मिळणार होते.सुंदरा आणि तिच्या माणसांनी अगदी चोख काम केले होते.


सगळेजण मुक्कामाच्या जागी आले.एक छोटा मुलगा पळत आला.सुंदराला हाक मारत म्हणाला,"मावशे,ये लाल लुगड्यावाले मावशे."


सुंदरा मागे वळली.त्या पोराने पळत येऊन सुंदराच्या हातात एक थैली दिली.सुंदराने थैली उघडली.आत बेलभंडारा आणि खलिता होता.सुंदरा हसली.नाईकांनी पुढील मार्गदर्शन पाठवले होते.इकडे सुंदरा आणि मोहनाने परत दर्शनाला जायचे ठरवले.


मोहना म्हणाली,"आक्का,पहिली कामगिरी फत्ते झाली.देवीची ओटी भरायची आहे."

सुंदरा म्हणाली,"अगदी माझ्या मनातलं बोललीस बघ."

सगळेजण दर्शनाला आले.ओटी भरताना सुंदरा म्हणाली,"आई,एक राक्षस अजून मारायचा आहे.तो तेवढा सापडू दे."

सगळे देवळाबाहेर आले.तेवढ्यात एक आवाज आला,"ये पोरी,आग हिकडं बघ."


मोहनाने पाहिले तर कालची म्हातारी होती.म्हातारी धावत मोहनजवळ आली,"आग काल तुझ्यारूपान आईच यिवून बोलली बघ.चल पूरणा वरणाचा सैंपाक केलाय म्हातारीने गॉड मानून घे."


कितीतरी दिवसानी म्हातारी गोडधोड वाढत होती आणि सगळेजण आनंदाने जेवत होते.


म्हातारीने प्रेमाने खाऊ घातलेली पुरणपोळी खाऊन सगळेजण परत आले.आता पुढच्या मुक्कामी जायचे होते पण बिजलीला इथेच सोडून जायचे होते.सुंदरा आणि मोहना तिला भेटायला वाड्यावर गेल्या.


सुंदराने बिजलीला जवळ घेतले,"जपून रहा पोरी.स्वतःला जप.ही मोहीम संपल्यावर भेटूच."


बिजली म्हणाली,"आक्का,माझी काळजी करू नको. तू मात्र स्वतःला जप."


तेवढ्यात बिजलीबरोबर थांबलेला नाईकांचा माणूस पुढे झाला,"आक्का,म्या मावळातल्या एका गावातला हाये.शिवबा राजांची आणि आऊसाहेबांची शपथ ह्यांना सुरक्षित तुमच्या हवाली करील."


सुंदराने त्या तरुणाकडे पाहिले,"राजांचा शिलेदार आहेस.तेवढा विश्वास ठेवते. दिलेली कामगिरी फत्ते करा."


तरीही मोहनाने खबरदारी म्हणून मालूला बिजलीच्या सोबत ठेवले.

सुंदराला आज हैबती पाटलांची खुप आठवण येत होती.आज आपण केलेले काम पाहून त्यांना नक्कीच अभिमान वाटला असता.


सुंदराचे भरून आलेले डोळे बकुळामावशीने पाहिले,"बाय माझी,रडू नकोस.आई भवानी नक्कीच सगळे ठीक करल."


रात्री सगळेजण जेवायला बसले.आज बिजली स्वतः सगळ्यांना वाढत होती.तिचे डोळे भरून येत होते.बाजारात विकलेल्या चौदा वर्षाच्या ह्या पोरीला सुंदराने सोडवले होते.आईसारखी माया लावली होती.त्यामुळे सुंदरपासून दूर जायचे ह्या कल्पनेने तिचे मन दुःखी होत होते.सगळ्यांची जेवणे आटोपली.सुंदरा आणि मोहना दोघीही आज खूप आनंदात होत्या.उद्या काय होईल ते अज्ञात असले तरी आजचा दिवस त्यांचा होता.



दुसऱ्या दिवशी पक्ष्यांच्या किलबिलाटाने सर्वांना जाग आली.तेवढ्यात लांबून एक म्हातारी येताना दिसली.डोक्यावर दुधाची घागर होती.


सुंदराने पळत जाऊन घागर उतरवली,"आजी काल जेवलो की पोटभर."


तशी म्हातारी डोळे पुसत म्हणाली,"त्या राक्षसांनी माझा लेक,सून आणि नातीला मारलं.आज त्याला संपवलं तुम्ही.माझ्या नातीवाणी हायस.म्हणून ह्ये दूध घिऊन आले बघ."


सुंदराने म्हातारीचे हात हातात घेतले,"माझी लेक,बिजलीला हिथ ठिवून जातेय.काळजी घे तिची."


म्हातारी सुंदराच्या चेहऱ्यावर हात फिरवून म्हणाली,"म्या हाये ना खमकी.काळजी नको करू. बिनघोर रहा."


बिजलीला सोडून मोहनाचा सुद्धा पाय निघत नव्हता.पण आता गाव सोडून पुढच्या खेळाला जायला गाड्या तयार होत्या.


मोहनाने सुंदराला विचारले,"आक्का,दुपारी त्या पोराने थैली दिली.काय सांगावा आहे?"


सुंदरा म्हणाली,"नीट ऐक पुढच्या मुक्कामात आपल्याला नाईकांच्या माणसांना हत्यारे द्यायची आहेत.नाईकांनी सावध रहायला सांगितले आहे."


मोहना म्हणाली,"बरोबर आहे.चिमणाजी गायब झाला असला तरी त्याची माणसे गप्प बसणार नाहीत.आपला पाठलाग होऊ शकतो."


इतक्यात मोहनाला काहीतरी आठवले,"आक्का, तुला तुझ्या मुलगा भेटावा म्हणून नवस केला आहे मी.हा बघ देवीचा अंगारा.पुढचे सोळा मंगळवार उपवास धरणार आहे."


सुंदरा म्हणाली,"नको पोरी,ते जग आता आपलं नाही.तिथे आपलं कोणीच नाही."


सुंदरा असे म्हणत असली तरी आतून तिलाही एकदातरी महादेव आणि हैबती पाटलांना निदान एकदा लांबून पहायला मिळावे असे नेहमी वाटत असे.फक्त ती कधी मनातले ओठावर येऊ द्यायची नाही.आपल्या काळजातली माया ह्या पोरींवर उधळत असे.आता त्यात आणखी एक भागीदार झाला होता.सुंदराने वाचवलेला मोत्या. सुंदराला विचारांच्या तंद्रीत आणि गाडीच्या लयीत आपसूक झोप लागली.गाडी पुढे चालत होती.अज्ञात प्रवासाच्या दिशेने.

पुढची कामगिरी फत्ते होईल का? मोहनाचा नवस पुरा होईल का?