(सदर कथानक इतिहासाच्या पार्श्वभूमीवर असले तरी कोणत्याही ऐतिहासिक सत्याचा दावा करत नाही. सदर कथा पूर्णपणे काल्पनिक आहे)
मागील भागात आपण पाहिले की चिमणाजीला गायब करून त्याच्या गढीचा ताबा घेण्याची बहिर्जी नाईकांनी आखलेली योजना यशस्वी झाली.आता लवकरच मोऱ्यांच्या जावळीच्या हद्दीत प्रवेश होणार होता.पाहूया ह्या प्रवासात सुंदराचे आयुष्य कसे बदलते.
गाड्या मंद लयीत चालत होत्या.सकाळच्या कोवळ्या उन्हात पावलं झपाट्याने उचलत होती.थोड्या वेळाने एक सुंदर वाहणारा ओढा पाहून सखारामने थांबायचा ईशारा केला.सगळेजण खाली उतरले.
तेवढ्यात मोहनाने तुळसाला हाक मारली,"तुळसा, हिकडं ये."
तुळसा जवळ येताच मोहनाने तिच्या हातात ढाल तलवार ठेवली ,"चल आज पहिला धडा शिकू,तलवारीच्या वारापासून बचाव कसा करायचा."
तुळसाने ढाल उचलली.तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली.तेवढ्यात मोत्या कुत्रा भुंकू लागला.तुळसाने पाहिलं आणि जोरात ओरडत मोहनाला मागे खेचले.त्याक्षणी एक सळसळत चैतन्य सरपटत झाडीत गेले.
तुळसाच्या अंगातून घामाचा धारा वहात होत्या,"नाग दिसला नाय का तुला?"
मोहनाने तिला शांत केले,"मला काय झालं न्हाय तुळसा. तसबी मरण कुणाला चुकलंय व्हय?"
तुळसा काही बोलणार एवढ्यात एक म्हातारा जाताना दिसला.मोहनाला सारखे त्याला पाहिले असे वाटत होते.पण तुळसाला शिकवायचे असल्याने तिने तो विचार झटकून टाकला.
इकडे सखाराम आणि सुंदरा दोघे सर्वांना सूचना देत होते.तेवढ्यात बकुळामावशी म्हणाली,"सुंदरा,ह्या इथंच आपण जेवण बनवू ."
इतक्यात लांबून घोड्याच्या टापांचा आवाज येऊ लागला. सुंदरा सावध झाली.सर्वांना ईशारा देताच सर्व सावध झाले.समोरून पंधरा वीस सैनिकांची तुकडी आली.त्यांचा म्होरक्या पुढे झाला.
सुंदराकडे पाहून म्हणाला,"आक्का, आम्ही दोन दिस झालं उपाशी हाये.आमाला जेवायला भेटलं का?"
सुंदरा म्हणाली,"भाऊ,तलवार दाखवून काहीपण मिळवू शकताय तुम्ही."
तस तो हसत म्हणाला,"आक्का,आमी महाराजांची माणस, आम्ही अस वागलो तर रयत इश्वास ठिविल का स्वराज्यावर?"
तशी बकुळामावशी पुढं झाली,"पोरानो थोडा दम धरा आता सैपाक करते."
सुंदरा आणि बकुळामावशी दोघींनी जेवणाची तयारी केली.इतक्यात त्या म्होरक्याला मोहना आणि तुळसा सराव करताना दिसल्या.
तो हसत त्याच्या बरोबरच्या तरुणाला म्हणाला,"पायल का दिपाजी?असल्या वाघिणी असल्यावर काय बिशाद कोणाची?"
भरपेट जेवल्यावर जाताना तो सुंदराला म्हणाला,"आक्का, म्या ज्योत्याजी पाटील. कधिबी मदत लागली तर हाक मार."
सुंदरा म्हणाली,"महाराजांचे शिलेदार आज आमच्या इथे जेवले.स्वराज्याच्या कामात आमची खारीची मदत."
ज्योत्याजीने मोहनाला जवळ बोलावले,"पोरी आक्षी बिजलीवाणी तलवार चालवतीस."
असे म्हणून ज्योत्याजीने मोहनाला खंजीर भेट दिला.सगळे घोडेस्वार निघून गेले.दुपारची उन्हे उताराला लागली.सगळेजण पुढच्या प्रवासाला तयार झाले.आज जावळीच्या हद्दीच्या अलीकडे असणाऱ्या गावात मुक्काम होता.तिथे हत्यारे पोचवायची होती.
सुंदराने गणपा,छबु आणि सखाराम तिघांना बोलावले,"उद्याची कामगिरी अवघड आहे.आपल्याला खेळ चालू असतानाच हत्यारे पोहोच करावी लागतील."
सखाराम म्हणाला,"खरय आक्का.आता मोऱ्यांच्या हद्दीच्या जवळ आलो आपण.सावध रहायला पाहिजे."
आजच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचेपर्यंत सूर्य मावळला होता.मोहनाने तुळसाला आणि रुपाला बोलावले,"आज आपुन जेवायला कायतरी झणझणीत करू."
रूपा म्हणाली,"व्हय,एखादं कोंबड मिळतंय का बघू गावात."
खरतर हे निमित्त होत.त्याच्या आडून हत्यार पोहोचवायच्या जागा हेरायच्या होत्या.गाव फिरून पहायचे होते.मोहना,रूपा आणि सखाराम निघाले.गावाच्या जरा बाहेरच्या बाजूने फिरू असे ठरले.वेशीच्या थोडे बाहेरच एक लोहाराचे पाल दिसले.त्यानंतर वेशीच्या आत सगळे गेल्यावर थोडं बाहेरून एका घराजवळ कोंबड्या दिसल्या.
मोहनाने हाक मारली,"कुणी हाय का ?"
तशी एक म्हातारी बाहेर आली,"काय पायजे? कोण हाये?"
रूपा म्हणाली,"आजी तमासगीर हाये आमी,तिकडं माळावर उतरलोय,वाईच कोंबडा हवाय कालवण बनवायला."
मोहना आणि रूपा म्हातारीशी बोलत असताना सखारामने नाईकांनी सांगितलेल्या खाणाखुणा पाहून ठेवल्या.कसबस आजीला पटवून कोंबडा विकत घेतला.
तिघे परत आले.कोंबडा कापून शिजायला टाकला.बकुळामावशी आणि सुंदरा बाकीची तयारी करत होत्या.तितक्यात कुठूनतरी शेळीचा आवाज आला.
बकुळामावशी म्हणाली,"कोणाची शेळी चुकली काय माहित?"
बजाकाका पहायला निघाले.तेवढयात मोहनाने त्यांना थांबवले,"अंधारात तुम्हाला नीट दिसायचं न्हाई,सखाराम आणि मी जाते."
सखाराम आणि मोहना कंदिलाच्या उजेडात आवाजाच्या दिशेने निघाले.लांब एका झाडामागून आवाज येत होता.सुंदरा सावध होती.तेवढ्यात झाडामागून एक माणूस आला.त्याने खुणेचा शब्द सांगितला.
मोहनाने खात्री केल्यावर तो बोलू लागला,"उद्याच्या जत्रेत आपली पन्नास माणसं हायेत,प्रत्येकाला हत्यार पोचवायची. खुणेचा शब्द आसल,\"वाघ आला\".तुम्ही नीट तयारीत रहा."
एवढे बोलून तो आला तसा अंधारात गायब झाला.
रात्री सगळे झोपल्यावर सुंदराने रूपा,मोहना,छबु,सखाराम,गणपा यांना बोलावले.उद्याची कामगिरी महत्वाची होती.
सुंदरा बोलू लागली,"रूपा आणि मोहना तुम्ही उद्याच्या खेळात नाचायच नाही."
मोहना हसली,"आक्का,म्हणजे तुळसा तयार झाली तर."
सुंदरा पुढे बोलू लागली,"तुम्ही पाच जणांनी प्रत्येकी दहा जणांना हत्यारे पोहोच करा.जत्रेत वेगवेगळी सोंग घ्या.फक्त प्रत्येकाच्या दंडाला भगवे कापड बांधा."
सगळ्या सूचना देऊन झाल्यावर आपपल्या जागेवर येऊन झोपले सगळे.
दुसऱ्या दिवशी छबु खेळणी विकायची टोपली घेऊन गेला.मोहनाने केळी घेतली.रूपा देवळाबाहेर फुल घेऊन बसली.गणपा आणि सखाराम मिठाई घेऊन जत्रेत बसले.
इकडे सुंदराने तुळसाला तयार केले,"तुळसा, तू तयार आहेस ना?"
तुळसाने तिच्या हातावर हात दाबत ती तयार असल्याचे सांगितले. इकडे जत्रेत सगळे आपापल्या जागा धरून बसले.जत्रा ऐन रंगात आली होती. खेळण्यांची दुकाने,प्रसादाची दुकाने,माकडवाले,अस्वलवाले, बत्ताशे,शेव रेवडी विकणारे.रंगीबेरंगी लुगड्यांची दुकाने.
हळूहळू एकेक हत्यार घेऊन जाऊ लागले.खुणेचा शब्द सांगून नाईकांची माणसे हत्यारे नेत होती.जत्रा रंगात आली होती.दिवस सरत आला.मोहनजवळ अजून एक तलवार बाकी होती.
अजून कोणी येईना.अंधार पडू लागला.तेवढ्यात एक तरुण आसपास घोटाळू लागला.मोहनाने त्याच्या दंडावर भगवे कापड पाहिले.तो पुढे येत नव्हता.याचा अर्थ? त्याला शत्रूने ओळखले होते.
मोहनाने धोका ओळखला.तिने आपल्या दंडावर असलेले भगवे कापड पदराने झाकले.केळीची पाटी डोक्यावर घेतली आणि झपाझप पावलं टाकायला सुरुवात केली.मोहना सावधगिरीने पावले टाकत होती.
गावाबाहेर पर्यंत तो तरूणसुद्धा तिच्या मागोमाग येत होता.गावाबाहेर येताच त्यांना दोघांनाही चारी बाजूने घेरले.
एकजण गरजला,"ये केळेवाली थांब."
मोहना थांबली,"काय ओ, केळी पायजे का?"
तेवढ्यात दुसरा तिला मागून पकडायला पुढे आला.मोहना सावध होती.पटकन बाजूला झाली.तिसरा तिला म्हणाला,"त्यो पदर बाजूला घे."
मोहना म्हणाली,"आवो मी गरीब केळ ईकणारी हाये,मला जाऊ द्या."
तेवढ्यात त्या तरुणाला पकडून दोघेजण घेऊन आले. त्यातील एकाने पुन्हा म्हंटले,"पदर बाजूला घे."
मोहनाने पदर बाजूला घेतला.दंडावर भगवे निशाण होते.त्यातील एकजण ओरडला,"फाडून काढा हिला,ह्या भगव्या निशाणासकट."
मोहनाने तलवार उपसली,"खबरदार,वाघीण अशी लांडग्यांना घाबरत नसती.म्या मेले तरी भगव्याला हात लावू देणार न्हाय."तलवार घेऊन चौघे जण धावले.मोहना शूरपणे लढत होती.
पण....चौघांसमोर ती कमजोर पडू लागली.एवढ्यात आई ग.....मोहना किंचाळली. दंडावर वार झाला.मोहना तरीही लढत होती.
दुसऱ्या वारात तलवार तिच्या हातातून निसटली.आता मरण समोर होते.एवढ्यात सनकन गोफणीचे दगड दोन बाजूनी येऊ लागले.बघता बघता बाजी पालटली.त्या सहाही जणांची डोकी फोडली गेली.
मोहना उभी राहिली.तेवढ्यात दोनजण तोंडावर पटका गुंडाळलेले बाहेर आले.
मोहनाला उभे केले,"सरळ मुक्कामी जावा.ह्यो दुसरा गडी चुकला म्हणून तुम्ही सापडला.पर नाईक आपल्या माणसांना अस एकटं सोडत न्हाईत."त्या तरुणाला घेऊन ते दोघे निघून गेले.मोहना जवळजवळ धावतच फडावर आली.
खेळ चालूच होता.मोहना राहुटीत आली.खूप रक्त जात होते.तिने लगेच जखमेवर हळद लावली.करकचून जखम बांधली.ह्या सगळ्या श्रमामुळे मोहना झोपी गेली.
पहाटे खेळ संपला. सुंदरा तंबूत आली.मोहनाच्या हाताकडे पाहिले.काहीतरी अघटित घडले आहे.तिने लगेच रूपा,छबु,सखाराम आणि गणपा सुखरूप आहेत का ?याची खात्री केली.
मोहनाला झोपू दिले.पोर सुखरूप आहे.काय झाले ते उद्या सकाळी विचारता येईल.असे ठरवून सुंदरा झोपली.
मोहनाला वाचवणारे कोण असतील?ह्या मोहिमेत अजून काय घडेल?
वाचत रहा.मी मानिनी...
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा