Login

मी मानिनी ! मी मर्दिनी ! भाग 31

जावळीच्या दिशेने शिवबाचे मावळे निघाले.ह्या प्रवासात सुंदराला काय काय अनुभव येतील?

(सदर कथानक इतिहासाच्या पार्श्वभूमीवर असले तरी कोणत्याही ऐतिहासिक सत्याचा दावा करत नाही. सदर कथा पूर्णपणे काल्पनिक आहे)

मागील भागात आपण पाहिले,हत्यारे पोचवण्याची कामगिरी बजावताना मोहनावर हल्ला झाला.दोन अज्ञात तरुणांनी तिला वाचवले. तंबूत आल्यावर कोणालाही काहीच न सांगता मोहना झोपी गेली. आता पाहूया पुढे .



सुंदराने पाहिले की मोहनावर हल्ला झालेला दिसत होता.मोहनाच्या काळजीने तिला रात्रभर झोप लागली नाही.सकाळी मोहना उठली,संपूर्ण अंग ठणकत होते.अशक्तपणा होताच.

मोहना उठलेली पाहून सुंदराने लगेच तिच्याकडे धाव घेतली,"काय झाले मोहना?कसे लागले तुला एवढे?"

मोहना म्हणाली,"आक्का,अग किती घाबरतेस?काहीही झाले नाहीय मला.ठीक आहे मी."

तरीही सुंदराने तिला जागेवरून हलायचे नाही अशी ताकीद दिली.पुढचा प्रवास मोऱ्यांच्या जावळीच्या हद्दीत होणार होता.आठवडाभर प्रवास केल्यावर जावळीत पोहोचणार होते सगळे.त्याआधी सगळी हत्यारे आडवाटेने जावळीत न्यावी लागणार होती.मुख्य गावात प्रवेश करताना चौक्या होत्या.निबिड अरण्य वाटांतून ही हत्यारे न्यावी लागणार होती.त्यासाठी सुंदराने सखाराम आणि छबुला पाठवायचे ठरवले.


सुंदराने रुपाला हाक मारली,"रूपा,ये रूपा इकडे ये."


रूपा पळतच आली,"काय झालं आक्का,मोहना ठीक हाये ना?"
सुंदरा हसली,"अग हो,जरा दमाने.मोहना ठीक आहे.तू जर छबु आणि सखारामला बोलावून आण.


सखाराम आणि छबु आला.सुंदरा बोलू लागली,"काल मोहनवर हल्ला झाला.याचा अर्थ आपला पाठलाग होतोय.आता जावळीच्या हद्दीत प्रवेश करताना चौकीवर झडती घेतली जाईल.त्यात आपली हत्यार सापडतील.मोहनावर केलेला तलवारीचा वार लक्षात येईल.


हे ऐकून छबु म्हणाला,"आक्का,अस झालं तर मग कामगिरी कशी पुरी व्हईल."

सखाराम म्हणाला,"आक्का,यावर काही उपाय हाये का?तू काही इचार केलाय का?"

त्यावर सुंदरा म्हणाली,"हो,आता आपण मोहनाला बरोबर घेऊन चौकी ओलांडू शकत नाही.तर आपण चौघे जंगलाच्या वाटेने प्रवास करायचा. पुढच्या मुक्कामी सर्वांना गाठायचे."


सखाराम म्हणाला,"पर आक्का,तू फडासोबत नसशील तर सगळे नीट होईल का?"

सुंदरा म्हणाली,"त्याचाही विचार केलाय मी.बकुळामावशी फड सांभाळेल.पूर्वी तीच आमचा फड सांभाळत असे."

छबु म्हणाला,"मावशीला सगळं सांगायला लागलं आक्का."

सुंदरा त्यांना धीर देत म्हणाली,"तिला मी समजावते.तुम्ही प्रवासाची तयारी करा.आपल्या चौघांना पुरेल असा शिधा,हत्यारे,बाकी समान बांधून ठेवा."आता बकुळामावशीला हे सगळे समजावून सांगायचे होते.

सुंदराने बकुळामावशीला हाक मारली.तेव्हा मावशी मोहनाच्या उशाला बसून होती.बकुळामावशी सुंदराकडे गेली.सुंदरा बोलू लागली,"मोहनाला काय झाले?तिच्यावर कोणी हल्ला केला?ह्या सगळ्याची उत्तरे देते."


असे म्हणून सुंदराने नाईकांनी सोपवलेली कामगिरी आणि पुढे घडलेल्या सगळ्या घटना तिला सांगितल्या.बकुळामावशी म्हणाली,"मला एका शब्दाने बोलली नाहीस पोरी.सगळं एकटी करत राहिलीस."


सुंदराने मावशीचा हात हातात घेतला,"मावशी माझ्यासाठी तू प्रत्येक ठिकाणी आईसारखी उभी आहेस.तुला त्रास होऊ नये म्हणून लगेच सांगितलं नाही."


बकुळामावशी म्हणाली,"आता का सांगितलं मग?काय झालंय?"


सुंदरा म्हणाली,"मावशी,आता आपण जावळीच्या हद्दीत जाणार.तिथल्या चौक्यांवर तपासणी होणार.मोहना जखमी आहे.आपली हत्यारे आहेत."


बकुळा म्हणाली,"मग तू काय ठरवलं हायेस?"


सुंदरा म्हणाली,"इथून पुढच्या मुक्कामात फडमालकीण तू असणार.आता मोहीम संपेपर्यंत फड तुला सांभाळायचा आहे."


बकुळा म्हणाली,"ते तर मी करील,पण का?"सुंदरा म्हणाली,"चौक्या पार करताना मी आणि मोहना जंगल रस्त्याने येणार.माझ्यावर जास्त लोकांचे लक्ष जायला नको.यासाठी फडाचे सगळे तू सांभाळ."सुंदराने बकुळाला सगळे व्यवस्थित समजावून सांगितले.



आजचा दिवस इथेच मुक्काम करायचे ठरले.मोहनाला आराम करायला सांगितला.छबु आणि सखारामने सर्व तयारी केली.सुंदराने बकुळामावशी आणि बजकाकाला सगळे परत एकदा समजावून सांगितले.इकडे मोहना मात्र तिच्यावर झालेला हल्ला परत आठवत होती.ज्या तरुणाला शत्रूने पकडले त्याने ईशारा करताच मोहनाचा पाठलाग सुरू झाला.मोहनाला आता कोणावरच विश्वास बसत नव्हता.दुपारपर्यंत आराम केल्यावर मोहनाला जरा बरे वाटू लागले.



सुंदरा तिच्याजवळच बसून होती.मोहना म्हणाली,"आक्का,आपल्या फडात कुणी फितूर नसेल का?मला ईशारा करणारा माणूस नाईकांचा होता की शत्रूचा?"


सुंदराने तिच्या डोक्यावर हात फिरवला,"नको विचार करू,तू सुखरूप आहेस ना.झालं तर."

आता आपल्याला जंगलाच्या रस्त्याने जावळीत प्रवेश करायचा आहे.तू तयार आहेस ना?मोहनाने होकारार्थी मान हलवली.


संध्याकाळी निघायची तयारी झाली.बकुळामावशीचा पाय निघत नव्हता.लहानग्या हौसा पासून ते आजवर तिने सुंदराला कधी एकटे सोडले नव्हते.तरीही जड पावलांनी सर्वांनी निरोप घेतला.रूपा आणि तुळसासुद्धा मोहनाला काळजी घ्यायला सांगत होत्या.फड पुढे निघून गेला.


तेवढ्यात छबु आणि सखाराम पंधरा वीस शेळ्या आणि दोन घोडे घेऊन येताना दिसले.मोहनाला काही कळेना.तिने सुंदराकडे पाहिले.सुंदरा हसून म्हणाली,"या वेशात जंगलात आपण पकडले जाऊ.पण धनगर बनून गेलो तर आपल्याला कोणीही ओळखणार नाही."

मोहना खुश झाली,"आक्का,तू खरच किती पुढचा विचार करतेस."

सर्वांनी वेषांतर केले.शेळ्या आणि घोडे घेऊन चौघे जावळीच्या निबीड अरण्यात घुसले.डोंगर पार करून मग पुढे गाव गाठायचे होते.जावळीचे जंगल अतिशय दाट. सूर्य दुपारी माथ्यावर असला तरी जंगलात रातकिडे किर्रर्रर्र करत असत.वाघ,चित्ते,बिबट्या आणि सगळे हिंस्त्र प्राणी पदोपदी होते.ह्या सगळ्यातून प्रवास करायचा होता.


मोहना जंगल पाहून म्हणाली,"आक्का,हा एवढा अवघड मुलुख कसा जिंकला असेल यवनांनी?"

सखाराम म्हणाला,"आपल्या लोकांना आपापसात भांडण्यापासून फुरसत नाही.यादव राज गाफील रहायलं आणि घात झाला."

सुंदरा म्हणाली,"खरे आहे.दह्या दुधाने,समृध्दीने भरलेले राज्य बुडाले.रयतेला वाली उरला नाही."

छबु म्हणाला,"पर आक्का, आता पुण्यातून शिवबाराजे आणि आऊसाहेबांचा कारभार गाजतोय बग सगळीकड."

सुंदरा हात जोडत म्हणाली,"आई अंबाबाई राजांना यश दे ग बाई."

अशा गप्पा मारत सगळे चालले होते.अचानक समोरून आवाज आला,"ये थांबा.कोण हायेसा तुमी?"

चौघेही सावध झाले.चारही बाजुंनी दरोडेखोरांनी घेरले.सुंदरा पुढे होत म्हणाली,"मायबाप गरीब धनगर हाये आमी.तिकडं गावाला निगालोय."

दरोडेखोरांचा म्होरक्या म्हणाला,"धनगर हायेस?मग इरुबाचा टाक कुठंय गळ्यात?"


सुंदरा गडबडली. तेवढ्यात मोहनाने तलवार उपसली.ते पाहताच म्होरक्या हसू लागला,"ह्या पोरीला किती शिकवायचं?सारखी तलवार उपसायची नाही."

हे ऐकताच सुंदरा म्हणाली,"मुजरा नाईक."

बहिरजींनी त्यांना वेषांतर पूर्ण करून दिले.सगळ्या सूचना दिल्या.बहिर्जी निघून गेले आणि मग हे चौघे एका ठिकाणी छोटेसे देऊळ पाहून थांबले.


सुंदराने चूल मांडली.कोरडा शिधा सोडला आणि जेवण बनवायला घेतले.

इकडे बिजली आणि मार्तंड यांनी चिमणजीच्या वाड्यावरून कुमक आणि रसद गोळा करायला सुरुवात केली.जावळीच्या यात्रेला ह्यावर्षी सगळ्यांना न्यायचं.चिमणाजी सापडायला नवस केला आहे.बिजलीने सगळीकडे हुल उठवून दिली.आता फक्त नाईकांचा सांगावा आला की निघायचे होते.


इकडे बकुळामावशी आणि बजाकाका फड घेऊन निघाले.चौकी येताच तिथे त्यांना हटकले.तशी रूपा पुढे झाली,"रामराम सरकार!" मधाळ आवाज आणि मादक कटाक्ष टाकत रूपा बोलली.

कोतवाल म्हणाला,"झडती घ्या रे यांची."

बकुळामावशी पुढे झाली,"सरकार आवो तमासगीर आम्ही काय न्हाई झडती घ्यायला."


इकडे रूपाने आपले नाजूक हात कोतवालाच्या छातीवर ठेवले,"हुजूर आज्ञा आसल तर थोडं मनोरंजन करू."


कोतवाल पूर्ण घायाळ झाला.दोन लावण्या सादर करत आपल्या सौंदर्याच्या आणि बुद्धीच्या जोरावर रूपाने उलट कोतवालाकडून बक्षीस मिळवले.


सगळीकडून नाईकांनी पेरलेली माणसे जावळीच्या दिशेने निघाली होती.शिवाजीराजे यायच्या आधी जावळी खिळखिळी करायची नाईकांची योजना हळूहळू आकार घेत होती.धोंडिबा, पांडू,सुंदरा, मोहना आणि त्यांचे साथीदार आता ह्या योजनेत महत्वाची भूमिका करणार होते.


सुंदरा आणि मोहना आज शांतपणे जेवत होत्या.भोवती कोलाहल नव्हता.कसली घाई नव्हती.एवढ्यात वाघाची डरकाळी ऐकू आली.

छबु घाबरून म्हणाला,"आक्का,आग खाली झोपायचं आपुन?"

तसा सखाराम हसला,"येडा का खुळा झालास.झाडावर काढायची आजची रात्र."

जेवण आवरून सगळेजण एका महाकाय झाडावर चढून बसले.सगळे समानसुद्धा सखारामने झाडावर बांधले.मोहनाला आता आस लागली होती पराक्रमाची आणि प्रितीची. तिला हा प्रवास आवडू लागला होता.


जंगलातून सगळे सुखरूप बाहेर पडतील का? फडावर पोहोचतील का?मोहनाला धोंडिबा भेटेल का?
वाचत रहा.मी मानिनी......

क्रमश....
0

🎭 Series Post

View all