(सदर कथानक इतिहासाच्या पार्श्वभूमीवर असले तरी कोणत्याही ऐतिहासिक सत्याचा दावा करत नाही. सदर कथा पूर्णपणे काल्पनिक आहे)
मागील भागात सुंदरा आणि मोहनाने परत एकदा काही मुलींना वाचवले.त्यातच अब्दुल नावाचा एक मुलगा त्यांना भेटला.ह्या अब्दूलने त्यांना रस्ता दाखवायचे कबूल केले.आता लवकरात लवकर मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचणे आवश्यक होते.
सुंदराने अब्दूलला सांगितले,"आजच पोहोचायचे आहे.मध्ये कुठेही न थांबता."
तशी अब्दूलने मान हलवली.सगळेजण जंगलाच्या रस्त्याने चालू लागले.अब्दूलला सखारामने विचारले,"अब्दुल, ह्ये काम कवापासून करतोय?"
तसा अब्दुल हसला,"भूक लई वाईट चीज असती.गेले तीन वरीस झालं काही पिकत न्हाई.मग जीव जगवायला भेटलं ते केलं."
तेवढ्यात अब्दूलला एक तळे दिसले,"सखा,इथे खाना खाऊ.पीनेको पाणी पण हाये हिथ."
तसेही सकाळी लवकर निघाल्याने सगळ्यांना भूक लागली होतीच.गावातल्या लोकांनी बांधून दिलेली चटणी भाकरी आणि तळ्याच गोड पाणी.सगळेजण पोटभर जेवले.आता सगळ्यांना पुढे निघायचे होते.एकाएकी चारही बाजुंनी ह्यांना घेरले.दरोडेखोर असतील ही शंका सखरामला आली.
सगळ्यांनी सावध पवित्रा घेतला.तेवढ्यात म्होरक्या गरजला,"ह्या दोघींना पकडा आणि बाकीच्या तिघांना हातपाय बांधून तळ्यात फेकून द्या."
ते ऐकून अब्दुल अंगावर धावून गेला,"आक्का आणि मोहनाला हात लावायचा नाय.नही तो."
दुसरा एकजण हसला,"नही तो?काय करणार तू?आपला जीव वाचवून पळ,ह्या काय तुझ्या ना नात्याच्या ना गोत्याच्या."
तसा अब्दूलने तलवार काढली,"ह्यांना हात लावायच्या आधी लढना पडेगा।"
तेवढ्यात मोहनाने तलवार घेतली.ते पाहून दरोडेखोरांचा म्होरक्या हसू लागला,"ही पोरगी कधी सुधारणार,सारखी तलवार उपसायची नसती."
मोहनाने डोक्यावर हात मारला.सुंदरा, छबु आणि सखाराम हसू लागले.अब्दूलला काही कळेना?तेवढ्यात नाईक घोड्यावरून खाली उतरले.सुंदराला म्हणाले,"माणसांची पारख चांगली करता तुम्ही."
सुंदरा हसली,"नाईक आयुष्यान शिकवलं."
नाईक पुढे बोलू लागले,"नीट ऐका, आमची दोन माणस आज फडावर येतील,पुढची योजना ते सांगतील.आता आपली भेट जावळीत."
नाईक निघून गेले.सुंदरा आणि सगळेजण पुढे चालू लागले.
जंगल वाटेतून चालताना सावध चालत होते.पावलं झपाझप पडत होती.अचानक सुंदराच्या पायाला काहीतरी टोचले,"आई गsssss "
सुंदरा ओरडली.तोवर सळसळत साप निघून गेला.मोहना धावत आली,"आक्का, काय झाले?"
अब्दुल खाली बसला. तळव्यावर दोन दात उमटलेले होते.अब्दूलने झटकन खंजीर काढला.जखम वरती करकचून बांधली आणि एक चिर दिली.मोहनाला म्हणाला,"मोहना,रक्त वाहू दे,मै अभी आया."
अब्दुल वेगाने जंगलात घुसला.इकडे रक्त वाहत होत.सुंदराला घाम फुटला होता.अब्दुल धावतच आला.त्याच्या हातात एक मुळी होती.त्याने दगडावर मुळी ठेवली,लेप बनवला आणि भराभर जखमेवर लावला.सखारामकडे वळून म्हणाला,"आता फिकीर नको,माझ्या अब्बूने दाखवलेलं औषध है.
साप का जहर काटून टाकते."
एक सुरक्षित आडोसा पाहून सगळेजण थांबले.सुंदराला तासाभराने दरदरून घाम फुटला आणि हळूहळू तिला बरे वाटू लागले.सगळेजण पुढे चालू लागले.आज अब्दूलने सुंदराचे प्राण वाचवले होते.
इकडे बकुळामावशी आणि रूपा फड घेऊन मुक्कामी पोहोचल्या.रूपा आता सुंदरा आणि मोहनाची वाट पाहू लागली.आजवर कायम सुंदरा बरोबर असायची.ती बरोबर असली की संकटांशी झुंजायला वाघाचे बळ प्राप्त व्हायचे.
रूपा मांडामांड करताना म्हणाली,"मावशे,कधी येणार आक्का,ती नीट पोहोचलं ना?"
बकुळा तिला समजावत म्हणाली,"रूपे,नको काळजी करुस.आग सुंदराने आजवर लई संकट पार केल्यात."
इतक्यात बाहेर कोणीतरी आल्याचा निरोप आला.बकुळा बाहेर आली.समोर दोन हबशी आणि एकजण होता.हबशी बकुळाला पाहून म्हणाले,"ये तो बुढी है,तुम तो बता रहे थे की बाई बडी सुंदर है।"
तेवढ्यात बकुळा म्हणाली,"सरकार,सुंदराबाई आजारी हाये.तिकडं वाईत सोडलं तिला."
तसे दाढी कुरवाळत हबशी म्हणाला,"मुबरकखान सरदार नाराज हुणार."
तेव्हा बरोबर आलेला दुसरा माणूस म्हणाला,"सरकार आवो सुंदरा नसली तरी दुसऱ्या कवळ्या पोरी हायेत फडात.खान साहेबांना शेजेवर बाई मिळाली म्हंजी झालं."
तसे तो हबशी चिडला,"खमोश,मुबरकखान को सुंदरा और उसकी ओ मोहना चाहीए."
तसा तो इसम चिडला,"ये म्हातारे,कुठंय सुंदरा?"
बकुळा लोचट हसली,"सरकार सुंदरा पायजे आसल तर वाईत मिळलं.वाटल्यास फडाची झडती घ्या."
बकुळा एवढे म्हणाल्यावर ते तिघे परत फिरले.
रूपा आणि बकुळाला धोक्याची जाणीव झाली.आता जावळीच्या हद्दीत काहीही होऊ शकत होते.सुंदराला फडावर येऊ देणे धोक्याचे होते.रूपा म्हणाली,"मावशे,हा निरोप कसबी करून आक्का आणि नाईकांना पोचवायला पायजे."
बकुळा म्हणाली,"व्हय,पर कसा पोचिवणार?नाईकांचा ठावठिकाणा कुणालाच माहीत नसतोय."
रूपा चिडली,"पर अस हाताव हात ठिवून चालायचं न्हाई.आपल्या फडाच्या आग माग नाईकांनी माणसं पेरली असत्यालच की."
बकुळा म्हणाली,"आग पर आपुन त्यांना हुडकणार कस?"
रूपाने काहितरी निर्धार केला,"ते माझ्याव सोड मावशे."
रूपा फडाच्या आजूबाजूने इकडे तिकडे फिरू लागली.थोड्या वेळाने तिला जाणवले एक तरुण इथेच घुटमळतो आहे.रूपा त्याच्या समोरून जाताजाता म्हणाली,"देवा माझ्या महादेवा, धावून ये रे रक्षणाला.हिथ राक्षसांच्या राज्यात किती तग धरणार?"
थोड्यावेळाने तो तरुण निघून गेला.रूपा आजूबाजूला बघत असताना तिला शेजारी एक उंच आंब्याचे झाड दिसले.तिने गणपाला बोलावले,"हे बघ गणपा,आंब्याच्या शेंड्यावर बसून रहा,आन आक्का येताना दिसली की खुणची शिळ वाजीव."
गणपा म्हणाला,"आग पर का?यिवू दे की आक्काला फडावर."
रूपा चिडली ,"तू गुमान झाडाव चढ आन मी सांगती तेवढं कर."
रूपा चिडली ,"तू गुमान झाडाव चढ आन मी सांगती तेवढं कर."
गणपा झाडावर चढून बसला.रूपाचा जीव मात्र हुरहूरत होता.
तिन्ही प्रहर उलटून गेले.सूर्य मावळतीला आला.गणपा आंब्यावर बसून कंटाळला होता.तेवढ्यात त्याला लांबूनच दोन स्त्रिया आणि तीन पुरुष दिसले.त्याने खुणेची शिळ वाजवली.रूपा सावध होती.आजूबाजूचा मागोवा घेऊन ती झपाट्याने पावले टाकत निघाली.जरा दूर गेल्यावर रूपा पळत सुटली.
सुंदराने आपल्या दिशेने कोणीतरी पळत येत असल्याचे पाहिले,"छबु,आरे कोणीतरी पळत येतंय का इकडे?"
छबुने कपाळावर हाताची खोलगट करत म्हंटले,"व्हय आक्का,कुणीतरी येतंय खर."
जवळ येताना रूपा ओरडत होती,"आक्का,तिथंच थांब,आक्का तिथंच थांब."
मोहनाने आवाज ओळखला,"आक्का,अग रूपा आहे."
रूपा जवळ पोहोचली.जोरात पळत आल्याने शब्द फुटत नव्हते.रूपा जवळ आली.जरा दम खाऊन ती बोलू लागली,"आक्का,तू आणि मोहना फडावर यिवू नका,हिथ धोका हाय."
मोहना म्हणाली,"रूपा,एवढी का घाबरलीस?"
रुपाने सकाळी घडलेला सगळा प्रसंग सांगितला.सुंदरा म्हणाली,"रूपा असे घाबरून चालणार नाही.चल बरं."
एवढ्यात झाडीतून मोराचा आवाज आला.ह्यावेळी मात्र मोहनाने ओळखले.नाईकांनी पाठवलेली माणसे बाहेर आली.
त्यातील एकजण म्हणाला,"सुंदराबाई, ही बरोबर बोलतीय,आता आपुन जावळीच्या हद्दीत हाये.उगा आपुन डोळ्यात भरलो तर सगळं व्हत्याच नव्हतं व्हईल."
सुंदराला आता समजले की परिस्थिती खरोखर हाताबाहेर जाऊ शकते.
मोहना म्हणाली,"मग आम्ही दोघी करू काय?"
तेव्हा तो तरुण हसला.त्याने बोलायला सुरुवात केली,"सुंदराबाई आणि मोहना तुमी आता लव्हाराच सॉंग घ्यायचं.ह्यो सखाराम आणि आमची दोन माणसं तुमच्या बरोबर आस्त्याल."
सुंदरा म्हणाली,"अहो पण?हे सगळं जमेल का?"
मोहना निर्धाराने म्हणाली,"आक्का स्वराज्याची सेवा करायची संधी परत मिळायची नाही.जमेल सगळे."
असे म्हणताच त्या तरुणाने शिळ घातली.झाडीतून दोन तरुण बाहेर आले.सगळेजण पहातच राहिले.कितीतरी दिवसांनी धोंडिबा आणि पांडूला ते पहात होते.तेवढ्यात तो तरुण म्हणाला,"सुंदराबाई, ह्ये दोघे तुमचे मुलगे आणि ह्या सुना."
ते बोलताच मोहना आणि रूपा लाजली.सखाराम म्हणाला,"म्हंजी फक्त समजायला बरं का."
सुंदरा म्हणाली,"अहो पण रुपासुद्धा माझ्याबरोबर आल्यावर फडाचे काय?"तो तरुण हसला,"त्याची व्यवस्था आम्ही कवाच केलीय.तुळसा आमची हेर हाये."
नाईकांचा माणूस पुढे बोलू लागला,"सगळ्यात आदि बोलताना लव्हार वाटलं पायजे.नाव पर बदला.बाकी सगळं सामान सुमान घिऊन आलोच."
तो निघून गेल्यावर सुंदरा म्हणाली,"मोहना आणि रूपा तुम्हाला दोन नाव देते,तारा आणि सुनंदा."
तेवढ्यात सखाराम म्हणाला,"आक्का, तुझं नाव काय ठिवायचं?"
त्यावर धोंडिबा सहज बोलून गेला,"हौसाई, हौसाई ठिवा."
ते ऐकून सुंदराचे डोळे भरून आले.धोंडिबा गडबडला,"म्हंजी तुमाला पटलं तर."
सुंदराने आनंदाने मान डोलावली.आता संपूर्ण कायापालट करून पुढचा प्रवास करायचा होता.चार दिवसांचा प्रवास करून जावळी गाठायची ती आता दोनच दिवसात घोड्यावरून गाठायची होती.
ह्या प्रवासातून पुढे काय होईल?धोंडीबाने हेच नाव का सुचवले?
वाचत रहा.मी मानिनी....
वाचत रहा.मी मानिनी....
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा