(सदर कथानक इतिहासाच्या पार्श्वभूमीवर असले तरी कोणत्याही ऐतिहासिक सत्याचा दावा करत नाही. सदर कथा पूर्णपणे काल्पनिक आहे)
मागील भागात सुंदरा आणि मोहना मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचल्या.मात्र तिथे मुबरकखानाची माणसे आधीच पोहोचली होती.सुंदरा आणि मोहना दोघींना त्यामुळे योजना बदलून वेषांतर करून जावळी गाठायची योजना आखावी लागली.
योजना ठरल्याप्रमाणे आता सर्वांना वेषांतर करून जावळी गाठायची होती.थंडीचे दिवस संपत आले होते.पुढच्या हंगामाची तयारी करताना शेतकरी सुतार,लोहार यांच्याकडून हत्यारे दुरुस्त करून घेत.कधी नवीन बनवून घेत.त्यातही गावाचे ठरलेले कारागीर असत.पण काही लोहार गावोगावी ठराविक काळ मुक्काम करत.त्यात ते फक्त शेतीची हत्यारेच नाही तर लोखंडी कढई,तवे अशी भांडीही विकत असत.तर आता ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून वेषांतर करणेआवश्यक होते.
रुपाला सुंदराने सांगितले,"तू परत जाऊन बकुळामावशी आणि बजाकाका यांना सगळे समजावून सांग.तुळसाची भेट घे."
रूपा फडावर आली.बकुळामावशीकडे गेली,"मावशे,आता माघ फिरायचा मार्ग न्हाई,तवा सुंदराच्या आणि मोहनाच्या जीवाला दगाफटका नको.त्यासाठी ह्ये सगळं करावं लागलं."
बकुळामावशीने रूपाच्या डोक्यावरून हात फिरवला,"सुंदराला कायमच साथ दिली हाये म्या. तू कायबी काळजी करू नको."
रूपाने तुळसाची भेट घेतली.नाईकांच्या माणसांनी तुळसाला आधीच सगळे समजावून सांगितले होते.
सुंदराला आज नवल वाटत होते.आयुष्याचा हौसा म्हणून सुरू झालेला प्रवास पुन्हा हौसाई ह्या वळणावर आला होता.औट घटकेचे असले तरी आईपण असतेच देखणे,निर्मळ, नितळ.सुंदराला मनातून खूप आनंद होत होता.तेवढ्यात मोहना ,रूपा तयार होऊन आल्या.अंगावर साधे लुगडे, गळ्यात डोरले, कपाळावर आडवे कुंकू,हातात चुडा, पायात जोडवी आणि नाकात नथ.रोज तोंडाला रंग लावून झकपकीत उभ्या राहणाऱ्या मोहना आणि रूपा आज अगदी साजिऱ्या दिसत होत्या.
सुंदराने नकळत त्यांच्या चेहऱ्यावर हात फिरवून बोटे मोडली,"कुण्या मेल्याची दिठ लागाया नग."
सुंदरा अशी भाषा बोलताना ऐकून रुपाला हसू आले,"आक्के, तुला आसबी भाषाण यात व्हय?"
सुंदरा हसली,"रूपे,लहानपण असेच खेडेगावात गेले,नंतर शुद्ध भाषा शिकले ती गाणं शिकायचे म्हणून."
तेवढ्यात धोंडिबा तयार होऊन आला,"गुडघ्यावर धोतर,अंगात बंडी, त्यातून दिसणारे पिळदार दंड.दंडावर आणि गळ्यात शोभणारा ताईत. टपोरे भोकरावाणी डोळे.मोहना पहातच राहिली.सुंदराला सुद्धा एकक्षण जणू ती हैबती पाटलांना पाहतेय असा भास झाला.डोळ्यात येणाऱ्या पाण्याबरोबर तिने तो विचार मागे सारला.
तेवढ्यात सखाराम म्हणाला,"आता चारदोन कोंबड्या,एक गाय,दोन घोडी आन ह्यो सगळा संसार हाये बघ आक्का."
सुंदरा हसली,"आर मंग बघत काय बसलाईस,चल बिगिबिगी."
सुंदरा मोहनाला म्हणाली,"अय तारे,आग आवर किती येळ झाला."
मोहना हसली,"आव जरा दम खावा की आत्याबाई.समद नीट भरू द्या."
धोंडिबा, पांडू,सखाराम,रूपा,मोहना आणि सुंदराला पाहून अब्दुलचे डोळे भरून आले.तो रडत म्हणाला,"आक्का,अब मी कसा यिवू?"
सुंदरा म्हणाली,"तुलाबी येता यील पर...."
पांडू म्हणाला,"अब्दुल डोक्याव टोपी नाय घालता याची गड्या."
अब्दुल म्हणाला,"आप लोग बडा अच्छा काम करत हाये.तर म्याबी येणार संग."
सगळेजण चालू लागले.संसार सगळा घोड्यावर लादलेला.झपाझप पावले जावळीची वाट चालू लागली.दोन मुक्कामात जावळी गाठायची होती.सकाळपासून सगळे चालत होते.
दुपार व्हायला आली तसा अब्दुल म्हणाला,"हौसाई,पेटमें कावळे ओरडत हायेत."
सुंदरा उर्फ हौसा हसली,"ये पोरींनो थांबा ग,सकाळी बांधून दिली ती भाकरी चटणी सोडा.आपल्या नवऱ्यांना बोलवा."
रूपाने हाक मारली,"अय पांडू,चल जेवायला."
पांडू म्हणाला,"आये,कसली सून आणलीस, नवऱ्याला नावानी हाक मारती."
रूपा चिडून म्हणाली,"गप,तू काय खरा नवरा न्हाई माझा."
इकडे मोहना मात्र लाजत धोंडीबाला म्हणाली,"आवो,जेवाय येताय नव्ह."
तस धोंडिबा मान हलवून आला.दोघांनाही मनातून हे नाते सत्यात उतरावे असे वाटत होते.बकुळामावशीने सकाळी निघताना रुपाकडे बांधून दिलेल्या चटणी भाकरीची चव घेत सगळे जेवत होते.सुंदराला राहून राहून हैबती पाटलांच्या बरोबर मळ्यात जेवण करतानाची आठवण येत होती.
दुपारचे जेवण केल्यावर उन्हे उतरू लागली.पुढे प्रवास सूरु झाला.धोंडिबा म्हणाला,"आता निसणी म्हणून गाव लागलं,तिथं मुक्काम करू पयला.मंग पुढचा मुक्काम दरे नावाचं गाव हाये तिथं आन नंतर जावळी."
सखाराम म्हणाला,"चाललं,तुमी लोकांनी सगळी पाहणी केलीय नव्ह,मंग काय हरकत न्हाई."
पांडू म्हणाला,"व्हय,पर जावळीत घुसताना सावध रहायला लागलं. तिकडं त्यांना हरेक नवखा माणूस राजांचा हेर वाटतोया."
मोहना म्हणाली,"नाईकांची किरतच तेवडी हाये,प्रत्यक्ष देवबी फसल त्यांचं सॉंग बघून."
तशी रूपा म्हणाली,"ह्ये मातर खर हाये.आता आपल्यालाबी सावध राहाय पायजे."
धोंडिबा म्हणाला,"आक्षी बराबर,आपल्यावर पाळत ठिवली जाऊ शकती. तवा डोळं आन कान कायम उघड आसू द्या.प्रत्येकाजवळ छोटं हत्यार ठिवा.येळकाळ सांगून येत नाही."
सगळेजण झपाझप पावले टाकत होते.दिवेलागण होण्याच्या आत निसणीत पोहोचणे आवश्यक होते.गावात प्रवेश करायच्या आधी चौकीवर कोतवाल चौकशी करत असे.
पुढे घोड घेऊन आलेल्या सखारामला तिथल्या शिपायाने हटकले,"कोणत्या गावच म्हणायच तुमी? कुणीकड निघालाय?"
सखाराम पुढं झाला,"रामराम सरकार,आवो आता आमचं आणि एक गाव कुठलं व,पोटपाणी भेटलं तेच आमच गाव.सुगीच्या हंगामाला आलोय बघा."
शिपाई जाऊन आत वर्दी देऊन आला.आतून कोतवाल आला.त्याने सगळ्यांना नजरेखालून घातले.मोहनाला पाहून तो म्हणाला,"आसली सुंदरा ह्या लव्हाराच्या हातून किती दिस सांभाळली जाईल काय म्हाइत?जपून रहा बाबा.पांडुरंग तुमाला सोबत करील."
कोतवाल स्वभावाने सज्जन माणूस होता.त्याने शिपायाला आवाज दिला,"जाऊ द्या र ह्यांना."
धोंडिबा मोहनाजवळ आला,"माझ्या अंगात जीव आसल तवर तुला कुणी हात लावू शकायच न्हाई."
मोहना खुदकन हसली,"कारभारी,आवो मला हात लावणाऱ्याच मुंडक म्या स्वतः उडवून टाकत असते."बोलतचालत गावात कधी येऊन पोहोचले समजलेच नाही.
आजवर फडाच्या राहुटीत राहिलेल्या मोहनाला आज हे उघड्यावर पालात रहायचे होते.धोंडिबा सोबत असल्याने तिला तेसुद्धा आवडत होते.तितक्यात पांडू म्हणाला,"हौसाई,तिकडं हिर दिसतीय, आमी पाणी आणायला जातो."
तस सुंदरा रुपाला म्हणाली,"रूपे,हंडा घिऊन पाण्याला जा."रूपा आणि पांडू पाण्याला निघाले.एका ठिकाणी अचानक रूपाचा पाय घसरला.पांडूने गपकन तिला आपल्या बाहुत पकडले.आजवर वासनेने बरबटलेले अनेक स्पर्श झेलले होते.हा आधाराचा स्पर्श रुपाला जाणवला.तरीही त्याला चिडवायला ती म्हणाली,"अय, सोड मला.लई अंगचटीला यिवू नगस."
तस पांडूने तिला सोडले,"जा,तुझ्या अंगाला काय सोन लागल का काय?"
दोघे भांडत विहिरीवर पोहोचले.इकडे मोहनाने चूल मांडायला घेतली.धोंडिबाने न सांगता तिला लाकडे गोळा करून दिली.ती हसत म्हणाली,"एवढा जीव नगा लावू,तुमी कोण?कुठंच?कायबी ठाव न्हाई."
धोंडिबा हसला,"तुला वाईत भेटलो तवा सांगितलं की लांब तिकडं बुऱ्हाणपूर कड गाव हाये माझं."सुंदराच्या कानावर बुऱ्हाणपूर पडताच तिला वाटले त्याच्याकडे चौकशी करावी.पण सुंदराने स्वतःचे मन आवरले.
सुंदरा स्वतः स्वयंपाक करायला बसली,"तारे,अय तारे."
मोहनाला समजले आपणच तारा आहोत,"काय आत्या?"
सुंदरा हसली,"जरा लसूण सोल,चांगली झणझणीत मिरची करते.सोबत येताना लागलेल्या मळ्यातून तोडलेल्या वांग्याचं भरीत आणि मस्त गरमगरम भाकऱ्या करते."
सुंदरा जेवण बनवू लागली.मोहनाने मिरची वाटून तव्यावर परतली.धोंडिबा जेवायला बसला. ताटाकडे बघून सहज बोलून गेला,"बघ,आईला समद माहीत आसत.भरीत,मिरची आन भाकरी मला लई आवडती."
सुंदराने चमकून त्याच्याकडे पाहिले.नंतर सावरून म्हणाली,"आर मग पोटभर जेव.वाढ ग त्याला भाकरी."आज रूपा आणि सुंदराला औट घटकेचे खोटे का होईना गृहिणी सुख मिळाले होते.
जेवत असताना धोंडिबा म्हणाला,"जावळीला पोहोचल्यावर आपल्याला काहीही करून मोऱ्यांच्या वाड्याजवळ थांबायचं आहे.शक्य झाले तर वाड्यात घुसायचे आहे."
सुंदरा म्हणाली,"काहीतरी करून तिथे काम मिळवता येईल.नाईकांचा काही सांगावा आलाय का?"
पांडू म्हणाला,"पुढच्या मुक्कामी नाईक भेटतील.आता लवकरच जावळीवर हल्ला होईल.मोऱ्यांच्या आगळीकीचा बंदोबस्त होईलच."
सखाराम म्हणाला,"आपल्याला जे जमलं ते समद करू आणि कामगिरी बजावू."
नाईकांची योजना काय असेल?मोहना-धोंडिबा,रूपा-पांडू यांच्या नात्यांचे काय होईल?
वाचत रहा.मी मानिनी....
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा