Login

मी मानिनी ! मी मर्दिनी ! भाग 35

मोहिमेचा अखेरचा टप्पा सुरू.काय सुंदराच्या आयुष्यात पुढे?

(सदर कथानक इतिहासाच्या पार्श्वभूमीवर असले तरी कोणत्याही ऐतिहासिक सत्याचा दावा करत नाही. सदर कथा पूर्णपणे काल्पनिक आहे)


मागील भागात सुंदरा आणि मोहना वेषांतर करून जावळीच्या दिशेने निघाल्या.जावळीच्या जवळ एका गावात मुक्काम पडला.आता अजून एक मुक्काम आणि जावळी.ह्या प्रवासात सतत सावध रहात जावळी गाठताना काय घडेल?


निसणी गावातील मुक्काम आटोपून सगळेजण पहाटेच निघाले.कारण प्रवासात जास्तीतजास्त लवकर प्रवास करण्यामुळे पाठलाग होण्याचा धोका कमी होणार होता.धोंडिबा म्हणाला,"हौसाई,आपुन सांजच्या येळ पतवर पोचू.तवा आज सकाळची न्ह्यारी काय करता याची न्हाई.नायतर पोचयला येळ व्हईल."हे वाक्य म्हणत असताना तो मोहना आणि रुपाकडे बघत होता.

मोहना म्हणाली,"येळला दोन दोन दिस उपाशी राहिलोय आमी.किती येळला उपाशीपोटी नाचलोय."धोंडीबाला हे ऐकून घरची आठवण आली.


तेवढयात अचानक सखाराम ओरडला,"मेलो,मेलो."मोहना गर्रकन मागे वळली.सखारामचा पाय सापळ्यात अडकला होता.रूपा ओरडली,"आर अय,भिलाटीतल्या कुणीतरी जनावर पकडायला फासा लावलाय."


तोवर पांडू मागे गेला.त्याने अलगद सखारामचा पाय सोडवला.सुंदरा म्हणाली,"आता फूड नीट जपून चला समदी."

सगळेजण गावापासून दूर आले.जंगलाची वाट सुरू झाली. मोहना आणि धोंडिबा अतिशय सावध होते.मोहनाला सतत कोणीतरी मागावर आहे असे जाणवत होते.


आता गावापासून खूप दूर आल्यावर सगळे जरा निवांत चालत होते.तेवढ्यात पांडू म्हणाला,"धोंडिबा,आर पाणी संपलं बग गड्या."

अब्दुल म्हणाला,"पिणे का पाणी तर पायजे ना."

धोंडिबा आणि मोहना इकडेतिकडे शोधू लागले.कुठे जवळ विहीर,झरा काही दिसते का?अब्दुल आणि सखारामनेसुद्धा शोध सुरू केला.थोड्या वेळाने अब्दुल पाणी घेऊन आला.

सुंदरा म्हणाली,"पाणी मिळालं हाये तर आरदी आरदी भाकर खाऊन घ्या."


सकाळपासून चालत असल्याने सपाटून भूक लागलेली होती.सर्वांनी भाकर खाल्ली आणि थंडगार पाणी प्यायले. त्यानंतर बऱ्याच वेळाने.........


सुंदरा पहिल्यांदा जागी झाली.सगळीकडे अंधार होता.जरा डोळे किलकिले करून पाहिल्यावर तिला आपले हात पाय बांधल्याची जाणीव झाली.तिने इकडे तिकडे पाहिले.सगळ्यांना बांधलेले होते.तेवढ्यात धोंडिबा शुद्धीवर आला.त्याने तात्काळ ओळखले.तो अब्दूलला शोधू लागला.अब्दुल त्याच्या शेजारीच पडलेला होता.हळूहळू सगळे शुद्धीवर आले.


मोहनाने प्रयत्न करून तोंडावरचे कापड बाजूला केले. इतरांनी सुद्धा प्रयत्नपुर्वक तोंडावरचे कापड काढले.सुंदरा काही बोलणार एवढ्यात बाहेरून आवाज आला,"वा,म्हातारे वा.काय झक्कास सोंग काढले."


त्यावर ती महिला म्हणाली,"पाणी मागायला आलेला येडा व्हता.पण तीन बायका आणि चार धट्टे पुरुष.किंमत चांगली मिळलं."


दुसरा पुरुष म्हणाला,"व्हय,बाया चांगल्या देखण्या हायेत.मुबरकखानाच्या माणसांना इकू."आता धोंडीबाला सगळा उलगडा झाला होता.


थोडयावेळाने बाहेरून आवाज यायचा बंद झाला.तसे धोंडीबाने अब्दूलला विचारले,"तू पाणी कुठून आणलं?"

अब्दुल म्हणाला,"आवो,हिर आणि झराच काय पण घरसुदीक दिसना.लई लांबवर एक म्हातारी दिसली.तिला म्हणलं आजे थोडं पाणी दितीस का?"

पांडू चिडला,"आन मंग म्हातारीन चांगल हंडाभर पाणी तुला दिल व्हय ना?"

अब्दुल म्हणाला,"व्हय,लई मायाळू म्हातारी व्हती."

रूपा चिडली,"आर येड्या,त्ये पाणी पिऊनच आपलं ह्ये हाल झाल्यात."


सुंदरा म्हणाली,"आता चिडून उपयोग नाही.इथून लवकर निसटायला हवे."

मोहना म्हणाली,"पण आक्का,बाहेर किती माणसे आहेत,आपल्याल बांधलं आहे.कसे निसटणार?"

सुंदरा म्हणाली,"काहीतरी मार्ग काढवाच लागेल."तेवढ्यात धोंडिबा म्हणाला,"एक उपाय हाये,माझ्या कंबरेला करदोऱ्यात एक छोटा सुरा हाये.पण?"

रूपा ओरडली,"पांडू,त्यो सुरा काढ बाहेर."

पांडू चिडला,"अय आग म्या इतक्या लांब.मला कस जमलं?"

सुंदरा म्हणाली,"मोहना,तू सगळ्यात जवळ आहेस.तू काढ सुरा."

मोहनाला कळेना,हात पाय बांधलेले.तरीही हरून चालणार नव्हते.तिने थोडी हालचाल केली.आता धोंडिबा आणि मोहना एकदम जवळ होते.धोंडीबाला मोहना इतक्या जवळ आणि बाजूला इतके लोक पाहून कसेतरी वाटत होते.मोहना त्याला म्हणाली,"आता?लाजायला काय झालं?मी लाजायला पायजे.

"सुंदरा खाली वाकली.तिने दाताने करदोरा ओढायचा प्रयत्न केला.तर धोंडीबाच्या कंबरेला चावा बसला.तो दात ओठात रोवून ओरडला,"नीट,जपून."अखेर प्रयत्नांती तिने तो छोटा सुरा दातांनी काढला.


आता काय?मोहनाने खुणेनेच विचारले.तस रूपा चिडली,"लवकर हातच्या दोऱ्या काप."

मोहना दातात सूरी धरून हाताच्या दोऱ्या कापू लागली.बाहेरचा कानोसा घेऊन हळूहळू काम करणे आवश्यक होते.अखेर मोहनाला हात सोडवण्यात यश आले.तिने मग भराभर स्वतःला सोडवले.त्यानंतर मग सर्वांना मोकळे केले.


धोंडीबाने उठून सगळीकडे पाहिले.वरती एक झरोका होता.धोंडिबा म्हणाला,"पांडू,माझ्या खांद्यावर उभा रहा आन बाहेर काय दिसतंय ते बघ."


लगेच धोंडीबाने पांडूला खांद्यावर घेतले.पांडूने झरोक्यातून डोकावले. बाजूला दाट झाडी दिसत होती.मोहना म्हणाली,"काही पहारेकरी दिसत आहेत का?"

तेवढ्यात बाहेर पावलांचा आवाज आला.पांडू खाली उतरला.सगळेजण आता सावध झाले.कोणी दार उघडून आले तर हल्ला करायचा. पण तेवढ्यात बाहेरून ती बाई म्हणाली,"ह्ये बघ सुभाण्या,आता हित ह्ये चार पाच गडी ठिवू.मी सांगावा धाडलाय."


तसे सुभाण्या हसला,"व्हय,ह्या बाया मुबारकला इकू आन ती पोर तिकडं हबशाना दिऊ."चल आता संध्याकाळी दार उघडून थोडं खायाला दिऊ यांना,"ती बाई हसत बोलली.पावले दूर जात होती.


मोहना म्हणाली,"यिवून दे संध्याकाळी चेटकीनीला,माजच उतरवते तिचा.आम्हाला इकायच्या गोष्टी करते काय?"

पांडू म्हणाला,"हा,थांबा.आस उतावीळ व्हवून चालायचं न्हाई.नीट जपून काम करावं लागलं."


रूपा म्हणाली,"व्हय,बाहिर चारजण हायेत.त्यांच्याकड हत्यार असतील."

सगळेजण आता वाट पाहू लागले.हळूहळू अंधार व्हायला आला.इतक्यात दरवाजावर आवाज झाला.धोंडिबा आणि पांडू दरवाजामागे लपले.दरवाजा उघडून ती बाई आणि सुभाण्या आत आले.त्यासरशी पांडू आणि धोंडीबाने पोलादी पंज्याने तोंडावर हात ठिवून त्यांना पकडले.

सुंदराने चपळाईने हत्यारे काढून घेतली.रूपा आणि मोहनाने त्याला बांधून टाकले.तोवर अब्दुल आणि सखाराम कोपऱ्यात टाकलेली हत्यारे घेऊन आले.

सुंदराने त्या बाईच्या गळ्याला खंजीर लावला,"इचारते ते गुमान सांगायचं.न्हायतर एका झटक्यात गळा चिरीन कोंबडीगत."

तिने गुपचूप मान हलवली.तस सुंदराने विचारले,"आम्हाला कुठं ठिवल हाये?हितुन डेरे गावाला जायला वाट कोणती हाये?"


तशी ती बोलायला लागली,"हित आधी गाव व्हत.पर सगळं धुळधाणीत निघाल.गनिमानी वाट लावली. म्या पाऱ्या रामोशाची पोरगी हाये.जीव जगवायला काय करावं आक्का?"


तशी रूपा चिडली,"आग म्हणून काय माणसांना इकती व्हय?कष्ट करून खा."


तशी ती म्हणाली,"मला बराबर घेशीला तर पडलं ते काम करते.पर मला सोड आक्का."

धोंडिबा म्हणला,"बाहेरची माणसं?"


सुभाण्या म्हणाला,"ती आमची न्हाईत.आमाला फक्त जीव जगवाया पुरत मिळतंय."धोंडिबा म्हणाला,"ठीक आहे.इथून बाहेर पडल्यावर ठरवू काय करायच."


सुभाण्याने बाहेरच्या लोकांना शिळ घातली.तसे ते चारही जण एकदम आत घुसले.आतल्या परिस्थिती बाबत बेसावध असल्याने त्यांना लगेचच तलवारीच्या जोरावर गुडघे टेकायला भाग पाडले.अब्दुल आणि सखारामने त्या चौघांना करकचून बांधले.सगळेजण बाहेर आले.सगळं सामान घेतलं.

तेवढ्यात सुभाण्या म्हणाला,"ये चिमणे चल लवकर.आग खानाची माणसं यायच्या आत पळायला पायजे."


तिचे चिमणी नाव ऐकून अब्दूलला हसायला आले.आता अंधारात प्रवास करावा लागणार होता.अगदी काहीही झाले तरी गाव गाठावे लागणार होते.


चिमणी आणि सुभाण्या चांगले माहीतगार होते.जंगलवाटा त्यांच्या सरावाच्या होत्या.झपाझप पावले टाकत सगळे डेरे गावाच्या दिशेने निघाले.आज नाईक तिथे भेटणार होते.त्यानंतर मात्र नाईक भेटणार नव्हते.त्यामुळे आजच गाव गाठणे आवश्यक होते.वाटेत येणारे काटेकुटे,खाच खळगे बाजूला करत सगळे चालत होते.डोंगर चढून गेल्यावर समोर गावातले दिवे दिसू लागले.तसे सगळ्यांना हायसे वाटले.


चिमणी म्हणाली,"दादा,आपल्याला खालच्या अंगांनी वड्यातून जावं लागलं.तिकडं गस्त नसती."

रूपा म्हणाली,"का?तिकडं का नसती गस्त?"

चिमणी हसून म्हणाली,"तिकडं मसणवटा हाये नवं."

धोंडिबा म्हणाला,"शाबास,हुशार हैस चिमणे.आज आपल्याला नाईकांना भेटायच हाये."सगळेजण चिमणीच्या मागून चालू लागले.

नाईक भेटतील का?काय असेल पुढील योजना?चिमणी आणि सुभाण्याच काय करतील नाईक?