Login

मी मानिनी ! मी मर्दिनी ! भाग 37

मोहिमेचा अखेरचा थरार सुरू.काय होईल पुढे?


(सदर कथानक इतिहासाच्या पार्श्वभूमीवर असले तरी कोणत्याही ऐतिहासिक सत्याचा दावा करत नाही. सदर कथा पूर्णपणे काल्पनिक आहे)


मागील भागात मोहना आणि धोंडीबाने मोऱ्यांच्या गढीत काम मिळवायचे प्रयत्न सुरू केले. पांडू आणि रूपा वेशीच्या जवळ शेती अवजारे विकायला बसणार होते.नाईकांचा निरोप होता त्याप्रमाणे उद्या काही हत्यारे पोहोचवायची होती. आता पाहूया पुढे.


सुंदरा हत्यारे घेऊन जाणार होती.धोंडिबाला सदूने आपल्याबरोबर घेतले.मोहना आणि चिमणी पुजाऱ्याच्या वाड्यावर निघाल्या.सदूने पागेतल्या प्रमुखांकडे धोंडीबाला नेले,"सरकार,ह्यो लांबचा पावणा हाये.इकडं पॉट भरायला आलाय.आपल्या हित कायबाय काम मिळालं तर.."

प्रमुखाने धोंडीबाकडे पाहिले,"चांगला मजबूत हायेस. काय काम येत तुला?"

धोंडिबा डोकं खाजवत म्हणाला,"शेती भातीची समदी काम येत्यात मालक."

प्रमुख म्हणाला,"हिथ घोड्यांला खायला घालणं, त्याची बयजवारी करणं.ही काम करावी लागत्याल."

धोंडिबा हात जोडून म्हणाला,"सांगाल ती समदी काम करीन सरकार."
तस पागाप्रमुख हसला,"मंग लाग कामाला.इथं कामाशी काम ठिवायचं,उगा चौकशा करायच्या न्हाई.सदू घे तुझ्या हाताखाली."

मोहना आणि चिमणी गोदावरीबाईंकडे पोहोचल्या.गोदावरी म्हणाली,"मी ह्यांना विचारलं आहे.आजपासून कामाला या.साफसफाई,स्वयंपाकघरात मदत आणि पाणी भरणे,शेणसडा ही सगळी कामे करावी लागतील."

मोहनाने तिचे पाय धरले,"लई उपकार झाले आक्कासाब. समदी काम नीट करू आमी."


गोदावरीबाई हसल्या,"चला मग तिकडे परसात विहीर आहे.पाणी भरायला घ्या.गोविंदा यांना घेऊन जा रे."



सुंदराने विचार केला की आता हत्यारे पोहोचवायला गावात फिरायला लागणार. त्यासाठी काय युक्ती करावी?अचानक सुंदराला कल्पना सुचली.तिने कपाळावर मळवट भरला.हातात देवीचा मुखवटा आणि डोक्यावर देव्हारा घेतला.देव्हाऱ्यात तलवारी आणि खंजीर लपवले.सखाराम आणि अब्दूलला पोतराज बनवले आणि निघाली.


नाईकांच्या माणसांनी तिला सगळे समजावून सांगितले होतेच.ठरलेल्या घराजवळ येताच सुंदराने गाणे म्हणायला सुरुवात केली,"आई ग लखाबाई तुझं गुंजावानी डोळं...."


कडकलक्ष्मीचा खेळ पहायला सगळे बाहेर आले.ज्या घरात जायच आहे त्या घरातील पुरुषाला आशीर्वाद देताना सुंदरा म्हणाली,"आई आज तुमचं भल करायला आलीय.तिचा आशीर्वाद घ्या.आईला घरात घेऊन वटी भरा."सुंदराने आपले काम सुरू केले.



मोहनाने वाड्याच्या मागील बाजूचे निरीक्षण सुरू केले.ती हसत गोविंदाला म्हणाली,"ही भली मोठी भिंत कशाची म्हणायची व?"

गोविंदा ओरडला,"ये तारे,तुला कशाला चांभारचवकाशा?"

तस चिमणी म्हणाली,"आव तस न्हाय दादा,पर हेवडी मोठी भिंत पायली न्हाई कधी."गोविंदा म्हणाला,"मोरे सरकारांच्या वाड्याची भीत हाये ती."

तशी मोहना येड्याचा आव आणत म्हणाली,"म्हंजी गंगाधर शास्त्री ह्येवडी मोठी भित वलांडून जात्यात व्हय पूजा करायला."

तसे गोविंदा डाफरला,"तुमी गप पाणी भरा.उगा कशात नाक खुपसू नगा."

धोंडिबा घोड्यांना खायला घालत असताना सहज म्हणाला,"सदू,एवढी मोठी पागा तर बादशहा कड बी नसलं.किती घोड आस्त्याल र?"

सदू भोळेपणाने सांगू लागला.धोंडिबा सगळे तपशील नीट लक्षात ठेवत होता.


इकडे नाईक प्रचंड अस्वस्थ येरझाऱ्या घालत होते.जोत्याजी म्हणाला,"नाईक,आव जरा दमान. व्हईल समद नीट."

नाईक चिडले,"जोत्याजी दोन दिसात राज मोहिमेला निगत्याल.त्याआधी समदी तजवीज व्हाया पायजे का नको?अजून स्वराचा पत्ता नाही."

तेवढ्यात लांबून खुणेची शीळ ऐकू आली.नाईक आणि जोत्याजी सावध झाले.स्वार येत होता.नाईकांच्या पुढे आल्यावर स्वार बोलू लागला,"नाईक ,जावळीच्या दोन्ही बाजूनी मदत यिवू शकते.ती रोखण्यासाठी राज दोन्ही बाजूनी चाल करणार हायेत.पर हित सगळी व्यवस्था चोख असायला पायजे."


नाईकांनी स्वराला सांगितलं,"काळजी नसावी,लवकरच मोऱ्यांच्या गढीतली समदी माहिती मिळलं."


इकडे रुपाजी आणि बिजली सज्ज होते.दोनशे तरुण त्यांनी गोळा केले होते.नाईकांनी ईशारा दिला आणि वेगवेगळ्या जंगलवाटेने हे सगळे जावळीच्या दिशेने निघाले.



सुंदराने पहिल्या घरात प्रवेश केला.सुंदरा देव्हारा घेवून आत येताच दरवाजा बंद झाला.समोरच्या तरुणांनी शब्द उच्चारले,"जय भवानी!"
तसे सुंदराने उत्तर दिले,"हरहर महादेव!"

खूण पटली.पण त्या तरुणाला कळेना की हत्यारे कुठे आहेत?तसे सुंदराने देव्हाऱ्यात मूर्तीच्या खाली ठेवलेली हत्यारे काढली.तलवारी आणि खंजिरी दिल्या.तो तरुण म्हणाला,"माय,एवढं धाडस केलं. आपलीच जित व्हणार बघ."

सुंदराने त्याला म्हंटले,"व्हय लेकरा,तुम्ही समदी ह्या राक्षसांशी लढायला जीवाची बाजी लावताय. त्यात आमचा खारीचा वाटा."

तो तरुण सुंदराच्या पाया पडला,"आक्षी माझ्या आईवानी बोललीस बघ."

सुंदराने तोंडभरून आशीर्वाद दिला,"मोहीम फत्ते करूनच या."


सुंदरा दुसऱ्या घराकडे वळली.चिमणी आणि मोहना काम करताना बारकाईने नजर ठेवून होत्या.काम करता करता गोदावरीबाई आणि इतर नोकरांकडून मिळेल तेवढी माहिती गोळा करत होत्या.मोहना गोदावरीबाईना म्हणाली,"आक्का,ही गढी तर लई मजबूत हाये व.बादशहा सुद्धा जिकू शकणार न्हाय."


गोदावरीबाई म्हणाल्या,"हो,गढीची सुरक्षा करायला खुप गुप्त उपाय आहेत."त्या पुढे बोलणार एवढ्यात बाळ रडायला लागले आणि बोलणे तिथेच थांबले.


दिवसभर कामे करून सगळे संध्याकाळी परत आले.आल्यावर धोंडीबाने लगेच तपशील लिहायला घेतला.घोड्यांची एकूण संख्या,तरुण घोडे,आजारी घोडे.सगळा तपशील लिहून काढला.उद्या तो नाईकांना पोहोचवायचा होता.मोहनाने सुद्धा मिळालेली माहिती सांगितली.गढीच्या सुरक्षेसाठी काही गुप्त उपाय आहेत.आता ते शोधायला हवेत.


सुंदराने सगळी हत्यारे पोचवली होती.रूपा आणि पांडूने आज नवीन आलेली हत्यारे ताब्यात घेतली होती.ती योग्य जागी लपवायची होती.आज रात्रीच.सुंदरा म्हणाली,"चला,दोन घास खाऊन घ्या."

पांडू म्हणाला,"आपल्याला सावध रहायला पायजे.सगळीकडून माणस फिरत हायेत."

मोहना म्हणाली,"व्हय,आमी काम करताना पण आमच्या आजूबाजूला काहीजण अस्त्यात लक्ष ठिवून."


इकडे रायगडावर खुद्द महाराज सदरेवर होते.समोर आऊसाहेब होत्या.


महाराज पंतांना म्हणाले,"मोऱ्यांचा बदअंमल आता खपवून घेणे नाही.आम्ही मध्यस्थी केली म्हणून चंद्रराव गादीवर बसला."

आऊसाहेब म्हणाल्या,"शिवबा,आपण त्यांना संधी दिलीत. स्वराज्याची सेवा करावी असे समजूनही सांगितले.आता हा बंडाचा झेंडा मोडून काढा."


राजांनी चिटणीसाला सांगितले,"फर्मान लिहा,चंद्रराव मोरे यांसी राजे शिवाजीराजे भोसले यांचा प्रणाम.आपण करत असलेली कृत्य रयतेच्या हिताला बाधक आहेत.स्वराज्य हे आपल्या लोकांसाठी आहे.आपणाला यापूर्वीही समज दिली.तरीही आपण बदअंमल करत आहात.बंड केलिया मारले जाल."

राजांनी आऊसाहेबांकडे पाहिले.आऊसाहेबांची रजामंदी दिसताच राजांनी हुकूम दिला,"लगेच फर्मान जावळीला रवाना करा."सदरेवरील बैठक संपली.



रुपाजी आणि बिजलीने सगळ्या मावळ्यांना गढीत बोलावले.रुपाजी म्हणाला,"गड्यानु, आता ती येळ आलीय.आपल्याला नाईकांचा सांगावा आलाय.आजवर लई सहन केलं. आया बहिणींवर झालेल जुलूम.गाव शिवाराची नासधूस.देवांचा अपमान.पर आता न्हाई.बोला हरहर....."

त्या सर्व मावळ्यांनी एक कंठाने जयघोष केला,"महादेव...."


रुपाजी म्हणाला,"आता आपल्या लोकांनी धा जणांची टोळी करायची आन जावळीच्या जंगलातून निघायचं. महाराजांचे सैन्य गडावरून निघालं की त्यांच्यापुड आपुन निघू."


एकजण म्हणाला,"आता जगायचं स्वराज्यासाठी आन मरायकबी स्वराज्यासाठी.लई भोगल आजवर.आता ह्ये थांबायला पायजे."सगळेजण एका अनामिक भावनेने भारले होते.तो मंत्र होता स्वराज्याचा,तो मंत्र होता शिवबाराजे.



इकडे जेवण झाल्यावर धोंडिबा बाहेर येऊन बसला.समोर सदूची बायको त्याच्या तान्ह्या बाळाला दूधभात भरवत होती.धोंडिबा खुपवेळ ते दृश्य पहात होता.त्याच्या डोळ्यात पाणी होते.इतक्यात मोहना हळूच येऊन मागे उभी राहिली,"काय पाहताय एवढ?"


धोंडिबा म्हणाला,"आईच्या हातून किती गोड लागत असलं ना घास.असा घास घालणारी आई नाही."


मोहनाने त्याच्या खांद्यावर हात ठेवला,"सुख वाटलं की वाढत आन दुःख कमी होत."


धोंडीबाने हळूच डोळे पुसले,"खविसखान नावाच्या राक्षसाने माझी आई हिरावून घेतली."एवढे बोलून तो गप्प झाला.मोहनाला मात्र हे नाव ती सतत ऐकतेय हे आठवत होते.


ती काही बोलणार एवढ्यात एक म्हातारा आला,"पोरी,आजच्या रात हित पालाबाहेर पडू का ग?"


मोहनाने त्याला पाहिलं,तिला वाटलं हा तोच आहे ज्याला आपण खायला दिलंय. तिच्या मनात शंका आली.तरीही म्हाताऱ्याचा हेतू जाऊन घेण्यासाठी तिने त्याला बाहेर झोपायची परवानगी दिली.


इकडे नाईकांनी धाडसी बेत आखला.वेषांतर करून चंद्रराव मोऱ्यांच्या शाही शिक्का कट्यारीचा वापर करून गोंधळ उडवून द्यायचा.त्यासाठी तयारी सुरू केली.नाईक जोत्याजीला म्हणाले,"मी सकाळपर्यंत परत आलो न्हाय तर मोहिमेची पुढची काम तू करायची.महाराजांनी वकील पाठवला आहे.पण मोरे ऐकणार नाही."

जोत्याजीने नाईकांना मुजरा केला,"बिनघोर रहावा,स्वतःला जपा नाईक."


नाईक वळले आणि कामगिरीवर निघाले.ज्योत्याजी पाठमोऱ्या नाईकांना पाहून मनात म्हणाला,"तुमी परत आला न्हाई तर पार पाताळात शोध घिऊन तुमाला शोधलं हा ज्योत्याजी."


काय होईल पुढे?नाईक परत येतील?मोहनाने आसरा दिलेला म्हातारा कोण असेल?