मागील भागात बहिरजींनी आता थेट वेषांतर करून मोऱ्यांच्या गढीत घुसायचे ठरवले.इकडे राजांचा वकील शेवटचा प्रयत्न करण्यासाठी पोहोचला होता.सुंदरा,मोहना आणि धोंडिबा आपापली कामगिरी करत होते.आता पाहूया पुढे......
मोहनाने त्या म्हाताऱ्याला आश्रय दिला.तरीही तिचे मन साशंक होते.डोळे आणि कान सदैव उघडे ठेवा आणि कोणावरही विश्वास ठेवू नका.हा बहिर्जी नाईकांनी शिकलेला धडा तिला ह्या म्हाताऱ्यावर विश्वास ठेऊ देत नव्हता.हा म्हातारा आपला पाठलाग करत आहे असे सतत तिला जाणवत होते.ती रूपाला म्हणाली,"रूपे,ह्ये म्हातारं आदी दिसलेलं का आपल्याला."रूपाने म्हाताऱ्याला नीट पाहिले.ती अचानक ओरडली"आग व्हय की,चिमणाजी देशमुख गायब केला तवा हे म्हातारं आल व्हय जेवण मागायला.त्याला एक हात न्हाई,त्यामुळं लक्षात राहील."मोहना म्हणाली,"रूपे,ह्यो म्हातारा हेर बिर नसल ना."रुपा विचारात पडली,"ह्यो इचार माझ्या मनात आलाच न्हाई. पर म्हाताऱ्यावर लक्ष ठेवायला पाहिजे."रुपा आणि मोहना दोघीही सावध झोपल्या होत्या.काही झाले तर म्हातारा पळून जाऊ नये म्हणून नजर ठेवून.
बहिर्जी आता आर या पार अशा भूमिकेने मोऱ्यांच्या गढीत घुसणार होते.काहीही झालं तरी वाड्याचा नकाशा आणि मोऱ्यांची नेमकी योजना काय?ह्याबद्दल छडा लावायचा होता.बहिर्जी वेषांतर करण्यात पटाईत.चंद्रराव मोऱ्याचा विश्वासू आणि त्याचा चुलतभाऊ हनुमंतराव बाहेर मोहिमेवर होता.पुढील एकदोन दिवसात परत येणार होता.हीच संधी साधून माहिती मिळवायची नाईकांनी ठरवले.
इकडे रुपाजी आणि बिजलीने दोनशे मावळे तयार ठेवले होते. जावळीकडे जाणाऱ्या दोन्ही मार्गांकडे रुपाजी लक्ष ठेवून होता. रडतोंडीचा घाट आणि निसाणीचा घाट दोन्हीकडून जावळीवर चढाई शक्य होती.बहिर्जी वाड्यात घुसले.रुबाबदार चाल,हुबेहूब आवाज,दाढी यामुळे पहारेकरी त्यांना ओळखू शकले नाहीत.त्यांनी हनुमंतराव समजून बहिर्जीना आत सोडले.आता वाड्यात हनुमंतराव म्हणून वावरत लवकरात लवकर शक्य तेवढी माहिती मिळवून बाहेर पडायचे होते.
इतक्यात एक सेवक धावत आला,"काकासाहेब आपल्याला राजांनी दालनात बोलावले आहे."
नाईकांनी विचारले,"आता,लगेच.आम्ही जरा थकलो आहोत."
नाईकांनी विचारले,"आता,लगेच.आम्ही जरा थकलो आहोत."
सेवक म्हणाला,"शिवाजीराजे हल्ला करतील आशी भीती बसलीय त्यांच्या मनात.सकाळपासून मद्य पिऊन नुसता विचार करत बसल्यात."
बहिर्जी हसले,आता काही तो ओळखू शकणार नाही.एवढे जाणून ते सेवकाबरोबर निघाले.
बहिर्जी हसले,आता काही तो ओळखू शकणार नाही.एवढे जाणून ते सेवकाबरोबर निघाले.
मोहना आणि चिमणी आज कामाला आल्यावर बारीक लक्ष ठेवून होत्या.वाड्यात देवपूजा करायला गंगाधर शास्त्री जातात पण ते कुठून आणि कसे? आज पहाटे गंगाधर शास्त्री वाड्यात अखंड अभिषेक करायला जाणार होते.मोहना एकीकडे काम करत असताना दुसरीकडे लक्ष ठेऊन होती.तेवढ्यात गोदावरी बाई म्हणाल्या,"तारे,जरा बाहेर जाऊन दूध घेऊन ये हो."मोहना बाहेर पडली आणि गंगाधर शास्त्री आत शिरले.
चिमणी सावध होतीच.तिने थोड्या वेळाने दरवाजा ठोकला,"बायसाब,तुमासणी बोलावल हाये.तिकड सैपाक खोलीत."
गोदावरी बाई आतूनच म्हणाल्या,"तू हो पुढे.मी आलेच हो."
चिमणी मुद्दाम पाय वाजवत पुढे गेली आणि नंतर दबक्या पावलांनी लपून राहिली.गोदावरीबाईंनी दरवाजा उघडला.इकडे तिकडे बघितले आणि त्या चालू लागल्या.चिमणी पटकन आत घुसली.शास्त्री कुठेच दिसत नव्हते.म्हणजे इथून वाड्यात जायला गुप्त मार्ग होता.आता तो शोधायला हवा.
तितक्यात बाहेर चाहूल लागलेली पाहून चिमणी बाहेर आली.इकडे गोदावरी बाई पोहोचायच्या आत मोहना समोरून आली,"बायासाब, आवो त्ये तुमचं साफसफाई करायचं काम रहायल हाय."तितक्यात समोरून गोदावरी बाईंकडे पाहून आलेले दिसले.गोदावरी बाई तिकडे वळल्या.
गोदावरी बाई मोहनाला म्हणाल्या,"पाहुणे जाऊ दे मग सफाईचे बघू.आता तू जा."
मोहना तिथून निघाली.चिमणी आणि मोहना पाणी भरायला मागील दारी गेल्या.चिमणी म्हणाली,"त्या खुलितून रस्ता हाय.म्या आत गेले तवा पंत कुठ दिसलेच न्हाईत.पर आता हुडकायच कस?"
चिमणी हे बोलत असताना मोहना मनात योजना आखत होती.पाणी भरत असताना ती सगळीकडे लक्ष ठेऊन होती.बऱ्याच वेळाने चिमणी आणि मोहना गोदावरी बाईंच्या खोलीत गेल्या.जाताना बैठकीत पंत आहेत हेसुद्धा पाहिले.गोदावरी बाई म्हणाल्या,"तारे,चिमणे थंडीचे दिवस आहेत.जरा अंथरुणाना उन दाखवा आणि खोली साफ करायची नीट."
चिमणी म्हणाली,"आस करा, तुमी बाळाला घिऊन बाहिर बसा. आमी करतो साफसफाई."
गोदावरीबाई चिडल्या,"आम्ही इथे समोर बसून असणार.समजले."
काम सुरू झाले.मोहनाने इशारा करताच चिमणीने पदरात लपवलेली पुडी सोडली आणि हळूच गोदावरीबाईंच्या मागून फुकली.थोड्या वेळातच त्या झोपी गेल्या.
मोहना आणि चिमणी शोध घेऊ लागल्या.चिमणी दारावर लक्ष ठेवून होती.मोहना सगळीकडे शोधत होती. फडताळ,खिडक्या,झालच तर भिंतींवर सुद्धा चाचपून पाहिले.तरीही काही हाती लागत नव्हते.चिमणी तिला घाई करत होती.एवढ्यात बाळ हलले म्हणून ती जवळ गेली.बाळाच्या पाळण्याला एक मूठ वेगळी होती.मोहनाने मूठ फिरवली.त्याबरोबर पलंगाखाली असलेले तळघराचे दार उघडले.मोहनाने पटकन कळ फिरवून दार बंद केले.नंतर सगळी सफाई करून मोहना आणि चिमणी बाहेर पडल्या.गोदावरी जागी झाली.पण तिला विशेष काही आठवले नाही.
धोंडिबा आणि सदू काम करत असताना सदुला विचारले,"मालकांनी नवे घोडे घेतल्यात.का वो?"
सदू इकडेतिकडे बघत म्हणाला,"जावळीवर हल्ला व्हइल आस वाटत हाय त्यांना."
धोंडिबा भोळेपणा दाखवत म्हणाला,"आवो पर ह्या जंगलात घोड्यांचा काय उपेग?"
धोंडिबा भोळेपणा दाखवत म्हणाला,"आवो पर ह्या जंगलात घोड्यांचा काय उपेग?"
तसा सदू हसला,"गढीच्या तटबंदीवरून घोडा चालत जाईल एवढी जागा हाय.ती वाट तिकड रडतोंडीच्या घाटात जातीय आस आईकल हाय."
धोंडिबा म्हणाला,"छ्या,खालून एवढी मोठी न्हाई वाटत भित."
सदू म्हणाला,"तुला बगायची का?"
धोंडिबा साळसूदपणे म्हणाला,"व्हय."
सदू म्हणाला,"ह्या हित एक चोरवाट हाय.म्या गुपचूप बघून ठीवली हाय.उद्या तुला वर घेऊन जातो."
धोंडिबा म्हणाला,"उद्याचा काय भरोसा?आजच न्या की."
सदू आणि धोंडिबा आत घुसले.धोंडिबा पुढे चालत असताना सदूने त्याच्या पाठीला खंजीर लावला,"तुझा त्यो बहिर्जी स्वतला लई भारी समजतो.तुमच्या समद्यावर माझी नजर हाय.चल आता तुला कोठडीत डांबतो."
इतक्यात धोंडिबा खाली वाकला आणि त्याने मांडीवर वार केला.सदू कोसळला.धोंडिबाने त्याच्या मांडीत खंजीर रोवला आणि मान पकडत विचारले,"कोण कोण हाये तुमि?सांगितलं तर जंगलात जिवंत सोडील न्हायतर.."
धोंडिबाला सदुने नाव सांगितली.तशी धोंडिबाने एका झटक्यात सदुची मान मोडली.
धोंडिबाला सदुने नाव सांगितली.तशी धोंडिबाने एका झटक्यात सदुची मान मोडली.
मोहना,चिमणी आणि धोंडिबा मुक्कामी ठिकाणाकडे वेगाने निघाले.इकडे अब्दुल आणि सखारामने मोऱ्यांच्या सैन्यात नोकरी मिळवली.तेही घराकडे निघाले.आता लवकर सगळे सांगायला हवे.इकडे जोत्याजी बैचेन होता.मध्यरात्र उलटून गेली.नाईक अजून आले नव्हते. \"नाईकांना काही दगाफटका झाला नसल ना?\" जोत्याजी शंका मनात येऊन बैचेन होत होता.
महाराजांचा वकील मोऱ्यांच्या दरबारात पोहोचला.चंद्रराव मोरे महाराजांनी पाठवलेले पत्र वाचून संतापाने ओरडला,"जावळी जिंकणे पोरांसोराचा खेळ वाटला काय?जाऊन सांग तुझ्या राजाला."
वकील म्हणाले,"आपण सामंजस्याने विचार करा. रंगो वाकड्याला आमच्या हवाली करा.स्वराज्याच्या गुन्हेगाराला आश्रय देऊ नका."
तरीही चंद्रराव मोरे ह्यांनी प्रस्ताव धुडकावला.वकील बाहेर पडताच मोऱ्यानी चिटणीसाला आज्ञा दिली,"मुबारकखान आणि खावीसखान शेजारी आहेत.आजच मदतीचे खलिते रवाना करा."
धोंडिबाने घडलेला प्रकार सांगितला.सदुचे साथीदार सावध व्हायचे आधी आपल्याला काम फत्ते करावे लागेल.तेवढ्यात जोत्याजी धावत आला,"दगा झाला.नाईक वाड्यात शिरल्यात.पण बाहीर आल नाहीत.नाईकांना सोडवायला पायजे."
मोहना म्हणाली,"म्या आणि धोंडिबा नाईकांना सोडवू."
जोत्याजी म्हणाला,"सदुच्या साथीदारांना आम्ही संपवतो.सुंदराबाई आज वाड्यातून निरोप बाहेर पडलं.खलिते मिळवा.राज यायच्या आधी नाईक सुटले पाहिजे."
इकडे खविसखान आणि मुबारकखान यांचे खलिते गुप्त दाराने बाहेर पडले.जोत्याजीच्या माणसाने हे येऊन सांगताच तो सुंदराला म्हणाला,"तुमि अब्दुलला रुपाजी आणि बिजलीला निरोप द्यायला पाठवा.दोन्ही खानाना जंगल वाटेने रोखून धरायला सांगा."
सुंदरा म्हणाली,"मी स्वतः त्यांना रोखायला पुढे असेल.आधी नाईकांना सोडवा."सगळेजण आपापल्या कामगिरीवर निघाले.
नाईक सुटणार का? रंगो वाकड्याला सजा मिळणार का? खविसखान परत समोर येणार का? सुंदराला अजून काय काय पहायला मिळणार?
वाचत रहा.मी मानिनी...
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा