Login

मी मानिनी ! मी मर्दिनी ! भाग 39

मोहिमेचा थरार आणि सुंदराच आयुष्य दोन्हींनी एका थरारक टप्प्यावर



भाग 39
(सदर कथानक इतिहासाच्या पार्श्वभूमीवर असले तरी कोणत्याही ऐतिहासिक सत्याचा दावा करत नाही. सदर कथा पूर्णपणे काल्पनिक आहे)


मागील भागात बहिर्जी परत आलेच नाहीत. जोत्याजी आणि बाकी सगळ्यांनी एकत्र येऊन पुढची कामगिरी ठरवली.नाईक सापडतील का?शिवाजीराजे चालून यायच्या आधी मोऱ्यांच्या गढीत काय काय होईल?


सदू परत आला नाही.त्यामुळे मोरेंच्या गुप्तहेर खात्यातील ह्या कामगिरीवर असणारी माणसे सावध हालचाली करून त्याचा शोध घ्यायला निघाली.इकडे अब्दुल निरोप घेऊन निघाला.रुपाजी आणि बिजली दोघांनी तयार केलेले सैन्य आता कामी येणार होते.ही कमाल होती नाईकांच्या दूरदृष्टीची. पण नाईक कुठे होते?मोऱ्यांच्या वाड्यात नाईकांबरोबर नक्की काय घडले होते?


बहिर्जी हनुमंतराव मोऱ्यांच्या वेशात आत गेले.त्यानंतर चंद्रराव त्यांना ओळखू शकला नाही.सगळी योजना त्याने बहिर्जी नाईकांना सांगितली.बहिर्जी काम साधून निघाले.आत आलोच आहोत तर थोडी अधिक माहिती मिळवावी म्हणून ते रेंगाळले आणि इथेच घात झाला.खुद्द हनुमंतराव परत आले.दरवाजातच त्यांना पहारेकऱ्याने अडवले.आताच काकासाहेब आत गेले असे सांगून.

हनुमंतराव मुत्सद्दी आणि हुशार होते.त्यांच्या लक्षात आले.त्यांनी पहारेकरी शिपायांना शाही अंगठी दाखवली,"मगाशी आत गेला त्याचाकड अंगठी होती का?"

पहारेकरी मान खाली घालून म्हणाला,"खुद्द तुमि हायेसा,म्हणून तपासली न्हाय जी."

हनुमंतराव म्हणाले,"चारही दरवाजातून कोणाला बाहेर पडू देऊ नका."

आत सगळ्या वाड्याची झडती सुरू झाली.इकडे खुद्द हनुमंतरावांच्या दालनात कागदपत्रे पाहणाऱ्या नाईकांना याची कल्पना आलीच नाही.कान आणि डोळे नेहमी उघडे ठेवणारा स्वराज्याचा गुप्तहेर आज फसला होता.हनुमंतराव मोरे आणि सैनिकांनी नाईकांना पकडले.

चंद्रराव म्हणाला,"काका,ह्याच मुंडक मारा आता."
हनुमंतराव म्हणाले,"मुंडके मारू,पण आता नाही.ह्याचे राजे आणि हा दोघांचे एकत्र.घेऊन जारे याला."नाईक कोठडीत बंद झाले.


मोहना,चिमणी आणि धोंडिबा तिघांनी नाईकांना शोधायची कामगिरी घेतली.खावीसखान नाव ऐकून सुंदरा चिडलेली धोंडिबाने पाहिले होते.तरीसुद्धा आधी नाईकांचा शोध घेणे आवश्यक होते.सकाळ झाली तसे सुंदरा आणि चिमणी कामावर आल्या.चिमणी आणि मोहना दोघीही सावधपणे काम करत होत्या.दुपारी जेवण घेऊन येताना चिमणीने गुंगीचे औषध मिसळले.बाळाच्या गुटित जास्तीचे जायफळ उगळून बाळ झोपेल याचीही व्यवस्था केली.

गोदावरीबाई झोपी गेलेल्या पाहून मोहनाने धोंडिबाला इशारा केला.धोंडिबा आणि मोहना गुप्त दाराने आत गेले.चिमणी बाहेर थांबली.इकडे सुंदराने अब्दुल बरोबर निरोप दिला.तिने खाविसखान नाव ऐकताच त्याला आता संपवायचा हे ठरवले.अब्दुल निरोप घेऊन निघाला.सुंदरा आणि रुपा दोघींनी हत्यारे जमा केली.

सुंदरा रूपाला म्हणाली,"रुपा,फडावर जा. बकुळामावशी आणि बजाकाका यांना बोलावून आण.आपल्या सगळ्या माणसांना तयार करायला पाहिजे."रुपा आजूबाजूला नजर ठेवत निघाली.


बकुळामावशी आणि बजाकाका रूपाला पाहून हरकून गेले.ते दोघे आणि तुळसा बाहेर पडले.येताना बकुळा मावशीने एक पिशवी बरोबर घेतली.झपाझप पावले टाकत सगळेजण चालत गावाबाहेर आले.पाले आणि ती वस्ती पाहून बकुळाच्या डोळ्यात पाणी आले.

सुंदरा समोर दिसताच बकुळाने तिला मिठीत घेतले,"पोरी,किती सोसल,कशी रायलीस?"

सुंदरा म्हणाली,"मावशे,महाराजांनी चेतावलेल्या ह्या स्वराज्याच्या अग्नीत आपला हा खारीचा वाटा."

तेवढ्यात मावशीने पिशवीतून पितळी डबा काढला,"पोरी,आज पिठल भाकरी केली.पिठलं करताना तुझी लई आठवण येत व्हती.पोटभर खाऊन घे."

बजाकाका लांबून डोळे पुसत होता.सुंदरा कितीतरी दिवसांनी तिच्या प्रेमाच्या माणसांना भेटत होती. सुंदराने तुळसाला सगळे समजावून सांगितले,"तुळसा माझी सगळी माणसे हत्यारे चालवतात. फडावर पन्नास माणसे असतील.सर्वांना हत्यार द्या.आपल्याला लवकरच एका राक्षसाला संपवायचे आहे."

तुळसा म्हणाली,"व्हय, मावशीनं सांगितलय मला सगळ.ह्यावेळी सोडायचं न्हाई त्याला."

बकुळामावशी, बजाकाका आणि तुळसा हत्यारे घेऊन बाहेर पडले.

सुंदराने केलेला निर्धार तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.ही मानिनी आता पुन्हा एकदा मर्दिनी होऊन लढणार होती.ह्यावेळी फक्त स्वतःसाठी नाही तर स्वराज्यासाठी सुद्धा.मोहना आणि धोंडिबा मोऱ्यांच्या गुढीत शिरले.मोहना म्हणाली,"आता नाईकांना कुठं ठेवलं असल ते शोधायला पाहिजे."

धोंडिबा म्हणाला,"त्यासाठी एखाद्या मातब्बर सरदार गाठायला पाहिजे.त्यानंतर...."

दोघांनी योजना तयार केली.हळूच मागोवा घेतला आणि सुंदराने पहारेकऱ्याला हाक मारली,"दादा,आव दादा."

पहारेकरी मागे वळला.गुडघ्यावर लुगड नेसलेली,गोऱ्यापान अंगाची,लांबसडक केस असणारी मोहना तो बघतच राहिला.तेवढ्यात मोहना परत ओरडली,"आवो शिपाई दादा मला वाचवा."

धोंडिबा पुढे आला,"तुला आता कोण वाचवित बघतोच म्या,चल घरला."

मोहनाला हाताला धरून ओढत होता.तेवढ्यात रंगो वाकडा आला.मोहनाला बघताच लाळ गाळू लागला,"काय चाललं र तिकड?काय गोंधळ हाय?"

मोहना धोंडिबाचा हात झटकून म्हणाली,"सरकार,ह्याच्या बरोबर मला नांदायच न्हाय."

धोंडिबा म्हणाला,"म्या नवरा हाय तुझा.नांदायला पायजेच."

भांडणे वाढत चालली.तेवढ्यात हनुमंतराव आले.त्यांनी मोहिमेची घाई असल्याने हुकूम दिला,"ह्यांना आजच्या दिवस कोठडीत डांबा दोघांना.बरोबर डोकं ठिकाणावर यील."रंगो वाकडा तडफडत राहिला.पहारेकरी दोघांना घेऊन गेले.


योजना सफल झाली होती.आता कोठडीपर्यंत पोहोचले होते.नाईकांना शोधून सोडवणे हे पुढचे काम होते.चिमणी अस्वस्थ होती.गोदावरीबाई शुध्दीवर यायच्या आत ती तिकडून निघाली.जाताना कोणी बघणार नाही याची खात्री करून घेत चिमणी बाहेर पडली.

महाराजांचा वकील राजगडी पोहोचला होता.चंद्रराव मोरे ह्याने उद्दाम उत्तर दिले होते,"दारुगोळी महझूद आहे. काही बेजबाबास खुते घालून लिहिले ते कासियास ल्याहाविले? थोर समर्थ असो."


महाराज संतापले आता समोपचार संपला.महाराजांनी आदेश दिला,"जावळी कडे कूच करायची तयारी करा."मोहीम सुरू झाली. रडतोंडीचा घाट आणि निसानी घाट दोन्ही बाजूंनी हल्ला करायची तयारी झाली.सैन्य निघाले.


जावळी प्रांताच्या पूर्वेस खविसखान आणि त्याचा मुलगा मुबारकखान दोन हजार फौज बाळगून होते.आदिलशाही प्रदेशात प्रवेश करण्याच्या मोक्याच्या जागेवर ते सुभेदार होते.मोऱ्यांच्या दरबारातून मदत मागणीचे पत्र पोहोचले.तेव्हा दोघे बाप बेटे आय्याशी करण्यात मग्न होते.पहारेकरी आत आले.पत्र वाचताच मुबारक म्हणाला,"अब्बु,हे मराठे असे आपस मध्ये लडके मरणार."

खविसखान खुनशी हसत म्हणाला,"आपल्याला पैसे आणी चांगल्या जवान पोरी मिळतील.झालच तर बादशहा शाबासी देईल."

मुबारक म्हणाला,"किधरसे जाना है?"

खविसखान म्हणाला,"हम जंगल के रस्ते जायेगे.सिर्फ दोसो आदमी लेकर. अगर मोरे जित गये तो फायदा हमारा.हार गये तो जंगलसे निकल आयेगे."


पण खविसखान विसरला की ह्या जंगलात एक वाघीण त्याच्या नरडीचा घोट घ्यायला दबा धरून बसली आहे.अब्दुल रुपाजीकडे पोहोचला.जोत्याजीने दिलेला निरोप ऐकताच रुपाजी आणि बिजलिने मावळे गोळा केले.शंभर मावळे महाराजांना मदतीला मागे ठेवले.मोजके शंभर मावळे घेऊन रुपाजी आणि बिजली निघाले.


धोंडिबा आणि मोहना एक खेडवळ नवरा बायको आहेत असे समजून त्यांना कोठडीत डांबले.रात्र झाली.हळूहळू पहारेकरी पेंगु लागले.मोहना आणि धोंडिबा दोघांनी काम सुरू केले. धोंडीबाने कुलूप तोडले.हळूच धोंडिबा आणि मोहना बाहेर आले.मोहनाने चिमणीने दिलेली पावडर कापडावर घेतली आणि सर्वांच्या नाकाला लावली.


नाईकांना शोधत कोठड्या तपासत असताना एका कोठडीत साखळदंड बांधलेले नाईक दिसले.धोंडिबाने दरवाजा उघडला.साखळदंड सोडले.नाईकांना घेऊन मोहना,धोंडिबा निघाले.पण आता रात्री गोदावरी बाईंच्या खोलीतून बाहेर पडता येणार नव्हते.

नाईक म्हणाले,"मी गढीचा नकाशा मिळवला आहे.आपल्याला पलीकडच्या दालनातून बाहेर पडता येईल."


तिघेही चोर पावलांनी दालनात घुसले. रंगो वाकडा पाहून नाईकांचा माथ्याची शीर उडू लागली.पण आता काहीही करण्यात अर्थ नव्हता.गढीत संरक्षणाचे असलेले गुप्त उपाय नष्ट करायला हवे.त्यासाठी नाईक बाहेर असणे गरजेचे होते.तिघेही गुप्त दरवाजाने बाहेर पडले.जंगलातून वाट काढत तिघेही निघाले.

आतापर्यंत दाबून ठेवलेला प्रश्न धोंडिबाने मोहनाला विचारला,"सुंदरा आणि खविसखान यांचा काय संबंध आहे?सुंदरा त्याच्या नावावर एवढी का चिडली?"


नाईक म्हणाले,"मला सुद्धा हे जाऊन घ्यायचं आहे.ह्या मर्दिनीच्या आयुष्यात काय घडलं आहे?"

मोहना थांबली.सुंदरा आक्का माझी आई,बाप ,भाऊ,बहीण सगळ आहे."

धोंडिबा आणि सुंदरा यांचा काय संबंध असेल?मोऱ्यांच्या जावळीवर हल्ला कसा होईल?