Login

मी मानिनी ! मी मर्दिनी ! भाग 40

मोहिमेचा थरार अंतिम टप्प्यावर

भाग 40
(सदर कथानक इतिहासाच्या पार्श्वभूमीवर असले तरी कोणत्याही ऐतिहासिक सत्याचा दावा करत नाही. सदर कथा पूर्णपणे काल्पनिक आहे)

मागील भागात धोंडिबा आणि मोहना नाईकांना मोठ्या धाडसाने सोडवून बाहेर घेऊन आले.इकडे अब्दूलने दिलेला निरोप रुपाजीला मिळाला.त्याप्रमाणे रुपाजी माणसे घेऊन निघाला. फडातील लोकांना तुळसाने हत्यारे पोहोचवली.आता हा मोहिमेचा थरार कसा रंगतोय आणि सुंदराच्या आयुष्यातील कोणते रहस्य उलगडते.


वाड्यातून बाहेर पडत असताना अचानक हल्ला झाला.तीन ते चार पहारेकरी धावून आले.धोंडिबा,मोहना आणि नाईकांनी तलवारी काढल्या.चकमक सुरू झाली.मोहना लढत असताना मागून वार झाला.तेवढ्यात तो वार झेलून वार करणाऱ्याला कोणीतरी संपवले.मोहना मागे वळली.हा तोच एक हात तुटलेला भिकारी होता.

मोहना काही बोलायच्या आत तो म्हणाला,"हितन बाहेर पडा,कामगिरी पुरी झाली की सगळ सांगतो."

विचार करत थांबायला वेळ नव्हता.आणखी सैनिक यायच्या आत सगळेजण बाहेर पडले.नाईकांनी धोंडिबाला सांगितले,"हा नकाशा पहा,ह्यानुसार काही दरवाजे जंगलात उघडत आहे.तिथून हल्ला करतील मोऱ्यांची माणसे."

मोहना म्हणाली,"हो,तिथे आपली माणसे पाहिजेत."

नाईक आता भराभर सूचना देत होते,"आता सगळ्यांनी जंगलातील देवळात जमू.तिथे आपण पुढची योजना ठरवू.मोहना,तू सुंदराबाई आणि तुमच्या सगळ्या माणसांना तिथे घेऊन ये."एवढे बोलून नाईक वेगाने निघून गेले.


धोंडिबा आणि मोहना झपाट्याने चालू लागले.तरीही धोंडिबाने परत तो प्रश्न विचारला,"मोहना, खविसखान आणि सुंदराचा काय संबंध आहे?त्याचे नाव ऐकताच सुंदरा प्रचंड चिडली होती."


मोहना म्हणाली,"सुंदरा म्हणजे मूळची हौसा.पुण्यातील मावळ खोऱ्यातील एका लहानग्या पोरीला हैवानानी पळवल.त्यानंतर हौसाची सुंदरा झाली."

धोंडिबा हे ऐकून स्तब्ध झाला,"किती भोगावं लागल असेल एवढ्या लहान वयात."

मोहना म्हणाली,"हे काहीच नाही.सुंदरा बनून जगणाऱ्या ह्या मुलीला परत हौसा बनवणारा एक जिगरबाज मर्द तिला भेटला. हैबती पाटील त्यांचं नाव."


हे नाव ऐकताच धोंडिबा जरा गडबडला पण स्वतःला सावरुन घेत म्हणाला,"मग पाटलांचा वाडा सोडून हौसा परत सुंदरा कशी झाली?"

मोहना पुढे सांगू लागली,"बुऱ्हाणपूर जवळ खविसखान तेव्हा सुभेदार होता.त्याने सुंदराला पाहिलं आणि घात झाला."

धोंडिबा म्हणाला,"पाटील कुठे होते तेव्हा?"

मोहना म्हणाली,"त्या राक्षसाने आधी हैबतीला दूर पाठवल.त्यानंतर सगळ्या गावासमोर....म्हणून ही मानिनी तिथून बाहेर पडली.ह्या राक्षसाला संपवायचं स्वप्न घेऊन.सोबत आम्हाला जपत राहिली."


धोंडिबाच्या डोळ्यात पाणी होत.तितक्यात समोर सुंदरा दिसली आणि विषय थांबला.


मोहनाने सगळी परिस्थिती सांगितली,"आक्का,आपल्याला नाईकांनी जंगलातील देवळात बोलावल आहे.सर्वांना निरोप द्यायला पाहिजे."

सुंदरा म्हणाली,"आपण गेलो तर आसपास मुबारकची माणसे असतील."

धोंडिबा पुढे आला,"मी जातो,तुम्ही आता इथले आवरून रुपा आणि पांडू,चिमणी,सुभाण्या यांना घेऊन पुढे निघा."


धोंडिबा फडावर निघाला.इकडे सुंदरा सर्व आवरून जंगलच्या वाटेने निघाली. जोत्याजी आणि सखाराम परत आले.धोंडिबा फडावर आला.त्याने तुळसाला सगळे समजावून सांगितले.सुंदराचा निरोप आहे म्हंटल्यावर सगळेजण आवरू लागले.पटापट सगळे निघाले.तरीही मुबारकची माणसे पाठलाग करू लागली.

तुळसाा म्हणाली,"आता ह्या चौघांना वाटेला लावायला पाहिजे आधी."धोंडिबा आणि तुळसा जरा मागे हटले.पाठलाग करणाऱ्या चौघांना त्यांनी एकेक करून संपवले.


नाईक अस्वस्थ येरझाऱ्या घालत होते.तेवढ्यात स्वार येऊन पोहोचला.नाईक अधीर झाले,"राजगडावर काय हालचाल हाय?"

स्वार बोलू लागला,"राज महाबळेश्वर पठारावरून निसाणी घाटातून स्वतः येणार चालून आन रडतोंडी घाटातून दुसरी तुकडी यील बघा."

नाईक म्हणाले,"राज निघालं का?"

स्वार म्हणाला,"व्हय नाईक आता बरीच दौड मारली आसल."

नाईक म्हणाले,"टेहळणी करत रहा.निशाण दिसले की लगेच सांगावा धाडा."

स्वार मुजरा करून निघून गेला.सुंदरा आणि तिची माणसे येऊन पोहोचली.नाईक म्हणाले,"तुमि आजवर स्वतःला.वाचवायला जिगर दाखवून लढला,आता स्वराज्यासाठी लढायच हाय.राज समोरून चालून येणार.पर चोर वाटेनं होणार हल्ल आपल्याला रोखायच हायेत."


सुंदरा म्हणाली,"नाईक,माझी माणस कधीच माग हटणार नाहीत.तुमि फक्त हुकूम द्या."

नाईकांनी वाड्याचा नकाशा दाखवला.चारही बाजूंनी चोर दरवाजे जंगलात उघडत होते.नाईक बोलू लागले,"ह्या दरवाजा मार्फत आपल्या फौजेवर मागून हल्ला व्हईल.हित दबा धरून रहायचं. खविस आन मुबारक जंगल मार्गाने येणार."

सुंदरा म्हणाली,"त्यांना रोखायला मी जाते."

धोंडिबा चटकन म्हणाला,"नाईक यांच्याबरोबर मी थांबतो."

नाईक हसले,"ठीक हाय,मोहना तू मात्र वाड्याच्या आसपास ह्या पोरी घेऊन थांब."नाईक सविस्तर योजना सांगत होते.प्रत्येकास स्फुरण चढत होते.


आजवर जपलेले स्वप्न आता साकार होणार होते.सुंदरा आता सज्ज होती खविसखान नावाचा राक्षस संपवायला.नाईक पुढे सांगू लागले,"राज गडावरून निघाल्यात पठारावर जरीपटका दिसला की आपल्याला सांगावा येईल.आज रात्रीच सगळ्यांनी जागा हेरून ठेवा."


रुपाजी आपल्या साथीदारांसह येऊन पोहोचला.रुपा आणि मोहना बिजलीला पाहून रडू लागल्या.इतक्या दिवसांनी झालेली भेट पाहून सगळ्यांना भरून आले.तेवढ्यात सगळेजण एकत्र झाले.सुंदरा बोलू लागली,"आजवर कित्येक वेळा आपण लढलो.ही शेवटची लढाई.आज हा राक्षस संपला की एक वेगळे जगणे सुरू करायचे."

रात्र व्हायला लागली.सगळेजण आपापल्या नेमून दिलेल्या ठिकाणावर जायला निघाले.


इकडे मुबारक आणि खविसखान वेगळे मनसुबे रचत होते.मदत करायला गेल्यासारखे दाखवायचे आणि जेवढे लुटता येईल तेवढे लुटायचे. खविसखान म्हणाला,"मुबारक,निकलने की तैयारी करो. कल सुबह निकल जायेगे."

मुबारक हसला,"जी अब्बू,रस्ते पर लूट भी करनी है."

जावळीच्या हद्दीत जायची आयती मिळालेली संधी ते सोडणार नव्हते.रस्त्यात येणारी गावे लुटत पुढे जायचे.जंगलात थांबायचे.मोरे जिंकले तर पुढे व्हायचे नाहीतर लूट घेऊन पळून जायचे.इतका कपटी बेत आखला होता.पण जंगलच्या वाटेवर कोणीतरी वाट बघत होत.दोघांच्या पापाची शिक्षा द्यायला.


नाईक अस्वस्थ होते.प्रत्यक्ष राजे मोहिमेवर येणार होते,कोणतीही चूक होता कामा नये.नाईकांना रंगो वाकड्याला संपवायचे होते.त्यासाठी सुद्धा काय योजना आखावी यावर नाईक विचार करत होते.एवढ्यात मोहना तिथे आली,"नाईक,काही अडचण आहे का?तुम्ही चिंतेत दिसताय?"

नाईक म्हणाले,"रंगो वाकडा आत लपून बसलाय.त्याला धडा शिकवायचा आहे."

मोहना म्हणाली,"मी एक सुचवू का?"

नाईकांनी तिच्याकडे पाहिले.मोहना हसत म्हणाली,"ह्याला जाळ्यात फसवून बाहेर आणु."नाईकांनी संमती दिली आणि मोहना कामाला लागली.


मोहनाने चिमणी आणि बीजली दोघींना बोलावले,"बिजले,एक पाखरु बाहेर काढायचे आहे."

बिजली हसली,"एवढंच?करून टाकू."

मोहना म्हणाली,"काम जोखमीचे आहे. रंगो वाकडा."

बिजली चिडली,"म्हंजी हे सगळ ज्याच्यावरून सुरू झालं तो व्हय?"

मोहना म्हणाली,"हो, रंगो वाकडा रोज देवदर्शन करायला वाड्याबाहेर येतो. आपल्याकडं आजचा आणि उद्याचा दिवस आहे फक्त."


बिजली आणि चिमणी लगेच तयारीला लागल्या. रंगो वाकडा महादेवाचं दर्शन घ्यायला बाहेर पडला.बरोबर शिपाई होते.तरीही तो घाबरून होता.बहिर्जी कधीही आपल्याला मारून टाकेल असे त्याला वाटत होते.देवळात आला.दर्शन घेऊन बाहेर पडला इतक्यात समोरून अटकर बांधा, केतकीचा रंग,कुरळे केस,नाजूक कटी आणि ओलेते अंग.अशी एक तरुणी येताना दिसली.तिला बघताच वाकडा लाळ गाळू लागला.


तेवढ्यात चिमणी पुढे झाली,"व्हा बाजूला,बाय बगितली नाय का कदी?"

वाकडा दात काढत म्हणाला,"अशी न्हाय बागितली."


चिमणी रागात म्हणाली,"आमच्या वैनी बायने नवस केला हाय.तो फेडायला आता पुढचं आठ दिस वल्या अंगान देवाच्या दर्शनाला येणार हाय."रंगो वाकडा ती जाईपर्यंत पहात होता.उद्या सकाळी हिला उचलायची.त्याने मनात योजना आखली.



सुंदरा मोजके लोक घेऊन निघाली.हेरांनी आणलेल्या बातमीनुसार मुबारक आणि खविसखान ज्या मार्गावरून आत घुसतील त्या ठिकाणावर दबा धरून थांबायचे होते.धोंडिबा मात्र सुंदराची खूप काळजी घेत होता.तिला खूप जपत होता.तो अचानक असे का वागतोय हे मात्र समजत नव्हते.तरीही सुंदराला आता फक्त एकच ध्येय समोर दिसत होते.तिचे आयुष्य उद्वस्त करणारा आणि तिच्या बाळाला अनाथ करणारा नराधम तिला संपवायचा होता.


मोहनाला बिजली आणि चिमणी दोघींनी सगळे सांगितले.मोहना म्हणाली,"उद्या त्याला दाखवू बाई आई असते तशीच ती कालीसुद्धा असते."


पुढे काय होईल?धोंडिबा आणि सुंदरा यांचे काय नाते असेल?मोहीम फत्ते होईल का?