भाग 42
(सदर कथानक इतिहासाच्या पार्श्वभूमीवर असले तरी कोणत्याही ऐतिहासिक सत्याचा दावा करत नाही. सदर कथा पूर्णपणे काल्पनिक आहे)
मागील भागात आपण पाहिले,मोहिमेचा थरार अंतिम टप्प्यावर आला.मुरारबाजी नावाचा वीर योद्धा महाराजांनी हेरला व त्यांना ताब्यात घेतले.मोऱ्यांच्या गढीवर हल्ला करायला आता एकच अडसर होता तो म्हणजे प्रवेद्वाराजवळील उकळती तेलाची कढई.इकडे खविसखान आणि सुंदरा वीस वर्षांनी समोर आले होते.आता पाहूया पुढे.
महाराज चिंतित झाले,कारण जितका वेळ जाईल तेवढी बाहेरून मदत यायची शक्यता वाढणार होती."बहिर्जी,आपल्याला गढीच्या मागील बाजूकडून हल्ला करता येईल का?"महाराजांनी विचारले.
बहिर्जी निराशेने म्हणाला,"मागील बाजूकडे पूर्ण काटेरी जंगल आहे महाराज."महाराज अस्वस्थ होते.
इकडे खविसखान आणि मुबारक सूंदराला पाहून अवाक झाले आणि चिडलेही,"इसे उस वक्त उठाकर जनाने मे रखना चाहिए था."
खविसखान म्हणाला.त्यावर हसत मुबारक म्हणाला,"आता ठेवू अब्बा,आम्हीपण चाखू चव मुरलेल्या...."
हे ऐकताच धोंडिबा चिडला,"तुमच्या दोघांची डोकी उडवून पायाशी ठेवतो का नाही बघा."चकमक सुरू झाली.सुंदरा आणि महादेव यांच्या मदतीला रुपाजी आणि त्याचे शुर मावळेही होते.रक्ताचे पाट वाहू लागले.धोंडिबा आणि सुंदरा प्रचंड आवेगात लढत होते.आता इथून कोणीही जिवंत जाऊ शकणार नाही.
तेवढ्यात सुंदरा म्हणाली,"रुपाजी,ह्या बाप लेकानी पकडलेल्या पोरींना सोडवा."
रुपाजी आणि सखाराम तिकडे धावले.सुंदरा प्रत्यक्ष कालिमाता भासत होती.अंगावर जखमा होऊनसुद्धा ती थांबली नव्हती.अखेर तो क्षण आला सुंदरा उर्फ हौसा आणि खविसखान समोरासमोर आले.आजवर यासाठीच वाट पाहिली होती.महिपतीमामा, हैबती पाटील, तारा,सुनंदा आणि तिचा लाडका तान्हा महादेव या सर्वांच्या पासून सुंदराला दूर नेणारा.
एका मनिनीला दारोदार भटकायला भाग पाडणारा कितीतरी आया बहिणींना नासवनारा खविसखान.सुंदराने हल्ला केला.तलवारीला तलवार भिडली.प्रत्यक्ष भवानी सुंदराच्या अंगात संचारली होती.
सर्रकन एका वारात त्याच्या दंडावर घाव झाला.सुंदरा हसली,"इतक्या लवकर नाही मारणार तुला."
तिकडे मुबारक आणि धोंडिबा भिडले.तलवारीचे आवाज जंगल व्यापून उरले होते.इतक्यात सुंदराला चारही बाजूंनी घेरले.ती तरीही आटोपत नव्हती. खविसखानाने संधी साधून सुंदरावर मागून वार केला.
वार कोणीतरी अंगावर झेलला,"ह्यावेळी नाही खान,वीस वर्षांपूर्वी माझ्या गावाशी,माणसांशी गद्दारी केली.आता नाही."
तेवढ्यात सुंदरा खानावर चालून गेली.इकडे धोंडिबा आणि मुबारक लढत होते.दोघांवर असंख्य वार झाले होते.अचानक धोंडिबाने पवित्रा घेतला आणि एका घावात मुबारकचे मुंडके उडाले.ते पाहून खविसखान चवताळून धावून जाऊ लागला आणि त्याचा पायच गुडघ्यात उडवला सुंदराने.त्यानंतर सुंदरा बेभान होऊन वार करत राहिली. खविसखान मातीत मिळाला आणि त्याचे सैन्य पळत सुटले.
बेभान सुंदराला धोंडिबाने जाऊन सावरले आणि म्हणाला,"आई,मी तुझा महादेव.आबाना तुला शोधून आणीन असे वचन देऊन आलो होतो."
सुंदरा भानावर आली,"धोंडिबा ,नाही महादेव..."तिला डोळ्यांसमोर तोच तान्हा महादेव दिसू लागला.सुंदरा आणि महादेव तेवढ्यात त्या पडलेल्या माणसाकडे गेले.त्याने सुंदराला वाचवले होते.त्याला उचलले.
मावळ्यांना मागे फिरायला सांगितले.इकडे महाराज बाहेर थांबून होते.मोहनाने पाहिले की तेलाची कढई उडवायला पाहिजे.मोहना सुभान्या आणि अब्दुल आत होते.मोहना म्हणाली,"अब्दुल आपल्याला गढीच्या भिंतीवर जायला पाहिजे.पागेतून तिथे जायला वाट आहे."
तिघेही घोड्याच्या पागेत पोहोचले.मोहनाने दरवाजा शोधला.भिंतीवर पोहोचताच मोहना ओरडली,"रस्त्यात येईल त्याला कापा,कढई उलटेपर्यंत थांबू नका."
बहिर्जी चोर दरवाजा मार्गे आत जायचा प्रयत्न करत होते. चिमणीने त्यांना आत नेले.बहिर्जी रंगो वाकडा कुठेय ते शोधायला सांगून भराभर भिंतीवर चढले. तोवर मोहना वेगाने पुढे जात होतीच.मोहनाने शिताफीने कढई जवळ जायचा मार्ग शोधला.
तिला तिथे पाहताच पहारेकरी ओरडले,"कोण रे तू?मारा ह्याला."मोहना पुरुष वेषात लढू लागली.घमासान चालू झाले.आठ दहा शिपयांशी मोहना लढत होती.एवढ्यात तलवारीच्या वाराने डोक्यावरचा पटका उडला.ते पाहून एकजण म्हणाला,"आयला,ही तर बाई हाय."
तेवढ्यात दुसऱ्या बाजूने हल्ला झाला,"ती एकच न्हाई,अजून एक हाय."
तुळसा पोहोचली होती. मोहनाने कढई बांधलेला एक दोर कापला आणि मोहनावर मागून वार झाला.तेवढ्यात तुळसा धावून गेली,"मोहना दोर काप,ह्यांना मी बघते."
मोहनाच्या डोळ्यापुढे अंधारी येत होती. सर्व हिंमत एकवटली आणि मोहनाने दोर कापले.कढई घरंगळत खाली गेली.गढीत पोहोचायच्या मार्गावरचा अडथळा दूर झाला.बहिर्जी ओरडले,"तुळसा,मोहनाला घिउन जा, दरवाज खोलतो मी."तुळसने मोहनाला पाठीशी बांधले आणि बाहेर पडली.
महाराज आणि मावळे आत घुसले.गढी पडली. जावळीवर भगवा फडकला पण...हनुमंत राव मोरे चतुर होते.त्यांनी चंद्रराव मोरेना बाहेर काढले आणि रायरीच्या किल्ल्यावर आश्रय घेतला.इकडे बहिर्जी नाईक ह्यांनी पळून जायच्या तयारीत असलेल्या रंगो वाकड्याला कैद केले.स्वराज्याच्या काळजात असलेली एक जखम भरून निघाली.
बहिर्जी नाईक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आखलेली सगळी गणित जमून आली.तेवढ्यात एक हेर धावत आला,"राज तिकड जंगलात रुपाजी देशमुख काही पोरींना सोडवून घेऊन आल्यात."
राजे म्हणाले,"त्यांना आत येऊ द्या."
रुपाजी आत आले.त्यांच्या बरोबर आजूबाजूच्या गावातील खविसखान आणि मुबारकने पकडलेल्या पोरी होत्या.रुपाजीने राजांना मुजरा केला,"राज,त्या खानान पकडलेल्या ह्या पोरी हाय.त्या म्हणत्यात की आता आमासनी परत घरात घेणार न्हाईत."
राजे चिडले,"का नाही घेणार?बहिर्जी ह्या प्रत्येक पोरीला घरी पोहोचवायची व्यवस्था करा.सोबत आपले खलिते द्या.तरीही नकार दिला तर ह्या पोरींना राजगड सांभाळेल."
महाराजांचे बोलणे ऐकून त्यातील एकजण पुढे आली,राज,आता बिनघोर जाणार घरला.न्हाई घेतल त्यांनी तरी तुम्ही पाठीशी हाय."
महाराज हसले,"आक्का,स्वराज्य आपल्या लोकांसाठी आहे.कधीही ये राजगड खुला आहे."
त्या पोरींची व्यवस्था करून राजे पुढे बोलू लागले,"आता थेट रायरी,थांबायच नाही.मावळ्यांना सांगावे द्या."
बहिर्जीकडे वळून महाराज म्हणाले,"बहिर्जी,तुमच्या माणसांचे मान सन्मान रायरी जिंकल्यावर."ते ऐकून रुपाजी म्हणाला,"राज,तुमची शाबासकी हाच आमचा मान."रायरीवर चालून जायची तयारी झाली.
बहिर्जी आणि मावळे पुढच्या लढाईसाठी जाणार.सुंदराला निरोप मिळाला.तिने तडक बहिर्जीची भेट घेतली,"नाईक,अर्धवट थांबवू नका.आम्हाला मोहिमेत लढू द्या."
नाईक म्हणाले,"आक्का,पण तुझी काही माणसे जखमी आहेत. माझं आईक,तुमि हितच थांबा.राज परत येताना भेटणार हाय."
तेवढ्यात पांडू आणि महादेव म्हणाले,"नाईक जे जखमी न्हाईत त्यांना लढू द्या की. आव राज लढाईवर जाणार आन आमी माग रहायचं."
नाईक हसले,"बर,जे जखमी न्हाईत त्यांना घ्या सोबत."सुंदरा आणि महादेव तंबूत आले.मोहना अजून बेशुद्ध होती.सुंदराला ज्याने वाचवलं तो ही शुध्दीवर नव्हता.तरीही तो दौलती असेल असच तिला वाटत होत.
सुंदराने बकुळामावशी आणि बजाकाका दोघांना बोलावले,"मावशी,मी आणि धोंडिबा पुढच्या मोहिमेवर जातोय.आपली जखमी माणस इथ राहतील त्यांची काळजी घ्या."
बकुळा म्हणाली,"खविसखान मारला,आता पुढ जायला पाहिजे का?"
सुंदरा तिच्या जवळ गेली,"मावशी,इथून पुढे मी लढणार नाही.पण प्रत्यक्ष महाराजांच्या सोबत रणांगणावर मरण आले तरी चालेल."
सुंदरा आणि महादेव पुढील तयारीला लागले.सुंदराने सर्वांना बोलावले,"ज्यांची इच्छा आहे ते पुढ येतील.थांबायच असेल तर थांबा."
तसे सगळेजण म्हणाले,"आक्का,जगलोय तुझ्या संग आन मेलो तरी तुझ्या संग."
इकडे रंगो वाकड्याला महाराजांपुढे सादर केले.महाराज म्हणाले,"स्वराज्यात एका स्त्रीशी बदअंमल करून तुम्ही इथे आसरा घेतला.पण लक्षात ठेवा हे स्वराज्य आहे.आया बहिणींच्या अब्रूशी खेळणाऱ्याला इथे माफी नाही."
वाकडा गुर्मीत म्हणाला,"मी माझ्या गावात काय बी करीन,तुमि कोण मला शिक्षा देणारे."
महाराज आता संतापले,"खामोश,बहिर्जी ह्याच तेच करा जे रांझ्याच्या पाटलाच केलं.चौरंग...."
ते ऐकताच वाकडा कोसळला.महाराज निघून गेले.बहिर्जीनी ईशारा केला. रंगो वाकडा हे आता सगळ्यांसाठी उदाहरण झाले.स्वराज्यात गुन्हा केला तर तुम्हाला माफी नाही.
महाराज रायरीकडे कूच करत होते.इकडे मोहना दुसऱ्या दिवशी शुध्दीवर आली.तिला समजले की सुंदरा आणि इतर सगळेजण पुढे मोहिमेवर गेले.मोहना म्हणाली,"आक्का, महाराजांना आता परत भेटता येईल का मला?एकदा राजांना पाहिले की मेले तरी चालले असते."
तिचे बोलणे ऐकून शेजारचा माणूस म्हणाला,"पोरी,अस बोलू नको.सुंदरा यील परत.राज भेटत्याल तुला."
मोहना त्याच्याकडे पहात राहिली,"बाबा,तुम्ही आमचा खूप दिवस पाठलाग करताय?तुम्ही नक्की आहात कोण?का आमच्या मागे येताय?तो हसला,"सुंदरा येऊ दे,सगळी कोडी उलगडतील.
कोण असेल तो माणूस?हौसा आणि हैबती एक होतील का?मोहना आणि धोंडिबा यांचे काय होईल?सुंदराच्या फडाचे काय?
सगळी रहस्य उलगडतील पुढील अंतिम भागात
सगळी रहस्य उलगडतील पुढील अंतिम भागात
वाचत रहा.
मी मानिनी.....
क्रमशः
मी मानिनी.....
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा