भाग 43(अंतिम)
(सदर कथानक इतिहासाच्या पार्श्वभूमीवर असले तरी कोणत्याही ऐतिहासिक सत्याचा दावा करत नाही. सदर कथा पूर्णपणे काल्पनिक आहे)
मागील भागात जावळी जिंकण्याची मोहीम फत्ते झाली.तरीही चंद्रराव मोरे हाती लागला नाही.त्यामुळे रायरीच्या किल्ल्यावर चालून जायचे महाराजांनी ठरवले.सुंदरा आणि तिची माणसे त्याही मोहिमेत सहभागी झाली.आता पाहूया पुढे.
मोहना शुद्धीवर आली.तिने आसपास पाहिले तर तिला सुंदरा दिसेना.पण तिला तो म्हातारा माणूस दिसला.आता मात्र मोहनाने त्याला ओळखले,"बाबा,तुम्ही गेले कित्येक महिने आमचा पाठलाग करताय.कोण आहात तुम्ही?आमच्यामागे का येताय?"
तो म्हातारा आता बोलू लागला,"पोरी,म्या दौलती पाटील.माझ्याबद्दल हौसा कधीतरी बोलली आसल."
मोहनाला हे नाव ऐकल्याचे आठवत होते.तेवढ्यात दौलती म्हणाला,"म्या सांगतो पोरी.ध्यानात ठेवायला तसं काम केलं न्हाई कधी.हौसा आन हैबती यांची गोष्ट तुला ठाऊक आसल ना?"
मोहना म्हणाली,"व्हय,माझ्या आक्काच्या आयुष्यातलं आनंदाचं दिस व्हत ते."
दौलती उदास होत म्हणाला,"खरय पोरी,त्या दिसाना नजर लागली माझी.सुड घ्यायचा म्हणून म्या त्या खविसखानाला गावात आणल.पर माझी भन आणि तान्ही रखमा हरवली.माझा संसार संपला.हौसाचा महादेव आईला पारखा झाला.समद म्या मदत केली म्हणून.पर देवानं शिक्षा दिली.आई वारली आन बायकु खुळी झाली."
एवढे बोलून दम लागल्याने तो थांबला.मोहनाला प्रचंड राग आला,"मंग आता कशाला आलाईस हित?"
दौलती हात जोडून म्हणाला,"हौसा मेली आस गावातल्या सगळ्यांना वाटलं.पर तिला एकान तमाशात पाहिलं.मग म्या महादेवला गाठल,त्याला समद सांगितलं.तिला शोधत गावोगाव भटकलो आणि एक दिवस सुंदरा झाल्याली हौसा सापडली."
मोहना म्हणाली,"आता काय पायजे तुला?"दौलती म्हणाला,"हौसा आन तिच्या लेकाची भेट व्हायला पायजे आन माझी तान्ही रखमा कुठं हाय?"एवढे बोलून तो गप्प बसला.
रायरी तसा अजिंक्य,पण त्याची नीट काळजी घेतलेली नव्हती आणि मोऱ्यांचे मनोबल खचले होते.मावळ्यांनी रायरी जिंकली.तिथली व्यवस्था लावून महाराज जावळीकडे परत फिरले. जावळी विजयात बहुमोल कामगिरी केलेल्या सगळ्यांचे कौतुक करायचे होते.महाराज जावळीला पोहोचले आणि रयत आनंदाने त्यांचे स्वागत करू लागली.
त्यानंतर महाराज बहिर्जी नाईकांना म्हणाले,"बहिर्जी,इथल्या मोहिमेत लढलेल्या तुझ्या सगळ्या मंडळींना बोलावून घ्या."
बहिर्जी म्हणाले,"आज्ञा महाराज."
महाराजांनी बोलावले,एवढा निरोप मिळताच सगळ्यांचं काळीज आनंदाने फुलून आले.रुपा, बिजलि,चिमणी, बकुळा सगळ्याजणी तयार व्हायला लागल्या.मोहना आणि सुंदरा म्हणाल्या,"आवरा ग,राज भेटणार.आज खूप आनंदाचा दिवस आहे."
सगळेजण महाराजांना भेटायला दरबारात पोहोचले.आजवर फडावर लोकांच्या नजरा वेगळ्या असत आणि आज.
राजांनी सुंदराला पुढे बोलावल,"आक्का,तुम्ही एवढी बहाद्दुरी गाजवली.त्यासाठी हा मानाचा शेला आणि सोन्याचं कड."
सुंदराचे डोळे पाण्याने भरले.राजांना मुजरा केला.त्यानंतर ती म्हणाली,"महाराज एक विनंती आहे."
महाराजांनी खुणावताच सुंदरा बोलू लागली,"महाराज आजवर नाचले ते फक्त खविसखान मारायला.इथून पुढं..."
महाराज मंद हसले,"काळजी करू नका.बहिर्जी,ताईला मानाने तिच्या गावी पोहोचवा.सोबत ह्या सगळ्या लोकांच्या पोटा पाण्याची व्यवस्था करा."
त्यानंतर महाराज मोहनाकडे वळले,"पोरी,विजसुद्धा तुझ्या तलवारीला शिवू शकणार नाही.स्वराज्याच्या ह्या लेकीला मानाची तलवार आणि पैठणी."
मोहना मुजरा करत म्हणाली,"राज,यापुढ सुद्धा ही तलवार स्वरायाच्या कामी येईल."सगळ्यांचा सन्मान झाला.शिवाबाराज ह्या डोळ्यांनी पाहिले,सगळ्यांची मने आनंदाने तुडूंब भरली होती.
परत येताच दौलती हौसाच्या समोर उभा राहिला,"हौसा,मी भयंकर चूक केली.तुझ आईपण,सौभाग्य,मान सगळ हिसकवल.देवानं त्याची शिक्षा दिली.माझी लाडकी बहिण,माझी तान्ही रखमा दोघी गेल्या.माझा संसार धुळीला मिळाला.पर आता तू परत चल पाटलाला भेट.तुझ्याबिगर अपुरा हाय हैबती."
सुंदरा त्याला उठवत म्हणाली,"वासना आणि सूड माणसाला सुचू देत नाही.तुमची बहीण आणि तिचे बाळ नाही वाचवू शकले पण.....तुमची लाडकी लेक मात्र वाढवली.तिला आईची माया देऊन माझं आईपण जगले मी."
दौलती म्हणाला,"म्हणजे,माझी रखमा....कुठाय?"
सुंदरा मोहनाकडे बोट दाखवून म्हणाली,"ही बघ,तुझी रखमा.स्वतःच्या जीवापाड जपली आहे."
मोहना मात्र संतापली,"हा माणूस माझा बाप,माझा आई,बाप सगळ तूच आक्का."
सुंदरा तिच्याजवळ गेली,"मोहना, बाळा माणूस चुकतो.त्याला सुधारायला हव.तुझी आई वाट बघत असेल तुझी."
तेवढ्यात दौलती म्हणाला,"हौसा,तू माझी लेक मला परत दिलीस,हा तुझा लेक महादेव."
धोंडिबा हसला,"काका,आईला सांगितलं म्या समद.पर तुमच्यावर एक माणूस रागावल हाय.त्याची समजूत काढील म्या."
दौलती म्हणाला,"हौसा,तू परत चल.सगळा गाव पाटलिनीची वाट बघतोय.तू गाव सोडून गेलीस आणि गावातील लोकांनी तेव्हापसून पोरीबाळी लढायला शिकवल्या.खानाला तू दिल्याली झुंज प्रत्येक लेकीला शिकिवतो आमी."
तेवढ्यात चिमणी आणि सूभाण्या हात जोडत म्हणाले,"आक्का,निघतो आता."
सुंदरा म्हणाली,"कुठ निघाला?आजवर ह्या सुंदराने कोणालाही अर्ध्यात सोडलं नाही."
छबू म्हणाला,"आक्का,मला मातर नग निऊस.माझ्यापायी तुला काही सोसायला लागल तर मला नाही चालायचं."
सुंदरा हसली,"तुमि सगळ्यांनी माझा आधार बनून मला इथवर पोचवलं.आता सगळ्यांनी सोबत रहायचं."तेवढ्यात नाईक आल्याचा सांगावा आला.
बहिर्जी आत आले.धोंडिबा आणि पांडूच्या पाठीवर थाप दिली,रुपाजी मिठीत घेत म्हणाले,"शाब्बास पोरांनो."
मोहनाकडे वळून म्हणाले,"पोरी,वाघीण हायेस जिथं जाशील तिथं पाणी काढशील."
सुंदरा म्हणाली,"नाईक तुम्ही विश्वास ठेवला आणि हे सगळ जमल."
नाईक हसले,"विश्वास ह्या महादेव आणि पांडूच्या डोळ्यात हाय,विश्वास ह्या मोहनाच्या तलवारीत हाय,विश्वास प्रत्येक मावळ्यांच्या गर्जनेत हाय."
सुंदरा म्हणाली,"बरोबर आहे नाईक.हे स्वराज्य उभ राहील आणि कोणीही लहानगी हौसा कधीच सुंदरा होणार नाही."
नाईक गरकन वळले,"माझ्या भनी ह्या स्वराज्यान तुला शबुद दिलाय.त्योच पुरा करायला आलो.महाराजांनी तुम्हा समद्यांसाठी शेती, घर सगळी व्यवस्था करायचा हुकूम दिलाय.महादेव पाटील व्हईल ना व्यवस्था."
महादेव मुजरा करत म्हणाला,"राजांचा शब्द पुरा केला जाईल नाईक."
सुंदरा म्हणाली,"नाईक,उद्या निघतोय.ह्या बहिणीला विसरू नका.कधीही हाक मारा."नाईक सर्वांचा निरोप घेऊन परत गेले.
सुंदरा म्हणाली,"मावशी,उद्या निघायचं.आज माझा लेक माझ्या सोबत जेवणार."बकुळा डोळे पुसत म्हणाली,"तू फकस्त नाव सांग.कोणताबी जिन्नस सांग."
त्या संध्याकाळी एक आई आपल्या लेकराला जेऊ घालत होती.कितीतरी वर्षांची माया आज भरून येत होती.महादेव डोळ्यांनी मोहनाला इशारा करत होता.सुंदरा हसत म्हणाली,"दौलत भाऊजी आता गावाला पोहचलो की तयारी करा.मुलगी लग्नाची हाय."सगळे हसू लागले.
दुसरा दिवस उजाडला.प्रवास सुरू झाला.पाच मुक्काम झाले. बकुळा म्हणाली,"आजचा शेवटचा मुक्काम.उद्या आपुन पोचणार."बिजली म्हणाली,"आक्का,मला ते..."
सुंदरा हसली,"रुपाजी देशमुख लग्नाचं म्हणाल ना.रूपे तुझा जीव पांडूवर जडलाय ते पण समजल आहे मला.चिमणे तू माझ्या सखारामला सांभाळ.गणपा तुला मात्र नंतर शोधते बाबा पोरगी."
रुपा लटके रागवत म्हणाली,"काय आक्के,सगळ्यांचं मन वळखल तू."
सुंदरा म्हणाली,"पोरीनो तुम्हाला जन्म दिला नसला तरी माया आईची आहे."सगळेजण आता उद्याच्या प्रवासाला आतुर होते.
दुसऱ्या दिवशी प्रवास सुरू झाला.सुंदरा आता परत हौसा झाली.मनाने आणि शरीरानेसुद्धा.वीस वर्षांपर्वी ज्या वेशीवर तिला नग्न करून अपमानित आणि जखमी सोडून खान निघून गेला.आज त्याच वेशीवर हौसा उभी होती.स्वतःचा मान,सन्मान सगळे परत मिळवून.
सुंदराला कायमचे मागे ठेउन हौसा उतरली.तिला आठवत होते महिपतीमामा,मामी आणि .....तेवढ्यात पाण्याने भरलेल्या डोळ्यांसमोर एक धिप्पाड पण थोडी वयस्कर आकृती साकार होऊ लागली.हैबती पाटील समोर पाहून हौसा क्षणभर थबकली.
तेवढ्यात तोच ठाम आणि धारदार आवाज कानावर आला,"पाटलीनबाई का थांबलाय? तुमि ह्या हैबती पाटलांची पत्नी आहात.मानाने गावात या."
क्षणात हौसाच्या मनात आलेल्या सर्व शंका मिटून गेल्या. हौसा त्याच आत्मविश्र्वास आणि प्रेमाने पुढे निघाली.समोर तिच्या जिवलग मैत्रिणी तारा आणि सुनंदा तिचे औक्षण करायला उभ्या होत्या.आज एक मर्दिनी पुन्हा एकदा मानिनी बनून परत आली होती.
असंख्य संकटे झेलून लहानगी हौसा आज पुन्हा एकदा पाटलांच्या घरात सून म्हणून येत होती कायमची.तिला आजूबाजूला दिसत होते तिचे भाऊ,घरात राबणारी तिची आई,विठ्ठल नाम गाणारा तिचा बाप आणि तिच्या बरोबर होता तिचा जीवनाचा जोडीदार.
जो तिचा मान जपणार होता.मानिनी आणि मर्दिनी अशी स्त्रीची दोन्ही रूपे आज हौसाने सिद्ध करून दाखवली होती.सगळ्या गावात आनंद साजरा केला जात होता.एक नवे पर्व सुरू झाले आणि दुष्टचक्र संपले होते.
समाप्त.
दीर्घकथा लिहायचा पहिलाच प्रयत्न.तोही ऐतिहासिक पार्श्वभूमीवर.वाचकांनी दिलेल्या उदंड प्रेम आणि प्रतिसादाने कथा यशस्वीरित्या पूर्ण झाली.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा