Login

मी सिंहगड बोलतोय.

ऐकुया सिंहगडाची कहाणी त्याच्याकडून...!
मी सिंहगड बोलतोय


नमस्कार मंडळी! कसे आहात सगळे? ज्या स्वराज्यात सगळे आनंदाने जगताय ना? छत्रपती शिवाजी महाराजांनी मिळवून दिलेल हे स्वराज्य राखताय ना!

काय? मी कोण म्हणताय? अहो मी सिंहगड. ओळखलत का मला? भाषे वरुण थोडं ओळखण कठीण झालं असेल नाही? होणारच! तुम्ही म्हणत असाल हा जुन्याकाळातील गड तरी कसा शुद्ध बोलतो. अहो आम्ही पुण्या जवळचे. त्यात इतकी वर्षे होऊन गेली कित्येक लोकं इथे येतात बोलतात त्यांचं ऐकून ऐकून आता झाली सवय.

पण पूर्वीपेक्षा सध्या आमची अवस्था खूपच बिकट झाली आहे. हो पण जीर्ण झालो असलो तरी तसाच स्थिर आणि भक्कम उभा आहे आणि असाच राहणार शेवट पर्यंत. अगदी आपल्या सिंह तानाजी मालुसुरेंसारखा. अजूनही छाती फुलून येते ओ आपल्या मावळ्यांचे आणि तानाजी रावांचे कौतुक ऐकताना. आता ही ती रात्र तशीच्या तशी डोळ्यांसमोर उभी राहते.

त्यावेळेस उदयभान राठोड त्याच्या सेने सोबत गडावर हाजिर होता. त्याचं कोणीच काही वाकडे करू शकत नाही अशा दिमाखात तो होता. त्याने सर्वत्र हैदोस मांडला होता. हे राजांना बघवलं नाही. मी पहिला स्वराज्यातचं होतो पण नंतर शहाजी राजांच्या सुटले साठी पुरंदरच्या तहात मला देखील मुघलांच्या ताब्यात देण्यात आले. इतर गडांसोबत कोंढाणा देखील त्यांच्या ताब्यात गेला. कोंढाणा म्हणजे कोण म्हणताय? कोंढाणा म्हणजे मीच आत्ताचा सिंहगड म्हणजे पूर्वीचा कोंढाणा.

तर झालं असं की उदयभान्यान नुसता सगळी कडे हैदोस माजवला होता. महाराजांनी त्याची खोड मोडायचं ठरविले. त्यासाठी त्यांनी स्वतः स्वर व्हायचं ठरवलं. ही गोष्ट सुभेदारांच्या कानावर पडली. त्यांनी राजांसमोर विडा उचलला की ' कोंढाणा मीच फत्ते करणार. आधी लगीन कोंढाण्याचं मग आमच्या रायबाच.' असं बोलून निघाला ना ओ गडी पोराच लग्न मागं टाकून अवघ्या ५०० मावळ्यांना सोबत घेऊन.

४ फेब्रुवारी १६७० ची ती भयानक रात्र. तानाजी राव सगळी खबर काढून जिथे शत्रूचे लोकं कमी असतील अशा गडाच्या मागच्या बाजूला आले. तिथून कोणी चढू शकत नाही असा शत्रूचा अंदाज होता. पण त्यांना तेव्हा मराठ्यांच्या ताकदीचा अंदाज नव्हता. तिथे पोहोचल्यावर काही निवडक मर्दानी मावळे घेऊन तानाजी राव कड्यावरुन वर चढू लागले. इतरांना दरवाजा जवळ थांबण्यास सांगितले. आतून त्यांनी दरवाजा उघडल्यावर बाकीच्यांनी तिथून यायचं ठरलं. काही वेळातच ते कठीण असा कडा पार करून आपले मावळे तानाजी रावांसोबत वर गडावर पोहोचले. पण बघता बघता मुघलांना ह्याची खबर लागली सगळे सावध झाले.

दोन्ही दल समोरासमोर आले युद्ध जुंपले. दरवाजा उघडा करून आपल्या इतर मावळ्यांना देखील आत घेतला. सपासप वार चालू झाले. मी रक्ताच्या थारोळ्यात नाहु लागलो. मग युद्ध चालू असतानाच तो मुघलांचा राठोड आणि आपले सुभेदार आले की ओ समोरासमोर! मग काय? अहो मग काय दोघांमध्ये जोरदार तलवार बाजी झाली. दोघे एकमेकांवर भारी. पण लढता लढता आपल्या सुभेदांच्या हातची ढाल तुटली आणि तिथे गफलत झाली. आता काय करावं? वेळेला दुसरी ढाल उपलब्ध नाही. मी मनात म्हणत होतो ' मला शक्य असते तर धावत जाऊन त्यांना दुसरी ढाल दिली असती .'

पण असं मला नाही करता आलं आणि त्यांना आपल्या डाव्या हाताची ढाल करावी लागली. ते त्या हातावर वर झेलू लागले. त्यांची ती लढाई इतकी भारी की लढता लढता दोघे ही खाली कोसळले. शेलार मामांनी देखील शेवटला त्यांच्यात मध्यस्थी केली.

आता सुभेदार पडले ही बातमी मावळ्यांमध्ये पसरल्यावर सगळे माघारी फिरायला लागले. मला देखील त्या क्षणी उदासी वाटली.

पण हे सारं सूर्याजी मालुसरे म्हणजेच तानाजी ज्यांचे बंधू ह्यांना बघावले नाही. त्यांनी थेट जाऊन खाली जाणारे दोर कापले आणि मावळ्यांना त्यांच्या कर्तृत्वाची जाण करून दिली. मग काय आपले मावळे फिरले मागे आणि उरलेले सगळे मुघल कापून गड काबीज केला.

ही बातमी रायगडावर पोहोचली. गड मिळाल्याचा महाराजांना आणि आऊ साहेबांना आनंद झाला. पण पुढे सुभेदारांबद्दल ऐकून फार दुःख झालं. त्यांना माहीत होतं तानाजी राव गड मिळवणारच. पण त्यांचं असं सोडून जाणं असं अपेक्षित नव्हतं. अहो कसला तो गडी, पिळदार मिश्या, धिप्पाड देह. सिंहच जणू! म्हणूनच तर त्यांच्या मृत्यूची बातमी ऐकताच राजे दुःखाने म्हणाले,"गड आला, पण माझा सिंह गेला."

माझ्या वर पुन्हा भगवा फडकताना बघून माझी छाती फुलून गेली. सुभेदारांचे दुःख मनात तसेच कायम राहिले. कोंढाणा पुन्हा स्वराज्यात मिळाल्याचा सर्वत्र आनंद पसरला. काय म्हणता? कोंढाणा हे नाव कोठून कसं आलं? हा तर आमच्या इतिहासाचा एक भाग होता ह्या आधी देखील खूप मागचा इतिहास आहे.

ते असं की, पूर्वी ह्या डोंगरावर कौंडण्य ऋषी ह्यांनी इथे तपश्चर्य केली त्यामुळे ह्या संपूर्ण डोंगराचे नाव कोंढाणा असा पडले. इथे हा किल्ला सर्वात आधी महादेव कोळी लोकांच्या ताब्यात होता. हा किल्ला म्हणजे पुण्यनगरचे मुख्यच मानले जायचे. इथे महादेव कोळी राजा नागनाथ (नागा) कोळी ह्यांचे राज्य होते.

इ. स. १३६० मध्ये दिल्लीचा सुलतान मोहम्मद तुघलकाने दक्षिण स्वारी केली. तेव्हा त्याला मंगोल आक्रमणापासून सुरक्षित ठेवण्यासाठी राजधानी देवगिरी येथे हलविले. पण त्या काळी दख्खनच्या भागात कोळी राजांचे वर्चस्व होते. म्हणून त्यांनी कोळी साम्राज्यावर आक्रमण केले. त्यावेळी त्यांच्यात आणि स्थानिक राजा नागनाथ कोळी ह्यांच्यात मोठे युद्ध झाले.

पुढे जनतेला घेऊन त्यांनी किल्ल्यात आश्रय केला. त्यांनी जेमतेम वर्षभर किल्ला लढविला. त्यांचे ते पराक्रम पाहून सुलतान देखील चकित झाला. पुढे रसद तुटल्यामुळे त्यांनी किल्ला सोडून दिला. पण सुलतान देखील दिल्लीला निघून गेला. पुढे मग निजामशाही पर्यंत हा किल्ला महादेव कोळी सामंताकडे होता.

बघा मंडळी असा हा आमचा थोर इतिहास. ज्याचे वर्णन करू तितके कमी. आणि आज ही आमची अवस्था काय? तर अशी जीर्ण पडखळ? छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज असते तर आता गोष्टच वेगळी होती. त्यांनी गडकोट राखले आणि स्वराज्य उभे केले. पण त्यांच्या नंतर आता आमची किंमत कमी होते गेली असा दिसतंय.

फक्त माझीच ही अवस्था नाही. माझे हे समोर दिसणारे मित्र बंधू पुरंदर, राजगड, लोहगड, तोरणा आणि अजून सर्वत्र पसरलेले न दिसणारे देखील. त्यांची ही अवस्था आता अशीच झाली आहे. आम्ही आपल्या मावळ्यांचे बलिदान नाही विसरलो. पण ही माणसं बहुतेक ते विसरू लागली आहेत. त्यांनी जर तेव्हा ते पराक्रम घडविले नसते तर आजचा दिवस तुमच्या नशिबात कधीच नसता इतकं ध्यानात ठेवा.

म्हणून त्यांचं स्मरण म्हणून तरी आमच्या सारखी वास्तू जपा. ज्याने करून पुढच्या येणाऱ्या पिढ्यांना त्याची जाण राहील. त्यांना आपल्या मावळ्यांच्या रक्ताची किंमत कळेल.

बघा आज कोणी ऐकायला मिळालं म्हणून किती बोलून गेलो मनातले साठलेले सगळे. नाही तर लोकं येतात त्यांच्या तोंडून मावळ्यांच कौतुन ऐकत बसायचं. आता बघुया कोण येतं नवीन काय ऐकायला मिळतं ते. चला निरोप घेतो तुमचा. आणि हो सांगितलं तेवढं ध्यानात असूद्या!