मी तुझ्या पाठीशी आहे भाग ५
स्वप्नाला तिच्या सासूबाई हळूहळू घरातील सगळ्या चालीरीती शिकवत होत्या. स्वप्नाही त्यांच्याकडून सगळं शिकून घेत होती. स्वप्ना तिच्या सासूबाईंच्या तालमीत तयार होत होती.
एके दिवशी घरातील सगळी कामे आवरल्यावर स्वप्ना मोबाईलमध्ये टाइमपास करत बसलेली होती.
"स्वप्ना, तुला कधी नोकरी करण्याची इच्छा झाली नाही का? किंवा आपणही चार पैसे कमवावे असं वाटलं नाही का?" स्वप्नाच्या सासूबाईने तिला विचारले.
"आई, बारावीनंतर मला फॅशन डिझायनिंग किंवा हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करण्याची इच्छा होती, पण बाबांनी कडाडून विरोध केला. घरात दोन ते तीन दिवस कर्फ्यू लागला होता. नेहमीप्रमाणे मला माघार घ्यावी लागली. तेव्हापासून काही वेगळं करावं, हा विचारचं डोक्यातून काढून टाकला." स्वप्नाने उत्तर दिले.
"स्वप्ना, तू आत्ता काही शिकत का नाही? माझ्यावेळी एका स्त्रीसाठी शिक्षण व नोकरीच्या संधी कमी होत्या. आता तसं राहिलं नाहीये. तू एखादा छोटासा कोर्स केला, तरी तुला काहीही करता येईल. आपल्या घरात जास्त कामं नसतात. मोकळा वेळ बराच आहे, तर या वेळेचा सदुपयोग करावा, असं मला वाटतं.
पुढे जाऊन तुला जेव्हा काहीतरी करावे असे वाटेल, त्यावेळी तुझ्याकडे वेळ नसेल. घराकडे लक्ष द्यायला मी आहेच." स्वप्नाच्या सासूबाई म्हणाल्या.
सासूबाईंचं बोलणं ऐकून तिच्या डोळ्यात पाणी आले. सासूबाई तिच्याजवळ गेल्या, त्यांनी तिच्या डोळ्यातील पाणी पुसले व त्या म्हणाल्या,
"स्वप्ना, काय झालं?"
"आई, माझा एवढा विचार माझ्या आईने सुद्धा केला नव्हता." स्वप्नाने सांगितले.
यावर तिच्या सासूबाई म्हणाल्या,
"स्वप्ना, असा विचार आपल्या आईबद्दल करु नकोस. ती वेळ वेगळी असेल. आईला त्यावेळी तुला कितीही सपोर्ट करावा वाटला असेल, पण आईचं बाबांसमोर काहीच चाललं नसेल. आता तो विचार करु नकोस.
मला एवढंच वाटतं की, प्रत्येक स्त्रीने आपल्या पायावर उभे रहावे. पैश्यांसाठी नवऱ्यावर अवलंबून न राहता स्वतः काहीतरी करावे. कोणतीही वेळ सांगून येत नसते. आयुष्यात जे संकट आपल्यासमोर उभे राहिल, त्या संकटाशी दोन हात करण्यासाठी आपण तयार असायला हवे. मी बोलायला लागले की, अजून बोलतचं राहिलं.
रात्री राहुल सोबत बोलून पुढे काय करायचं? ते ठरव. राहुल नाही म्हणाला, तर मला सांग. मी त्याच्याशी बोलते."
स्वप्नाने मान हलवून होकार दिला.
राहुल घरी आल्यावर स्वप्नाने आपला विचार त्याच्याकडे बोलून दाखवला. थोडा विचार करुन राहुल म्हणाला,
"स्वप्ना, तुला कुकिंग मध्ये इंटरेस्ट आहे का?"
"हो, आहे ना." स्वप्नाने उत्तर दिले.
"तू फॅशन डिझायनिंग पेक्षा बेकरी आयटम व केक बनवण्याचा कोर्स कर, ते तुला जास्त फायदेशीर होईल. सध्या त्याला जास्त मागणी आहे. आपल्याकडे जागा भरपूर आहे. आपण एखादं किचन त्यासाठी बनवू शकतो. तू पहिले कोर्स कर, मग त्यासाठी लागणारे एकेक साहित्य आपण घेऊ."
राहुलने सांगितले.
राहुल व सासू-सासऱ्यांची खंबीर साथ आपल्याला लाभणार हे कळल्यावर स्वप्नाने पुन्हा स्वप्न बघायला सुरुवात केली.
राहुलने चांगल्यात चांगले क्लासेस शोधले. बेसिक क्लास झाल्यावर लगेच स्वप्नामध्ये आपण याच क्षेत्रात वेगळं काहीतरी करु शकू हा आत्मविश्वास निर्माण झाला होता.
आपण बनवलेले केक कोण विकत घेणार? हा प्रश्न तिच्यापुढे निर्माण झाला होता, त्यावर तिनेच उपाय शोधून काढला होता. शेजारच्या मुलीच्या बर्थडेला ती केक तयार करुन घेऊन गेली होती. स्वप्नाने तयार केलेला केक उपस्थित असलेल्यांना खूप आवडला. त्यातील काही जणांनी तिला ऑर्डर द्यायला सुरुवात केली.
स्वप्ना बिस्कीट व नानकटाई बनवायलाही शिकली होती. स्वप्नाच्या घरी कोणीही आलं की, ती त्यांना नानकटाई टेस्ट करायला द्यायची. स्वप्नाला आता बिस्कीट व नानकटाईच्या ऑर्डर येऊ लागल्या होत्या.
सुरुवातीच्या काळात स्वप्ना केक, बिस्कीट गॅसवर कुकर किंवा कढईत बनवायची. केकचा बिजनेस चांगला सुरु झाल्यावर स्वप्नाने स्वतः कमावलेल्या पैशांतून ओव्हन खरेदी केले.
स्वप्नाला तिच्या सासूबाई सुद्धा मदत करु लागल्या होत्या. स्वप्नाचा बिजनेस मस्त सुरु झाला होता. स्वप्नाच्या सासऱ्यांनी तिला डबल डोअरचे फ्रीज घेऊन दिले. सासू-सासऱ्यांना तिचं विशेष कौतुक वाटायचं.
पुढील सहा महिन्यात स्वप्नाने गोड बातमी दिली होती. गरोदर असताना सुद्धा स्वप्नाने आपलं काम सुरु ठेवलं. राहुल व स्वप्नाचे सासू-सासरे तिला मदत करत होते.
क्रमशः
©®Dr Supriya Dighe
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा